X-ray पाहून हाडांमधील फ्रॅक्चर शोधायला डॉक्टरांना होणार आता AI ची मदत

एक्सरे पाहून हाडांमधील फ्रॅक्चर शोधायला डॉक्टरांना होणार आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, फिलीपा रॉक्स्बी
    • Role, आरोग्य प्रतिनिधी

रुग्णाचा एक्स रे तपासताना फ्रॅक्चर झालेलं हाड शोधण्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची डॉक्टरांना मदत होऊ शकते, असा दावा इंग्लंडमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ ॲन्ड केअर एक्सलन्स या संस्थेनं केला आहे.

या संस्थेनं पार पाडलेल्या संशोधनातून एक्स-रे'चं विश्लेषण करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान अतिशय प्रभावी आणि अचूक असल्याचं समोर आलं आहे. यामुळे हाडासंबंधी रोगांचं निदान करणं आता डॉक्टरांसाठी सोपं होणार आहे. कमी वेळेत अचूक निदान होत नसल्यामुळे वारंवार तपासणीसाठी रूग्णालयात जाण्याची वेळ येणाऱ्या रूग्णांनाही यामुळे दिलासा मिळू शकेल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चार तंत्र या खास कामासाठी विकसित केली गेली असून ब्रिटनमधील सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच त्यांचा वापर सुरू केला जाईल, असं म्हटलं जात आहे.

अर्थात हे संशोधन अजून चालूच असून संबंधित पुरावे व डेटा गोळा केला जात आहे. पण आतापर्यंत समोर आलेल्या निष्कर्षातून हाडांमधील दुखापत शोधण्यात हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत झालंय. अर्थात निदान करण्याचं काम पूर्णपणे एआयच्या हातात सोपवणं हा हलगर्जीपणा ठरेल.

डॉक्टरांनी एक्स रे'ची केलेली पाहणी आणि एआयनं केलेलं विश्लेषण अशा दोन्ही मार्गांचा सोबत अवलंब करण्याचा सल्ला या संस्थेनं दिलाय.

एक्स रे पाहून नेमकी कुठल्या हाडाला किती दुखापत झाली आहे, याचा बरोबर अंदाज लावणं हे तसं जिकिरीचं काम आहे. डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ रोज मोठ्या संख्येनं एक्स रे तपासण्याचं काम करतात. वाढलेलं रूग्ण आणि त्या तुलनेत डॉक्टरांची असलेली कमतरता यामुळे कमी वेळेत घाईने अनेक एक्स रे तपासण्याचा दबाव डॉक्टरांवर असतो.

त्यामुळे बऱ्याचदा नेमकं परिक्षण आणि निदान करण्यात डॉक्टरांकडून चूक होऊ शकते. अशी चूक होण्याचं प्रमाण 3 ते 10 टक्क्यांपर्यंत असल्याचंही एका सर्वेक्षणातून समोर आलं होतं.

एक्स रे तपासून हाडांच्या दुखापतींचं निदान करण्याचं काम प्रामुख्याने रेडिओलॉजिस्ट व रेडिओग्राफर करतात. अतिशय बारकाईनं वेळ घेऊन करावं लागणारं हे निरीक्षण कामाच्या वाढत्या व्यापामुळे घाईघाईत केलं गेल्यामुळे त्यात डॉक्टरांकडूनही भूल चूक होण्याची शक्यता असते. एआयच्या आगमनामुळे आता या समस्येवर तोडगा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एक्सरे पाहून हाडांमधील फ्रॅक्चर शोधायला डॉक्टरांना होणार आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत

फोटो स्रोत, Getty Images

“हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित आणि प्रभावी असून डॉक्टरांवरील‌ कामाचा ताण यामुळे निश्चितच कमी होईल. कधी कधी हाडांमधील फ्रॅक्चर इतके लहान असतात की घाईत मानवी डोळ्यांनी पाहिल्यावर ते नजरेतून सुटू शकतात. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर आधीच कामाचा भरपूर ताण असतो. या नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे हा ताण आता हलका होईल,” अशी आशा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ ॲन्ड केअर एक्सलन्सचे प्रमुख मार्क चॅपमन यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली.

रोगाचं निदान करण्यात हे तंत्रज्ञान कमी पडलं अथवा चुकीचं ठरलं तर उपचार देखील चुकीचे होऊन रुग्णाचं नुकसान होण्याचा धोका आहे का?

या प्रश्नाला उत्तर देताना नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ ॲन्ड केअर एक्सलन्सनं हे तंत्रज्ञान डॉक्टरांसाठी फक्त एक सहाय्यक म्हणून काम करणार असल्याचं सांगितलं. अंतिम निदान आणि उपचार हे डॉक्टरांचेच असणार आहेत. एक्स रे एआयबरोबरच रेडिओलॉजिस्टच्याही नजरेखालून गेलेले असल्याकारणानं दोनदा खात्री होऊन उलट निदान आणखी अचूक होणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

आरोग्य क्षेत्रासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान एक वरदान ठरू शकतं.

स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ओळखून लवकर निदान करणे, संभाव्य हृदयविकाराची शक्यता पडताळून संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देणे आणि पुढील महामारीच्या संकटाचा अंदाज लावणे अशी महत्वाची कामं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं अचूक करून दाखवलेली आहेत.

आता एक्स रे तपासणीतून अचूक निदानाचं हे तंत्रज्ञान आरोग्य क्षेत्रातील आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब करणारं ठरेल.

आरोग्य क्षेत्रातील एआयची भूमिका आणि महत्त्व वरचेवर आणखी अधोरेखित करणारे हे नवनवीन शोध व तंत्रज्ञान याचाच पुरावा आहेत.

हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वसुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ ॲन्ड केअर एक्सलन्सतर्फे लवकरच प्रसिद्ध केली जातील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)