मुस्लिमांच्या भूमीत असा तयार झाला ज्यूंचा देश इस्रायल, इस्रायलच्या जन्माची रक्तरंजित कथा

इस्रायल

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अनघा पाठक
    • Role, बीबीसी मराठी

दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन आणि मित्रपक्षांचा विजय झाला असला तरी ब्रिटनची अपरिमित हानी झाली होती. त्यांच्या वसाहतींचा कारभार हाकणं त्यांना अवघड झालं होतं, हळूहळू ते वसाहतींमधून माघार घ्यायला लागले. 1948 च्या मे महिन्यात पॅलेस्टाईन प्रदेशातून ब्रिटनने माघार घेतली, आणि आपआपला देश बनवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करणाऱ्या अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. प्रश्न होता, ही भूमी नक्की कोणाच्या हातात जाणार. युद्ध तुल्यबळांचं नव्हतं. अरबांच्या तुलनेत ज्यूंची संख्या अतिशय कमी होती पण या दिवसाच्या तयारी गेले कित्येक वर्षं तिथे असणाऱ्या आणि इस्रायलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक ज्यू ने अनेक वर्षांपासून केली होती. 14 मे 1948 साली इस्रायलने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. 2000 वर्षांत पहिल्यांदा पूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता. मुस्लीमबहुल प्रदेशाच्या मधोमध ज्यूंचा देश निर्माण झाला.

अरबांची संख्या एका बाजूला होती तर ज्यूंचं लढण्याचं शास्त्रशुद्ध ट्रेनिंग, नेतृत्व, रणनिती दुसऱ्या बाजूला. त्यातच ज्यूंना मात देण्यासाठी शेजारच्या तब्बल पाच अरब देशांनी - इजिप्त, सीरिया, जॉर्डन, लेबेनॉन आणि आणि इराकचं सैन्य आलं. एक दिवसापूर्वी अस्तित्वात आलेला देश आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढत होता. अरबांना इस्रायलचं अस्तित्व जगाच्या पटलावरून पुसून टाकायचं होतं. इस्रायलला आपल्या भूमीतल्या अरबांना हाकलून आपला साम्राज्यविस्तार करायचा होता. हा रक्तरंजित संघर्ष गेली 73 वर्षं चालूये.

एखादा देश कसा तयार होतो? एकतर तो प्रदेश आधीपासूनच तिथे अस्तित्वात असतो किंवा त्या भूप्रदेशाची फाळणी होऊन दोन देश तयार होतात.

पण जिथे कोणत्याच सीमा आखलेल्या नाहीत, तिथे बाहेरच्या जगातून लोक येत राहून कालांतराने एका धर्माच्या लोकांचा देश कसा तयार होऊ शकतो? इस्रायलसंबधांत हाच प्रश्न मलाही पडला होता.

इस्रायलच्या जन्माची कथा गुंतागुंतीची आहे आणि तुटक-तुटकही. तीच गुंतागुंत सोप्या शब्दात सलग उलगडून सांगण्याचा प्रयत्न या लेखात केलाय.

यातून इस्रायलच्या जन्माची कथा तर कळेलच पण इस्रायलचा इतिहास, इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षांचं मुळ, इस्रायल आणि अरब राष्ट्रांचं युद्ध याही प्रश्नांची उत्तर मिळतील.

जेरुसलेम

इस्रायलची कथा सुरू होते जेरुसमलेममधून. सन 1095. नोव्हेंबर महिन्यातल्या एका थंड सकाळी पोप अर्बन दुसरा याने फ्रान्सच्या क्लेअरमाऊंट शहरात दिलेल्या एका प्रवचनाने युरोपचा चेहरामोहरा बदलला.

काय होतं त्या प्रवचनात असं? त्या प्रवचनाने 200 वर्षं चालेल्या ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांच्या युद्धाचं रणशिंग फुंकलं. या युद्धांना नंतर ख्रिश्चनांनी क्रुसेड्स असं नाव दिलं तर मुस्लिमांनी जिहाद.

व्हीडिओ कॅप्शन, इस्रायल कसा जन्माला आला? स्वातंत्र्य, इतिहास, आणि पॅलेस्टाईनशी वैर | सोपी गोष्ट 341

लॅटिन चर्चने 1095 ते 1271 या काळात होली लँड आणि होली सिटी मुस्लीम अधिपत्याखालून काढून त्या प्रदेशावर पुन्हा आपला ताबा मिळवण्यासाठी युद्ध केली. होली लँड म्हणजे आजचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, सिरिया आणि लेबेनॉनचा काही भाग आणि होली सिटी म्हणजे जेरुसलेम.

हा तोच काळ होता जेव्हा धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यातल्या संघर्षांने तसंच चर्चच्या विभागणीमुळे धर्मसत्तेचं आसन डळमळायला लागलं होतं.

यातून बाहेर पडायचा एक रस्ता पोप अर्बन दुसरा याला दिसला, तो म्हणजे एका परकीय, पापी, धर्मबाह्य शत्रूविरोधात युद्ध घोषित करायचं आणि ख्रिश्चनांना एकत्रित करायचं. एक लाख ख्रिश्चन स्त्री, पुरुष, लहान मुलं सैनिक बनून साडेचार हजार किलोमीटरचा रस्ता कापत जेरुसलेमच्या वाटेला निघाले. एकाच वेळेस नाही, लहान लहान गटात.

जेरुसलेम शहर

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसीच्या 'द लँड ऑफ होली' या डॉक्युमेंट्रीमध्ये मध्ययुगीन इतिहासकार डॉ थॉमस अॅसब्रीज म्हणतात की, "युरोप पार करताना हे गट तिथल्या वेगवेगळ्या भागातल्या ज्यू लोकांवर हल्ले करत त्यांचं शिरकाण करत निघाले होते."

अर्थात तोवर जेरुसलेम मुस्लीम शासकांच्या हातात जाऊन 400 वर्षं लोटली होती आणि या भागात ज्यूंचं प्रमाण नगण्य असलं तरी त्यांचं अस्तित्व कायम होतंच.

क्रुसेडर्सचा पहिला जथ्था निघाल्यानंतर बरोबर चार वर्षांनी जेरुसलेम त्यांच्या ताब्यात आलं, त्यानंतर जवळपास 100 (1099 ते 1187) जेरुसलेम आणि आसपासच्या भागात त्यांनी राज्य केलं. सालदिनच्या मुस्लीम योद्धांनी त्यांचा पराभव केला आणि होली लँड पुन्हा एकदा मुस्लीम शासकांच्या हातात गेलं.

जेरुसलेम शहर

जेरुसलेम जगातल्या सगळ्यात जुन्या शहरांपैकी एक आहे. इतिहासाची पानं चाळली तर लक्षात येतं की जेरूसलेमवर अनेक शासकांनी राज्य केलं.

इसवीसन पूर्व 1700 शतकात इथे कॅननाईट लोकांनी राज्य केलं, मग इजिप्तच्या फेरोंनी त्यानंतर आले इस्रेलाईट्स म्हणजेच आजचे ज्यू ज्यांचे वंशज आहेत असं समजलं जातं ते लोक.

इसवीसन पूर्व 1000 च्या पूर्वार्धात जेरुसलेम, आताचा इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबेनॉन आणि सिरिया या देशांचा प्रत्येकी काही भाग मिळून इस्रेलाईट लोकांची दोन साम्राज्य होती. प्राचीन इस्रायल आणि जुडाहचं राज्य. जेरूसलेम जुडाहच्या राज्याची राजधानी होतं.

पवित्र स्थळ दर्शवणारा नकाशा

फोटो स्रोत, Google

प्राचीन इस्रायलच्या साम्राज्याचे उल्लेख हिब्रू बायबल तसंच काही धर्मग्रंथामध्ये सापडतात पण त्याचे ऐतिहासिक पुरावे कमी आहेत.

मग कालांतराने हा भाग बॅबिलोनियन, पर्शियन, ग्रीक (अलेक्झांडर द ग्रेट ने आक्रमण केलं तेव्हा), रोमन, बायझेंटाईन आणि सरतेशेवटी मुस्लीम शासकांच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतरही इथे सत्तापालट सतत होत राहिला. इथे राज्य करणारे शेवटचे शासक होते ऑटोमन.

या साम्राज्याचा अस्त ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात 1918 ला केला.

वरती वर्णन केलेल्या भागाला लँड ऑफ इस्रायल किंवा होली लँड असंही म्हणतात. याचे उल्लेख अनुक्रमे हिब्रू बायबल आणि बायबलमध्ये आहेत. ज्यू धर्मियांमध्ये अशी मान्यता आहे की इथेच ज्यू धर्माचा उदय झाला, इथेच त्या धर्माचे कायदे तयार झाले आणि हीच भूमी देवाने वारसहक्काने ज्यू धर्मीयांना दिलेली आहे. त्यांची ही धार्मिक मान्यता जेनेसिस आणि एक्सोडस या हिब्रू बायबलच्या भागांवर आधारित आहे.

पवित्र चर्च

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पवित्र चर्च

'ज्यू लोक एकदिवस आपल्या जमिनीवर (लँड ऑफ इस्रायलमध्ये) परत येतील' अशी भविष्यवाणी धर्मग्रंथात केली आहे. या भविष्यवाणीवरच ज्यू राष्ट्राची राजकीय संकल्पनाही आधारित होती.

इतकी सगळी कथा सांगण्याचं कारण एकच की ज्यू लोकांना आपला देश बनवण्यासाठी हाच भूभाग का हवा होता ते लक्षात यावं.

गंमत म्हणजे या भागात राहाणाऱ्या अरब मुस्लिमांना जग आज पॅलेस्टिनी म्हणून ओळखत असलं तरी या भूभागाला सगळ्यांत आधी प्राचीन ग्रीक लेखकांनी पॅलेस्टाईन म्हटलं होतं आणि पुढे रोमन शासकांनी ते नाव वापरलं. ऑटोमन साम्राज्यापर्यंत हे नाव कायम राहिलं.

पहिलं महायुद्ध आणि जगाचा बदलत गेलेला नकाशा

आधुनिक जगाच्या इतिहासात पॅलेस्टाईन-इस्रायलच्या नात्याचं जे काही खोबरं झालं ते पहिल्या महायुद्धानंतर.

इस्त्रायल

फोटो स्रोत, Getty Images

ऑटोमन साम्राज्याचं राज्य इथे असताने शेजारच्या इजिप्तकडून किंवा सीरिकडून आक्रमणं होत राहायची. 1840 मध्ये ऑटोमन सम्राटांनी ही आक्रमण थांबवण्यासाठी ब्रिटिशांना मध्यस्ती करायला सांगितलं. ब्रिटिशांनी काही करार आणि फायद्यांच्या बदल्यात ते मान्य केलं.

त्यानंतर या भागात थोडी शांतता प्रस्थापित झाली आणि पॅलेस्टाईनची सामाजिक-आर्थिक भरभराट व्हायला लागली. ऑटोमन साम्राज्याचा आधीपासून युरोपशी व्यापार होता. युरोपियन लोकांशी संपर्क वाढल्याने इथेही बदल व्हायला लागले. तोपर्यंत इथे ज्यू लोकांची संख्या अगदीच कमी होती.

याच काळात युरोपमध्ये झायोनिस्ट चळवळीचा उदय झाला. ही एक राजकीय चळवळ होती ज्यात एका ज्यू राष्ट्राची स्थापना करणं हे उदिष्ट होतं. हिब्रू बायबलमध्ये 'झायन' हा शब्द जेरूसलेमसाठी वापरला आहे.

14 मे 1948 रोजी इस्त्रालयच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, 14 मे 1948 रोजी इस्त्रालयच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. त्यावेळी जल्लोष करणारा तरूण वर्ग.

पहिल्या महायुद्धाने या भागात मोठे बदल घडवले. तत्कालीन जगातलं सगळ्यांत मोठं मुस्लीम साम्राज्य असलेल्या ऑटोमनांनी युद्धात उडी घेतली आणि रशिया, फ्रान्स, ब्रिटन यांच्या विरोधात 'सैन्य जिहाद' घोषित केला. जर्मनांशी हातमिळवणी करून ऑटोमनांनी सुएझ कालवा ताब्यात घेण्यासाठी इंग्लंडच्या अधिपत्याखाली असलेल्या इजिप्तवर हल्ला केला.

युद्धाचे तपशील बरेच आहेत पण महत्त्वाचं इतकंच की ऑटोमनांचा पराभव झाला. जर्मनीचा झालाच होता. ऑटोमन साम्राज्याचे तुकडे होऊन पॅलेस्टाईन ब्रिटिश प्रशासित प्रदेश झाला तर सीरिया आणि लेबेनॉन फ्रेंच प्रशासित प्रदेश झाले.

पॅलेस्टाईनचा भाग आता सरळ सरळ ब्रिटनच्या अधिपत्याखाली होता म्हटल्यावर या भागात स्वतंत्र ज्यू राष्ट्र निर्माण करा अशी मागणी करणारे युरोपातले आवाज बुलंद व्हायला सुरूवात झाली.

बाल्फोर जाहिरनामा

ऑटोमन शासकांचा पहिल्या महायुद्धात पराभव होता होता ब्रिटनने बाल्फोर जाहीरनामा आणला. हे युरोपातल्या झायनेस्ट चळवळीचं फळ होतं. ज्यू राष्ट्राच्या मागणीला दिलेली ही पहिली अधिकृत मान्यता होती.

पण या बाल्फोर जाहीरनाम्यात असं नक्की म्हटलं तरी काय होतं?

भिंत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ज्यू धर्मियांसाठी पवित्र असलेली भिंत

'इंग्लंडच्या राजसत्तेचा पॅलेस्टाईनमधल्या ज्यू लोकांच्या देशाला पाठिंबा आहे, आणि ज्यू लोकांना एक राष्ट्र मिळावं यासाठी मदत करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल. पण त्याआधी हे स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे की असं करताना पॅलेस्टाईननध्ये राहाणाऱ्या ज्यू धर्मीय सोडून इतर लोकांच्या नागरी आणि धार्मिक हक्कांवर गदा येता कामा नये. तसंच इतर देशात राहणाऱ्या ज्यू लोकांचे हक्क आणि राजकीय स्थान याला धक्का लागता कामा नये.'

या जाहीरनाम्यानंतर या प्रदेशात ज्यू लोकांसाठी देश निर्माण करण्याची जबाबदारी आणि पर्यायाने या प्रदेशात प्रशासन करण्याची जबाबदारी राष्ट्रसंघाने (लीग ऑफ नेशन्स) ब्रिटनवर टाकली.

इथे येणाऱ्या ज्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. 1920 ते 1940 या दशकांत मोठ्या प्रमाणात ज्यू इथे यायला लागले.

विशेषतः दुसऱ्या महायुद्धात हिटलरने लाखो ज्यूंचा नरसंहार करायला सुरुवात केल्यानंतर युरोपमधले हजारो ज्यू आपला जीव वाचवून या प्रदेशात पळून आले.

बाल्फोर जाहीरनाम्यात म्हटलं होतं की इथे ज्यूंसाठी वेगळं 'राष्ट्रीय घर' बनवलं जाईल. हा प्रदेश तसाही ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता त्यामुळे इथे येणारे ज्यू असंच समजत होते की एक ना एक दिवस इस्रायल बनेल आणि झालंही तसंच.

ब्रिटीशांनी बाल्फोर जाहीरनामा सादर का केला आणि ज्यू लोकांसाठी वेगळं राज्य बनवण्याचं वचन का दिलं?

"न देऊन सांगता कोणाला? त्यांच्यावर दबावच तेवढा होता," लेखक पत्रकार निळू दामले उत्तरतात. त्यांनी इस्रायल-अरब संघर्षाचा जवळून अभ्यास केलाय आणि यावर जेरुसलेम नावाचं पुस्तकही लिहिलं आहे.

"झायनिस्ट चळवळीचा उदय साधारण 1890 च्या काळात ब्रिटनमध्ये झाला. त्यातले ज्यू ब्रिटिशांचे सावकार होते. त्या चळवळीतला मोठा नेता रॉथ्सचाईल्ड प्रचंड श्रीमंत होता. युरोपातली अशी अनेक श्रीमंत कुटुंब यात गुंतलेली होती. त्यामुळे त्यांना नाराज करणं ब्रिटिशांना परवडणारं नव्हतं, विशेषतः युद्धकाळात, जेव्हा सरकारला पैशाची गरज होती," ते म्हणतात.

पण हा जाहीरनामा म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र होतं असंही सांगायला ते विसरत नाहीत, "ब्रिटिशांचं काय जात होतं पॅलेस्टाईनच्या भूमीत इस्रायल वसवू असं आश्वासन द्यायला. त्यांना काहीच द्यायचं नव्हतं."

इस्रायलची स्थापना आणि अरब राष्ट्रांचा हल्ला

वाढत्या नाझी प्रपोगंडामुळे युरोपमधले ज्यू पळून जात होते, पण अनेक देशांची दार त्यांना बंद होती. वाढत्या ज्यू स्थलांतरितांमुळे पॅलेस्टाईन प्रदेशात असंतोष वाढत होता, त्यामुळे ब्रिटीशांनीही ठरवलं की ज्यूंचं येणं थांबवायचं. ज्यू आता अवैधरित्या या भागात प्रवेश करायला लागले.

1920 ते 1940 या काळात या प्रदेशातल्या ज्यू आणि अरब लोकांमध्ये सतत संघर्ष होतच होता. अनेकदा दंगलीही व्हायच्या.

युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

दुसरं महायुद्ध भडकलं तेव्हा पॅलेस्टाईन त्यातून वेगळं राहू शकलं नाही. ब्रिटिशांबरोबर लढण्यासाठी ज्यू लोकांचं सैन्य स्थापन करून त्यांची मदत घ्यावी असा प्रस्ताव तत्कालीन पंतप्रधान चर्चिल मांडला पण ब्रिटीश सरकार आणि सैन्याने तो फेटाळला. त्यांचं म्हणणं होतं सैन्यात ज्यू आणि अरब लोकांची संख्या समसमान असावी. पण अरबांना ब्रिटिशांकडून लढण्यात रस नव्हता. त्यांचे नेते, जेरूसलेमचे मुफ्ती नाझी जर्मनीच्या बाजूने वळाले.

याच काळात ज्यू लोकांचं स्थानिक सैन्य तयार झालं होतं ज्याचं नाव होतं हागनाह (संरक्षण दल).

अरबांनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करायला सुरुवात केली. जाफामध्ये हल्ले व्हायला लागले. ब्रिटिशांनी सैन्याला पाचारण केलं. या युद्धात 5000 हून जास्त अरबांचा मृत्यू झाला. जेरूसलेमचे मुफ्ती अल-हुसैनी फ्रेंच प्रशासित सीरियाला पळाले.

दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1947 मध्ये ब्रिटनने पॅलेस्टाईनचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांसमोर मांडला. संयुक्त राष्ट्रांनी तोडगा दिला की एक स्वतंत्र ज्यू राष्ट्र असावं, एक स्वतंत्र अरब राष्ट्र असावं आणि जेरूसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावं. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं आणि ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये यायला मज्जाव करता येणार नाही असं सांगितलं.

ब्रिटन दुसऱ्या महायुद्धानंतर आधीच जर्जर झाला होता. 1948 साली पॅलेस्टाईनमधल्या ज्यू लोकांनी स्वातंत्र्याची घोषणा केली आणि इस्रायलची निर्मिती झाली. ज्यू लोकांना दोन हजार वर्षांनंतर स्वतःचा देश मिळाला होता. इस्रायलची स्थापना झाल्या झाल्या त्याला अमेरिका आणि रशिया या दोन्ही शक्तिशाली देशांनी मान्यता दिली.

ब्रिटिशांनी पॅलेस्टाईनमधून माघार घेतली आणि देशांतर्गत ज्यूंचं आणि अरबांचं सैन्य एकमेकांना भिडलं. पॅलेस्टिनी अरबांच्या मदतीना जॉर्डन, सीरिया, इराक लेबेनॉन, इजिप्तचंही सैन्य आलं. पाच देशांनी मिळून इस्रायलवर आक्रमण केलं होतं.

इस्रायलची स्थापना होऊन अजून एक दिवसही झाला नव्हता. देशाची लोकसंख्या होती आठ लाखाच्या आसपास. देशच अस्तित्वात नव्हता, त्यामुळे इतर देशांशी शस्त्रास्त्र करार करण्याचा प्रश्न नव्हता. अरब देशांचं सैन्य इस्रायलच्या सैन्याच्या कितीतरी पट जास्त होतं.

पण दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांच्या बाजूने लढलेले आणि काही महत्त्वाच्या लढायांमध्ये मोक्याची भूमिका बजावलेले सैन्याधिकारी ज्यू होते आणि आता ते इस्रायललाठी लढत होते.

जून महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या सांगण्यावरून इस्रायल आणि अरब राष्ट्रांनी युद्धविरामाची घोषणा केली. इस्रायलला आपली रसद पुन्हा भरून घेण्याची संधी मिळाली. रशियासारखी मोठी राष्ट्र त्यांना मागच्या दाराने मदत करत होती.

त्यामाने अरब सैन्यात सुसुत्रता कमी होती. पाच राष्ट्रांचं सैन्य मिळूनही इस्रायलचं अस्तित्व नकाशावरून पुसू शकलं नाही. पण इस्रायलचा काही भूभाग मात्र त्यांनी ताब्यात घेतला. जॉर्डनकडे वेस्ट बँक भाग गेला, इजिप्तने गाझा पट्टी मिळवली. पूर्व जेरूसलमेही त्यांच्या हातातून निसटलं.

इस्रायलकडे पश्चिम जेरूसलेम आणि पॅलेस्टाईनचा इतर भाग राहिला. हे पहिलं अरब-इस्रायल युद्ध होतं.

1949 मध्ये या इस्रायलने जॉर्डन, इजिप्त, लेबेनॉन आणि सीरियासोबत युद्धबंदीचे करार केले. ज्याच्या वाटेला जी जागा आली ती आली असा साधा अर्थ या करारांचा होता. पण या युद्धाची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. अपार मनुष्यहानी झाली होती.

नकबा

गाझा पट्टीच्या कोणत्या भागात तुम्ही उभे आहात यावर ठरतं की 14 मे 1948 हा तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की शोकाचा.

गाझा

फोटो स्रोत, Getty Images

पॅलिस्टिनी लोक या दिवसाला नकबा म्हणतात. 14 मे च्या ऐवजी 15 मेला हा दिवस पाळून ते याला पॅलिस्टिनी लोकांच्या इतिहासातला सगळ्यांत काळा दिवस मानतात.

इतिहाकार बेनी मॉरिस आपल्या 'द बर्थ ऑफ द रिवाइज्ड पॅलेस्टिनियन रिफ्युजी प्रॉब्लेम' या पुस्तकात लिहितात की, "14 मे 1948 च्या दुसऱ्या दिवशी साडेसात लाख पॅलेस्टिनी नागरिक इस्रायली सैन्याच्या भीतीने घरदार सोडून पळून गेले, अनेकांना पळवून लावलं गेलं. अनेकांनी नेसत्या वस्त्रांनिशी घरदार सोडलं. काहींनी घराला कुलूपं लावली आणि पळले. या घरांची कुलूपं उघडायला ते परत कधी येऊ शकले नाहीत. यांच्या चाव्या या दिवसाची आठवण म्हणून जपल्या गेल्या फक्त."

नकबा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 15 मे 1948 ला लोक घरांना कुलूप लावून पळून गेले होते.

पण इस्रायलला ते मान्य नाही. ते म्हणतात की पॅलिस्टिनी लोक इस्रायलच्या सैन्यामुळे नाही तर अरब राष्ट्रांनी केलेल्या आक्रमणामुळे पळाले.

पण युद्धबंदीनंतर इस्रायलने या लोकांना परत येऊ दिलं नाही. त्यांची घरदार जप्तं केली. या पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी शेजारच्या राष्ट्रांमध्ये छावण्या उभ्या केल्या गेल्या.

आमनेसामने उभं ठाकलेलं इस्रायल-अरब सैन्य

इस्रायलने केलेला अरबांचा पराभव राजकीय पटलावरची एक त्सुनामी ठरला. आजतायगत हा भाग त्या त्सुनामीनंतर आलेल्या भुकंपाचे झटके सोसतोय.

अरब राष्ट्र या पराभवातून कधी फारसे सावरलेच नाहीत. आणि इस्रायलही कधी हे विसरला नाही की आपल्याच शेजारी राष्ट्रांनी आपल्याला जगाच्या नकाशावरून पुसण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही बाजूंना माहिती होतं की पुढचं युद्ध अटळ आहे.

युद्ध

फोटो स्रोत, Alamy

ज्या राष्ट्रांच्या सैन्याला इस्रायलने मात दिली होती, त्या राष्ट्रांच्या सैन्याने आपल्याच देशात सत्तापालट करायला सुरुवात केली. सीरिया सतत सत्ताबदल व्हायला लागला.

इस्रायलविरुद्ध केलेल्या युद्धात लढलेल्या अधिकाऱ्याने इतर तरुण अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन इजिप्तमध्ये बंड केलं आणि तिथल्या सुलतानाला पदच्युत केलं. या अधिकाऱ्याचं नाव होतं गमाल अब्दुल नासिर. नासिर 1956 मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष बनले.

याच वर्षी त्यांनी ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलचा विरोध झुगारून सुएझ कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं. या एका कृतीने ते अरब राष्ट्रांचे हिरो ठरले.

सुएझ कालव्याच्या राष्ट्रीयकरणानंतर फ्रान्स, ब्रिटन आणि इस्रायलने एकत्रितरीत्या इजिप्तविरोधात कारवाई केली, पण यातून त्यांना माघार घ्यावी लागली. इजिप्तचा राजनैतिक विजय झाला होता.

आग धुमसत होतीच...

1948 चं युद्ध कोणत्याही मोठ्या शस्त्रास्त्रांशिवाय लढणाऱ्या इस्रायलने आपलं सैन्य मजबूत करायला सुरुवात केली होती. 1965 पर्यंत त्यांचं सैन्य घातक बनलं होतं आणि फ्रान्स, ब्रिटन, अमेरिकासारख्या देशांकडून त्यांनी संरक्षण सामग्री विकत घेतली होती. त्यांनी अथक मेहनत घेतली होती.

युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

मनुष्यबळ वाढलं होतं कारण 10 लाखांहून जास्त ज्यू स्थलांतरितांना जागा दिली. इस्रायलमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांसाठी सैन्यात सेवा देणं अत्यावश्यक होतं.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातल्या ज्यू लोकांनी नाझी सैन्याचा प्रतिकार केला नाही, निर्वासित झाले म्हणून त्यांना कमजोर समजणारी नवी पिढी इथे तयार झाली होती.

पश्चिमेतल्या ताकदवान देशांना कळून चुकलं होतं की आता मध्यपूर्वेत युद्ध झालं तर कोणाचं पारड जड असेल. अमेरिकेच्या चीफ ऑफ स्टाफने म्हटलं होतं की इस्रायल कमी कमी पुढची पाच वर्ष अरब राष्ट्रांच्या आघाडी सैन्याचा एकटाच मुकाबला करू शकतो.

1967 साली तेल अवीवमध्ये तैनात असलेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने इस्रायली सैन्याच्या आपल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की नेतृत्व, प्रशिक्षण, संरक्षण साधनं आणि रसद या सगळ्या आघाड्यांवर इस्रायलचं सैन्य इतकं तयार झालंय जितकं आधी कधीच नव्हतं.

बीबीसीचे मध्यपूर्वेचे संपादक जेरेमी बोवेन लिहितात की, "इजिप्तमध्ये नासिर यांना इस्रायलचा बदला घ्यायचा होता. पण त्यांचं आणि त्यांचा सहकारी देश सीरियाचं सैन्य इतकं प्रशिक्षित नव्हतं. ते फक्त मोठमोठे दावे करत होते. नासिर यांना अरब जगाचं नेतृत्व तर करायचं होतं पण या राष्ट्रांमध्ये एकवाक्यता नव्हती. अरब लोक राष्ट्रीयता आणि एकतेच्या गप्पा हाणायचे पण वास्तवात त्यांच्यात दुफळी माजलेली होती. सीरिया आणि इजिप्तचं नेतृत्व आपल्याविरोधात जॉर्डन आणि सौदी अरब षड्यंत्र करत असल्याची तक्रार करायचं."

सहा दिवसात बदललं मध्यपूर्वेचं राजकारण

धुमसणाऱ्या आगीचा भडका उडायला कारण ठरला इस्रायल-सीरियामधला सीमावाद.

बीबीसीचे मध्यपूर्वेचे संपादक जेरेमी बोवेन नमूद करतात की, "सीरियाने पॅलिस्टिनी बंडखोरांना आश्रय दिला होता. हे बंडखोर इस्रायलवर सतत हल्ले करत राहायचे. यात शेकडो इस्रायली नागरिकांचा जीव गेला होता. इस्रायला यांचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. हे बंडखोर इस्रायलच्या सीमेत घुसले. इस्रायलने याला 'दहशतवादी हल्ला' म्हटलं आणि प्रत्युत्तरादाखल जोरदार कारवाई केली."

युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

जॉर्डनचे प्रमुख शाह हुसेन इस्रायलशी गुप्त चर्चा करत असायचे. त्यांना विश्वास होता की इस्रायल त्यांच्याविरोधात कारवाई करणार नाही. पण नोव्हेंबर 1966 मध्ये इस्रायलचं सैन्य जॉर्डनच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँक प्रदेशातल्या सामुआ गावात शिरलं.

शाह हुसेनांना धक्का बसला. त्यांनी अमेरिकन गुप्तहेर यंत्रणेला सांगितलं की ते तीन वर्षांपासून इस्रायलशी गुप्त चर्चा करत आहेत. इतकंच काय अगदी इस्रायलच्या कारवाईच्या दिवशी सकाळी त्यांना इस्रायली पक्षकाराने सांगितलं होतं की वेस्ट बँक भागात प्रत्युत्तरादाखल कारवाई करणार नाहीत.

शाह हुसेन यांनी वेस्ट बँकेत मार्शल लॉ लागू केला. त्यांना आता जवळपास खात्री पटली होती की दुःख आणि रागाच्या भरात वेस्ट बँकेचे पॅलेस्टिनी लोक त्यांना सत्तेवरुन खाली खेचतील.

त्यांना भीती वाटत होती की नासिर यांचे समर्थक असणारे त्यांच्या सैन्यातले अधिकारी बंडखोरी करतील आणि या नादात इस्रायल वेस्ट बँक आपल्या घशात घालेल.

इस्रायल वादग्रस्त भागांमध्ये आक्रमक रितीने पुढे पुढे सरकत होता. जिथे सैन्य नाही अशा भागात ते हत्यारबंद ट्रॅक्टर चालवून तिथलं गवत कापत निघाले होते.

दुसरीकडे सीरिया इस्रायल युद्धाचे ढग घोंघावायला लागले होते.

7 एप्रिल 1967 साली सीरिया आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं. इस्रायलने सीरियाला सळो की पळो करून सोडलं.

जेरेमी बोवेन लिहितात, "एका ब्रिटीश मुत्सद्याने म्हटलं की इस्रायली फौजापुढे अरबांच्या सेना गलितगात्र होत होत्या. या हतबलतेने हैराण झालेले पॅलेस्टिनी युवक विचारत होते की इजिप्तचं सैन्य कुठेय? नासिर यांनी कारवाई करावी म्हणून दबाब वाढत होता.

युद्ध

फोटो स्रोत, Getty Images

इजिप्तचे सैन्यप्रमुख फील्ड मार्शल आमिर यांनी आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश दिले. पण इजिप्तचं निम्म्याहून जास्त सैन्य आधीच येमेनशी लढत होतं. सैन्याचे चीफ ऑफ ऑपरेशन्स अन्वर अल कादींनी आमिर यांना याची जाणीव करून दिली.

यावर जनरल अन्वर म्हणाले की युद्ध करायचं नाहीये, हे फक्त एक शक्तीप्रदर्शन आहे.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासिर यांची इच्छा होती की जगभरात त्यांची ओळख ज्यू राष्ट्रासमोर उभं राहाण्याची हिंमत असलेला अरब नेता अशी बनावी. त्यांनी सिनाई सीमेवर सैन्य धाडलं, तिरानच्या सामुद्रधुनीत इस्रायला रस्ता रोखला.

आधुनिक लढाऊ विमानं उडवणाऱ्या पायलटांच्या मधोमध उभे असलेले नासिर असा फोटो जगभरात फिरला. आपण किती कणखर आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

जॉर्डनचे शाह धर्मसंकटात सापडले होते. आसपासचे घडत होतं ते पाहून आपली सत्ता टिकवणं इतकंच उदिष्ट त्यांच्या डोळ्यासमोर होतं. म्हणूनच इच्छा नसताना त्यांनी नासिर यांच्यासोबत समझौता केला.

युद्धाचं वातावरण निर्माण झालं होतं, एकमेकांना दंड-बलदंड दाखवले जात होते. अरब रेडियो स्टेशन्स आणि इस्रायली वृत्तपत्र रोज एकमेकांना धमकी देत होते. यासगळ्यात इस्रायल मात्र निराशेच्या गर्तेत ढकलला जात होता.

परिस्थिती अशी आली की सरकारने शवपेट्या जमा करायला सुरुवात केली. धार्मिक नेत्यांनी आणिबाणी समजून सार्वजनिक बागा दफनभूमीमध्ये बदलायला सुरुवात केली.

पंतप्रधान लेवी एश्कोलही काळजीत पडले होते. त्यांनी 28 मेला केलेल्या भाषणाने लोक अजून घाबरले. भाषण करताना ते अडखळत होते, त्यांना नीट बोलताही येत नव्हतं.

भाषणानंतर एका बैठकीत इस्रायलच्या सैन्याधिकारऱ्यांनी पंतप्रधानांची निर्भत्सना केली. "आपल्याकडचं सगळ्यात मोठं हत्यार तुम्ही आज गमवलं. ते हत्यार होतं आपल्याबद्दल इतरांच्या मनात असलेली भीती," ब्रिगेडियर जनरल एरियल शेरॉन ओरडले.

युद्धाचा निर्णय झाला होता. जॉर्डनचं खोरं आणि इस्रायलच्या दिशेने इराकच्या सैन्याने कूच केलं होतं आणि म्हणून नासिर यांनी भविष्यवाणी केली की इस्रायल चार किंवा पाच जूनला हल्ला करेल. युद्ध सुरू झालं होतं.

पाच जूनला सकाळी पावणेआठ वाजता तेल अवीवचे धुरंदर नेते श्वास रोखून बसले होते. इजिप्त पासून सुरुवात करून जॉर्डन, सीरिया सगळीकडच्या विमानतळांना नष्ट करायला इस्रायलच्या लढाऊ विमानांनी झेप घेतली होती.

इस्रायली वायूसेना गेल्या कित्येक वर्षांपासून याची तयारी करत होती. त्यांचा अभ्यास इतका जबरदस्त होता की अरब सैन्याधिकाऱ्यांचे आवाज ओळखणारी एक स्वतंत्र सिस्टीमही त्यांनी बनवली होती.

अरब राष्ट्रांच्या सैन्यांची बैठक सुरू असताना वरतून धडाधड बॉम्ब पडायला लागले.

मोजून पाच दिवसात इस्रायलने इजिप्त, जॉर्डन आणि सीरियाच्या सैन्याला मुळापासून उपटून फेकून दिलं. इजिप्तकडून गाझापट्टी आणि सिनाई, सीरियाकडून गोलनच्या टेकड्या आणि जॉर्डनकडून वेस्ट बँक आणि पूर्व जेरूसलेम हिसकावून घेतलं.

दोन हजार वर्षांत पहिल्यांदा ज्यू लोकांचं पवित्र स्थान असलेल्या जेरुसलेम त्यांच्या ताब्यात आलं होतं. याही वेळेस पॅलेस्टिनी लोकांना इथून निर्वासित व्हावं लागलं. त्यांची हत्याकांडं झाली पण 1948 इतकी वाईट परिस्थिती आली नाही.

नासिर यांनी राजीनामा दिला पण लोकांच्या विरोधानंतर त्यांनी तो मागे घेतला. आपल्या मृत्यूपर्यंत ते पदावर कायम राहिले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या अन्वर सादत यांनी इस्रायलसोबत ऐतिहासिक शांतता करार केला ज्यामुळे त्यांच्याच रक्षकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केलं.

इजिप्तचे सैन्यप्रमुख आमिर यांचा मृत्यू रहस्यमयी परिस्थितीत झाला. त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं होतं त्यांना विष देऊन ठार मारलं.

जॉर्डनचे शाह हुसेन यांच्या हातातून पूर्व जेरूसलेम तर गेलं पण त्यांची सत्ता कायम राहिली. दोन्ही देशांमध्ये 1994 साली शांतता करार झाला.

सीरियाचे वायूसेना कमांडर हफीज असद यांनी 1970 मध्ये सत्ता हस्तगत केली. 2000 साली त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र बशर अल-असद त्यांचे उत्तराधिकारी बनले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)