होमिओपॅथी कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या धक्कादायक आत्महत्येचं गूढ काय आहे?

फोटो स्रोत, PRAVINBHAI SHRIMALI
- Author, लक्ष्मी पटेल
- Role, प्रतिनिधी, बीबीसी न्यूज गुजराती
- Reporting from, Lakshmipatel210
"मी वैतागले आहे. माझ्या कॉलेजमधील प्राध्यापक माझ्याशी गैरवर्तन करतात. ते मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा देखील प्रयत्न करतात."
उर्वशी श्रीमाली या मेहसाणातील विद्यार्थिनीनं आत्महत्या केली. उर्वशीनं ही बाब तिच्या वडिलांना, प्रवीणभाई श्रीमाली यांना सांगितली होती. प्रवीणभाई यांनी स्वत: ही गोष्ट बीबीसीला सांगितली.
ते म्हणाले, "मी माझ्या लेकीला समजू शकलो नाही. ती मोकळेपणानं फारसं काही बोलू शकली नाही. मला वाटत होतं की, शिक्षकांना गुरु म्हटलं जातं. माझी मुलगी तिथे डॉक्टर होण्यासाठी गेली होती. मात्र, या लोकांमुळे ती रुग्ण बनली आणि तिला नाईलाजानं हे जग सोडावं लागलं."
"या लोकांना शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याबरोबर अशी घटना पुन्हा घडणार नाही," असंही ते म्हणाले.
उर्वशी श्रीमाली ही गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील बसना येथील मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती.
19 वर्षांच्या उर्वशीनं बुधवारी (29 जानेवारी) दुपारी वसतिगृहातील तिच्या खोलीत आत्महत्या केली.


त्यामुळे उर्वशीच्या वडिलांनी मेहसाणा तालुका पोलिस ठाण्यात मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच प्राध्यापकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणं, शारीरिक आणि मानसिक छळ करणं आणि अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे.
उर्वशीच्या आत्महत्येनंतर मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शनं केली. तसंच, जबाबदार प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली.
उर्वशीच्या वडिलांची नेमकी काय तक्रार केली आहे?
उर्वशीचे वडील प्रवीणभाई यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीचा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता.
तक्रारीत प्रवीणभाई यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या मुलीनं म्हणजे उर्वशीनं त्यांना सांगितलं होतं की "माझ्या (उर्वशीच्या) महाविद्यालयातील प्राध्यापक सुरेश राव वासनिक माझ्यावर मोठ्या आवाजात ओरडून मला धमकावतात. ते मला नापास करण्याचीही धमकी देतात. प्राध्यापक प्रशांत नुवल मला तीनवेळा लिहण्याची शिक्षा देतात. ते मला एकाच ठिकाणी सलग दोन ते तीन तास उभं राहायला लावतात. ते मला शिवीगाळ करतात."
उर्वशीनं जे वडिलांना सांगितलं होतं ते तक्रारीत नोंदवताना प्रवीणभाई म्हणाले, "ते माझ्या (उर्वशीच्या) शरीराला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतात. प्राध्यापक वाय चंद्र बोस मला वर्गात एकटीला बोलावतात आणि माझ्यावर अश्लील किंवा घाणेरड्या कॉमेंट करतात. प्राध्यापक संजय रिठे जेव्हा मला प्रात्यक्षिक करायला सांगतात तेव्हा ते सर्वांसमोर माझा अपमान करतात. ते कोणत्यातरी बहाण्यानं मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात."

फोटो स्रोत, PRAVINBHAI SHRIMALI
प्रवीणभाई यांनी मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची देखील तक्रार केली. प्रवीणभाईंनी सांगितलं की, जेव्हा त्यांच्या मुलीनं याबाबत जेव्हा प्राचार्यांकडे तक्रार केल्यानंतरसुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.
पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत प्रवीणभाई यांनी उर्वशीचं म्हणणं असं सांगितलं,
"मी (उर्वशी) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश जिंगा पाटील यांच्याकडे माझा जो छळ होत होता त्याबद्दल तक्रार केली. मात्र त्यांनी प्राध्यापकांचं म्हणणं मानलं. त्यांनी मला ते सहन करण्यास सांगितलं आणि भविष्यात त्याबद्दल तक्रार न करण्यास सांगितलं. मी आता वैतागले आहे."
उर्वशीचे वडील म्हणाले, "अर्थात त्या दिवशी देखील मी माझ्या मुलीला सांगितलं की, मी येईन आणि तुझ्या प्राचार्यांना भेटेन. गरज पडली तर आपण त्या महाविद्यालयातून तुझा प्रवेश देखील रद्द करू."
प्रवीणभाई यांनी केलेल्या तक्रारीत असंही म्हटलं आहे की, मृत उर्वशीच्या मानेवर लाल रंगाचे व्रण होते आणि तिच्या छातीवर जखम होती.
प्रवीणभाई यांनी बीबीसीला सांगितलं, "माझ्या मुलीच्या शरीरावर खुणा होत्या. तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्याचा अहवाल जेव्हा समोर येईल तेव्हाच सत्य काय आहे ते समोर येईल."
'उर्वशीच्या गुन्हेगारांना मी शिक्षा करेन'
उर्वशीचे वडील प्रवीणभाई यांनी बीबीसीला सांगितलं, "29 जानेवारीला ज्या दिवशी ही घटना घडली, तेव्हा माझ्या मुलीनं सकाळी 11 वाजता मला फोन केला होता. तिनं मला सांगितलं की तिला महाविद्यालयात जायचं नाही."
"ते ऐकून मला वाटलं की मी आजारी पडणार आहे. मात्र मला हे माहित नव्हतं की तेव्हा मी माझ्या मुलीचा आवाज शेवटचा ऐकतो आहे."
प्रवीणभाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1:29 वाजता त्यांना उर्वशीच्या महाविद्यालयातून फोन आला की उर्वशीनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
त्याबद्दल प्रवीणभाई सांगतात, "13 जानेवारीला, माझी मुलगी एका सहलीवरून घरी आली होती. त्यावेळेस तिनं मला तिच्या प्राध्यापकांकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल सांगितलं होतं. मला या गोष्टीचं दु:ख आहे की मी माझ्या मुलीला समजू शकलो नाही."
"माझी मुलगी फारच भावनिक होती. ती दयाळू होती. ती घरात आम्हाला डास देखील मारू द्यायची नाही. एखादा पक्षी मेला तर तिला खूप दु:ख व्हायचं. ती मेलेल्या पक्षांना पुरायचीदेखील," असं प्रवीणभाई रडत लेकीबद्दल सांगत होते.
उर्वशीला न्याय मिळवून देण्याबाबत ते म्हणाले, "मी उर्वशीच्या गुन्हेगारांना शिक्षा करेन. माझ्या मुलीच्या बाबतीत जे झालं, ते पुन्हा दुसऱ्या कोणाच्या मुलीबाबत घडता कामा नये."
या प्रकरणाबाबत पोलिसांचं काय म्हणणं आहे?
पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) मिलन पटेल या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयात विद्यार्थिनीनं केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणात पाच आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा देखील समावेश आहे."
त्यांनी पुढे सांगितलं, "पोलिसांनी सर्व पाचही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. पोलिसांनी आरोपींची चौकशी आधीच केलेली असल्यामुळे रिमांडची मागणी करण्यात आली नाही."
इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अशाप्रकारे छळ होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत का? असा प्रश्न विचारला असता मिलन पटेल म्हणाले, "आम्ही याबाबत चौकशी करत आहोत. संबंधित लोकांचे जबाब घेतले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यावर याबद्दल आम्ही काही सांगू शकू."

फोटो स्रोत, KETAN PATEL
मिलन पटेल म्हणाले, "पोलिसांनी फॉरेन्सिक टीमबरोबर (FSL)मृत विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील खोलीची तपासणी केली आणि त्यांना तिथे एक सुसाईड नोट सापडली. सुसाईड नोटसह खोलीतील इतर वस्तू किंवा साहित्य जप्त करण्यात आलं आहे."
"त्या वस्तू फॉरेन्सिक सायन्सच्या प्रयोगशाळेत पुढील तपासासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुसाईड नोटमध्ये काय लिहिण्यात आलं आहे, याबद्दल या क्षणी मी काहीही सांगू शकत नाही. यासंदर्भात तपास सुरू आहे."
सुसाईड नोटबद्दल विचारलं असता उर्वशीचे वडील प्रवीणभाई म्हणाले, "माझ्या मुलीच्या अत्यंसंस्कारासाठी मी माझ्या गावी आलो आहे. त्यामुळे मला त्याबद्दल काहीही अधिक माहित नाही."
आरोपींची नावं
उर्वशीच्या वडिलांनी, प्रवीणभाई श्रीमाली यांनी ज्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, त्या आरोपींची नावं पुढीलप्रमाणे आहेत,
- सुरेश राव वासनिक
- प्रशांत चंदमालजी नुवल
- वाय. चंद्र बोस
- डॉ. संजय रिठे
- डॉ. कैलाश जिंगा पाटील
या संपूर्ण घटनेसंदर्भात मर्चंट होमिओपॅथी महाविद्यालयाचे विश्वस्त राजूभाई दलिया यांच्याशी बीबीसीनं संपर्क साधला असता, त्यांनी त्याबाबत बोलण्यास नकार दिला. या प्रकरणातील आरोपींचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यांच्याकडून प्रतिसाद मिळताच त्याचं म्हणणं इथं अपडेट केलं जाईल.

महत्त्वाची सूचना :
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











