सीरिया: युद्धाने होरपळलेल्या शहरात माणसांपेक्षा जास्त आहेत मांजरी

यादवी युद्धामुळे होरपळत असलेल्या सीरियातील उत्तर-पश्चिम प्रांतात असलेल्या काफ्र नाबल शहरात गेले अनेक महिने रशिया आणि सीरियाच्या सैन्याकडून बॉम्बस्फोट सुरू आहेत.
या बाँबस्फोटाने हादरलेले अनेक जण शहर सोडून सुरक्षित ठिकाणाच्या शोधात निघून गेले आहेत. ओसाड पडलेल्या या शहरात आता माणसांपेक्षा मांजरीच जास्त आहेत आणि या कठीण काळात मांजरीच लोकांचा आधार बनल्या आहेत.
बाँबहल्ल्याने ढिगाऱ्यात रूपांतर झालेल्या या शहरातल्या एका पडक्या घरात 32 वर्षांचा सालाह जार राहतो. पण तो एकटा नाही. त्याच्यासोबत 6-7 मांजरी आहेत.
बाहेरच्या बाँबस्फोटांमुळे सगळेच घाबरलेत आणि जीव मुठीत घेवून कोपऱ्यातल्या टेबलाखाली सगळे सोबत आडोशाला बसले आहेत. सालाह म्हणतो, "मांजरी जवळ असल्या की आधार वाटतो. या असल्या की बाहेरचे बाँबस्फोट, विध्वंस, दुःख, वेदना सगळ्यांची भीती जरा कमी होते."
सालाहच्या काफ्र नाबल शहरात पूर्वी 40 हजार लोक राहायचे. पण बाँबस्फोटांमुळे आता शंभराहून कमी उरले आहेत. लोक गेले, पण इथल्या मांजरी इथेच राहिल्या. शेकडो, हजारो मांजरी.

फोटो स्रोत, Getty Images
सालाह म्हणतो, "खूप लोक शहर सोडून गेले. या मांजरींची काळजी घेणारं, त्यांना खाऊ-पिऊ घालणारं कुणी हवं. त्यामुळे जे लोक शहरात राहिले, त्यांच्याकडेच मांजरींनी आश्रय घेतला. आज प्रत्येक घरात 15 मांजरी आहेत. कदाचित जास्तच."
सालाह 'फ्रेश FM' या रेडियो स्टेशनसाठी न्यूज रिपोर्टर होता. रेडियो स्टेशनचा मुख्य स्टुडिओ बाँबहल्ल्यात बेचिराख झाला. मात्र सुदैवाने बाँबहल्ल्याच्या आधीच रेडिओ स्टेशनचे काही ऑपरेशन्स सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. त्यामुळे सालाह आजही या स्टेशनसाठी न्यूज रिपोर्टर म्हणून काम करतो.
फ्रेश FM या रेडियो चॅनलवरून बाँबस्फोटांची पूर्वकल्पना दिली जाते. सोबतच बातम्या, विनोदी कार्यक्रम आणि फोन-इनसारखे कार्यक्रमही प्रसारित केले जातात. हे सर्व कार्यक्रम माणसांप्रमाणेच मांजरींमध्येही लोकप्रिय आहेत.
डझनभर मांजरी या रेडियो स्टेशनमध्येच राहतात. या रेडियो स्टेशनचे संस्थापक आणि धाडसी कार्यकर्ते राएद फारेज यांचा नोव्हेंबर 2018 मध्ये एका इस्लामिक कट्टरतावाद्याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. राएद यांनी मांजरींना दूध आणि चीज मिळावं, यासाठी विशेष भत्ता सुरू केला होता.

सालाह सांगतो, "या इमारतीत अनेक मांजरींचा जन्म झाला. इथेच जन्मलेल्या पांढऱ्या रंगावर तपकिरी ठिपके असलेल्या मांजरीची राएदबरोबर चांगलीच गट्टी जमली होती. तो जाईल तिथे ती जायची. त्याच्यासोबतच झोपायची."
सालाह आपल्या पडक्या घरातून बाहेर पडताच चहुबाजूंनी मांजरीचा आवाज येऊ लागला आणि बघता बघता कितीतरी मांजरी तिथे गोळा झाल्या. सालाह सांगतो की इथल्या प्रत्येक व्यक्तीबाबत हे घडतं.
तो सांगतो, "रस्त्यावरून जाताना 20-20 मांजरी सोबत येतात. कधी कधी तर 30 मांजरी असतात. यातल्या काही घरापर्यंत येतात."

रात्रीच्या नीरव शांततेत मांजरीच्या आवाजात भुंकणाऱ्या कुत्र्यांची भर पडते. लोक सोडून गेल्याने कुत्रेसुद्धा अनाथ झालेत. त्यांचीही उपासमार होते. अन्न आणि झोपण्यासाठीची जागा, यासाठी कुत्रे आणि मांजरी यांच्यात रोज रात्री संघर्ष झडतो. यात जिंकतो मात्र, एकच.
सालाह सांगतो, "अर्थातच मांजरी जिंकतात. त्यांची संख्या खूप जास्त आहे."
यापैकी बहुतांश मांजरी पाळीव आहेत. सीरियातल्या उत्तर-पश्चिम भागतल्या महत्त्वाच्या इडलिब शहरावर ताबा मिळवण्यासाठी सीरियाच्या सैन्याने एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर हवाईहल्ले केले होते.
या हल्ल्यांमुळे काफ्र नाबल शहरातून लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलं. त्यामुळे या मांजरी निराधार झाल्या आहेत. मालक गेल्याने उपासमारीची वेळ आलेल्या या मांजरींना आता ढिगाऱ्यातच नवीन निवारा शोधावा लागतोय.

काफ्र नाबलमध्ये आयुष्याचा भरवसा नाही. कधीही कुठेही बाँब पडून जीव जाऊ शकतो. अशा परिस्थितीतही इथे मागे राहिलेले लोक या मांजरींची पूरेपूर काळजी घेत आहेत. या मांजरींना पुढचं जेवणं कसं मिळेल, याची चिंता ते करत नाहीत. कुठूनतरी सोय होईलच, अशी आशा सालाह याला वाटते.
तो म्हणतो, "जेव्हा मी जेवतो, तेव्हा त्याही जेवतात. मग ती भाजी असो, नूडल्स किंवा कोरडा ब्रेड. आम्ही एकत्रच जेवतो. या परिस्थितीत मला वाटतं की आम्ही दोघेही दुर्बल आहोत आणि आम्ही एकमेकांना मदत केली पाहिजे."
सतत होणाऱ्या बाँबस्फोटांमुळे मांजरीही जखमी होतात. इतर जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच औषधांचाही तुटवडाच असतो. तरीही मांजरींना उपचार मिळावे, यासाठी सगळेच सर्वतोपरी प्रयत्न करतात.

"माझा एक मित्र आहे. त्याच्या घरात खूप मांजरी आहेत. त्यातल्या एकीच्या पुढच्या पंज्याला रॉकेटमुळे दुखापत झाली होती. आम्ही तिला उपचारासाठी इडलिब शहरात घेऊन गेलो. आता ती पूर्णपणे बरी झाली आहे आणि पहिल्यासारखी चालते."
सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असदचं सैन्य आता काफ्र नाबलपासून फार लांब नाही. ते कधीही या शहरात घुसतील. त्यामुळे शहरात उरलेल्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सालाहलाही काळजी वाटते. स्वतःची, आपल्या मित्रांची आणि या छोट्या मांजरीचीही.

तो म्हणतो, "चांगल्या काळात, वाईट काळात, आनंदात, दुःखात आणि दहशतीतही आम्ही एकत्र होतो. त्या आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत."
पुढे काही खूप वाईट घडलंच आणि सालाह आणि त्याच्या मित्रांवर शहर सोडून जाण्याची वेळ आलीच तर जमेल तितक्या मांजरी सालाह सोबत घेऊन जाणार आहे.
एकूणच युद्धाच्या सावटात माणूस आणि या मुक्या जनावरांमध्ये तयार झालेले बंध आता सहज मोडणारे नाहीत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








