माणसाच्या प्रगतीला वेग देणाऱ्या डिझेल इंजिनची गोष्ट, आधी शेंगदाणा तेलावरच्या इंजिनचाही केला प्रयोग

रुडॉल्फ डिझेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डिझेल इंजिनचा शोध लावणारा हा महान शास्त्रज्ञ आपल्यावर साठलेलं कर्ज आणि व्याजाचा परतावा कसा करावा, याच्या चिंतेनं ग्रस्त होता.
    • Author, बीबीसी प्रतिनिधी

रात्रीचे साधारण 10 वाजले असतील. रुडॉल्फ डिझेलने नुकतंच जेवण संपवलं आणि एस एस ड्रेस्डेन या आपल्या जहाजातील केबिनमध्ये तो पहुडायला गेला.

रात्री घालायचे त्याचे कपडे पलंगावर पडलेले होते. पण अंगावरचे दिवसाचे कपडे काढून रात्रीचे कपडे चढवण्याची तसदी त्याने घेतली नाही.

डिझेल इंजिनचा शोध लावणारा हा महान शास्त्रज्ञ आपल्यावर झालेलं कर्ज आणि व्याजाचा परतावा कसा करावा, या चिंतेनं ग्रस्त होता. त्याची सध्याची आर्थिक परिस्थिती एवढं मोठं कर्ज फेडणं त्याला शक्यच नव्हतं.

या विचारांनीच तो जहाजाच्या केबिनमध्ये हतबल होऊन बसला होता. त्यानं रोजनिशी उघडली आणि त्यादिवशीच्या म्हणजेच 29 सप्टेंबर 1913 च्या तारखेला फक्त 'एक्स' असं एक अद्याक्षर कोरून ठेवलं. आता त्याचा अर्थ काय होता, हे फक्त त्यालाच माहिती.

या जहाजात सफारीवर निघण्याआधी रुडॉल्फ डिझेलनं त्याला जितके पैसे मिळवता येतील तितके रोख जमवून ती रोख रक्कड एका बॅगेत भरली व ती बॅग आपल्या पत्नीला दिली. यासोबत त्याच्या सगळ्या आर्थिक व्यवहाराचे कागदपत्र सुद्धा पत्नीला देऊन ठेवले‌.

पैसे आणि कागदपत्रांची ही बॅग आपल्या बायकोला देताना तो म्हणाला की, "पुढचा एक आठवडा ही बॅग उघडू नकोस. नंतर काय ते तुला कळेलच."

पत्नीला वाटलं की काहीतरी गोपनीय माहिती वगैरे असेल त्यामुळे तिला काही तशी शंका आली नाही. आता जहाजात केबिनमध्ये बसलेला डिझेल केबिन बाहेर आला.

त्याने आपला कोट काढला, त्याची व्यवस्थित घडी घालून तो नीट दुमडून तिथल्या कपाटात ठेवून दिला. त्यानंतर जहाजाच्या कड्यावर जाऊन एकदा खाली घोंघावणारं समुद्राचं पाणी बघितलं व थेट पाण्यात उडी मारली.

आपल्या कुटुंबासमवेत रुडॉल्फ डिझेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आपल्या कुटुंबासमवेत रुडॉल्फ डिझेल
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता त्याने खरंच स्वतःहून उडी मारली होती का? याचं उत्तर ठामपणाने कोणीच देऊ शकत नाही. कारण ज्ञात माहितीनुसार तेव्हा तो त्या जहाजावर एकटाच होता.

पण रुडॉल्फ डिझेलचा मृत्यू त्यानं समुद्रात उडी टाकून आत्महत्या केल्यानं झाला, हाच सर्वमान्य समज आहे. पण काही जणांनी अशीही शंका व्यक्त केली होती की, ही आत्महत्या नव्हे तर हत्या होती.

कोणीतरी रुडॉल्फला पाण्यात ढकलून दिलं होतं. रुडॉल्फच्या मृत्यूसंदर्भात अशी अनेक षडयंत्र रचली गेली आहेत. पण डिझेल इंजिनचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फला मारण्यात कोणाचं हित असू शकतं?

आता ही षडयंत्र अगदीच अनाठायी अथवा निराधार होती, असंही म्हणता येणार नाही.‌ कारण रुडॉल्फच्या आत्महत्येला (की हत्येला?) असलेली पार्श्वभूमी. 1892 ला पुढे भविष्यात क्रांती घडवून आणणारं डिझेल इंजिन हे रुडॉल्फ डिझेलनं विकसित केलं होतं.

या शोधामुळे जसा बहुतांश जणांचा फायदाच झाला तसा काही मोजक्या जणांचा तोटाही झाला होता. या डिझेल इंजिनच्या शोधामुळे ज्यांना आता नुकसान होणार होतं त्यांनीच रुडॉल्फची हत्या केल्याचा दावा आजही अनेक जण करतात. अर्थात हत्येच्या या दाव्याला पुष्टी देणारा कुठलाही ठोस पुरावा आजही उपलब्ध झालेला नाही.

लाल रेष
लाल रेष

का भासली इंजीन तयार करण्याची गरज?

या सगळ्या षडयंत्राची कारणं समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. रुडॉल्फच्या मृत्यूच्या 40 वर्ष आधी आणि त्याने डिझेल इंजिनचा शोध‌ लावला त्याच्या 20 वर्ष आधी म्हणजेच 1872 पासून सुरूवात करू.

भांडवलशाहीच्या विकासाच्या टप्प्यात औद्योगीकरणानं नुकताच जोर पकडला होता. औद्योगीकरणाची प्राथमिक गरज असणाऱ्या रेल्वे आणि कारखान्यांना उर्जेचा पुरवठा वाफेच्या इंजिनद्वारे होत होता. कारण अर्थातच अजून डिझेल इंजिनचा शोध लागलेला नव्हता.

शहरांमध्ये अजूनही लोक फिरण्यासाठी घोडे / टांगा वापरायचे. त्यावर्षी इक्विन नावाच्या एका नव्या फ्ल्यूनं अमेरिकन शहरांमध्ये हाहाकार माजवला होता. शहरांचा सगळा कारभार थांबला होता.

सगळी दुकानं बंद पडलेली होती, रस्ते ओसाड पडलेले होते, हॉटेलांमध्ये एक माणूसही पाहायला मिळायचा नाही. रस्त्यांवर जागोजागी कचऱ्याचा ढीग जमा झालेला होता. त्यावेळी शहरांची अवस्था काय बिकट झाली असेल याचा फक्त अंदाज तुम्ही लावू शकता.

समजा अमेरिकेतील एका साधारण शहराची लोकसंख्या 5 लाख असेल. तर या शहरात त्यावेळी 1 लाख घोडे असतील. कारण शहरात वाहतुकीचं साधन मुख्यत: हे घोडेच होते.

शहराचं कामकाजच ठप्प पडल्यामुळे या 1 लाख घोड्यांच्या मलमूत्रानी शहराची काय अवस्था केली असेल? त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच सुरू नसल्यामुळे शहरात घाणीचं साम्राज्य पसरलं होतं.

तर इतकी सगळी अडचण निर्माण करणाऱ्या या घोड्याला पर्याय ठरू शकेल असं स्वस्त, टिकाऊ छोटं इंजिन बसवलेल्या गाड्या उपलब्ध असतील तर? शहरातील रस्त्यांवर धावू शकतील अशा स्वयंचलित गाड्या बाजारात आल्या तर तो कोणाला नको असेल?

डिझेल इंजिन

फोटो स्रोत, Getty Images

आता याचे अनेक पर्याय शोधता आले असते. वाफेचं इंजिन तर त्यावेळी कार्यरत होतंच. रेल्वे या वाफेच्या इंजिनवरच धावत होत्या.

दुसरा एक पर्याय होता इंटर्नल कंम्बशन इंजिनचा. ते त्यावेळी पेट्रोल, गॅस आणि गनपावडरवर चालत असे. पण हे दोन्ही प्रकारचे इंजिन्स वापरणं त्यावेळी व्यावहारिक नव्हतं. कारण त्यांची अकार्यक्षमता.

उपलब्ध इंधनानं निर्माण केलेल्या उष्णतेपैकी फक्त 10 टक्के उर्जेचाच वापर हे इंजिन करत होतं. बाकी 90 टक्के इंधन किंवा त्यातून निर्माण होणारी उर्जा ही वायाच जात असे. त्यामुळे शहरातील रोजच्या वाहतूकीसाठी अशी इंजिनं बसवलेली वाहनं वापरणं परवडणारं नव्हतं.

म्हणूनच लोक अजूनही घोडेच वापरत होते. घोड्यांची जागा घेऊ शकेल, अशा परवडणाऱ्या आणि टिकाऊ पर्यायांचा शोध सुरू होता.

नेमका तेव्हा रुडॉल्फ डिझेल विद्यार्थीदशेत होता. विद्यार्थी असतानाच म्युनिचमधील रॉयल बेव्हरियन पॉलीटेक्निक संस्थेत थर्मोडायनामिक्सवरील एक व्याख्यान त्याने ऐकलं. हे व्याख्यानच त्याचं आयुष्य बदलण्यासाठी एका अर्थानं कारणीभूत ठरलं.

व्याख्यानातून मिळाली प्रेरणा

व्याख्यानाचा विषय होता चालू वापरात असलेल्या इंजिन्सची मर्यादा. हे व्याख्यान ऐकल्यानंतर चालू वापरात असलेल्या इंटर्नल कंम्बशन इंजिनची 10 टक्के कार्यक्षमता ही फार कमी आहे आणि व्याख्यानात सांगितलेल्या सिद्धांताचा अवलंब करून ती वाढवता येऊ शकते, असं रुडॉल्फ डिझेलला वाटलं. त्यामुळे इंधनानं निर्माण केलेल्या जास्तीत जास्त उष्णतेला ऊर्जेत रूपांतरीत करुन इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तो लगेच कामाला लागला.

या एकाच ध्येयाचा झपाटल्यासारखा त्याने पाठलाग सुरू केला. अर्थात 100 टक्के कार्यक्षमता असणारं इंजिन विकसित करणं अशक्य होतं. पण किमान 25 टक्क्यांपर्यंत ही कार्यक्षमता आपल्याला वाढवता येऊ शकते, असा विश्वास आता रुडॉल्फला निर्माण झाला.

तेव्हा इंधन जाळल्यानंतर त्याच्या एकूण उष्णतेपैकी 25 टक्के ऊर्जा निर्माण करणारं तंत्रज्ञान हे तसं बरंच क्रांतीकारी ठरलं असतं. कारण आधीच्या 10 टक्क्यांच्या तुलनेत याची कार्यक्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढणार होती. आजही जगातील सर्वात आधुनिक आणि महाग डिझेल इंजिनची कार्यक्षमता ही 50 टक्केच आहे.

डिझेल इंजिन

फोटो स्रोत, Getty Images

पेट्रोल आणि डिझेल इंजिन यांच्या कार्यरचनेत मोठा फरक असतो. पेट्रोल इंजिन इंधन आणि हवेचं मिश्रण घडवून आणत त्यात दाब निर्माण करतं. मग स्पार्क प्लगच्या मदतीनं हे मिश्रण पेट घेतं. पण हा दाब कधी कधी जास्त झाला की, इंजिन आग लागून पेट घेण्याचा धोका असतो.

यामुळं पेट्रोल इंजिनमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण जास्त असतं. इंधन आणि हवा एकत्र दाबली गेल्यामुळे इंजिनमधील तापमान गरजेपेक्षा जास्त होण्याची शक्यता पेट्रोल इंजिनमध्ये असते. हे तापमान नियंत्रणाबाहेर वाढल्यामुळे इंजिनलाच आग लागण्याचे प्रकार होतात.

डिझेल इंजिनमध्ये जो दाब निर्माण होते त्यात फक्त हवाच दाबली जाते. इंधनावरील दाबाचा प्रश्नच उद्भवत नाही. फक्त हवा दाबली गेल्यामुळे ती तितक्याच प्रमाण तापते जेवढी इंधन पेट घेण्यासाठी गरजेची आहे.

त्यामुळे तापमान अनियंत्रित प्रमाणात वाढून आग वगैरे पेटण्याची भीती नसते आणि प्रत्यक्षात इंधनावर दाब न पडता सुरुवातीला फक्त हवाच दाबली गेल्यामुळे इंजिनची कार्यक्षमता देखील वाढते.

निर्माण होणाऱ्या उष्णतेतून जास्तीत जास्त उर्जा वापरली जाते. अर्थात त्यासाठी पेट्रोलच्या तुलनेत डिझेल इंजिनची रचना थोडी अधिक गुंतागुंतीची असते. त्यामुळे तुम्ही पाहाल की पेट्रोलवर चालणारी गाडी ही डिझेलवर चालणाऱ्या गाडीपेक्षा स्वस्त असते. मात्र दीर्घकाळात डिझेलवर चालणारी गाडीच परवडते.

कारण खरेदीची किंमत जास्त असली तरी कार्यक्षमताही जास्त असल्यामुळे डिझेल इंजिनच्या गाड्या कमी इंधनात जास्त अंतर धावतात.

डिझेल इंजिन

फोटो स्रोत, Getty Images

इतका महत्वाचा डिझेल इंजिनचा शोध लावल्यानंतरही रुडॉल्फ डिझेल दिवाळखोरीत कसा निघाला ? असा साहजिक प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण रुडॉल्फ डिझेलनं विकसित केलेलं पहिलं डिझेल इंजिन हे अगदी प्राथमिक अवस्थेतील होतं.

ते काम करत असताना अनेक अडचणी आल्या. ज्यामुळे सुरुवातीला ज्या गुंतवणूकदारांनी डिझेल इंजिनच्या या प्रयोगात पैसे गुंतवले होते ते त्यांनी परत काढून घेतले. गुंतवणूकदारांना पैसे परत करावे लागल्यामुळे रुडॉल्फ डिझेलचं मोठं नुकसान झालं.

आधुनिक अर्थव्यवस्थेला आकार देणारा इतका महत्वाचा शोध लावल्यानंतरही हा शास्त्रज्ञ पैसे मिळणं तर सोडाच पण असलेले पैसे गमावत आणखी कर्जात बुडाला, हा एक दैवदुर्विलासच म्हणावा लागेल.

पण तरी रुडॉल्फ डिझेलनं हार मानली नाही. तो हे प्राथमिक अवस्थेतील डिझेल इंजिन विकसित करत राहिला. यातल्या दोषांवर काम करत त्यात वरचेवर सुधारणा घडवून आणण्यासाठी त्याने प्रयत्न केले. यात सुधारणा घडवून आणल्यानंतर डिझेल इंजिन इतर कोणत्याही इंजिन पेक्षा किती जास्त कार्यक्षम आहे, याची प्रचिती जगाला झाली.

जर्मनीला हवे होते हक्क

एकतर डिझेल हे पेट्रोलपेक्षा कमी खर्चिक आणि कमी क्लिष्ट इंधन आहे. कच्च्या तेलापासून पेट्रोल बनवण्यासाठी त्यावर फार मोठी प्रक्रिया करावी लागते. त्या तुलनेत डिझेल बनवण्यासाठी जास्त प्रक्रिया करावी लागत नाही.

शिवाय डिझेल इंजिनमध्ये इंधन प्रत्यक्षात जाळायची गरज पडत नसल्यामुळे इंजिनमधील तापमान नियंत्रणात राहतं. वाहन अथवा वाहनांचे सुटे भाग पेट घेण्याची शक्यता फार कमी असते. यामुळे खासकरून लष्करासाठी डिझेल इंजिनची वाहनं फार सोयीची झाली.

युद्धभूमीवरील गोळीबार आणि बॉम्बच्या वर्षावात आधीच पेट घेण्यासाठी अनुकूल असलेली पेट्रोल इंजिनची वाहनं वापरणं लष्कराला अडचणीचं ठरत होतं. युद्धभूमीवर ही वाहनं पेट घेऊन नुकसान झाल्याच्या अनेक दुर्घटना लष्करसोबत घडत होत्या. त्यामुळे लष्कराने लगेच डिझेल इंजिनची वाहनं वापरायला सुरुवात केली.

1904 साली तर फ्रान्सच्या लष्करानं डिझेल इंजिन असलेल्या पाणबुड्या वापरायला सुरुवात केली होती‌. तिथून मग हळूहळू डिझेल इंजिनचं प्रस्थ वाढलं आणि वाफेवर चालणारे इंजिन कालबाह्य व्हायला सुरुवात झाली.

'डिझेल' चित्रपटातील दृश्य. पॉल वेगेनर यांच्यासोबत रुडॉल्फ डिझेलच्या भूमिकेतील कलाकार विली बिर्गेल

फोटो स्रोत, Getty Images

रुडॉल्फ डिझेलचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे तर हत्या होती, असा दावा करणारे लोक हीच गोष्ट अधोरेखित करतात. ज्यावेळी रुडॉल्फ डिझेलचा मृत्यू झाला म्हणजेच 1913 ला पहिल्या महायुद्धाचं वारं घोंघावायला सुरुवात झाली होती.

विशेषत: ब्रिटन आणि जर्मनीतील वाद विकोपाला पोहोचले होते. कुठल्याही क्षणी युद्धाची ठिणगी पेटणार, हे स्पष्ट होतं. जर्मनी आणि ब्रिटन एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी दवडायला तयार नव्हते. त्यात अशा वेळी आपल्या डिझेल इंजिनचं पेटंट ब्रिटिश नौदलाला विकण्याचा विचार रुडॉल्फ करत होता. किंबहुना त्यासाठीच तो आता जहाजानं लंडनला निघाला होता.

हे डिझेल इंजिन भविष्यात किती क्रांतीकारी ठरणार आहे, याची जाणीव ब्रिटन आणि जर्मनीला होता. विशेषत: येऊ घाललेल्या युद्धात ज्या सैन्याकडे डिझेल इंजिन असेल त्या सैन्याला युद्ध जिंकणं सोपं होणार होतं.

रुडॉल्फ डिझेलनं डिझेल इंजिन वापरण्याचे हक्क फक्त आपल्याला द्यावेत, अशी जर्मनीची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी रुडॉल्फ डिझेलची मनधरणी करण्याचाही वारंवार प्रयत्न केला. पण जर्मनीला आपलं तंत्रज्ञान / शोध विकायचा नाही, यावर रूडॉल्फ ठाम होता.

विरोधी ब्रिटिश सैन्याच्या हाती हे तंत्रज्ञान लागलं तर युद्धात आपलं मोठं नुकसान होईल, याची पूर्ण जाणीव जर्मनीला होती. त्यामुळेच रुडॉल्फ डिझेल आपल्या इंजिनचं पेटंट ब्रिटिश नौदलाला विकायला लंडनला निघालेला असताना जर्मन सैन्यानं त्याची हत्या केली, असा दावा काही जणांनी केला. किंबहुना ब्रिटनमधील काही वर्तमानपत्रांमध्ये अशा आशयाच्या बातम्याही छापून आल्या.

वाफेच्या इंजिनला मागे टाकले

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर व्यावहारिक अथवा व्यावसायिक रूपात डिझेल इंजिनचा वापर खऱ्या अर्थानं सुरू झाला. लष्कराव्यतिरिक्त सुद्धा रोजच्या दळणवळणात डिझेल इंजिन किती उपयुक्त ठरू शकेल, याचा सुगावा बाजारपेठेला लागला.

दळणवळणाच्या जड वाहतूकीत डिझेल इंजिननं मोठी क्रांती आणली. 1920 च्या दशकात डिझेल इंजिन बसवलेले ट्रक्स दिसायला सुरुवात झाली. 1930 दशकात डिझेल इंजिनवर चालणाऱ्या रेल्वे सुरू झाल्या.

यानंतर डिझेल इंजिनची उपयुक्तता जहाजांमध्येही सिद्ध झाली. इतकी की 1939 साली जगातील एक चतुर्थांश सागरी व्यापार वाहतूक ही डिझेल इंजिनवर सुरू होती.

दुसरं महायुद्ध संपेपर्यंत तर डिझेल इंजिनमध्ये अनेक सुधारणा झाल्या. अजस्त्र मालवाहतूक करू शकणारे मोठ मोठे जहाज वाहून नेऊ शकतील, असे ताकदवान आणि प्रचंड कार्यक्षम डिझेल इंजिन आता विकसित झाले होते‌.

थोडक्यात कुठल्याही अतिशयोक्तीविना डिझेल इंजिन हे शब्दशः जागतिक मालवाहतूकीचंच आता इंजिन बनलं होतं.

रुडॉल्फ डिझेल

फोटो स्रोत, Getty Images

जगाच्या व्यापारी वाहतुकीवरील एकूण खर्चापैकी 70 टक्के खर्च हा फक्त इंधनाचा असतो. अतिशय कार्यक्षम आणि कमी खर्चिक अशा डिझेल इंजिनमुळे जागतिक व्यापार वाहतूक अतिशय सुकर बनली.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि जागतिक घडामोडींचे विश्लेषक वॅक्लव्ह स्मिल तर म्हणतात की, "डिझेल इंजिनचा जर शोध‌ लागला नसता आणि वाफेच्या इंजिनवर वाहतूक आपल्याला करावी लागली असती तर जागतिक व्यापार पर्यायानं जागतिकीकरणाचाच विकास अतिशय संथ गतीने झाला असता."

अर्थतज्ज्ञ ब्रायन आर्थर मात्र याबाबतीत वॅक्लव्ह स्मिल यांच्याशी सहमती दर्शवत नाहीत. ते सांगतात की, डिझेल इंजिन नसतं तर जागतिकीकरणाची प्रक्रियाच खोळंबली असती, असं ठामपणाने म्हणता येणार नाही.

इतिहास बघितला तर विकासाची प्रक्रिया ही कधी थांबत नाही. 1914 पर्यंत तरी सगळी वाहतूक मुख्यत: वाफेच्या इंजिनवर होत होती. त्यानंतर डिझेलच्या इंजिनचा शोध लागला. कालांतराने या डिझेल इंजिनमध्ये प्रचंड सुधारणा होत गेल्या आणि ते वरचेवर अधिक कार्यक्षम बनलं.

डिझेल इंजिनच्या या वाढत्या कार्यक्षमतेमुळे वाफेचं इंजिन मागे पडलं. यामध्ये विशिष्ट औद्योगिक लॉबीसुद्धा कार्यरत होती. या लॉबीने डिझेल इंजिन अधिक कार्यक्षम व्हावं, यादृष्टीने संबंधित संशोधनात प्रचंड पैसा ओतला.

डिझेल इंजिन नसतं तर कदाचित हाच पैसा आणि संसाधनं वाफेच्या इंजिनवर संशोधन करून त्याला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी वापरली गेली असती. डिझेल इंजिनचा शोध‌ लागलाच नसता तरी आजपर्यंत मग वाफेच्या इंजिनमध्ये प्रचंड सुधारणा होऊन कदाचित ते सुद्धा तितकंच कार्यक्षम बनलं असतं.

आज जशा डिझेलवर धावणाऱ्या अलिशान गाड्या, जड वाहतुकीचे ट्रक्स रत्यावर धावताना दिसतात तशीच वाफेच्या इंजिनवर धावणारी वाहनं रस्त्यावर दिसली असती. थोडक्यात ब्रायन आर्थर यांच्या मते डिझेल इंजिन नसतं तरी इतर कुठल्या मार्गानं मानवानं पर्यायी वाहतूकीच्या साधनात तितकीच सुधारणा करून दाखवलीच असती.

ग्राफिक्स

आज रुडॉल्फ डिझेल यांचं नाव कच्च्या तेलापासून बनलेल्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनसोबत घेतलं जात असलं तरी स्वतः रुडॉल्फ डिझेलनंच इतर पर्यायी इंधनावर चालू शकणारे दुसरे इंजिनही बनवले होते‌.

कोळशापासून ते अगदी वनस्पती तेलापर्यंत अशा वेगवेगळ्या इंधनांचा वापर करू शकणारे इंजिन्स विकसित करण्याचा त्याने प्रयत्न केला. 1900 साली पॅरिसमध्ये भरलेल्या जागतिक प्रदर्शनात रुडॉल्फ डिझेलनं शेंगदाणा तेलावर चालणाऱ्या एका इंजिनचं प्रात्यक्षिक देखील सादर केलं.

अर्थात हे इंजिन तेव्हा अगदी प्राथमिक अवस्थेतील होतं. 1912 साली म्हणजेच मृत्यूच्या एक वर्ष आधी त्याने असंही भाकित केलं होतं की भविष्यात वनस्पती तेल हा इंधनाचा पारंपारिक (कच्च्या तेलापासून बनलेल्या) पेट्रोल / डिझेल इतकाच महत्वाचा स्त्रोत बनेल. त्याचं हे भाकीत काही खरं ठरलं नाही.

कदाचित हे भाकित करताना आपण अनावधानानं फार मोठी पर्यावरणवादी संकल्पना मांडतो आहोत, याचा अंदाज त्यालाही आला नसेल.

कारण त्यावेळी अजून हवामानबदल व जागतिक तापमानवाढ अशा समस्यांनी अजून डोकं वर काढलं नव्हतं. पण आजच्या संदर्भात बघायचं झाल्यास वनस्पती तेलांवर चालणारे इंजिन्स हे हवामान बदलाच्या जागतिक समस्येवर ठोस उपाय ठरू शकतात.

डिझेल यांचे कुटुंब.

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात रुडॉल्फ डिझेलच्या मृत्यूनंतर वनस्पती तेलावर चालणाऱ्या इंजिन्सचं संशोधन खोळंबलं आणि त्यावर पुढे काहीच काम झालं नाही. पण रुडॉल्फ डिझेलचा मृत्यू ही आत्महत्या नव्हे तर हत्या होती, असा दावा करणारा आणखा एक गट याच संदर्भात आणखी एक शंका उत्पन्न करतो.

त्यावेळी रुडॉल्फ डिझेलनं वनस्पती तेलावर चालणारं तितकंच कार्यक्षम इंजिन विकसित केलं असतं तर शेतकऱ्यांना (विशेषत: शेंगदाणे उत्पादकांना) मोठा लाभ झाला असता.

या शोधात शेतीचा चेहरामोहराच बदलण्याची ताकद होती. पण मग जमिनीखाली मिळणाऱ्या कच्च्या तेलाला इतका भाव कोणी दिला नसता.

वनस्पतीं तेलावर चालणारं इंजिन रुडॉल्फ डिझेलनं विकसित केल्यास कच्च्या तेलाची मागणी कमी होऊन आपलं फार नुकसान होईल, या भीतीनेच पारंपरिक तेल उत्पादकांनी (औद्योगिक ऑईल लॉबी) रुडॉल्फ डिझेलची हत्या केली, असा दावा काहीजण करतात.

वनस्पती तेलावरील इंजिनचा प्रयोग

कच्च्या तेलाचा उपसा आणि त्याच्या वापरातून गाड्यांमधून होणारं उत्सर्जन हवामानबदलासाठी कारणीभूत असणारा मुख्य घटक होता, हे आज आपल्याला कळून चुकलं आहे.

पर्यावरणाविषयी सजगता वाढू लागल्यानंतर आता जैविक इंधन (उदाहरणार्थ बायोडिझेल) मध्ये सुद्धा अधिक रस आज घेतला जातोय. पण जैविक इंधनावर चालणारे इंजिन आज डिझेल इंजिनला सक्षम पर्याय ठरू शकतील, असं ठामपणाने म्हणता येणार नाही. कारण जैविक इंधनाकडे उर्जेचा मुख्य स्त्रोत म्हणून पाहण्यात आज अनेक व्यावहारिक अडचणी आहेत.

हे जैविक इंधन बनवण्यासाठी शेतीचं उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढवावं लागेल. कारण अन्न पुरवण्याबरोबरच इंधन निर्मितीसाठी देखील शेतीवरच अवलंबून राहावं लागेल. इतक्या प्रमाणात शेती करण्यासाठी एवढी सुपीक जमीन आज उपलब्ध नाही.

शिवाय हवामानबदलामुळे वातावरणातील अनिश्चितता वाढल्यामुळे आज शेती आणखी जिकीरीची झाली आहे. उपलब्ध शेतजमिनीत आणि वातावरणात आहे त्या लोकसंख्येला खायला पुरेल इतकं अन्न‌ पिकवणं हेच एक आव्हान असताना जैविक इंधनाच्या निर्मितीसाठी अधिकचं पीक काढणं, फारच अवघड होईल. याने आधीच गगनाला भिडलेल्या अन्नधान्याच्या किंमती आणखी वाढतील.

अन्न हे जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्यामुळे त्याची किंमत इतर वस्तूंप्रमाणे कशीही वाढवली जाऊ शकत नाही. पण रुडॉल्फ डिझेलच्या काळात जैविक इंधनावर चालणारं इंजिन विकसित करणं आणि त्याला अधिमान्यता मिळणं सहज शक्य होतं. कारण तेव्हा एक तर शेतीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन उपलब्ध होती.

आजच्यासारखी अनिश्चित वातावरण आणि हवामानबदलाची समस्यादेखील अस्तित्वात नव्हती. त्यामुळे शेती करणं हे अधिक सोप्पं होतं. आजच्यासारखी सुपीक जमिनीची कमतरता नव्हती. शिवाय आजच्या तुलनेत तेव्हाची जगाची लोकसंख्याही फारच कमी असल्यामुळे फार मोठ्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी जास्त अन्न‌ पिकवण्याचं ओझंही शेतीक्षेत्रावर नव्हतं.

हे जैविक इंधनावरील इंजिन विकसित होऊन व्यावसायिक वापरात आले असते तर त्याचा आणखी एक मोठा फायदा जगाला झाला असता. शेतमालाची मागणी प्रचंड वाढल्यानं गरिब कृषीप्रधान राष्ट्रांचा विकास वेगाने व्हायला मदत झाली असती. पण दुर्देवानं हे वनस्पती तेलावर चालणारं‌ इंजिन नीट विकसित करण्याआधीच रुडॉल्फ डिझेलचा अकाली मृत्यू झाला आणि यातलं काहीच घडू शकलं नाही.

शिवाय तेल उत्पादकांच्या लॉबीने या क्षेत्रात नवनवीन संशोधन अथवा प्रगती होऊ नये, यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावली. अन्यथा आजचं जग कसं असलं असतं याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आज खाली तेल दडलेल्या जमिनीवरून राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारे वाद अथवा युद्ध हे सुपीक जमिनीवरून झाले असते.

म्युनिकमधील जर्मन संग्रहालयाच्या हॉल ऑफ ऑनरमध्ये रिलीफ पोर्ट्रेट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, म्युनिकमधील जर्मन संग्रहालयाच्या हॉल ऑफ ऑनरमध्ये रिलीफ पोर्ट्रेट

आता या सगळ्या जर तरच्या गोष्टी झाल्या. आणि इतिहासात जर - तरच्या गोष्टींना फारसा अर्थ नसते. मात्र, आजचं आधुनिक जग आणि अर्थव्यवस्था घडवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या डिझेल इंजिनच्या शोधकर्त्याचा असा करूण अंत होणं, निश्चितच वेदनादायी म्हणावं लागेल.

मृत्यूनंतर दहा दिवसांनी तिथल्या समुद्रात बोट चालवणाऱ्या एका शोधपथकाला रुडॉल्फ डिझेलचा मृतदेह सापडला. पण तोपर्यंत या मृतदेहाची अवस्था इतकी वाईट झाली होती की तो रुडॉल्फ डिझेलचाच मृतदेह आहे, ही ओळख पटवणं अशक्य होतं.

पण त्याने घातलेल्या जॅकेटमध्ये त्याचं पाकिट, छोटा चाकू आणि चष्म्याचा बॉक्स होता. त्याच्या मुलाने या वस्तूंची ओळख पटवली तेव्हा कुठे जाऊन तो मृतदेह रुडॉल्फ डिझेलचाच आहे, हे स्पष्ट झालं. अन्यथा अथांग सागरात त्याचा मृतदेह कुठेतरी गडून राहिला असता. त्याच्या मृत्यूच्या कारणाइतकाच गूढ बनून.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)