सीरियातील शहरं ताब्यात घेणाऱ्या बंडखोर गटाचा हा नेता कोण आहे?

फोटो स्रोत, AFP
हमा, अलेप्पो आणि होम्स ही सीरियातील महत्त्वाची शहरं इस्लामी बंडखोरांनी ताब्यात घेतली आहेत. या बंडखोर गटाचे नाव हयात तहरीर अल-शाम (एचटीएएस) हे आहे.
सीरियाची स्थिती गंभीर होत चालल्याचे म्हटले जात आहे. बंडखोरांचा सीरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आहे.
एचटीएएसचे प्रमुख अबू मोहम्मद अल-जुलानी यांच्यावर मानवाधिकारांचं उल्लंघन केल्याचे आरोप होत आहेत.
अर्थात अलीकडच्या काही वर्षांपासून अबू मोहम्मद अल-जुलानी जगासमोर उदारमतवादी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अमेरिकेनं त्यांना पकडण्यासाठी त्यांच्यावर एक कोटी डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.
अबू मोहम्मद अल-जुलानी कोण आहेत?
अबू मोहम्मद अल-जुलानी हे टोपणनाव आहे. त्यांच्या खऱ्या नावाबद्दल आणि वयाबद्दल वाद, संभ्रम आहे.
फेब्रुवारी 2021 मध्ये अमेरिकन ब्रॉडकास्टर पीबीएसनं अल-जुलानी यांची मुलाखत घेतली होती.
त्यावेळेस जुलानी म्हणाले होते की जन्माच्या वेळी त्याचं नाव अहमद अल-शारा होतं आणि ते एक सीरियन नागरिक आहेत. त्यांचं कुटुंब गोलान भागातील आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले होते की त्यांचा जन्म सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधमध्ये झाला होता. त्यांचे वडील तिथे काम करायचे. जुलानी स्वत: मात्र सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कसमध्ये वाढले आहेत.
मात्र अशा बातम्या देखील आहेत की त्यांचा जन्म सीरियाच्या पूर्व भागातील दैर एज-जोरमध्ये झाला होता. त्याचबरोबर अशा देखील अफवा आहेत की इस्लामिक कट्टरतावादी होण्याआधी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं होतं.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि युरोपियन युनियनच्या वृत्तांनुसार, त्यांचा जन्म 1975 ते 1979 च्या दरम्यान झाला आहे.
तर इंटरपोलचं म्हणणं आहे की त्यांचा जन्म 1979 मध्ये झाला होता. अस-सफीरच्या वृत्तामध्ये मात्र त्यांचा जन्म 1981 मध्ये झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
अल-जुलानी इस्लामिक गटाचे नेते कसे झाले?
असं मानलं जातं की 2003 मध्ये अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या सैन्याच्या इराकवरील हल्ल्यानंतर, अल-जुलानी तिथल्या अल-कायदा या जिहादी संघटनेशी जोडले गेले होते.
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मित्र राष्ट्रांच्या सैन्यानं इराकचे राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैन आणि त्यांच्या बाथ पार्टीला सत्तेतून बाजूला केलं होतं. मात्र अमेरिका आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या सैन्याला विविध कट्टरतावादी गटांच्या विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं.

फोटो स्रोत, Hayat Tahrir Al Sham
2010 मध्ये अमेरिकन सैन्यानं इराकमध्ये अल-जुलानी यांना अटक केली होती आणि कुवैतजवळच्या बुका या जेल कॅम्पमध्ये अटकेत ठेवलं होतं.
असं मानलं जातं की इथेच अल-जुलानी यांची भेट इस्लामिक स्टेट (आयएस) ही संघटना स्थापन करणाऱ्या कट्टरतावाद्यांशी झाली असेल. पुढे इराकमध्ये इस्लामिक स्टेटचे नेते बनलेल्या अबू बक्र अल-बगदादी यांच्याशी देखील त्यांची भेट झाली असण्याची शक्यता आहे.
अल-जुलानी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की 2011 मध्ये जेव्हा राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याविरोधात सीरियात सशस्त्र संघर्षाची सुरूवात झाली, तेव्हा अल-बगदादीनं त्यांना तिथे संघटनेची एक शाखा सुरू करण्यासाठी पाठवण्याची व्यवस्था केली.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर अल-जुलानी नुसरा फ्रंट (आताचं जबहत अल-नुसरा) या सशस्त्र गटाचे कमांडर झाले. या गटाचा इस्लामिक स्टेटशी गुप्त संबंध होता. या गटानं लढाईच्या मैदानात मोठं यश मिळवलं.
2013 मध्ये अल-जुलानी यांनी नुसरा फ्रंटचा इस्लामिक स्टेट (आयएस) शी असलेला संबंध तोडला आणि ते अल-कायदाच्या नियंत्रणाखाली आणलं.
मात्र नंतर ते अल-कायदापासून देखील वेगळे झाले. 2016 मध्ये त्यांनी एका रेकॉर्डेड संदेशाद्वारे अल-कायदापासून देखील वेगळं होण्याची घोषणा केली होती.
2017 मध्ये अल-जुलानी म्हणाले होते की त्यांच्या गटाचं सीरियातील इतर बंडखोर गटांबरोबर विलीनीकरण झालं आहे आणि त्यानंतर त्यांनी हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) ची स्थापना केली.
अल-जुलानी या संपूर्ण गटाचं नेतृत्व करतात.


अल-जुलानी कसे नेते आहेत आणि त्यांचं उद्दिष्टं काय?
अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखाली एचटीएस हा वायव्य सीरियातील इदलिब आणि आसपासच्या भागातील प्रमुख सक्रिय बंडखोर गट बनला.
युद्धाआधी या शहराची लोकसंख्या 27 लाख होती. काही अंदाजांनुसार, विस्थापित लोक आल्यामुळे या शहराची लोकसंख्या 40 लाखांपर्यंत पोहोचली होती.
इदलिब प्रांतात या बंडखोर गटाचं 'सॅल्व्हेशन गव्हर्नमेंट'वर नियंत्रण आहे. आरोग्य, शिक्षण आणि अंतर्गत सुरक्षा या गोष्टी पुरवण्याच्या बाबतीत हा बंडखोर गट स्थानिक प्रशासनाप्रमाणे काम करतो.
2021 मध्ये अल-जुलानी यांनी पीबीएसला सांगितलं होतं की त्यांनी अल-कायदाच्या जागतिक जिहादच्या धोरणाचं अनुकरण केलं नाही.
ते म्हणाले होते की त्यांचं मुख्य उद्दिष्ट सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हटवणं हे होतं. ते असंही म्हणाले होते की 'अमेरिका आणि पाश्चात्य देशांचं देखील हेच उद्दिष्ट होतं.'
ते म्हणाले की, "या भूप्रदेशामुळे युरोप आणि अमेरिकेच्या सुरक्षेला धोका निर्माण होत नाही. हा प्रदेश परदेशी जिहाद करण्यासाठीचं व्यासपीठ नाही."

फोटो स्रोत, Hayat Tahrir Al-sham
2020 मध्ये एचटीएसनं इदलिबमधील अल-कायदाचे तळ बंद केले होते. तसंच त्यांची शस्त्रास्त्रं जप्त केली होती आणि त्यांच्या काही नेत्यांना तुरुंगात टाकलं होतं.
यामुळे इदलिबमधील इस्लामिक स्टेटच्या कारवायांवर देखील अंकुश आला होता.
एचटीएसनं त्यांच्या नियंत्रणाखालील भागात इस्लामी कायदा लागू केला आहे. मात्र इतर बंडखोर जिहादी गटांच्या तुलनेत त्यात फारच कमी कठोरपणा आहे.
सार्वजनिकरीत्या हा गट ख्रिश्चन आणि बिगर मुस्लीमांशी संबंध ठेवतो. त्यांच्या या 'अधिक' उदारमतवादी धोरणामुळे इतर जिहादी गट एचटीएसवर टीका करत आले आहेत.
मात्र मानवाधिकार संघटनांनी, जनतेच्या निदर्शनांचं दमन करण्याचा आणि मानवाधिकारांचं उल्लंघन करण्याचा आरोप एचटीएसवर केला आहे.
अल-जुलानी यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
पाश्चात्य देश आणि मध्यपूर्वेतील देशांच्या सरकारांनी आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं एचटीएसला कट्टरतावादी संघटना म्हणून घोषीत केलं आहे.
कारण भूतकाळात अल-जुलानी यांचे संबंध अल कायदाशी होते. अल-जुलानी यांना अटक करण्यासाठी अमेरिकन सरकारनं त्यांच्यावर एक कोटी डॉलरचं बक्षीस ठेवलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











