एली कोहेन : इस्रायलचा गुप्तहेर ; जो सीरियात केवळ राहिला नाही, तर उपसंरक्षण मंत्रीही होणार होता

इस्रायली हेर

फोटो स्रोत, BBC/PUNEET KUMAR

    • Author, भरत शर्मा
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

'तू कोणाला पत्रं लिहित आहेस? N कोण आहे?'

'काही नाही. असंच...N वरून नादिया. कधी कधी वेळ घालवण्यासाठी असं लिहित बसतो मी.'

'नादिया कोण?'

'नादिया माझ्या बायकोचं नाव आहे.'

'पण मला तर वाटलं होतं की तुझं लग्नच झालेलं नाही.'

'कामिलचं लग्न झालेलं नाही, पण एलीचं झालंय...'

'इथं कोणी एली नाहीये.'

'मला कधी कधी खूप एकटं वाटतं म्हणून लिहितो.'

'कामिलला कधीही एकटं वाटत नाही'

'बरं. यापुढे पत्रं लिहिणार नाही.'

'पत्रं? आणखी आहेत? कुठे?'

'ज्युलिया, प्लीज. मी ती पोस्ट करणार नव्हतो. जेव्हा कधी हे सगळं संपेल तेव्हा मी ती नादियाला दाखवू शकेन, असं वाटलं होतं...नाही नाही, प्लीज ही पत्रं जाळू नकोस...'

'कामिल, हा काही खेळ नाही. ही तू वठवत असलेली भूमिका नाही. तू कामिल बन नाहीतर मरायला तयार राहा.'

रागाच्या भरात ज्युलियाने त्या माणसाचा गळा दाबला. त्याने केलेल्या या गोष्टीबद्दल तिला तिच्या अधिकाऱ्यांना कळवायला लागेल अशी धमकीही दिली.

आपल्याकडून चूक झाली आणि आपल्याला पुन्हा असा मूर्खपणा करून चालणार नाही हे कामिलच्या लक्षात येतं.

पाठीमागे जळणाऱ्या फायरप्लेसमध्ये पत्रांची राख होते आणि सोबत त्याची नादियाबद्दलंची स्वप्नही. एली पुन्हा एकदा कामिलच्या रूपात शिरतो.

'द स्पाय' या नेटफ्लिक्सवर रीलीज झालेल्या 6 भागांच्या मालिकेतलं हे एक दृश्य. एक सामान्य माणूस गुप्तहेर झाल्यानंतर पुन्हा सामान्यांसारखं जगण्याची त्याची इच्छा आणि गरज दाखवणारं हे दृश्य.

एली की कामिल. कामिल की एली. इस्रायली की सीरियन. गुप्तहेर की व्यापारी.

ही गोष्ट जरी फिल्मी वाटत असली तरी खऱ्या एली कोहेनचं आयुष्य अशाच थराराक घटनांनी भरलेलं होतं.

त्यांचं पूर्ण नाव होतं - एलीआहू बेन शॉल कोहेन

सीरियाला सळो की पळो करणारा इस्त्रायली हेर - एली कोहेन

फोटो स्रोत, ISRAELI GOVERNMENT PRESS OFFICE

त्यांना इस्रायलाचा सर्वात शूर आणि धाडसी गुप्तहेर म्हटलं जातं. असा हेर ज्याने शत्रूच्या गोटात म्हणजेच सीरियात फक्त चार वर्षं घालवली नाहीत तर तिथल्या सत्तेमध्ये आपला मार्ग काढत वरपर्यंत पोहोचण्यात यशही मिळवलं.

कामिलचं रूप घेत कोहेननी सीरियाच्या राष्ट्रपतींशी इतकी जवळीक साधली की त्यांना सीरियाचं उप-संरक्षण मंत्रीपद जवळपास देण्यात येणार होतं. 'द स्पाय' सीरिजमध्ये या सगळ्याचं चित्रण आहे.

असं म्हटलं जातं की कोहेन यांनी मिळवलेल्या गुप्त माहितीच्या जोरावर 1967 मध्ये सौदी अरेबियाविरुद्धच्या युद्धात इस्रायला यश मिळवता आलं होतं.

इजिप्तमध्ये जन्मलेले एली इस्रायलाला कसे पोहोचले?

या माणसाचा जन्म ना इस्रायलमध्ये झाला होता ना सीरियात ना अर्जेंटिनामध्ये. 1924 मध्ये इजिप्तमधल्या अलेक्झांड्रियातल्या एका सीरियन-यहुदी कुटुंबात एलींचा जन्म झाला.

1914 मध्ये त्यांचे वडील सीरियामधल्या अलेप्पोमध्ये स्थायिक झाले. इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर इजिप्तमधली अनेक यहुदी कुटुंब तिथून बाहेर पडू लागली.

सीरियाला सळो की पळो करणारा इस्त्रायली हेर - एली कोहेन

फोटो स्रोत, Getty Images

1949 मध्ये कोहेन यांच्या आई-वडिलांनी आणि तीन भावांनीही हाच निर्णय घेतला आणि इस्रायलमध्ये स्थलांतर केलं. पण कोहेन यांनी मात्र इजिप्तमध्येच थांबून आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 1957 मध्ये ते इस्रायलला आले.

इथे आल्यानंतर दोन वर्षात त्यांचं नादिया मजाल्दसोबत लग्न झालं. नादिया इराकी - यहुदी होती आणि लेखिका सॅमी मायकल यांची ती बहीण होती. इस्रायली गुप्तचर विभागामध्ये 1960 मध्ये रुजू होण्याआधी एली यांनी अनुवादक आणि अकाऊंटंट म्हणूनही काम केलं होतं.

आधी अर्जेंटिना, मग स्वित्झर्लंड मार्गे सिरीया

1961 मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एली कोहेन अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस आयर्समध्ये दाखल झाले. सीरियन वंशाच्या व्यापाऱ्याचं रूप घेत त्यांनी इथे धंदा करायला सुरुवात केली.

यासाठी त्यांनी कामिल अमीन थाबेत हे नाव घेतलं. अर्जेंटिनामध्ये स्थायिक झालेल्या सीरियन समाजामध्ये या रुपात वावरत त्यांनी ओळखी तयार केल्या. सीरियन दूतावास काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी लवकरच मैत्री करत त्यांचा विश्वास संपादन केला.

यामध्ये सीरियन लष्करातले मुत्सद्दी अधिकारी अमीन अल-हफीज यांचाही समावेश होता. नंतर ते सीरियाचे राष्ट्रपती झाले. आपल्याला लवकरात लवकर सीरियाला 'परतायचं' असल्याचा निरोप कोहेन यांनी आपल्या 'नव्या मित्रांना' दिला होता.

सीरियाला सळो की पळो करणारा इस्त्रायली हेर - एली कोहेन

फोटो स्रोत, Getty Images

सीरियाची राजधानी दमास्कसला जाऊन स्थायिक होण्याची संधी 1962 मध्ये त्यांना मिळाली. अर्जेंटिनामध्ये झालेल्या ओळखींचा फायदा त्यांना सीरियातल्या सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी झाला.

आपलं बस्तान बसवल्यानंतर कोहेन यांनी सीरियन सैन्याविषयीची गुप्त माहिती आणि त्यांच्या योजना इस्रायलला कळवायला सुरुवात केली.

1963 मध्ये सीरियामध्ये सत्तापालट झाल्यानंतर कोहेन यांच्या हेरगिरीतून मिळणारी माहिती महत्त्वाची झाली. बाथ पार्टीला सत्ता मिळाली. यामध्ये असे अनेक लोक होते जे अर्जेंटिनामध्ये असल्यापासून कोहेन यांचे मित्र होते.

सीरियाच्या राष्ट्रपतींशी जवळीक

या सत्तापालटामध्ये अमीन अल-हफीज राष्ट्रपती झाले. हफीज यांचा कोहेन यांच्यावर पूर्ण विश्वास होता. कोहेन यांना सीरियाचा उप - संरक्षण मंत्री बनवण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता, असं म्हटलं जातं.

कोहेन यांना सैन्याच्या गुप्त बैठकांना हजर राहण्याची संधी तर मिळायचीच पण त्यांना गोलान हाईट्समध्ये सीरियन सैन्याच्या तळाच्या पाहणी दौऱ्यावरही नेण्यात आलं होतं.

सीरियाला सळो की पळो करणारा इस्त्रायली हेर - एली कोहेन

फोटो स्रोत, Getty Images

सीरिया आणि इस्रायलमध्ये याच गोलान हाईट्स भागावरून तणाव होता.

'द स्पाय' सिरीजमध्ये एक प्रसंग दाखवला आहे. उन्हामुळे सीरियन सैन्याला त्रास होत असल्याचं सांगत कोहेन तिथे युकॅलिप्टस म्हणजेच निलगिरीची झाडं लावण्याची कल्पना सुचवतात आणि त्यानुसार इथे ही झाडं लावण्यात येतात.

1967च्या मिडल ईस्ट युद्धामध्ये या झाडांमुळे आणि कोहेन यांनी गोलान हाईट्सबद्दल पाठवलेल्या इतर माहितीमुळेच इस्रायलने सीरियाचा पराभव केला, असं म्हटलं जातं. याच झाडांमुळे इस्रायलला सीरियन सैनिकाचा ठावठिकाणा कळला.

एली पकडले गेले?

कोहेन हेरगिरीत निष्णात होते. पण त्यांच्या स्वभावात काहीसा बेफिकीरपणा होता. रेडिओ ट्रान्समिशन करताना सावध राहण्याचा सल्ला त्यांना त्यांचे इस्रायलमधे हँडलर्स वारंवार देत.

एकाच दिवसात दोनदा रेडिओ संदेश पाठवू नये, अशी ताकीदही त्यांना देण्यात आली होती. पण कोहेन याकडे पुन्हापुन्हा दुर्लक्ष करत आणि यामुळेच त्यांचा शेवट झाला.

सीरियाच्या काऊंटर इंटेलिजन्स ऑफिसर्सना जानेवारी 1965 मध्ये त्यांच्या रेडिओ संदेशांचा सुगावा लागला आणि त्यांना संदेश पाठवताना पकडण्यात आलं.

सीरियाला सळो की पळो करणारा इस्त्रायली हेर - एली कोहेन

फोटो स्रोत, Getty Images

त्यांची चौकशी झाली, लष्करी कार्यालयात खटला चालला आणि शेवटी त्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला.

1966 मध्ये दमास्कसमध्ये एका चौकामध्ये त्यांना जाहीर फाशी देण्यात आली. त्यांच्या गळ्यात एक बॅनर घालण्यात आला होता. त्यावर लिहिलं होतं - 'सीरियामधल्या अरब लोकांतर्फे'

कोहेन यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी सुरुवातीला इस्रायलने आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली. पण सीरियाने ऐकलं नाही. कोहेन यांच्या मृत्यूनंतर इस्रायलने त्यांचा मृतदेह आणि अवशेष परत देण्याची अनेक वेळा मागणी केली पण सीरियाने दरवेळी नकार दिला.

53 वर्षांनी मिळालं एलींचं घडयाळ

2018 मध्ये मृत्यूच्या 53 वर्षांनंतर इस्रायलला एलींचं एक घड्याळ मिळालं. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने याविषयीची घोषणा केली होती. पण इस्रायलला हे घड्याळ कधी आणि कसं मिळालं हे मात्र सांगण्यात आलं नाही.

'मोसाद (इस्रायली गुप्तचर संस्था) च्या खास ऑपरेशनद्वारे' हे घड्याळ हस्तगत करून परत आणल्याचं सांगण्यात आलं.

एली कोहेनना ज्या दिवशी अटक करण्यात आली, त्यादिवशी त्यांनी हे घड्याळ लावलेलं होतं आणि हे घड्याळ कोहेन यांचं ऑपरेशनमधलं रूप आणि खोट्या अरब रूपाचा महत्त्वाचा हिस्सा होतं, असं मोसादचे संचालक योसी कोहेन यांनी म्हटलं होतं.

सीरियाला सळो की पळो करणारा इस्त्रायली हेर - एली कोहेन

फोटो स्रोत, ISRAELI GOVERNMENT PRESS OFFICE

हे घड्याळ मिळाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं, "ही शूर आणि वचनबद्ध मोहीम राबवल्याबद्दल मला मोसादच्या अधिकाऱ्यांचा अभिमान आहे."

"या महान योद्ध्याशी निगडीत एखादी वस्तू इस्रायलला परत आणणं हे या मोहिमेचं एकमेव उद्दिष्टं होतं. देशाची सुरक्षा कायम ठेवण्यामध्ये या व्यक्तिची महत्त्वाची भूमिका होती."

कोहेन यांची विधवा पत्नी नादिया यांना गेल्या वर्षी मे महिन्यात हे घड्याळ समारंभपूर्वक सोपवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी इस्रायली टीव्हीला सांगितलं, "घड्याळ मिळाल्याचं जेव्हा मला समजलं, तेव्हा माझ्या घशाला कोरड पडली आणि अंगावर शहारा आला. त्यांचा हात माझ्या हातात घेतल्यासारखं मला वाटलं. त्यांचा एक भागच जणू आमच्यासोबत आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)