सीरियाचं युद्ध अखेर संपण्याच्या मार्गावर?

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, इडलिबमध्ये 10 लाख मुलं आहेत.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, इडलिबमध्ये 10 लाख मुलं आहेत.
    • Author, जेरेमी बोवेन
    • Role, बीबीसी पश्चिम आशिया संपादक

सीरियातलं युद्ध सध्या ज्या भागात सुरू आहे तो भाग म्हणजे इडलिब. इथे एकतर या युद्धाला पूर्णविराम लागू शकतो किंवा इथूनच याला नवं वळण लागून सीरियाच्या लोकांना नव्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

इडलिब प्रांतात 30 लाख सामान्य नागरिक आणि जवळपास 90 लाख बंडखोर आहेत. यातले 20 हजार कट्टरतावादी जिहादी आहेत, असं सांगितलं जातं.

मात्र युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा मी विद्रोहींच्या ताब्यात असलेल्या भागात गेलो, तेव्हा तिथे आंदोलक स्वातंत्र्याच्या घोषणा देत होते. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना देशाची राखरांगोळी होताना बघायची नाही, तर तिथलं सरकार त्यांना नकोय. मात्र या गोष्टीला खूप काळ लोटून गेला आहे.

आता युद्धाचं स्वरूप खूप बदललं आहे. या संघर्षाला आता अनेक पदर आहेत. बंडखोरांनी नव्या आघाड्या तयार केल्या आणि नंतर त्या तोडून पुन्हा दुसऱ्या आघाड्या बनवल्या. सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या बंडखोरांमध्ये फरक करत नाही.

राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या लेखी सर्वच कट्टरतावादी आहेत.

आंतरराष्ट्रीय समुदायांनी हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांतर्फे होत आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, आंतरराष्ट्रीय समुदायांनी हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांतर्फे होत आहे.

मात्र असे अनेक बंडखोर आहेत जे कट्टरतावादी नाही. त्यांना पाश्चिमात्य राष्ट्रांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. ही बंडाळी आणि युद्ध अनेकदा जिहादी आणि नागरी सेना यांच्यात पेटलं.

2016मध्ये रशियाने युद्धात हस्तक्षेप केला होता. रशियाची साथ मिळाल्यावर असद सरकारने बंडखोरांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला. यासाठी चर्चा, इशारे आणि मोठ्या प्रमाणावर सैन्याचा वापर करण्यात आला.

इडलिब प्रांत 2015 पासून कट्टरवाद्यांच्या ताब्यात होते.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, इडलिब प्रांत 2015 पासून कट्टरवाद्यांच्या ताब्यात होते.

2016च्या सुरुवातीला अलप्पोमधला विजय सरकारसाठी मोठं यश ठरला. यानंतर असद सरकारचा विजयरथ वेगाने पुढे सरकला. आता केवळ इदलिब हा एकमेव प्रांत बंडखोरांच्या ताब्यात आहे.

हयात तहरीर अल-शाम ही इदलिबमध्ये असलेली बंडखोरांची मुख्य संघटना आहे. या संघटनेत केवळ सीरियाचे नाही तर परदेशी बंडखोरही आहेत.

अल-नुसरा फ्रंटचं हे नवं रूप... अल-कायद्याशी संबंधित या संघटनेला संयुक्त राष्ट्र, पश्चिम आशिया आणि पश्चिमेकडील अनेक राष्ट्रांनी जहालमतवादी संघटना म्हटलं आहे.

हयात तहरीर अल-शाम बंडखोरांची मुख्य संघटना आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हयात तहरीर अल-शाम बंडखोरांची मुख्य संघटना आहे.

आम्ही दोन्हीकडच्या फ्रंट लाईन बघितल्या आहेत. दोन्हीकडे त्यांच्या हातात बंदुका आल्या आहेत, जे युद्ध सुरू झालं त्यावेळी लहान होते. या युद्धाने सीरियातील मुलांचं भविष्यच बदलून टाकलं आहे.

या युद्धात मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली आहे. कित्येक लोकांचा जीव गेला. जवळपास पाच लाख नागरिक मृत्यूच्या दाढेत सामावले. ही संख्या सातत्याने वाढते आहे.

विजयाच्या जवळ पोहोचलेलं असद सरकार सत्तेत टिकून राहील. मात्र या युद्धाची मोठी किंमत सीरियाला चुकवावी लागली आहे. ज्यामुळे असद सरकारलाही मोठ्या दबावाचा सामना करावा लागला.

गेल्या आठवड्यात इडलिब परिसरात युद्ध थंडावलं होतं.

फोटो स्रोत, CARA SWIFT

फोटो कॅप्शन, गेल्या आठवड्यात इडलिब परिसरात युद्ध थंडावलं होतं.

मानवाधिकार संघटनांचा दावा आहे की युद्धात सर्वांत जास्त सामान्य नागरिक असद सरकारच्या सैन्याच्या हल्ल्यात ठार झाले. मात्र सीरियाच्या सरकारने या आरोपाचा इन्कार केला आहे. आम्ही आपल्याच नागरिकांना का मारू, असा त्यांचा सवाल आहे.

इडलिब प्रांतातली गावंच्या गावं उद्ध्वस्त झाली. जिथे गावं होती, तिथे आता वाळवंट आहे. स्मशान शांतता पसरलेल्या या गावांमध्ये गेल्यावर एकच विचार मनात येतो, तो म्हणजे या गावात राहणाऱ्या लोकांचं काय झालं असेल. संपूर्ण गाव रिकामं झालं आहे. त्यातले काहीजण तर देश सोडून पळून गेले असतील आणि काहींचा मृत्यूही झाला असेल.

इडलिबमधील उध्वस्त इमारती

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, इडलिबमधील उध्वस्त इमारती

इथलं युद्ध आता संपलं आहे आणि मागे राहिली आहेत बॉम्बहल्ल्यात नष्ट झालेली भकास रिकामी घरं... या युद्धात देशाच्या निम्म्या लोकांनी म्हणजे 1.2 कोटी लोकांनी आपली घरं गमावली. या आठवड्यात इदलिबच्या आतल्या आणि बाहेरच्या बंदुका शांत होत्या.

सीरिया रशिया आणि इराणच्या मदतीने या भागावर हल्ला चढवणार होता. तसं झालं असतं तर इडलिबमध्ये मोठा रक्तपात झाला असता. मात्र रशिया आणि तुर्कीच्या मधल्या प्रांताच्या आसपास निशस्त्रीकरण करण्यावर सहमती झाल्याने हा हल्ला रद्द करण्यात आला. सर्व बंडखोरांना या प्रांताच्या बाहेर राहण्यास सांगण्यात आलं.

सीरिया युद्धामुळे 12 लाख लोकांनी घर सोडलं

फोटो स्रोत, CARA SWIFT

फोटो कॅप्शन, सीरिया युद्धामुळे 12 लाख लोकांनी घर सोडलं

हयात तहरीर अल-शाम सारख्या संघटनांनादेखील 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांच्या बंडखोरांना तिथून बाहेर काढायला सांगण्यात आलं आहे. मात्र आतापर्यंत बंडखोरांच्या केवळ एकाच संघटनेनं यावर सहमती दाखवली आहे.

पण ATS सारख्या संघटनांनी या प्रांतातून आपली शस्त्रास्त्र हटवल्याच्याही अनेक बातम्या आल्या. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तुर्कीने जिहादी संघटनांना धमकावलंही आणि समजावण्याचाही प्रयत्न केला.

या संघटनांनी होकार दिला नाही तर मात्र वर्षाअखेरपर्यंत युद्ध पुन्हा सुरू होऊ शकतं. तसं झालं तर पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणात सामान्य नागरिकांचा बळी जाईल आणि लाखो लोक बेघर होतील.

राष्ट्राध्यक्ष असद

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष असद

संपूर्ण सीरियामध्ये युद्ध संपण्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र इडलिबमधील लोकांच्या मनात अजूनही मोठं युद्ध होण्याची भीती कायम आहे.

परदेशातील संघटना अजूनही देशातील अनेक भागात बाँबहल्ले करत आहेत. ते एकमेकांसमोर उभे ठाकले तर युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. कुर्दसुद्ध लवकर पराभव मान्य करणार नाहीत. अशा परिस्थितीत युद्ध पुन्हा सुरू होऊ शकतं.

युद्धाच्या केंद्रस्थानी राष्ट्राध्यक्ष असद आणि त्यांचे सहकारी आहेत. असद पायउतार होण्याचे अंदाज अनेक वर्षं बांधले गेले. मात्र रशिया आणि इराण यांच्या मदतीने त्यांची खुर्ची अजूनतरी टिकून आहे.

हे पाहिलंत का?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सीरियातल्या त्याच्या लाडक्या इडलिबमध्ये 'तो' परतलाय

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)