सीरियातील बंडखोर कोण आहेत? सीरियात पुढे काय होणार?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सेबेस्टियन अशर
- Role, पश्चिम आशिया, संपादक
अबु मोहम्मद अल-जुलानी हयात तहरीर अल-शाम (HTS) या सीरियामधील इस्लामिक बंडखोर गटाचे नेते आहेत. असद राजवटीनंतर भविष्यातील सीरियातील नेते म्हणून ते स्वत:ला पुढे करत आहेत.
हयात तहरीर अल-शाम (HTS)या बंडखोरांचा बालेकिल्ला वायव्य सीरियातील इडलीब प्रांतात आहे.
तिथून या बंडखोर गटानं सीरियातील अलेप्पो शहरात मारलेली जोरदार धडक आणि त्यानंतर हमा आणि होम्स या शहरांवर मिळवलेला ताबा, याशिवाय सीरियामध्ये गेल्या दीड आठवड्यात झालेल्या नाट्यमय घटना घडू शकल्या नसत्या याबद्दल कोणतीही शंका नाही.
मात्र त्याचबरोबर इतर बंडखोर गटांचा देखील उदय होत ते पुढे आले आहेत. बहुधा संपूर्ण सीरिया एकत्र आणण्याची जी भावना होती त्यामुळे सीरियातील राजवट इतक्या वेगानं कोसळली.
या सर्व बंडखोर गटांमध्ये - काही आता दमास्कसमध्ये आहेत - काही बंडखोर गट असे आहेत जे कधीकाळी फ्री सीरियन आर्मीच्या नेतृत्वाखाली सीरियाच्या दक्षिणेकडील शहरं आणि गावांमधून कारवाया करत होते, जी वर्षानुवर्षे निष्क्रिय होती आणि जिथे बंडखोरीची ठिगणी पूर्णपणे पडली नव्हती.
तर सीरियाच्या पूर्वेकडील भागात कुर्दिश नेतृत्वाखालील सशस्त्र गटांना सीरियन सैन्याच्या पतनानंतर फायदा झाला आणि त्यांना त्या भागातील दाएर एल-झौर या मुख्य शहराचा पूर्ण ताबा घेता आला.
सीरियाच्या विस्तीर्ण वाळवंटात तथाकथित इस्लामिक स्टेटचे वाचलेले काही भाग देखील या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात.
तर अगदी उत्तरेला तुर्कीच्या सीमेला लागून असलेल्या भागातील आणि तुर्की पाठिंबा असलेली, सीरियन नॅशनल आर्मी देखील सीरियातील घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.


प्रतिमा बदलण्यासाठी अल-जवलानींचे प्रयत्न
मोहम्मद अल-जुलानी यांनी आपल्या संघटनेच्या विचारसरणीबद्दल सीरियातील लोकांना वाटणारी भीतीची धारणा बदलून आपली संघटना बशर अल-असद यांच्या राजवटीला व्यावहारिक पर्याय म्हणून सीरियातील लोकांना स्वीकारता येईल यासाठी कित्येक वर्षे प्रयत्न केले आहेत.
2011 मध्ये हयात तहरीर अल-शाम या संघटनेची स्थापना जभात अल-नुसरा या नावानं अल-कायदाची थेट संलग्न असलेली संघटना म्हणून करण्यात आली होती.
इस्लामिक स्टेट (IS) या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेचा नेता अबु बकर अल-बगदादी याचा देखील जभात अल-नुसराची स्थापना करण्यात सहभाग होता.

फोटो स्रोत, AFP
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात असलेल्या सशस्त्र गटांपैकी सर्वांत प्रभावी आणि घातक गट म्हणून या संघटनेला ओळखलं जातं होतं.
संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, तुर्की आणि इतर देशांकडून या संघटनेला दहशतवादी गट म्हणून प्रतिबंधित करण्यात आलं होतं. ते अजूनही कायम आहे.
मात्र अल-जुलानी यांनी जाहीरपणे अल-कायदाशी असलेलं संबंध तोडले, जभात अल-नुसरा ही संघटना विसर्जित केली आणि नवीन संघटनेची स्थापना केली. वर्षभरानं यासारख्या इतर बंडखोर गटांमध्ये विलीन झाल्यानंतर या संघटनेनं हयात तहरीर अल-शाम हे नाव घेतलं.
हयात तहरीर अल-शामानं अल-कायदाशी असलेले आपले संबंध पूर्णपणे तोडले होते की नाही, याबद्दल त्यावेळेस शंका होत्या आणि त्यातील काही अजूनही आहेत. मात्र गेल्या दीड आठवड्यातील कारवाईमधून त्यांनी सर्वसमावेशकतेचा आणि हिंसाचार किंवा सूड नाकारण्याचा संदेश दिला आहे.
मात्र यापूर्वी हा गट इतर बंडखोर गट आणि विरोधी गटांबरोबरच्या परस्पर संघर्षात गुंतलेला होता. हीच बाब पुन्हा देखील घडू शकते.
सीरियाचं भवितव्य काय?
सीरियात सरकारी नियंत्रणाबाहेर असलेला भूभाग आधीच विविध बंडखोर गटांच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या राजवटीचा शेवट झाल्यामुळे सीरियातील या विविध भागांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
सीरियातील संघर्षामध्ये कथितरीत्या मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्यामुळे हयात तहरीर अल-शमाकडून वैधतेसाठी केले जाणारे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. कारण याचा त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सीरियाचं नजीकचं राजकीय भवितव्य हे फक्त या संघटनेचे हेतू आणि क्षमतेबरोबरच इतर प्रतिस्पर्धी बंडखोर गटांकडून केले जाणारे दावे आणि त्यांच्याकडून येणारा दबाव यावरच अवलंबून असणार नाही, तर सीरियातील अलीकडच्या काळातील घडामोडींमध्ये सर्वात जवळून सहभागी असलेल्या सीरियाबाहेरील प्रमुख शक्ती काय करतात यावर देखील अवलंबून असणार आहे.
या प्रमुख बाह्यशक्ती म्हणजे इराण, रशिया आणि तुर्की. यात इराण आणि रशियानं राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पाठिंबा दिला होता. तर तुर्कीनं बंडखोर गटांना पाठिंबा दिला होता.
याबरोबरच सीरियाच्या भवितव्यात अमेरिकेची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. कारण कुर्दिश नियंत्रणाखाली असलेल्या सीरियाच्या पूर्व भागात अजूनही अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती आहे.
सीरियातील राजकीय संकटानंतर या सर्व बाह्य शक्ती आता सीरियात आपापलं महत्त्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कारण असद राजवटीच्या अस्तानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत आपलं हित साधण्यासाठी या शक्ती नवीन व्यूहरचनात्मक मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











