Hevrin Khalaf: सीरियातील ’शांतिदूता’ला 20 गोळ्या घालून का मारण्यात आलं?

फोटो स्रोत, Getty Images
सीरियाच्या कुर्द नेत्या हेफरीन खलफ यांच्या हत्येमागे टर्की-पुरस्कृत सीरियन राष्ट्रीय सैन्याचा हात होता, असं बीबीसी न्यूज अरबीच्या शोधमोहिमेत असं स्पष्ट झालं आहे.
34 वर्षीय हेफरीन खलफ सीरियात विविध समाजांमध्ये समानतेसाठी लढा देत होत्या. सीरियाच्या उत्तर भागात टर्कीच्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र विरोध केला होता.
उत्तर सीरियाला कुर्दिश भाषेत रोजावा म्हटलं जातं आणि या भागाचं नियंत्रण कुर्दांच्या हाती होतं.
अहरार अल-शर्किया नावाच्या गटाने खलफ यांच्या हत्येची जबाबदारी नाकारली असली तरी, पुरावे आणि समोर असलेले तथ्य वेगळंच चित्र मांडतात. अहरार अल-शर्किया हा गट टर्की-पुरस्कृत सीरियन राष्ट्रीय सैन्यासाठी (SNA) लढतो. टर्की सरकारनेही यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
सर्व समाजात बरोबरी
हेफरीन खलफ यांनी फ्युचर सीरिया पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. कुर्द, सीरियन अरब आणि ख्रिश्चनांबरोबर काम करत सीरियाची पुनउर्भारणी करणं, हे फ्युचर सीरिया पक्षाचं लक्ष्य आहे.
खलफ यांची मैत्रीण आणि माजी सहकारी नुबाहर मुस्तफा म्हणाल्या, "मी माझी बहीण, कॉम्रेड आणि माझ्यासाठी एक नेता असलेली व्यक्ती गमावली आहे.
"ती इतर महिलांसाठी काम करणारी महिला होती, तिला लोकांना सक्षम करायचं होतं. सीरियात शांतता नांदावी यासाठी ती प्रयत्नशील होती."

फोटो स्रोत, FUTURE SYRIA PARTY
12 ऑक्टोबर 2019च्या सकाळी साडेपाच वाजता खलफ उत्तर सीरियातील अल-हसाकाह शहराच्या दिशेने निघाल्या होत्या. रक्कामध्ये त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयापासून तीन तासांच्या अंतरावर त्या MH4 हायवेवरून जात होत्या.
या भागातून अमेरिकेच्या लष्कराने माघार घेऊन फक्त तीन दिवस झाले होते. अमेरिकेच्या लष्कराने माघार घेतल्यानंतर टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रसिप अर्दोआन यांना सीरियात घुसून लष्करी मोहीम राबवण्याची परवानगी मिळाली. हा हायवे सीरियाच्या सीमेजवळ नाही. मात्र प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की टर्कीहून सीरियात आलेल्या सैन्याची एक तुकडी हायवेवरून दक्षिणेकडे जात होती.
ही तुकडी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या केंद्र सरकारच्या लष्करातील नसून टर्की-पुरस्कृत SNAचा भाग होती.
SNA काय आहे?
SNAची स्थापना 2019मध्ये स्थापना झाली होती. 41 गट मिळून स्थापन झालेल्या SNAमध्ये एकूण 70,000हून अधिक सैनिक आहेत.
टर्कीने या गटांना प्रशिक्षित केलं असून त्यांना हत्यारंही पुरवली आहेत. अमेरिकेच्या लष्कराने माघार घेतल्यानंतर ही तुकडी उत्तर पूर्व सीरियात कुर्द फौजांशी लढत आहेत.
12 ऑक्टोबर 2019 रोजी एक गट अहरार अल-शर्कियाने एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप टेलिग्रामवर काही व्हीडिओ अपलोड केले. एका व्हीडिओत बंडखोर समूह MH4 हायवेवर येण्यासंदर्भात घोषणा करत होते.
व्हीडिओत उगवता सूर्य दिसतोय. त्यांच्या येण्याची वेळ सकाळी साडेसहा-सातच्या सुमारासची आहे. व्हीडिओत मागे क्राँकीटचं बॅरियर, टेलिफोनचा खांब आणि धूळ भरलेला रस्ता दिसतोय.
या भागाच्या सॅटेलाईट फोटोंद्वारे बीबीसीने ही जागी नक्की कुठली याचा शोध घेतला. ही जागा तिरवाजिया चेक पॉइंट आहे. हा तोच चेकपॉइंट जिथून हेफरीन खलफ यांची गाडी 12 ऑक्टोबरच्या सकाळी जात होती.
PKK कोण आहे?
या व्हीडिओत तीन लोकांना अटक होताना दिसत आहे. PKK बंडखोर असल्याचं सांगितलं जात आहे.
PKK कुर्दांचा सशस्त्र समूह आहे, जो गेल्या अनेक वर्षांपासून टर्कीविरोधात लढत आहेत. एका व्हीडिओत अहरार अल-शर्किया संघटनेची माणसं आपल्या माणसाला म्हणताना दिसत आहेत की जमिनीवर पडताना गोळी लागतानाचा व्हीडिओ बनवा. या हत्येचा व्हीडिओ तिरवाजिया चेक पॉइंट या ठिकाणी बनवण्यात आला होता.

फोटो स्रोत, VIDEO POSTED ON TELEGRAM
अहरार अल-शर्कियाने सुरुवातीला तिथे असल्याचा इन्कार केला होता. मात्र त्यानंतर एका गटाने बीबीसीला सांगितलं की, ज्या लोकांनी MH4 बंद केला होता. त्यादिवशी परवानगीविना बंद करण्यात आला होता. ज्यांनी नेतृत्वाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आलं आहे.
अहरार अल-शर्कियाने हेही म्हटलं आहे की त्यांनी एका गाडीवर गोळीबार केला कारण त्यांनी गाडी थांबवण्यास नकार दिला होता. मात्र त्या गटाने सांगितलं की त्यांनी हेफरीन खलफ यांना लक्ष्य केलं नव्हतं. त्यांचा मृत्यू कसा झाला हे माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हीडिओवर आणि बीबीसी न्यूज अरबीशी बातचीत करणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या मते खलफ यांना कुर्द फौजांनीच मारलं.
बीबीसीच्या जियोलोकेशन विश्लेषणानुसार हेफरीन खलफ यांची गाडी तिरवाजिया चेकपॉइंटहून खाली आली होती.
त्यादिवशी अहरार अल-शर्कियाने अपलोड केलेल्या व्हीडिओत बंडखोर हफरीन यांच्या गाडीच्या आसपास दिसत आहेत. गाडीमध्ये एक मृतदेह होता आणि असं मानलं जात आहे की तो त्यांचे चालक फरहाद रमादान यांचा होता.
व्हीडिओत एका ठिकाणी महिलेचा आवाज गाडीच्या आतून येताना दिसत आहे.
'या जगात मानवता नाही'
हेफरीन यांची आई सुआद मोहम्मद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की "हा हेफरीन यांचा आवाज आहे. 5,000 वेगवेगळ्या आवाजांमधूनही मी तिचा आवाज ओळखू शकतो."
"मी जेव्हा तिचा आवाज ऐकला तेव्हा मला जगातली क्रूरता कळली. जगात मानवता शिल्लक राहिलेली नाही."
असं वाटतं की हेफरीन खलफ त्यावेळी जिवंत होत्या आणि जेव्हा गाडी थांबली तेव्हा बंडखोरांना त्यांनी आपली ओळख सांगितली. पुराव्यानिशी हे सिद्ध झालं की त्यांचा मृत्यू गाडीत झाला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीशी बोलताना एका शेतकऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलं की अहरार अल-शर्कियाचे बंडखोर चेक पॉइंटपाशी पोहोचले त्यावेळी त्या तिथून जात होत्या.
"जेव्हा बंडखोर सकाळी साडेसात वाजता तिथून निघाले तेव्हा त्या तिथे पोहोचल्या. ते दृश्य अतिशय भीतीदायक होतं. मी सगळ्यात आधी एका मुलीला पाहिलं. त्यांचा मृतदेह गाडीपासून जेमतेम पाच मीटर अंतरावर होता. त्यांचा चेहरा ओळखण्यापलीकडे गेला होता. त्यांच्या पायाला प्रचंड मार लागला होता. बहुतेक पाय तुटले होते."
तिरवाजिया चेक पॉइंटवर शेतकऱ्यांना नऊ मृतदेह आढळले. ते सांगतात, "मृतदेह गाडीत ठेवताना मदत करण्यासाठी स्थानिक लोकांनी मला नकार दिला. त्यांनाही मारलं जाईल अशी भीती वाटली."
20 गोळ्या लागल्या होत्या
12 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत हेफरीन यांचा मृतदेह तीन विभिन्न मृतदेहासंह मलीकिया लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं.
हेफरीन खलफ यांना 20 गोळ्या मारण्यात आल्या होत्या. त्यांचे दोन्ही पाय तुटले होते. त्यांच्यावर अतिशय भीषण पद्धतीने अत्याचार करण्यात आला होता.

बीबीसी अरबीच्या नुसार हेफरीन यांना गाडीतून जिवंत बाहेर खेचण्यात आलं. त्यानंतर अहरार अल-शर्कियाच्या बंडखोरांनी त्यांना निर्घूण पद्धतीने मारलं आणि त्यांची हल्ला केली.
अहरार अल-शर्कियाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की हेफरीन खलफ यांच्या हत्येसंदर्भात आम्ही अनेकदा इन्कार केला आहे.
हेफरीन खलफ यांच्या हत्येसंदर्भात निष्पक्ष तपास व्हावा असं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्तांनी टर्कीला म्हटलं आहे. मात्र हा तपास अद्याप सुरू झालेला नाही.
उत्तर सीरियात जेव्हा टर्की सैन्याची कारवाई सुरू झाली तेव्हापासून टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी रसिप तैयप अर्दोआन यांचं म्हणणं असं की सैन्याची मोहीम दहशतवाद रोखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्हावा.
टर्कीची प्रतिक्रिया नाही
ऑक्टोबर महिन्यात या भागातून अमेरिकेच्या लष्कराने माघार घेतल्यानंतर शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हेफरीन यांचाही समावेश आहे. यादरम्यान टर्कीचं समर्थन असलेल्या एसएनए तुकडीचं तिथे आगमन झालं. अहरार अल-शर्किया यापैकीच एक.
अॅम्नेन्स्टी इंटरनॅशनलने बीबीसीला सांगितलं की, "अहरार अल-शर्कियाने हेफरीन खलफ आणि अन्य लोकांच्या हत्येची स्वतंत्ररीत्या चौकशी व्हायला हवी. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. टर्की जोवर त्यांच्या सशस्त्र गटांना आळा नाही घालत आणि तोवर हे अत्याचार वाढतच राहतील."
यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी बीबीसीने टर्की सरकारशी संपर्क साधला, मात्र त्यांनी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








