तुर्कीच्या हल्ल्यांमुळे सीरियातील लाखो लोकांची पाण्यासाठी वणवण

- Author, नमक खोशनाव, ख्रिस्तोफर गाईल्स आणि सफोरा स्मिथ
- Role, बीबीसी आय, वर्ल्ड सर्व्हिस
एका बाजूने लेबनॉन, इस्रायल आणि दुसऱ्या बाजूने तुर्की, इराक यांच्या सीमा असलेल्या सीरियाचं भौगोलिक स्थान महत्त्वाचं आहे. तसा हा सुपीक प्रदेश आहे. मात्र सध्या सीरियातील लोकांना एका अभूतपूर्व संकटाला तोंड द्यावं लागतं आहे.
हे संकट जसं मानवी आहे तसंच नैसर्गिक देखील आहे. तीव्र दुष्काळ, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे सीरियातील लाखो सर्वसामान्य लोक हवालदिल झाले आहेत. या संकटाला जबाबदार कोण आहे, त्याची व्याप्ती किती आहे आणि त्याचा सीरियातील लोकांवर काय परिणाम होतो आहे याचा आढावा घेणारा हा ग्राऊंड रिपोर्ट.
तुर्कीनं सीरियाच्या ईशान्य भागात केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे तिथल्या दहा लाख लोकांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. सीरियाचा हा भाग दुष्काळग्रस्त आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असू शकतं.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसनं गोळा केलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 ते जानेवारी 2024 दरम्यान तुर्कीनं सीरियातील कुर्दिश नियंत्रणात असलेल्या ऑटोनॉमस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉर्थ अँड ईस्ट सीरिया (AANES)मधील तेल केंद्र, गॅस केंद्र आणि ऊर्जा केंद्रांवर 100 हून अधिक हल्ले केले आहेत.
आधीच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे आणि हवामान बदलामुळे पडलेल्या चार वर्षांच्या तीव्र दुष्काळामुळे हा प्रदेश त्रस्त होता. त्यात आता तुर्कीच्या या हल्ल्यांमुळे या प्रदेशातील मानवीय संकटात आणखी भर पडली आहे.
या भागात आधीच पाण्याचा तुटवडा होता. त्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विजेशी निगडित पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमुळे या प्रदेशातील अलूक या मुख्य पाणीपुरवठा केंद्राला होणाला असणारा विजेचा पुरवठा बंद झाला. तेव्हापासून हे पाणीपुरवठा केंद्र बंद आहे.
बीबीसीनं या ठिकाणी दोनदा दिलेल्या भेटींमध्ये इथल्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करताना पाहिलं आहे.
टँकरच्या पाण्यासाठी वणवण
तुर्कीनं म्हटलं आहे की ते ज्या कुर्दिश फुटीरतावादी गटांना दहशतवादी मानतात, त्यांच्या "उत्पन्नाच्या आणि क्षमतांच्या स्त्रोतां"ना त्यांनी लक्ष्य केलं आहे.
असं म्हटलं जातं आहे की या भागात तीव्र दुष्काळ आहे ही बाब सर्वांना माहित आहे. त्यात पाण्याचं अपुरं, खराब व्यवस्थापन आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधांकडे केलेलं दुर्लक्ष यामुळे या भागातील परिस्थिती आणखीच बिघडली आहे.
तुर्की "आमच्या लोकांचं अस्तित्व नष्ट करण्याचा" प्रयत्न करतं आहे, असा आरोप याआधी ऑटोनॉमस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉर्थ अँड ईस्ट सीरिया (AANES)नं केला होता.
सीरियाच्या हसाकेह प्रांतातील दहा लाखांहून अधिक लोक आधी पाणीपुरवठ्यासाठी अलूकवर अवलंबून होते. ते आता जवळपास 12 मैल (20 किमी) अंतरावरून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत.

या भागात दररोज पाण्याच्या टँकरच्या शेकडो खेपा केल्या जातात. पाणी पुरवठा करणारं व्यवस्थापन पाण्याचं वितरण करताना शाळा, अनाथाश्रम, हॉस्पिटल आणि अत्यंत गरजू लोकांना प्राधान्य देतात.
मात्र इथे टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा प्रत्येकासाठी पुरेसा नाही.
बीबीसीनं हसाकेह शहरात लोकांना पाण्याच्या टँकरची वाट पाहताना, पाणी मिळावं यासाठी टँकरचालकांची विनवणी करताना पाहिलं.
अहमद अल-अहमद या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या एका टँकरचे चालक आहेत. ते म्हणाले, "इथे पाणी सोन्यापेक्षा मूल्यवान आहे. या भागातील लोकांना अधिक पाण्याची आवश्यकता आहे. त्यांना पुरेसं पाणी देण्यात यावं, इतकीच त्यांची मागणी आहे."
इथे पाण्याचा संघर्ष तीव्र झाला आहे. पाण्यासाठी मारामारी केल्याचंही काही लोकांनी कबूल केलं. एका महिलेनं तर धमकी दिली की, "जर टँकर चालकानं मला पाणी दिलं नाही, तर मी त्याच्या टँकरचे टायर पंक्चर करेन."
याहा अहमद शहराच्या जल महामंडळाचे सहसंचालक आहेत. ते म्हणाले, "मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की ईशान्य सीरियाला भीषण संकटाला तोंड द्यावं लागतं आहे."
तुर्की आणि कुर्दिश सशस्त्र गटांमधील संघर्ष
या प्रदेशात राहणारे लोक फक्त सीरियात सुरू असलेल्या यादवी युद्धातच नाही तर तुर्की आणि कुर्दिश सैन्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या तावडीत देखील सापडले आहेत.
कुर्दिश सैन्यानं अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या मदतीनं 2018 मध्ये ऑटोनॉमस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉर्थ अँड ईस्ट सीरिया (AANES)ची स्थापना केली होती.
त्यानंतर त्यांनी या प्रदेशातून इस्लामिक स्टेट (IS)या सशस्त्र गटाला हुसकावून लावलं होतं. इस्लामिक स्टेटनं पुन्हा तिथं डोकं वर काढू नये यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीचं सैन्य अजूनही तिथं तैनात आहे.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगान यांनी तुर्कीच्या सीमेला लागूनच असलेल्या ऑटोनॉमस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉर्थ अँड ईस्ट सीरियाचं वर्णन एक दहशतवादी राज्य म्हणून केलं आहे. एएएनईएसला अद्याप आंतरराष्ट्रीय समुदायाकडून अधिकृत मान्यता मिळालेली नाही.

सीरियातील मुख्य लष्करी ताकदीवर वर्चस्व असणाऱ्या कुर्दिश सशस्त्र गट हा कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK)या बंडखोर गटाचाच विस्तार असल्याचं तुर्की सरकार मानतं. कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी या बंडखोर गटानं अनेक दशकं तुर्कीमधील कुर्दिश स्वायत्ततेसाठी लढा दिला आहे.
कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीला तुर्की, युरोपियन युनियन, युके आणि अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषीत केलं आहे.
ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान अमुदा, कामिश्ली आणि दरबासियाह या ऑटोनॉमस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉर्थ अँड ईस्ट सीरियामधील तीन भागातील वीज पुरवठा केंद्रांवर हल्ला झाला होता. तसंच स्वादियाह हे या प्रदेशातील मुख्य ऊर्जानिर्मिती केंद्र देखील हल्ला करण्यात आला होता.
दुष्काळ आणि वीज पुरवठा खंडित झाल्यानं पाणी संकट
उपग्रहाकडून मिळालेली छायाचित्रं, प्रत्यक्षदर्शीनी तयार केलेले व्हिडिओ, बातम्या आणि या ठिकाणांना दिलेल्या भेटींच्या आधारे बीबीसीनं या वीज केंद्रांचं जे नुकसान झालं आहे त्याची पुष्टी केली आहे.
जानेवारी 2024 मध्ये झालेल्या हल्ल्यांपूर्वी आणि त्यानंतर रात्री लाईट्सच्या उजेडात उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांमधून मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाल्याचं दिसून येतं.
"18 जानेवारीला या भागात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित झाल्याचं दिसून येतं," असं रंजय श्रेष्ठ म्हणाले. ते नासामध्ये वैज्ञानिक असून त्यांनी या फोटोंचा आढावा घेतला.
दुष्काळ आणि लढाईमुळे ईशान्य सीरियात दहा लाखांहून अधिक लोक पाणी संकटाला तोंड देत आहेत. बीबीसीच्या 'लाईफ अॅट 50°C: अवर वॉटर, देअर वॉर' या फिल्ममध्ये पाण्याची सर्वाधिक गरज असणाऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवणाऱ्या इंजिनीअर्स आणि टॅंकर चालकांना दाखवण्यात आलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे की तुर्की फौजांनी स्वादियाह, अमुदा आणि काश्मिली मध्ये हल्ले केले. तर मानवतावादी संघटनांचं म्हणणं आहे की दारबासियाहमधील हल्ल्यामागे तुर्कीचा हात होता.

यावर तुर्कीचं म्हणणं आहे की ते कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK), पीपल्स प्रोटेक्शन युनिट्स (YPG)आणि कुर्दिश डेमोक्रॅटिक युनियन पार्टी (PYD) ला लक्ष्य करत आहेत.
पीपल्स प्रोटेक्शन युनिट्स (YPG)हा अमेरिकेचं समर्थन असलेल्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसमधील सर्वात मोठा सशस्त्र गट आहे. हा गट ऑटोनॉमस अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ नॉर्थ अँड ईस्ट सीरिया (AANES)मधील मुख्य राजकीय पक्ष असलेल्या कुर्दिश डेमोक्रॅटिक युनियन पार्टी (PYD)ची लष्करी शाखा आहे.
"नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना आम्ही कधीच लक्ष्य केलेलं नाही," असं तुर्कीनं बीबीसीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तुर्कीचे परराष्ट्रमंत्री हकन फिदान म्हणाले होते की विशेषकरून इराक आणि सीरियामधील कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (PKK)आणि पीपल्स प्रोटेक्शन युनिट्स (YPG)च्या मालकीच्या सर्व "पायाभूत सुविधा, इमारती आणि ऊर्जा केंद्र" ही त्यांचं लष्कर, सुरक्षा दलं आणि गुप्तहेर संस्थेसाठीची "कायदेशीर लक्ष्य" आहेत.


तुर्की आणि सीरियामधील संघर्षामुळे सीरियातील लोकांना आधीच बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागत असताना, हवामान बदलामुळे त्यांच्यासमोरील संकट आणखी भीषण झालं आहे.
2020 पासून ईशान्य सीरिया आणि इराकच्या काही भागांमध्ये तीव्र आणि अपवादात्मक कृषी-दुष्काळाचा विळखा पडला आहे.
युरोपियन हवामान माहितीनुसार, गेल्या 70 वर्षांमध्ये टायग्रीस-युफ्रेटस खोऱ्यातील सरासरी तापमानात 2 अंश सेल्सिअस (36 फॅरनहाईट) ची वाढ झाली आहे.
कधीकाळी हसाकेह शहराला खाबूर नदीतून पाणीपुरवठा होत होता. मात्र आता पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्यामुळे लोकांना पाण्यासाठी अलूक जल केंद्रावर अवलंबून राहावं लागतं आहे.
2019 मध्ये तुर्कीनं रास अल-आइन प्रदेश ताब्यात घेतला होता. अलूक याच भागात आहे. तुर्कीवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी "सुरक्षित क्षेत्र" तयार करण्यासाठी असं करणं आवश्यक असल्याचं तुर्कीचं म्हणणं होतं.
संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल
यानंतर दोन वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघानं अलूक हून ईशान्य सीरियाला होणारा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. राष्ट्रसंघानं म्हटलं होतं की या भागातील पाणीपुरवठा किमान 19 वेळा खंडित किंवा विस्कळीत झाला होता.
फेब्रुवारी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका स्वतंत्र आयोगानं एक अहवाल प्रकाशित केला होता.
त्यात म्हटलं होतं की ऑक्टोबर 2023 मध्ये विजेशी निगडीत पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये युद्ध काळातील गुन्हे घडलेले असू शकतात. कारण या हल्ल्यांमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना पाणी संकटाला तोंड द्यावं लागलं होतं.
तुर्कीच्या सीरियावरील हल्ल्याचे तिथल्या नागरिकांवर जे परिणाम झाले त्यासंदर्भात बीबीसीनं आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञांसह त्यांचे निष्कर्ष मांडले.
आरिफ अब्राहम डॉटी स्ट्रीट चेंबर्सचे बॅरिस्टर आहेत. ते म्हणाले, "तुर्कीनं सीरियातील ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांचा तिथल्या नागरिकांवर विनाशकारी परिणाम झाला."
ते पुढे म्हणाले, "यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं गंभीर उल्लंघन झालेलं असू शकतं."
तर पॅट्रिक क्रॉकर युरोपियन सेंटर फॉर कॉन्स्टिट्युशनल अँड ह्युमन राईट्समध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी वकील आहेत. ते म्हणाले की, "सीरियात आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन झालं असण्याचे इतके भक्कम संकेत आहेत की त्यांची चौकशी कायदेशीर यंत्रणेद्वारे करण्यात आली पाहिजे."
तुर्की सरकारनं म्हटलं आहे की, "ते आंतरराष्ट्रीय कायद्यांचा पूर्ण सन्मान करतात."

ते पुढे म्हणाले की फेब्रुवारी 2024 मधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात करण्यात आलेल्या "निराधार आरोपां"संदर्भात त्यांनी "कोणताही ठोस पुरावा" सादर केलेला नाही.
त्याचबरोबर सीरियातील पाणीसंकटाला आपण जबाबदार नसल्याचं तुर्कीचं म्हणणं आहे.
तुर्की सरकारचा दावा आहे की ईशान्य सीरियामध्ये जे पाण्याचं संकट आहे ते हवामान बदलामुळे आणि त्या भागातील "पाण्याच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष" केल्यामुळे निर्माण झालेलं आहे.
एके काळी सुपीक प्रदेश असलेल्या ईशान्य सीरियामध्ये आता पिण्याच्या पाण्यासाठी देखील संघर्ष का करावा लागतो आहे. यामागे काय कारण आहे, यासाठी कोण दोषी आहे, याचा तपास बीबीसी आय चे नमक खोशनाव यांनी केला.
हसाकेह मधील रहिवाशांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांना वाटतं की त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आलं आहे.
ओस्मान गड्डो जल महामंडळाच्या पाणी चाचणी विभागाचे प्रमुख आहेत. ते म्हणाले, "आम्ही खूप त्याग केला आहे. आमच्यापैकी कित्येकजण लढाईत मारले गेले. मात्र आमच्या मदतीसाठी कोणीही पुढे सरसावत नाही. आम्ही फार काही नाही, फक्त पिण्याचं पाणी मागत आहोत."
(अहमद नूर आणि एरवन रिवॉल्ट यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











