टर्कीविरुद्ध लढण्यासाठी आता कुर्दांनी केला सीरियासोबत करार

एसडीएफ

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेनं सैन्य मागे घेतल्यानं सीरियन डेमोक्रेटिक फोर्सनं (SDF) सीरियाशी करार केलाय. टर्कीच्या आक्रमणाला रोखण्याचे प्रयत्न करण्यासाठीं उत्तरेकडील सीमेवर सैन्य पाठवण्यास सीरियन सरकार तयार झालं असल्याची माहिती सीरियातल्या कुर्दांनी दिलीय.

सीरियन माध्यमांच्या वृत्तांनुसार, उत्तरेकडील सीमेवर सरकारनं सैन्य तैनात केले होते. मात्र, अमेरिकेच्या निर्णयाचं पालन करत त्या भागातील अस्थिर स्थिती पाहता सर्व सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला होता.

सीमेवरील कुर्दांच्या सशस्त्र दलाला हतबल आणि असहाय्य करण्यासाठी टर्कीनं गेल्याच आठवड्यात हल्ला चढवला होता.

कुर्दांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळच संघर्ष सुरू झाल्यानं एन इस्सा या उत्तरेकडील कॅम्पमधून आयएस सदस्यांचे 800 नातेवाईक पळाले आहेत.

टर्कीचं आक्रमण आणि अमेरिकेची माघार यामुळं आंतरराष्ट्रीय स्तावरून ओरड सुरू झाली. कारण सीरियातल्या आयसिसशी लढण्यासाठी सीरियन डेमोक्रेटिक फोर्स (SDF) महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सीरिया आणि कुर्दांमधील करार काय आहे?

उत्तर सीरियातील कुर्दांच्या प्रशासनाच्या माहितीनुसार, करारानुसार संपूर्ण सीमेवर सीरिया आपलं सैन्य तैनात करेल.

एसडीएफ

फोटो स्रोत, Getty Images

"टर्कीच्या सैन्यानं आक्रमण करून ज्या भागावर ताबा मिळवलाय, तो भाग मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्याशी लढण्यासाठी सीरियन सैन्य एसडीएफला मदत करतील. शिवाय, आफ्रीनसारख्या शहरांना, ज्यांवर टर्कीच्या सैन्यानं ताबा घेतलाय, तेही मुक्त करण्याचा मार्ग मोकळा होईल." असं एसडीएफनं म्हटलंय.

2018 साली दोन महिन्यांच्या ऑपरेशननंतर टर्कीचे सैन्य आणि सीरियातील टर्की समर्थक यांनी कुर्दांना आफ्रीनमधून बाहेर पडण्यास भाग पाडले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून संरक्षण देणाऱ्या अमेरिकेनं साथ सोडल्यानं सीरियासोबतचा करार कुर्दांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मात्र, सीरियन सरकारनं करारात नेमके काय आश्वासनं दिलंय, हे कळू शकलं नाहीय.

सीरिया

दुसरीकडे, एसडीएफ प्रमुखानं फॉरेन पॉलिसी मॅगझिनमधील लेखात म्हटलंय, "असाद सरकार आणि रशियाशी वेदनादायी तडजोड होईल. आम्ही त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही. खरं सांगायचं तर कुणावर विश्वास ठेवणंच कठीण आहे. मात्र आम्हाला तडजोड किंवा आमच्या लोकांचा नरसंहार यातलं एक निवडायचं असेल, तर आम्ही आमच्या लोकांच्या आयुष्याची निवड करू."

अमेरिकेनं अचानक सैन्य मागे घेतल्यानं एसडीएफला सीरियन सरकारशी करार करावा लागलाय. अमेरिकेच्या निर्णयामुळं टर्कीचा मार्गही मोकळा झाला होता.

अमेरिकेच्या या निर्णयाला एसडीएफनं 'पाठीत खंजीर खुपसण्याची' उपमा दिलीय.

सीरियातून सैन्य मागे घेण्याचा अमेरिकेचा निर्णय

कुर्दांविरोधात टर्कीच्या वाढत्या मोहिमांमुळं अमेरिका सीरियातून आपले सर्व सैनिक बाहेर काढणार आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांच्या माहितीनुसार, टर्की आधीच ठरल्याप्रमाणं 'अधिक वेळ' आपली मोहीम सुरू ठेवेल.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

कुर्दांना सीमेवरून हटवण्यासाठी टर्कीचे सैन्य मोहीम राबवत आहेत. या परिसरात कुर्द हे अमेरिकेचे सहकारी आहेत. मात्र, अमेरिकेचे संरक्षणमंत्री म्हणतात, अमेरिका कुर्दांचं संरक्षण करणार नाही. ते सीरिया आणि रशियाशी मदत मागू शकतात.

टर्की-सीरिया यांच्यातील संघर्षामुळं सुमारे 1,30,000 हून अधिक लोक बेघर झाले आहेत आणि हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टर्कीला सीरियन कुर्दांची भीती असण्याचं कारण

सीरियामध्ये आयसिसचा बिमोड करण्यासाठी सीरियन डेमोक्रेटिक फोर्स (SDF) या आघाडीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. SDF नेच अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील बहुराष्ट्रीय आघाडीच्या मदतीने आयएसच्या ताब्यात असलेला ईशान्य सीरियातला हजारो किमीचा भूभाग सोडवला. SDF ही कुर्द आणि अरब जवानांची आघाडी आहे. या आघाडीत पिपल्स प्रोटेक्शन युनिट (YPG) या कुर्द गटाचा वरचष्मा आहे.

मात्र, YPG कट्टरवादी संघटना असल्याचं टर्कीला वाटतं. त्यांच्या म्हणण्यानुसार YPG टर्कीमध्ये गेल्या तीन दशकांपासून कुर्दांच्या स्वायतत्तेसाठी लढा देणाऱ्या कुर्दीस्तान वर्कर्स पार्टी (PKK) या कट्टरवादी गटाची विस्तारित संघटना आहे. PKK वर टर्कीमध्ये बंदी आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघानेदेखील PKKला कट्टरवादी संघटना असल्याचं जाहीर केलं आहे.

खरंतर YPG आणि PKK या दोन्ही संघटनांची विचारधारा एकच आहे. मात्र, आपण पूर्णपणे वेगवेगळ्या आणि स्वतंत्र संघटना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

टर्कीने YPGचे चित्र रंगवलं आहे, त्याचा अमेरिकेनेही इनकार केला आहे. असं असलं तरी टर्कीला ते मान्य नाही आणि आपण आपल्या सीमेतून YPG ला हद्दपार करणारच, असा पण त्यांनी केला आहे.

टर्कीने हल्ला का चढवला?

सीरियाच्या सीमेच्या आत कुर्दांपासून मुक्त असा 32 किमीचा एक 'सेफ झोन' असावा, असं टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचं म्हणणं आहे. या 32 किमी भूप्रदेशात सध्या टर्कीमध्ये शरण घेतलेल्या जवळपास 20 लाख सीरियन विस्थापितांचं पुनर्वसन करण्याचा त्यांचा मानस आहे.

मात्र, आम्ही आपल्या सीमेचं रक्षण करू, असं कुर्दांचं म्हणणं आहे. 'हा प्रदेश वॉर झोनमध्ये रुपांतरित होण्यासाठी' अमेरिका आम्हाला सोडून गेल्याचा आरोप करत इथे पुन्हा इस्लामिक स्टेटचा उदय होण्याचा धोका असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अमेरिकी सैन्य

फोटो स्रोत, AFP

विस्थापित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आकस्मिक योजना आखल्याचं आणि 'कुठल्याही वाईट परिस्थितीसाठी सज्ज असल्याचं' संयुक्त राष्ट्रांकडून सांगण्यात आलं आहे.

तर 'मर्यादा सोडून' असलेली कुठलीही कारवाई केल्यास तुर्कीची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त आणि पांगळी करू, असा इशारा ट्रंप यांनी दिला आहे.

'सेफ झोन'च्या चर्चेचा उगम

आयसिस पराभवाच्या उंबरठ्यावर होता त्यावेळी म्हणजेच 2018 सालच्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिका सीरियातून लवकरच सैन्य माघारी बोलवण्याची प्रक्रिया सुरू करेल, असं म्हटलं होतं.

मात्र, असं केल्यास कुर्दांचं भविष्य टांगणीला लागेल, अशी भीती कुर्दांनी व्यक्त केल्यावर ट्रंप यांनी टर्कीने सीरियावर हल्ला केल्यास टर्कीला आर्थिकदृष्ट्या पांगळं करू, असा इशारा दिला.

तसंच टर्की आणि सीरियाच्या सीमेला लागून असलेल्या सीरियाकडच्या भागात 32 किमीचा (20 मैल) 'सेफ झोन' उभारण्याचा प्रस्ताव सादर केला.

पुढे ट्रंप यांनी सैन्य माघारी बोलवण्याची योजना पुढे ढकलली. मात्र, टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसप तय्यब अर्दोआन यांनी 'सेफ झोन'चा प्रस्ताव लावून धरला.

SDF ने मार्च 2019 मध्ये आयसिएसच्या ताब्यात उरलेल्या एकमेव भागावर नियंत्रण मिळवलं आणि हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.

सीरिया सीमाभाग

फोटो स्रोत, AFP

सेफ झोनच्या नावाखाली टर्कीकडून सीरियावर हल्ला होऊ नये, या उद्देशाने अमेरिकेने यावर्षी ऑगस्टमध्ये टर्कीशी हातमिळवणी केली. मात्र, यावेळी सेफ झोनची चर्चा झाली नाही. तर टर्कीला त्यांच्या सीमेच्या सुरक्षेविषयी असलेली काळजी मिटावी, यासाठी अमेरिकेच्या सैन्याने टर्कीच्या सैन्यासोबत मिळून सीमा भागात एक सुरक्षा यंत्रणा उभारण्याला मान्यता दिली. तिकडे YPGने आघाडी धर्माचं पालन करत सीमाभागातून आपली तटबंदी हटवण्यास सुरुवात केली.

मात्र, दोन महिन्यांनंतर 6 ऑक्टोबर रोजी अर्दोआन यांनी ट्रंप यांना आपण एकट्यानेच सीरियात सेफ झोन उभारणार असल्याचा इशारा दिला. हा सेफ झोन कुर्दांपासून मुक्त असा प्रदेश असेल. शिवाय, इथे सीरियातून टर्कीमध्ये आलेल्या जवळपास 20 लाख शरणार्थींचं पुनर्वसन करू, असं अर्दोआन यांनी म्हटलं.

यावर आपण सीरियाच्या सीमाभागातून आपलं सैन्य मागे बोलावू आणि SDF ने जेरबंद केलेल्या सर्व आयएस अतिरेक्यांची जबाबदारी टर्कीची असेल, असं ट्रंप यांनी सुनावलं.

सीरियात जवळपास 12,000 संशयित आयएस अतिरेकी SDF ने उभारलेल्या तात्पुरत्या तुरुंगात कैद आहेत. तर आयएसशी संबंध असलेल्या जवळपास 70,000 संशयित महिला आणि लहान मुलांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे.

टर्की काय करू इच्छितो?

आपल्या 480 किमी लांबीच्या प्रस्तावित कॉरिडोअरमुळे टर्कीच्या सीमेची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि तिथे 10 ते 20 लाख सीरियन शरणार्थींचं पुनर्वसन करता येईल, असा विश्वास अर्दोआन यांना आहे.

सैन्य

फोटो स्रोत, Reuters

राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी 9 ऑक्टोबर रोजी 'ऑपरेशन पीस स्प्रिंग' सुरू करत असल्याची घोषणा केली. "आमच्या दक्षिण सीमाभागात दहशतवादी कॉरिडोअर तयार होण्यापासून रोखणं आणि या भागात शांतता प्रस्थापित करणं", हा टर्कीचा उद्देश असल्याचंही अर्दोआन यांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, "टर्कीला असलेला अतिरेक्यांचा धोका आम्ही मोडून काढू आणि सेफ-झोन उभारू. जेणेकरून सीरियन शरणार्थींना त्यांच्या घरी परत जाता येईल. आम्ही सीरियाची प्रादेशिक अखंडता जपू आणि स्थानिक समुदायाला दहशतवाद्यांपासून मुक्त करू."

सीरियातील कुर्द काय म्हणतात?

तिकडे SDFचं म्हणणं आहे की अमेरिकने 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला.' तसंच टर्कीच्या हल्ल्यामुळे कायमस्वरूपी 'युद्धक्षेत्र' (वॉर-झोन) तयार होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. इतकंच नाही तर यामुळे आयएसचा पुन्हा उदय होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

आम्ही आमच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी "कोणतीही किंमत चुकवायला" तयार असल्याचं SDFचं म्हणणं आहे.

टर्कीच्या सैन्य कारवाईपूर्वी उत्तर-पूर्व सीरिया "अभूतपूर्व अशा संभाव्य मानवीय संकटाच्या उंबरठ्यावर" असल्याचा इशारा SDFच्या कंमांडरने दिला होता.

नकाशा

ते पुढे म्हणतात, "आमच्या सीमाभागात मोठ्या संख्येने लोक राहतात. त्यामुळे या हल्ल्यात हजारो निष्पाप नागरिकांचं रक्त सांडेल."

इतकंच नाही तर टर्कीच्या कारवाईमुळे आयएसच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी भीतीही SDFने व्यक्त केली आहे.

तुर्कीने सीमेपार केलेली ही पहिलीच सैन्य कारवाई आहे का?

कुर्द सशस्त्र दलाविरोधात टर्कीने दोन हल्ले केले आहेत. पहिला 2016 मध्ये आणि दुसरा 2018 मध्ये.

2016 साली आयसिसच्या अतिरेक्यांना जाराब्लस या सीमेवरच्या एका महत्त्वाच्या शहरातून बाहेर हुसकावून लावणाऱ्या सीरियन बंडखोरांच्या गटाने केलेल्या कारवाईचं टर्कीने समर्थन केलं होतं आणि SDFच्या जवानांना पश्चिमेकडे म्हणजेच कुर्दांचा प्रदेश असणाऱ्या आफरीनकडे कूच करण्यापासून रोखलं होतं.

हल्ला

फोटो स्रोत, AFP

त्यावेळी अमेरिकेने टर्की सैन्याला अरबांचं मुख्य शहर असलेल्या मनबीजचा ताबा घेण्यापासून रोखलं होतं. मात्र, शहरातून SDFच्या जवानांनी माघार घ्यावी, असा हट्ट तुर्कीच्या नेत्यांनी धरला आणि याच मुद्द्यावरून वाद अजूनही कायम आहे.

जानेवारी 2018 मध्ये आपण SDFला नवीन सीमा सुरक्षा बल उभारण्याला मदत करत असल्याचं अमेरिकेने म्हटल्यानंतर टर्कीचं सैन्य आणि त्यांचं समर्थन असणाऱ्या सीरियन बंडखोरांच्या गटाने मिळून आफरीन शहरातून YPGच्या जवानांना हुसकावून लावण्यासाठी मोहीम हाती घेतली.

सीरियन ऑबझर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट या यूकेस्थित देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने म्हटलं की 8 आठवड्यांच्या या संघर्षात 1,500 कुर्द जवान, टर्की समर्थक 400 जवान आणि टर्की सैन्याच्या 45 जवानांसह जवळपास 300 सामान्य नागरिक ठार झाले. तर 1 लाख 37 हजार सामान्य सीरियन नागरिकांनी स्थलांतरित झाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)