सिरियामध्ये अचानक बशर अल-असद यांच्याविरोधात बंडखोरांचा उदय होण्यामागचं कारण काय?

सिरियामध्ये पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात बंडखोर गटांनी हल्ले करण्यात सुरूवात केली आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिरियामध्ये पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात बंडखोर गटांनी हल्ले करण्यात सुरूवात केली आहे
    • Author, जेरेमी बोवेन
    • Role, आंतरराष्ट्रीय संपादक, बीबीसी न्यूज

इस्रायलचा हमास, लेबनॉन आणि इराणशी सुरू असलेला संघर्ष संपलेला नसतानाच आता सिरियामधील युद्धाला तोंड फुटलं आहे.

इस्रायल-गाझा युद्धामुळे आधीच मध्यपूर्वेत प्रचंड तणाव असताना आता सीरियातील युद्धामुळे मध्यपूर्वेवर अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत.

यामुळे फक्त या प्रदेशाचीच नाही, तर जगाची चिंता वाढली आहे.

सिरियात नेमकं काय होतं आहे, तिथल्या संघर्षाशी निगडित विविध मुद्द्यांची मांडणी करणारा हा लेख :

गेल्या 7 ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर इस्रायलनं हमासविरुद्ध युद्धाची सुरूवात केली होती. वर्ष उलटून गेल्यानंतर देखील हे युद्ध अद्याप संपलेलं नसताना आता सिरियामध्ये आणखी एका युद्धाची सुरूवात झाली आहे.

मागील काही दिवसांपासून सिरियामध्ये जे घडतं आहे, त्यावरून हे स्पष्ट आहे की मध्य-पूर्वेत सुरू असलेलं युद्ध इतक्या लवकर थांबून तिथे शांतता निर्माण होणार नाही.

2011 पासून सिरियामध्ये एक दशकभर चाललेल्या युद्धानंतर देखील राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची राजवट सुरूच होती. कारण त्यांनी या संघर्षाची तयारी केली होती आणि ते आपल्या वडिलांकडून बरंच काही शिकले होते.

बशर अल-असद यांना त्यांची सत्ता वाचवण्यात यश आलं होतं. कारण त्यांना इराण, रशिया आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहसारख्या शक्तिशाली शेजाऱ्यांकडून मदत मिळाली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सिरियामधील बंडखोर गटांच्या विरोधात या मित्र देशांनी बशर अल-असद यांना मदत केली होती. सिरियामध्ये इस्लामिक स्टेट सारख्या जिहादी कट्टरतावादी बंडखोर गटापासून ते इतर अनेक सशस्त्र गट होते.

या गटांना अमेरिका आणि आखातातील श्रीमंत शाही सरकारांकडून मदत केली जात होती.

सध्या इस्रायलबरोबर सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणसमोर आव्हान आहे आणि त्यांची स्थिती थोडी कमकुवत झाली आहे. ही गोष्ट उघड आहे की या संघर्षात अमेरिका इस्रायलच्या पाठीशी आहे.

इराणचा सहकारी असलेल्या हिजबुल्लाह देखील बशर अल-असद यांच्या मदतीसाठी आपले सैनिक पाठवत होता. मात्र आता इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या हल्ल्यांमुळे हिजबुल्लाहची ताकद देखील फारच कमी झाली आहे.

बशर अल-असद यांना मदत करण्यासाठी रशियानं मागील काही दिवसांमध्ये सीरियामधील बंडखोर गटांवर हवाई हल्ले केले आहेत. मात्र युक्रेन बरोबरच्या युद्धामुळे रशियाची लष्करी ताकद आधीसारखी राहिलेली नाही.

युद्धाचा शेवट नाही

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सिरियातील युद्ध संपलेलं नाही. सिरियामध्ये जे घडतं आहे त्यावर प्रसारमाध्यमांचं फारसं लक्ष केंद्रीत नव्हतं. कारण मध्यपूर्वेत इतरत्र होत असलेल्या संघर्षांनी सर्वांचं लक्ष वेधून गेलेलं होतं.

त्याचबरोबर एक कारण हे देखील होतं की सिरियामध्ये युद्धजन्य ठिकाणांपर्यंत पत्रकारांना पोहोचता येत नव्हतं. सिरियात युद्ध थांबलेलं होतं मात्र तिथे युद्धाचा शेवट झालेला नव्हता.

2011 च्या आधी सिरियातील सत्तेवर बशर अल-असद यांचं नियंत्रण होतं, ते त्यांना पुन्हा मिळवता आलेलं नाही.

2011 हे अरब स्प्रिंगचं वर्ष होतं. सिरियातील तुरुंगांमध्ये अजूनही कैदी आहेत. मागील काही दिवस सोडता सीरियातील मोठ्या शहरांवर अजूनही बशर अल-असद यांचं नियंत्रण आहे.

ही शहरं सिरियाच्या चारी दिशांना आहेत आणि मुख्य महामार्गांनी जोडलेली आहेत.

आता बंडखोरांच्या गटांच्या आघाडीचं नेतृत्व हयात तहरीर अल-शम (एचटीएस) हा गट करतो आहे. या गटाचा उदय तुर्कीला लागून असलेल्या सीरियातील इदलिब प्रांतातून झाला आहे.

आता या प्रांतावर बंडखोर गटांचं नियंत्रण आहे. एका वरिष्ठ मुत्सद्द्यानं मला सांगितलं की 27 नोव्हेंबर नंतर काही दिवसातच सिरियाच्या सैनिकांना तिथून पळ काढावा लागला होता.

दोन दिवसांच्या लढाईनंतर बंडखोर गटांनी त्यांच्या सैनिकांचे फोटो पोस्ट करत एल्लपो या प्राचीन शहरावर नियंत्रण मिळवल्याचं जाहीर केलं होतं.

2011 मध्ये बंडखोर गटांबरोबरच्या संघर्षात सीरियातील अनेक शहरं पूर्ण बेचिराख झाली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2011 मध्ये बंडखोर गटांबरोबरच्या संघर्षात सीरियातील अनेक शहरं पूर्ण बेचिराख झाली होती

2012 ते 2015 दरम्यान इथे सिरियाच्या लष्कराचे सैनिक मोठ्या प्रमाणात होते. त्यावेळेस या शहराची विभागणी बंडखोर गटाच्या ताब्यातील भागात आणि सरकारी सैनिकांच्या ताब्यात असलेल्या भागामध्ये झाली होती.

सरकारी सैन्य मागे हटल्यानंतर असं वाटतं आहे की आता एल्लपो मध्ये शांतता आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोमध्ये दिसतं आहे की युनिफॉर्ममध्ये असलेले बंडखोर गटांचे सशस्त्र सैनिक एका फास्ट फूड आऊटलेटच्या बाहेर फ्राईड चिकनसाठी रांगेत उभे आहेत.

एचटीएस ची मूळं अल-कायदाशी जोडलेली आहेत. अर्थात 2016 मध्ये हा गट वेगळा झाला होता. 2016 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेव्यतिरिक्त अमेरिका, युरोपियन युनियन, तुर्की आणि ब्रिटननं एचटीएसला एक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.

मात्र सिरियन सरकार सर्वच बंडखोर गटांना दहशतवादी गट मानतं.

अबू मोहम्मद अल-जवलानी एचटीएसचे नेते आहेत. इराक आणि सिरियामध्ये प्रदीर्घ काळापासून त्यांची ओळख एक जिहादी नेता म्हणूनच राहिली आहे.

ईशान्य सीरियामध्ये सीरियाच्या सरकारची पकड सैल होते आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ईशान्य सीरियामध्ये सीरियाच्या सरकारची पकड सैल होते आहे

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या गटाचं प्रभाव क्षेत्र वाढवता यावं यासाठी जवलानी कट्टर जिहादी विचारसरणीपासून बाजूला झाले आहेत.

समर्थकांना आकर्षित करता यावं यासाठी या गटाची प्रतिमा नव्यानं तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा गट जिहादी भाषा आणि इस्लामिक संदर्भ टाळतो.

बीबीसी मॉनिटरिंगमध्ये जिहादी मीडिया विश्लेषक मीना अल-लामी म्हणाल्या की या गटाची भाषा तटस्थ आहे.

भूतकाळात जिहादी गटांनी जे केलं, त्यापासून अंतर राखण्याचा एचटीसीचा प्रयत्न आहे. तसंच हा गट सिरियाच्या सरकारच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो.

सिरियातील लोक आता कट्टरतावादी धार्मिक घटनांना उबगले आहेत.

2011 नंतर सिरियात लोकशाहीच्या समर्थनार्थ सुरू झालेल्या निदर्शनांचं बळाचा वापर करून दमन करण्यात आलं. त्यानंतरच तिथे बंडखोर गटांचा प्रभाव वाढला आहे.

अशा परिस्थितीत सिरियातील बहुतांश नागरिक एकतर तटस्थ राहिले किंवा नाईलाजानं त्यांनी सरकारला पाठिंबा दिला. कारण त्यांना जिहादी विचारसरणीच्या इस्लामिक स्टेटची भीती वाटत होती.

उत्तर सिरियामध्ये राजकीय विभाजन झाल्यानंतर एचटीसी आक्रमक झाली होती. ईशान्य सीरियातील बहुतांश भागावर सिरियाई डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) चं नियंत्रण होतं.

बशर अल-असद यांचं भवितव्य काय?

एसडीएफ कुर्दिश समुदायाचा गट आहे आणि याला अमेरिकेचा पाठिंबा होता. अमेरिकेचे जवळपास 900 सैनिक या भागात होते.

इथे तुर्कीची प्रमुख भूमिका आहे. सीमावर्ती भाग तुर्कीच्या नियंत्रणाखालीच आहे. तुर्कीनं या भागात त्यांचे सैनिक तैनात केले आहेत. तसंच ते इतर गटांना मदत देखील करतात. इस्लामिक स्टेटचे उरलेले सैनिक देखील कधी-कधी सीरियाच्या वाळवंटातून लपूनछपून हल्ले करतात.

सिरियातून येत असलेल्या वृत्तांनुसार बंडखोर गटांनी महत्त्वाची लष्करी संसाधनं ताब्यात घेतली आहेत. आता बंडखोर गट हामा च्या दिशेनं पुढे सरकत आहेत आणि दमिश्क हे त्यांचं लक्ष्य आहे.

अर्थात बशर अल-असद यांचं सरकार आणि त्यांचे मित्र हवाई हल्ला करण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

बंडखोर गटांकडे हवाई दल नाही. मात्र ते ड्रोनचा वापर करून हल्ले करू शकतात. असाच ड्रोनचा वापर त्यांनी सरकारच्या एका गुप्तहेर अधिकाऱ्याला मारण्यासाठी केला होता.

सिरियामध्ये युद्धाची नव्यानं होत असलेली सुरूवात जगाला सावध करणारी आहे.

सीरियातील लोकांना बंडखोर गट सत्तेत नको आहोत त्यामुळे बशर अल-असद यांना सत्तेत ठेवणं हा त्यांचा नाईलाज आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सीरियातील लोकांना बंडखोर गट सत्तेत नको आहोत त्यामुळे बशर अल-असद यांना सत्तेत ठेवणं हा त्यांचा नाईलाज आहे

गेइर पेडर्सन सिरियामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे राजदूत आहेत. त्यांनी एक वक्तव्यं दिलं आहे की सीरियामध्ये जे होतं आहे, ते हा प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेबरोबरच तिथल्या नागरिकांसाठीही धोकादायक आहे.

ते म्हणाले की सशस्त्र संघर्षाद्वारे सीरियातील समस्यांवर मात करता येणं शक्य नाही.

सिरियाचं भवितव्य निःपक्षपातीपणे घेतलेल्या निवडणुका आणि एका नव्या राज्यघटनेत आहे. याचा अर्थ असा की असद आणि त्यांच्या कुटुंब अनेक वर्षांपासून ज्या मनमानी कारभाराद्वारे सीरियाची सत्ता चालवत आहेत, ते थांबवावं लागेल.

सिरियातील युद्धात पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मात्र सिरियातील सत्ता असद यांच्या हातातून जाईल, असं म्हणणं उतावीळपणाचं होईल. जिहादी गटांच्या तुलनेत सिरियातील लोकांना असद यांचा पर्याय चांगला वाटतो. तीच असद यांची ताकद आहे. मात्र असद यांच्या विरोधातील इतर गटांचा उदय झाला तर असद यांचं सरकार धोक्यात येऊ शकतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.