अमेरिकेच्या निवडणुकीत AI आणि खोट्या माहितीचा वापर करून एक्स यूजर्स करतायेत खोऱ्याने कमाई

- Author, मरिआना स्प्रिंग
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एक्सवरील (पूर्वीचं ट्विटर) काही यूजर्स अमेरिकन निवडणुकीबद्दल खोटी माहिती, एआयच्या आधाराने बनवलेल्या बनावट प्रतिमा आणि निराधार षडयंत्र पसरवण्याचं काम पद्धतशीरपणे करत आहेत.
विशेष म्हणजे एक्स सोशल मीडिया वेबसाईट अपप्रचार करणाऱ्या या यूजर्सना आळा घालण्याऐवजी त्यांना हजारो डॉलर्स देऊन प्रोत्साहन देत आहे. यातल्या काही यूजर्सशी संपर्क साधून त्यांची कार्यपद्धती समजून घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला.
एक्सवर असे अकाऊंट्स आहेत, जे दिवसभर खोटी माहिती पसरवण्याचं काम करतात. एक्सवर या खातेदारांचं जाळंच विणलं गेलं आहे. ते एकमेकांचा मजकूर आपल्या खात्यावरून पुर्नप्रसिद्ध करतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा खोटा मजकूर पोहचावा, असा पद्धतीने नियोजनपूर्वक अपप्रचार करत असतात.
अमेरिकन निवडणूक जवळ येत असताना, अशा खोट्या माहिती पसरवणाऱ्या एक्स अकाऊंट्सवरील हालचालींना वेग आला आहे. ही खोटी आणि खळबळजनक माहिती अधिक वेगाने पसरत असल्याने यात एकूणच एक्सवरील लोकांच्या प्रतिक्रिया वाढतात. याचा फायदा शेवटी एक्सलाच होतो. त्यामुळे या खोटी माहिती पसरवणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना एक्स मोबदला देत आहे.
यातून आमची कमाई आता काही हजार डॉलर्सपर्यंत पोहचल्याची माहिती यातल्या काही एक्स यूजर्सनी बीबीसीशी बोलताना दिली. खोटी माहिती पसरवणारे हे यूजर्स एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांच्या मजकूराचा प्रसार करतात. अशा प्रकारे अपप्रचाराची ही एक छोटी अर्थव्यवस्थाच या कंटेंट क्रिएटर्सनी एक्सवर निर्माण केली आहे.
“आम्ही आमच्या खात्यावरुन फक्त स्वत:चाच नव्हे तर एकमेकांचाही मजकूर शेअर करत राहतो. एकमेकांना सहाय्य केल्याने आमचा सगळ्यांचाच फायदा होतो” असं एक यूजर बीबीसीशी बोलताना म्हणाला.
यातले काही उघडपणे डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आहेत तर काही कमला हॅरिस यांचे. यातले काही अकाऊंट्स आम्ही निष्पक्ष असल्याचाही दावा करतात. आम्ही विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की कुठल्याच उमदेवार अथवा पक्षाशी आम्ही अधिकृतरित्या जोडलेलो नाही. हे सगळं ते स्वतःच्या आवडीने स्वतंत्रपणे करत आहेत. पण प्रचंड फोलोविंग असणाऱ्या या खातेदारांनी अनेक राजकाऱ्यांनी आपल्याशी संपर्क करून प्रचार करण्याची विनंतीही केल्याचं सांगितलं.
9 ऑक्टोबरपासून एक्सवरील कुठल्या खात्यांना कसे पैसे मिळतील यासंबंधीचे नवीन धोरण कंपनीकडून राबवलं जात आहे. एक्सवरील मजकूराला जोडलेल्या जाहिरातींनुसार आधी खातेदाराला पैसे मिळत असत.
आता यूजरच्या पोस्टवर लाईक, शेअर आणि कमेंटच्या प्रतिक्रिया किती संख्येनं येत आहेत, याच्या आधारावर एक्सने पैसे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्या पोस्टवर जास्तीत जास्त प्रतिक्रिया मिळवण्यासाठी वादग्रस्त मजकूर टाकण्याकडे या क्रिएटर्सचा कल आणखी वाढला आहे.
इतर सोशल मीडिया वेबसाईट देखील यूजर्सना पैसे देऊ करण्यासाठी हेच मॉडेल अवलंबतात. पण कोणत्या यूजरने बनावट अथवा बदनामीकारक मजकूर टाकल्यास त्यावर कारवाई देखील त्या सोशल मीडिया कंपनीकडून केली जाते. प्रसंगी अशी खोटी माहिती सातत्यानं प्रसारित करणाऱ्या यूजरचं अकाऊंट देखील निलंबित केलं जातं.
एक्स मात्र असं काही करत नाही. खोटी माहिती आपल्या माध्यमातून प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी एक्सने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.
एक्सवरील यूजर्सची संख्या फेसबुक, इन्स्टाग्रामप्रमाणे प्रचंड नसली तरी राजकीय चर्चाविश्वावर एक्सचा प्रभाव वादातीत आहे. आगामी निवडणूक ही अमेरिकेच्या राजकारणील एक मैलाचा दगड ठरेल, असं भाकित केलं जातंय.
एक्स आपल्या यूजर्सना देऊ पाहत असलेलं हे अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्य इतक्या महत्त्वपूर्ण निवडणुकीवर प्रभाव पाडू शकतं, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या माध्यमातून खोट्या आणि बदनामीकारक मजकूराचं इतक्या मोठ्या प्रमाणात होणारं प्रसारण हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. याचे परिणाम दूरगामी असणार आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर लोकांना प्रभावित करू शकेल अशी खोटी माहिती पसरवणारे हे यूजर्स यातून नेमके किती पैसे कमावत आहेत, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला. यातून हे यूजर्स खोऱ्याने पैसे कमावत असल्याचं निष्पन्न झालं.

फोटो स्रोत, Getty Images
खोटा आणि दिशाभूल करणारा मजकूर प्रसिद्ध करून आपल्या नावडत्या उमेदवाराची बदनामी आणि आवडत्या उमेदवाराचा प्रचार एक्सवरून पद्धतशीरपणे केला जातोय. निवडणूक आणि मतमोजणीत घोटाळा होत असल्याचे निराधार आरोप आणि दावे केले जात आहेत. निवडणूक आयोगानं आधीच हे सगळे आरोप पुराव्यांसहित खोडून काढलेले असतानाही हे दावे पुन्हा पुन्हा केले जात आहेत.
अध्यक्षीय उमेदवारांवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे खोटे आरोपही एआयने बनवलेल्या काल्पनिक प्रतिमा जोडून अनेक यूजर्स नियोजनपूर्वक करत आहेत. असेच आरोप असणारा मजकूर फेसबुक आणि टिकटॉकसारख्या सोशल मीडिया साईट्सवरूनही टाकला जात होता. पण बनावट माहिती म्हणून अशा मजकूरावर या माध्यमांनी वेळीच प्रतिबंध लावला. एक्सने मात्र माहिती खोटी असल्याचं उघड झाल्यानंतरही त्यावर कुठलेही प्रतिबंध न लादत उलट प्रोत्साहन दिल्याचं पाहायला मिळतंय.
काही दिवसांपूर्वी कमला हॅरिस मॅकडोनाल्ड्समध्ये काम करत असल्याचा एक बनावट फोटो प्रसिद्ध झाला. त्यावरून बरंच वादंग माजलं. हा फोटो मीच बनवला होता, अशी कबुली एक्सच्या एका यूजरने दिली. हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनवला गेल्याचं स्पष्ट झाल्यानंतर काही यूजर्सनी पुन्हा तो डेमोक्रॅटिक पक्षानेच बनवलेला असल्याचे खोटे आरोप एक्सवरूनच फिरवायला सुरुवात केली.
या शिवाय जुलै महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला होता त्याविषयी सुद्धा अनेक निराधार सिद्धांत आणि षडयंत्र आज पसरवले जात आहेत. या षडयंत्राचा उगम देखील एक्सवर झाला असल्याचं मानलं जातं.
अशी खोटी माहिती आणि षडयंत्र एक्सवर रचली जात आहेत आणि त्यांना रोख लावण्याऐवजी प्रोत्साहन दिलं जात आहे याबद्दल आम्ही कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी बीबीसीला कुठलीच प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. एक्सचे मालक इलॉन मस्क यांच्यासोबत मुलाखतही कंपनीने नाकारली.
‘पैसे कमावणं आता झालंय फार सोपं’
फ्रीडम अनकट हा एक्सवरील असाच एक यूजर व कंटेंट क्रिएटर आहे. हा क्रिएटर लेखी मजकूर आणि चित्रांसह व्हिडिओ देखील बनवून टाकतो. अमेरिकन ध्वजाच्या आकृतीत चमकणाऱ्या लाईट्स हे त्यांचं प्रोफाइल पिक्चर त्याचा राष्ट्रवादी कल दर्शवतं. तो स्वतःला कुठल्याही पक्षाशी न जोडला गेलेला स्वतंत्र क्रिएटर मानतो. पण येत्या निवडणुकीत कमला हॅरिस यांच्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेले पाहायला मला आवडेल, असं तो बीबीसीशी बोलताना म्हणाला.
एक्सवरील त्याचे मित्र व चाहते त्याला फ्री या नावाने संबोधतात. दिवसाचे तब्बल 16 तास एक्सवर आपण काम करत असल्याचं त्याने सांगितलं. यामध्ये तो मुख्यतः एआयच्या आधाराने बनवलेल्या प्रतिमा व चित्रफिती प्रसवत असतो.
स्वतःचं पूर्ण नाव अथवा खरी ओळख त्याने लपवून ठेवलेली आहे. कारण ही ओळख सार्वजनिक झाल्यास आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल, अशी भीती त्याला वाटते. याआधी एकदा ओळख बाहेर पडल्यानंतर आपल्याला व कुटुंबातील सदस्यांना धमक्या मिळाल्या असल्याची आठवणही त्याने सांगितली.
एक्सवरील इतर यूजर्सच्या तुलनेत फ्री हा तसा मवाळच म्हणावा लागेल. त्याने इतर अकाऊंट्सना सोबत घेऊन खोटी माहिती पसरवणारं एक जाळंच एक्सवर तयार केलेलं आहे. ते नेमकं कसं काम करतं, याची इत्यंभूत माहिती त्याने आम्हाला दिली.
मागच्या काही महिन्यांपासून तो सातत्यानं अमेरिकन निवडणुकीसंबंधी मजकूर आपल्या खात्यावरून प्रसिद्ध करत आहे. आत्तापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी आपला मजकूर पाहिल्याचं तो सांगतो. फ्लोरिडा राज्यातील टॅम्पा शहरात तो राहतो. आम्ही त्याच्या घरी बसून त्याच्याशी गप्पा मारल्या. राजकीय अपप्रचारानं आपलं नेटवर्क कसं चालतं हे त्याने आम्हाला साक्षात दाखवून दिलं.

फ्रीडम अनकट टाकत असलेला काही मजकूर हा अर्थातच उपरोधिक किंवा अतिरंजित असतो. द मॅट्रिक्स या सिनेमातील मुख्य पात्राप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प गोळी लागल्यानंतर ती झटकून पुन्हा नायकाप्रमाणे उभे राहत असल्याचं एका पोस्टमधून त्याने दाखवलंय. तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये जो बायडन यांना डिक्टेटर सिनेमातील हुकूमशाह म्हणून रेखाटलं गेलंय.
ही सगळी चित्र त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं बनवली आहेत. अशाच एका चित्रात एका घराच्या छतावर एकजण हतबल होऊन बसलेला आहे. आजूबाजूला सगळं पाण्यात बुडालेलं आहे. वरून एक विमान येतं आणि सरळ पुढे निघून जातं. चित्राच्या खाली लिहिलेलं असतं, ‘’लक्षात ठेवा 5 नोव्हेंबर नंतर हे राजकारणी तुम्हाला विसरून जाणार आहेत.”
हेलेन वादळ आल्यानंतर अमेरिकतील नॉर्थ कॅरोलिना राज्यात हाहाकार माजला होता. तेव्हा सरकारनं वादळात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.
फ्रीडम अनकटने हेच त्याच्या या पोस्टमधून दर्शवलं होतं. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा आरोप नंतर खोटा असल्याचं सिद्ध झालं होतं. तब्बल 146 वैमानिक मोहिमा आखून हजारो लोकांची सुटका केल्याची पुराव्यानिशी माहिती नंतर नॉर्थ कॅरोलीनाच्या नॅशनल गार्डने प्रसिद्ध केली होती.
अशा अतिरंजित पोस्ट टाकण्यामागचा आपला उद्देश नवीन विषयावर लोकांमध्ये चर्चा सुरू करणे, हा असल्याचं फ्रीडम अनकट सांगतो. त्याच्या मते ही एक कला आहे.
“एआयच्या मदतीने रेखाटलेल्या या अतिरंजित प्रतिमा म्हणजे लोकांना मूर्ख नव्हे जागरूक बनवण्याचा प्रयत्न आहे. मी यातून लोकांमध्ये महत्वाच्या विषयांप्रती जागरूकता निर्माण करण्याचं विधायक काम करत आहे. त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक महत्वाचं हत्यार आहे,” असं तो म्हणाला.


एक्सने फ्रीडमचं अकाऊंट मॉनेटाईझ केलेलं आहे. तो पुढे म्हणाला, ‘’एक्सवरून एका महिन्यात हजार डॉलर्सपर्यंत माझी कमाई होते. लाखांच्या घरात कमाई करणारे सुद्धा काही अकाऊंट्स आहेत. हा आमच्यासाठी एक रोजगार असल्यासारखाच आहे."
"खरी माहिती बहुतांशी रटाळ असते. त्यापेक्षा खोटी माहिती ही रंजक आहे. जितका वादग्रस्त मजकूर तितक्या लोकांच्या प्रतिक्रिया जास्त. पारंपारिक माध्यमं टीआरपी / लोकप्रियता मिळवण्यासाठी अशाच सनसनाटी मजकूराचा आधार घेतात. आम्ही काही वेगळं करत नाही. एक्समुळे आमच्यासारख्या लोकांना पैसे कमावणं सोपं झालं आहे,” एक्स निर्माण करत असलेल्या नवीन रोजगारांवर तो म्हणाला.
फ्रीडम अनकटने म्हटलं, "मी प्रसिद्ध करत असलेला मजकूर हा अतिरंजित आणि वादग्रस्त असला तरी तो तथ्यांवर आधारलेला असतो. पूर्णपणे वास्तवाशी फारकत घेतलेला काल्पनिक नसतो. मी फक्त ते वास्तव एआयच्या मदतीने अतिरंजित करून दाखवतो. जेणेकरून लोक मजकूराकडे आकर्षित होतील. इतर काही प्रोफाईल तर धादांत खोटी माहिती बिनधास्त पोस्ट करत असतात. मी किमान तसं करत नाही."
"राहिला प्रश्न आम्ही शेअर करत असलेल्या मजकूरामुळे निवडणुकीवर पडणाऱ्या प्रभावाचा तर अपप्रचार आणि प्रपोगांडा करण्यात खुद्द सरकारच आघाडीवर आहे. इंटरनेटवर लोक बोलत नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक खोटी माहिती सरकारकडून पसरवली जाते. जनतेची खरी दिशाभूल जर कोणी करत असेल तर ते खुद्द सत्तेत बसलेले राजकारणीच आहेत. त्यामुळे आमच्यामुळे लोकशाही धोक्यात आलीये हे आरोप अवाजवी आहेत," फ्रीडम अनकटने या शब्दात सगळ्या आक्षेपांना उत्तर दिलं.

फ्रीडम अनकटने पुढे सांगितलं, “अनेक स्थानिक राजकारणी मोठी फोलोविंग असलेल्या माझ्यासारख्या एक्स यूजर्सकडे स्वतःचा प्रचार करण्यासाठी विचारणा करतात. त्यासाठी पैसे देऊ करण्याची देखील त्यांची तयारी असते. इंटरनेटवरील कंटेट क्रिएटर्स कडून दोन्ही बाजूंचा प्रचार व अपप्रचार केला जात असला तरी कमला हॅरिस यांच्या तुलनेत डोनाल्ड ट्रम्प यांना या इंटरनेट प्रचाराचा जास्त फायदा होतो."
"बहुतांश डोनाल्ड ट्रम्प समर्थक इंटरनेटवरील मजकूर वाचून / पाहूनच त्यांच्या बाजूने झुकले आहेत. आम्ही अतिरंजित व सनसनाटी मजकूर प्रसिद्ध करत असलो तरी पारंपारिक वर्तमानपत्र किंवा टीव्ही सारख्या माध्यमांपेक्षा आमच्यावरच लोकांचा जास्त विश्वास आहे. खोटी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात ही पारंपारिक माध्यमं आमच्यापेक्षाही वरचढ आहेत. त्यामुळे त्यांनी लोकांचा विश्वास गमावला आहे,’’ फ्रीडम अनकटने या नवीन माध्यमांची वाढती ताकद आणि प्रभाव स्पष्ट केला.
‘खरं काय आणि खोटं काय हे कळायला मार्गच नाही’
फ्रीडम अनकटप्रमाणेच एक्सवर कमल हॅरिस यांच्या समर्थनार्थ पोस्टींचा रतीब घालणारेही अनेक यूजर्स आहेत. त्यातलंच एक नाव आहे ब्राऊन आयईड सुझान. एक्सवर तिचे 2 लाखांपेक्षा जास्त फोलोवर्स आहेत. तिने तिचं नाव जरी सांगितलेलं असलं तरी फ्रीडम अनकट प्रमाणेच सुरक्षेच्या कारणास्तव आपली खरी ओळख आणि आडनाव गुप्त ठेवलेलं आहे. ठराविक उमेदवाराच्या समर्थनार्थ राजकीय प्रचार करणाऱ्या अशा एक्स यूजर्सना विरोधी गटाकडून ऑनलाईन धमक्या आणि शिवीगाळ नेहमीचीच असते. त्यामुळेच हे लोक आपली खरी ओळख कधी सार्वजनिक करत नाहीत.
सुझान लॉस एंजेलिसमध्ये राहते. बीबीसीशी बोलताना ती म्हणाली की, “या उपक्रमातून पैसा कमावणे हा तिचा उद्देशच नव्हता. आवड आणि राजकीय प्राधान्यक्रमातून तिने एक्सवर संबंधित मजकूर टाकायला सुरुवात केली होती. पण काही काळातच तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता ती दिवसाला 100 पेक्षा जास्त पोस्ट एक्सवर टाकत असते. एक्सवरील तिचा मजकूर 20 लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचतो.
काही दिवसांपूर्वी एक्सने जास्त फोलोविंग असलेल्या यूजर्सना ब्लू टिक देऊन पैसे द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून एक्स हा सुझानचा कमाईचा स्त्रोत बनलाय. “हे सगळंच अनावधानाने झालं. मी फक्त आवड म्हणून एक्सवर आले. मी न मागता मला ब्ल्यू टिक मिळालं. आणि नंतर माझं अकाऊंट देखील आपोआप मॉनिटाईझ झालं. आता महिन्याला साधारण काहीशे डॉलर्स मला यातून मिळतात,” सुझान म्हणाली.

राजकीय धोरणांवर टीका आणि टिप्पणी करण्याव्यतिरिक्त सत्यता पडताळले न गेलेले दावे सुझान एक्सवरून करत असते. तिच्या काही पोस्ट 30 लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचलेल्या आहेत. जुलैमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला होता तो एक बनाव होता आणि तो कट प्रसिद्धी व सहानुभूती मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच रचला होता, असा दावा त्या या पोस्ट्मधून करत असतात. सुझान यांनी केलेला दावा खरा आहे, हे दर्शवणारा कुठलाही पुरावा आज उपलब्ध नाही. तरीही आपल्या म्हणण्यावर सुझान ठाम होत्या.
“हल्ला झाल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला ठार केलं हे खरं असलं तरी माजी राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षा व्यवस्थेत इतका हलगर्जीपणा, गोळी लागल्यानंतर लगेच नाट्यमरित्या त्यांचं पुन्हा उठून उभा राहणं आणि एकूणच हा सगळा प्रकार ठरवून घडवला गेल्यासारखा वाटतो. आता तो एक बनाव होता हे पुराव्यानिशी सिद्ध करता येणार नसलं तरी या घटनेतील सगळेच पैलू हा तो बनाव असल्याचंच निर्देशित करतात. कोणाला मी फक्त षडयंत्र रचले आहे असं वाटतं असलं तरी वाटू देत. पण मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे,” सुझान म्हणाल्या.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्यासाठी सुझान एआयच्या मदतीने व्यंगचित्र आणि मीम्स बनवून एक्सवर टाकत असतात. अनेकदा यातून डोनाल्ड ट्रम्प यांना अतिवृद्ध, जर्जर आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं दाखवलं गेलंय. काही व्यंगचित्रांमध्ये डोनाल्ड ट्रम्प एक हुकूमशाह म्हणून दाखवले गेले आहेत. सुझानच्या मते हे अतिरंजित व्यंगचित्र डोनाल्ड ट्रम्प यांचं खरं व्यक्तिमत्व दर्शवतात.
फ्रीडम अनकट प्रमाणेच अनेक राजकारण्यांनी आपला प्रचार करण्यासाठी सुझान यांच्यासोबतही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आवडत्या उमेदवार कमला हॅरिस यांचा प्रचार करण्याबरोबरच नवनवी माहिती समोर आणून लोकांना अधिक जागरूक करणं हा आपला उद्देश असल्याचं सुझान सांगतात.
वास्तव नाकारून कल्पनेत रमलेले नेटकरी
कमला हॅरिस यांनी कधीकाळी मॅकडोनाल्ड्समध्ये काम केल्याचा खोटा दावा पहिल्यांदा एक्सवरूनच केला गेला. यावरून एकच वाद निर्माण झाला होता. अमेरिकेचं राजकारण या एका फोटोवरून तापवलं गेलं. मॅकडोनाल्ड्सच्या कर्मचाऱ्याचा वेश परिधान केलेला कमला हॅरिस यांचा फोटो त्यांच्या समर्थकांनीही एक्सवरून फिरवला. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला.
लवकरच डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी हा फोटो एडिटेट असल्याचं शोधून काढलं. मॅकडोनाल्ड्स मध्ये काम करणाऱ्या गणवेश परिधान केलेल्या एका दुसऱ्याच महिलेच्या फोटोवर कमला हॅरिस यांचा चेहरा जोडून हा फोटो बनवला गेला होता. काही जणांनी हा बनावट फोटो खुद्द डेमोक्रॅटिक पक्षानेच बनवून इंटरनेटवर व्हायरल केल्याचा निराधार आरोप देखील केला.
प्रत्यक्षात हा फोटो एक्सवर ‘’द इनफायनाईट ड्यूड’’ हे यूजरनेम वापरणाऱ्या व्यक्तीनं पहिल्यांदा टाकला होता. तिथूनच या फोटोचा उगम झाला व नंतर तो इंटरनेटवर सर्वत्र व्हायरल झाला. हा फोटो बनवणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे ब्लेक. बीबीसीशी बोलताना मी फक्त एक प्रयोग म्हणून हा फोटो एक्सवर टाकल्याचं तो म्हणाला. हा फोटो नंतर अमेरिकन राजकारणातील वादाचं केंद्र बनेल, याची त्यालासुद्धा कल्पना नव्हती. त्याच्या प्रोफाईलला फारसे फोलोवर्स नाहीत. फ्रीडम अनकट आणि सुझानच्या तुलनेत तो तसा या क्षेत्रात नवखाच आहे.
ही खोटी प्रतिमा तुम्ही कशी बनवली याबद्दल सविस्तर माहिती आणि पुरावा बीबीसीसमोर मांडायला मात्र ब्लेकने नकार दिला. इंटरनेट विशेष: एक्स नेमकं कसं काम करतं आणि कुठला मजकूर लोकप्रिय होतो याचं एक तर्कशास्त्र त्यानं आमच्यासमोर मांडलं.
“कुठली गोष्ट खरी आहे म्हणून लोक ती इंटरनेटवर पाहत नाहीत. तर ती खरी असावी अशी सुप्त आशा त्यांना असते म्हणून ते आवडीने एखाद्याने रचलेली काल्पनिक गोष्ट पाहतात आणि तिचा प्रसारही करतात. त्यामुळे अशा खोट्या किंवा बनावट गोष्टीच इंटरनेटवर बहुतांशी व्हायरल होतात. आणि हे फक्त एकाच बाजूचे लोक करतात असं नव्हे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस अशा दोघांचेही समर्थक तितक्याच प्रमाणात आपल्या सोयीचा अपप्रचार आवडीने करतात. त्यांना वास्तवाशी देणंघेणं नाही. तर आपल्याला हवी असलेली कल्पना वास्तव म्हणून सादर करण्यात त्यांना स्वारस्य आहे. इंटरनेटवरील लोक कल्पनेच्या जगातच वावरत असतात. त्यांनी हवी असलेली कल्पनाच ते वास्तव समजून स्वीकारतात. आणि त्याच भ्रमात जगतात. त्यामुळे अशी खोटी माहिती इतकी व्हायरल होते. इंटरनेटवर खऱ्यापेक्षा खोट्याची किंमत जास्त आहे,’’ ब्लेक सांगत होता.

तुमचं राजकीय समर्थन कोणाला आहे हा प्रश्न विचारल्यानंतर आपण निष्पक्ष असून हा सगळा प्रकार आपण फक्त एक सामाजिक प्रयोग म्हणून केल्याचं ब्लेक सांगतात. राजकारणात त्यांना फारसा रस नाही. त्यामुळे ते कोणाचाच प्रचार करत नाहीत.
यूजर्सचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे, असं एक्स सांगतं. त्यामुळे ही सोशल मीडिया वेबसाईट कुठल्याच मजकूरावर रोख अथवा प्रतिबंध लावत नाही. बऱ्याच गदारोळानंतर आता कुठे एक्सने एआयच्या आधाराने बनवलेल्या खोट्या प्रतिमा, व्हिडिओ, चित्रे आणि माहिताला जोडून एक चेतावणी द्यायला सुरुवात केलेली आहे. जेणेकरून यूजर्सला तो मजकूर कदाचित खोटा आहे, याची जाणीव होईल. याशिवाय कम्युनिटी नोट्स नावाची एक नवीन सुविधा एक्सने द्यायला सुरुवात केली आहे. यातून एक्सवरील कुठल्याही माहितीची सत्यता पडताळून यूजर्स ती मान्य अथवा अमान्य करू शकतात.
ब्रिटनच्या निवडणुकीदरम्यान एक्सवरील काही अकाऊंट्स खोटी माहिती पसरवत असल्याचा भांडाफोड बीबीसीने केला होता. तेव्हा एक्सने अशी खोटी माहिती पसरवणाऱ्या आपल्या यूजर्सवर कारवाई केली होती. अमेरिकन निवडणुकीत मात्र अशी कुठली कारवाई एक्स कडून केली जात असल्याचं दिसत नाही. अमेरिकन निवडणुकीबाबत कुठलीही माहिती मग ती खरी असो खोटी प्रसिद्ध करण्याची पूर्ण मोकळीक यावेळी एक्सने आपल्या यूजर्सना दिली आहे, असंच दिसतंय. यावर कंपनीला जबाब विचारण्याचा प्रयत्न बीबीसीने केला असता एक्सकडून आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. इलॉन मस्क यांची मुलाखत घेण्याची आम्ही केलेली विनंतीही कंपनीकडून फेटाळून लावली गेली.
अशा प्रकारे खोटी माहिती इतक्या मोठ्या प्रमाणात सर्रास पसरवली जाणं आणि त्यासाठी इतक्या मोठी कंपनीनं आयतं कोलीत लोकांच्या हातात देणं, ही तशी गंभीर बाब आहे. कारण जगातील सर्वात बलाढ्य लोकशाहीच्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. मतदान करताना या खोट्या माहितीच्या प्रसाराने संबंधित मतदार प्रभावित झालेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











