ताकदवान सीरियन सैनिकांचा अवघ्या काही दिवसात बंडखोरांनी कसा पराभव केला?

सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सामिया नस्र
    • Role, बीबीसी न्यूज अरबी

गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धाला आता सीरियात नवे वळण मिळाले आहे. असद कुटुंबाची 53 वर्षांपासून असलेली सत्ता उलथून टाकण्यात बंडखोरांना यश आले आहे. अनेकांना गेल्या काही आठवड्यापासून सीरियात वेगाने बदलत असलेल्या परिस्थितीचा अंदाज आला नव्हता.

काही दिवसांपूर्वीच देशाच्या उत्तरेला असलेल्या इदलिब शहरातून सशस्त्र बंडखोर गट हयात-तहरीर-अल-शामच्या नेतृत्त्वात असद सरकारविरोधात मोहीम सुरू झाली होती. एकापाठोपाठ एक अनेक शहरांवर या बंडखोर गटाने ताबा मिळवला.

काही दिवसांपूर्वीच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची शपथ घेतली होती. परंतु, ज्या वेगाने घडामोडी घडल्या ते पाहता सीरियाचा अभ्यास करणारे बहुतांश तज्ज्ञ अचंबित झाल्याचे दिसते.

या सर्व वेगवान घडामोडींमुळे मात्र अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अवघ्या 11 दिवसांत 50 हून अधिक वर्षांची राजवट उद्ध्वस्त झाली. सीरियातील या घडामोडांनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सीरियाचे लष्कर या बंडखोरांना रोखण्यात अपयशी कसे ठरले हा सर्वात मोठा प्रश्न आता विचारला जात आहे. अनेक शहरांतून सीरियाच्या सैन्य दलाने माघार का घेतली? यामागे काय कारणे असू शकतात?

सीरियाचे सैन्य दल कागदावर मजबूत

जगातील विविध देशांच्या सैन्य दलाच्या ताकदीचा अभ्यास करुन जागतिक क्रमवारी जाहीर करणाऱ्या ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने 2024 मध्ये सीरियाला अरब जगतात सहावा क्रमांक तर आंतरराष्ट्रीय स्तरावर साठावे स्थान दिले आहे. ही क्रमवारी देताना सैन्य दलाची संख्या, लष्करी साहित्य, मानवी संसाधने आणि त्यांना पुरवण्यात येणारी रसद याचा अभ्यास केला जातो.

सीरियाच्या लष्कराला निमलष्करी दल आणि नागरिकांचे समर्थन होते. हे सैन्य दल सोव्हियत संघाच्या काळातील शस्त्रास्त्रे आणि रशियासारख्या सहकाऱ्यांकडून मिळणाऱ्या लष्करी मदतीवर अवलंबून होते.

ग्लोबल फायर पॉवरनुसार, सीरियाकडे 1500 हून अधिक रणगाडे आणि 3000 शस्त्रसज्ज वाहने आहेत. त्यांच्याकडे तोफखाना आणि क्षेपणास्त्र यंत्रणाही आहे. सीरियाकडे हवाई युद्ध लढण्यासाठीही शस्त्रास्त्रे आहेत.

या फोटोत एक सैनिक हातात बंदूक घेऊन उभा असलेला दिसत आहे.

फोटो स्रोत, Ibrahim Mase/dia images via Getty Images

फोटो कॅप्शन, इराणसारख्या मित्रदेशांकडून मिळणारी मदत कमी झाल्यानंतर सीरियाच्या सैनिकांचं मनोबल खचायला लागलं होतं.

लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षण विमानेही आहेत. त्याचबरोबर एक छोटासा नौदल ताफाही त्यांच्याकडे आहे. सीरियाच्या नौदल आणि हवाई दलाकडे लटाकिया आणि टार्टससारखे महत्त्वाचे हवाई तळ आणि बंदरे पण आहेत. इतक्या साऱ्या गोष्टी अनुकूल असताना हे घडले कसे?

आकडेवारीवरुन सीरियाच्या लष्कराची स्थिती चांगली दिसते. पण अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे सीरियाचे लष्कर बंडखोर गटासमोर कमकुवत ठरले. या गृहयुद्धाच्या सुरुवातीलाच सीरियाने आपले अनेक सैनिक गमावले होते. जेव्हा युद्धाला सुरुवात झाली होती, तेव्हा सीरियाकडे सुमारे तीन लाख सैनिक होते. आता हीच संख्या निम्म्याने कमी झाली होती.

दोन कारणांमुळे त्यांच्या सैनिकांची संख्या घटली. एकतर युद्धात अनेक सैनिक मारले गेले. तर अनेक सैनिकांनी बंडखोर गटांशी हातमिळवणी केली. सीरियाच्या हवाई दलाला बंडखोर गट आणि अमेरिकेच्या हवाई दलाशी सामना करावा लागला. त्यामुळे त्यांच्या हवाई दलाची ताकद कमी झाली होती.

लाल रेष
लाल रेष

काम जोखमीचे आणि सैनिकांना वेतन केवळ तीन दिवसांचे

सीरियाकडे तेल आणि गॅसचा मोठा साठा आहे. परंतु, युद्धामुळे या साठ्याची वाहतूक करणे आणि त्याचा वापर करण्यात अडचणी आल्यामुळे त्यांच्या क्षमतेत मोठी घसरण झाली. देशातील ज्या भागांवर असद सरकारचे नियंत्रण होते, तेथील आर्थिक स्थिती आणखी बिघडली. याचे मोठे कारण म्हणजे अमेरिकेचा 'सिझर अॅक्ट.'

डिसेंबर 2019 मध्ये लागू झालेल्या या अॅक्टनुसार, अमेरिकेने सीरियन सरकारसोबत काम करणाऱ्या सरकारी संस्था किंवा व्यक्तींवर आर्थिक निर्बंध लादले होते. जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या अनेक अहवालांमध्ये असद सरकार सैनिकांना कमी वेतन देत असल्याचे म्हटले गेले.

सैनिकांना दर महिन्याला सुमारे 15 ते 17 डॉलर वेतन दिले जात होते. इतके पैसे तर तीन दिवसांच्या खर्चासाठीही पुरत नसल्याचे एका सीरियन नागरिकाने म्हटले आहे.

या फोटोत सीरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो शहरातील नैराब एअरपोर्टवर उभे असलेले लढाऊ विमानं दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2 डिसेंबरला सीरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो शहरात बंडखोरांनी हल्ला केला. तेव्हा सीरियाचे सैनिक नैराब एअरपोर्टवर लढाऊ विमानं सोडून पळून गेले.

मागील तीन वर्षांत सीरियामध्ये खूप बदल झाल्याचे लंडन विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विषयाचे प्रोफेसर फवाज गिरगिस यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे सीरियात गरिबी आली.

लष्करी अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसेही मिळत नव्हते. त्यांच्याकडे पुरेसे अन्नही नव्हते. एकंदर हे सैनिक एका कठीण मानसिक परिस्थितीतून जात होते. यातील अनेक सैनिकांची तर उपासमारी सुरू होती.

सीरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, अल असद यांनी मागील बुधवारी सैनिकांच्या वेतनात 50 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती.

बंडखोरांच्या आक्रमणासमोर आपल्या सैनिकांचे मनोबल वाढवणे हाच यामागचा उद्देश असल्याचे यातून स्पष्ट होते. परंतु, असद सरकारने खूप उशिराने हे पाऊल उचलले, असे वाटते.

असद यांच्या सहकाऱ्यांनी रणभूमीवरुन पळ काढला

जेव्हा बंडखोरांबरोबर युद्ध सुरु होते. तेव्हा अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांनी सरकारची साथ सोडली. ही धक्कादायक गोष्ट आहे. त्यामुळे बंडखोर सैनिक अलेप्पोहून दमास्कसकडे वेगाने आले. सीरियन सैनिक हमा आणि होम्स येथून जाताना रस्त्यावरच आपले लष्करी साहित्य आणि शस्त्रास्त्रे सोडून गेले.

दरम्यान, दमास्कस शहरातील काही सैनिकांनी आपला सैनिकी पोशाख उतरवून सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे परिधान केल्याचे बीबीसी प्रतिनिधी बार्बरा अशर यांनी सांगितले.

असद यांच्या धोरणांमुळेच सीरियाच्या सैन्याचे पतन झाल्याचे बैरुत येथील कार्नेगी मिडल इस्ट सेंटरचे वरिष्ठ फेलो डॉ. यझीद सईग म्हटले आहे. त्यांनी यासाठी असद यांनाच दोषी ठरवले आहे.

फोटोत असद आणि पुतीन दिसत आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, असद सरकारला रशिया आणि इराणचा पाठिंबा होता.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणतात, "2016 मध्ये सीरियन सैनिकांनी बंडखोरांवर निर्णायक विजय मिळवला होता. पण त्यानंतर सत्तेवर राहण्यासाठी असद यांनी याचा गैरवापर केला. याच धोरणांचा परिणाम सैन्य दलावर झाला. हजारो सैनिकांना लष्करातून काढण्यात आले."

"त्याचबरोबर लोकांच्या राहणीमानात प्रचंड घसरण झाली. भ्रष्टाचार इतका वाढला की, लोकांना अन्न मिळवण्यासाठी हाल सोसावे लागले. याचा सैन्य दलाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला. त्यामुळे लष्कराच्या उच्च पदावर असलेले अल असदचे शिया अलावी समुदायाचे जनरल एकाकी पडले."

इराण, हिजबुल्लाह आणि रशियाकडून कमी झालेली मदत यामुळेही सीरियन सैनिकांचे मनोबल घसरले. या तिघांकडून पूर्वीप्रमाणे मदत मिळत नव्हती. त्यामुळे एकाकी पडलेल्या सीरियन सैनिकांची लढण्याची इच्छाच संपुष्टात आली.

लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये युद्ध अभ्यासाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आणि ब्रिटनचे लष्करी तज्ज्ञ माइकल क्लार्क यांच्यानुसार, सीरियन सैन्य परकीय मदतीवर अवलंबून होते. त्यांचा प्रशिक्षणाचा दर्जा घसरला होता. त्यांच्या अधिकाऱ्यांचे नेतृत्वही भरकटले होते. जेव्हा सीरियन सैनिकांचा हयात तहरीर अल-शामच्या बंडखोरांशी सामना झाला. तेव्हा अनेक अधिकारी त्यांच्या सैनिकांसह पळून गेले तर काहींनी माघार घेतली होती.

या फोटोत हमा शहरातील बंडखोर कोणत्याही लढाई शिवाय सैनिकांच्या लढाऊ विमानांचा ताबा घेताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हमा शहरात बंडखोरांनी कोणत्याही लढाई शिवाय सैनिकांच्या लढाऊ विमानांचा ताबा मिळवला.

परंतु, इराण आणि हिजबुल्लाहने जाणीवपूर्वक सीरियन सैनिकांचा पाठिंबा काढल्याचा आरोप डॉ. सईग यांनी खोडून काढला आहे. भूतकाळात मैदानी लढाईसाठी इराण हिजबुल्लाहवर जास्त विसंबून होता. परंतु, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहचे नुकसान झाल्यानंतर त्यांची ताकद पूर्वीसारखी राहिली नव्हती.

त्याचबरोबर सीरियाला सल्ला द्यायला येणाऱ्या इराणी अधिकाऱ्यांची संख्याही रोडावली होती. गेल्या दशकात सीरियावर इस्त्राइलने केलेल्या हल्ल्यांमुळे इराणला जमिनीवरुन किंवा हवाई मार्गाने मोठ्या संख्येने सैन्य पाठवणे अशक्य होते.

त्याचबरोबर इराक सरकार आणि इराण समर्थक सैनिकांनी एकाचवेळी असद यांना मदत करणे बंद केले होते. असद यांना वाचवणे आता कठीण आहे, याची जाणीव कदाचित इराणला झाली होती.

या फोटोत दमिश्कमध्ये सीरियाचे सैनिक सोडून गेलेले रणगाडे दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दमिश्कमध्ये सीरियाचे सैनिक रणगाडे सोडून निघून गेले.

फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेन युद्धामुळे रशियाने लटाकिया येथील हवाई तळावरुन मोठ्या संख्येने आपले लढाऊ विमान आणि सैन्य दल परत बोलावले होते, हे वास्तवही नाकारता येणार नाही.

इराण, हिजबुल्लाह आणि रशियाने मदत बंद करणे हे सीरियाच्या अधोगतीचे मोठे कारण ठरु शकते, या चर्चेला डॉ. फवाज यांनी सहमती दर्शवली आहे. मदतीअभावी सीरियातील विविध शहरे टप्प्याटप्प्याने बंडखोरांच्या ताब्यात जाण्याचे हे एक मोठे कारण असल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सीरियन सैनिकांनी असद सरकारला वाचवण्यासाठी युद्ध केले नाही. उलट लष्कराने युद्धातून पळ काढणे आणि शस्त्रास्त्रे सोडून जाण्याचा निर्णय घेतला. यावरुन लक्षात येते की, 2015 नंतर असद यांच्यासाठी रशिया आणि हिजबुल्लाहच्या माध्यमातून इराणचा पाठिंबा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता.

इराणच्या शाहसारखे असद यांचे पतन

सशस्त्र बंडखोर गट एकत्र आले आणि त्यांनी एक कमांड रुम बनवली. आपल्या नव्या मोहिमेसाठी त्यांनी मजबूत तयारी केली. त्यामुळे सीरियन सैनिकांच्या तुलनेत आपली स्थिती मजबूत करण्यात ते यशस्वी झाले, असे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे.

याचदरम्यान, विरोधी पक्षनेत्यांची काही महत्त्वाची वक्तव्येही समोर आली आहेत. विरोधी पक्ष सर्व पंथ, समुदायांचा आदर करेल, असे आश्वासन त्यांनी सीरियन नागरिकांना दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा विधानांमुळे विरोधी गटांचे ध्येय सोपे झाले आहे.

1979 मध्ये इराणच्या शाहचे अशाच पद्धतीने पतन झाले होते. हा संपूर्ण घटनाक्रमही अगदी त्याचपद्धतीने असल्याचे डॉ. फवाज गिरगिस यांनी म्हटले आहे.

त्यांच्या मते, सीरियाचे विरोधक, त्यांचे इस्लामवादी आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष, दोन आठवड्यांपेक्षाही कमी काळात सीरियन सरकारला खाली खेचण्यात यशस्वी झाले आहेत. असद यांचे सरकार शेवटच्या घटका मोजतच होते आणि जेव्हा बंडखोरांनी हल्ला केला तेव्हा त्यांच्या सैन्याने शस्त्रे खाली टाकली. संपूर्ण यंत्रणा काही क्षणात उद्ध्वस्त झाली.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)