बशर अल-असद : सुन्नीबहुल सीरियावर तब्बल अर्धे शतक राज्य करणाऱ्या शिया कुटुंबाची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
सीरियातल्या हयात तहरीर अल-शाम(HTAS) या बंडखोर गटाने सरकारविरोधात बंड पुकारलं आहे. एचटीएस गटाने सीरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्यानंतर, सीरियाचे प्रमुख बशर अल-असद हे सीरियातून पळून गेल्याची माहिती या गटाने दिली आहे.
एका काळ्या युगाचा अंत होऊन नव्या युगाची सुरुवात होत असल्याचं या बंडखोर गटानं त्यांच्या टेलिग्रामवरील चॅनलवरुन म्हटलंय.
असद कुटुंबीयांची मागच्या 53 वर्षांपासून सीरियावर मजबूत पकड होती. मात्र आता पाच दशकांच्या या साम्राज्याचा अंत झालाय.
सध्या सीरिया एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, या पार्श्वभूमीवर बशर अल-असद आणि असद कुटुंबाच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.
सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या आयुष्यात अनेक निर्णायक क्षण आले. किंबहुना यातील सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे ते राहत असलेल्या ठिकाणापासून हजारो किलोमीटर अंतरावर झालेला कार अपघात.
बशर अल-असद यांना सुरुवातीला वडिलांच्या सत्तेचा वारसा सांभाळण्यासाठी तयार करण्यात आलं नव्हतं.
मात्र 1994 च्या सुरुवातीस दमास्कसजवळ एका कार अपघातात त्यांचा मोठा भाऊ, बसेल याचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि बशर अल-असद यांचा सत्तेच्या दिशेनं प्रवास सुरू झाला. त्यावेळेस बशर लंडनमध्ये नेत्ररोगशास्त्राचा अभ्यास करत होते.
बसेल यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लहान भावाला म्हणजे बशर यांना सीरियाची सत्ता सांभाळण्यासाठी तयार करण्याच्या योजना आखल्या गेल्या. नंतरच्या काळात एका रक्तरंजित युद्धाद्वारे बशर यांच्या हाती सीरियाची सत्ता आली. या युद्धात लाखो लोकांचा जीव गेला, तर लाखो लोक विस्थापित झाले.
मात्र एक डॉक्टर ते युद्धकाळातील गुन्ह्यांचा आरोप असलेल्या एका हुकुमशहापर्यंतचा बशर अल-असद यांचा प्रवास कसा झाला?


वडिलांचा वारसा
हाफिझ अल-असद आणि अनिसा मखलॉफ यांच्या पोटी 1965 मध्ये बशर अल-असद यांचा जन्म झाला. बशर यांच्या जन्माच्या वेळेसच सीरिया, मध्यपूर्व आणि इतरत्र देखील नाट्यमय घडामोडींची सुरुवात झाली.
त्यावेळेस आखातातील अनेक देशांमधील प्रादेशिक राजकारणावर अरब राष्ट्रवादाचं वर्चस्व होतं. सीरिया देखील यापासून वेगळा नव्हता.
इजिप्त आणि सीरिया (1958-1961) यांच्यातील अल्पायुषी एकता अपयशी ठरल्यानंतर सीरियामध्ये बाथ पार्टीनं सत्ता काबीज केली आणि अरब राष्ट्रवादाला चालना दिली. त्यावेळच्या बहुतांश अरब राष्ट्रांप्रमाणेच सीरियामध्ये देखील लोकशाही नव्हती. तिथे बहुपक्षीय निवडणुका होत नव्हत्या.

फोटो स्रोत, Getty Images
असद कुटुंब ज्या अलावाइट समुदायातील आहे, तो सीरियातील सर्वात वंचित समुदायांपैकी एक होता. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्या समुदायातील अनेकजण सीरियन सैन्यात भरती झाले होते.
एक लष्करी अधिकारी आणि बाथ पार्टीचे कट्टर समर्थक म्हणून हाफिझ अल-असद नावलौकिकाला आले. 1966 मध्ये ते सीरियाचे संरक्षण मंत्री झाले.
त्यानंतर हाफिझ अल-असद यांनी आपलं स्थान अधिक बळकट केलं आणि 1971 मध्ये ते सीरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हापासून 2000 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होते.
हाफिझ अल-असद इतका काळ सत्तेत राहणं ही एक उल्लेखनीय बाब होती. कारण सीरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात अनेक लष्करी उठाव झाले होते. इतका प्रदीर्घ काळ कोणालाही सत्तेत राहता आलं नव्हतं.
सीरियाच्या सत्तेवर त्यांची पोलादी पकड होती. त्यांनी विरोध दडपून टाकला आणि लोकशाही मार्गानं निवडणुका नाकारल्या.
परराष्ट्र धोरणात मात्र त्यांनी व्यावहारिकता दाखवली. एका बाजूला सोविएत युनियनबरोबर मैत्री करत ते दुसऱ्या बाजूला 1991 च्या आखाती युद्धाच्या वेळेस अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये देखील सहभागी झाले.
वैद्यकीय क्षेत्र आणि लंडन
बशर यांनी वेगळा मार्ग निवडला होता. हा मार्ग राजकारण आणि लष्करापासून दूर होता. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला होता. सीरियातील दमास्कस विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 1992 मध्ये ते लंडनमधील वेस्टर्न आय हॉस्पिटलमध्ये नेत्ररोगतज्ज्ञ होण्यासाठी युकेमध्ये गेले.
अ डेंजरस डायनॅस्टी: द असद्स या 2018 च्या बीबीसी माहितीपटानुसार, बशर यांचं लंडनमधील वास्तव्य मजेत गेलं. ते तिथे आनंदी होते. इंग्रजी गायक फिल कॉलिन्स त्यांना आवडायचा. बशर यांनी कॉलिन्सचं कौतुक केलं. त्यांना पाश्चात्य संस्कृती आवडत होती आणि त्यांनी पाश्चात्य संस्कृतीच्या अंगांचा स्वीकार केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
लंडनमध्ये बशर यांची भेट अस्मा अल-अखरास यांच्याशी झाली. पुढे त्यांच्याशीच बशर यांचं लग्न झालं. अस्मा तेव्हा लंडनमधील किंग्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकत होत्या.
नंतर त्यांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात एमबीएच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. मात्र लवकरच त्यांचं आयुष्यं एक वेगळं वळण घेणार होतं.
हाफिझ अल-असद यांचा दुसरा मुलगा म्हणून बशर मोठ्या प्रमाणात त्यांच्या मोठ्या भावाच्या म्हणजे बसेल यांच्या सावलीखाली होते. बसेल यांना तेव्हा हाफिझ यांच्या सत्तेचा "वारसदार" म्हणून ओळखलं जात आहे.
मात्र जानेवारी 1994 मध्ये बसेल यांचा मृत्यू झाला आणि या घटनेमुळे अचानक बशर अल-असद यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली.
त्यांना तातडीनं लंडनहून सीरियामध्ये बोलावण्यात आलं. सीरियाचा पुढील राज्यकर्ता म्हणून त्यांच्या जडणघडणीला सुरुवात झाली.
बशर सीरियाच्या लष्करात रुजू झाले आणि भविष्यातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांनी स्वत:ची सार्वजनिक प्रतिमा तयार करण्यास सुरुवात केली.
बदलाची स्वप्नं
जून 2000 मध्ये हाफिझ अल-असद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच 34 वर्षांच्या बशर अल-असद यांना सीरियाचा राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं. त्यासाठी सीरियाच्या राज्यघटनेत बदल करण्यात आला. सीरियाचा राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी वयाची पात्रता 40 वरून खाली आणण्यात आली.
बशर अल-असद यांनी 2000 च्या उन्हाळ्यात राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांनी सीरियामध्ये एक नवीन राजकीय वातावरण आणलं.
त्यांनी "पारदर्शकता, लोकशाही, विकास, आधुनिकीकरण, जबाबदारी आणि संस्थात्मक विचार" हे मुद्दे मांडले.
राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यांनी बशर अल-असद यांनी अस्मा अल-अखरास यांच्याशी लग्न केलं. या दांपत्याला हाफिझ, झेन आणि करीम ही तीन मुलं आहेत.
बशर यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या राजकीय सुधारणा आणि प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य या मुद्द्यांनी सीरियातील अनेक लोकांमध्ये आशा निर्माण केली. बशर यांची नेतृत्वशैली, त्याला अस्मा यांच्या पाश्चात्य शिक्षणाची असलेली जोड यातून बदलाच्या एका नव्या युगाची सुरुवात होईल असं वाटलं.

फोटो स्रोत, AFP
"दमास्कस स्प्रिंग" या नावानं ओळखला जाणारा नागरी चर्चा आणि तुलनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक छोटा काळ सीरियानं अनुभवला. मात्र 2001 पर्यंत सुरक्षा दलांनी त्यांच्या कारवाईला पुन्हा सुरुवात केली. उघडपणे बोलणाऱ्या अनेक विरोधकांना त्यांनी अटक केली.
बशर यांनी सीरियामध्ये मर्यादित स्वरुपात आर्थिक सुधारणा लागू केल्या. त्यामुळे खासगी क्षेत्राच्या वाढीला प्रोत्साहन मिळालं.
त्याचबरोबर त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये रामी मखलॉफ या त्यांच्या चुलत भावाचा देखील उदय झाला. मखलॉफनं एक प्रचंड आर्थिक साम्राज्य उभं केलं. टीकाकारांच्या मते त्यामध्ये संपत्ती आणि सत्तेचं मिश्रण होतं.
इराक आणि लेबनॉन
2003 च्या इराक युद्धामुळे बशर अल-असद आणि पाश्चात्य देशांमधील संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीनं इराकवर केलेल्या हल्ल्याला बशर अल-असद यांनी विरोध केला.
काहीजणांना वाटत होतं की, बशर यांनी ही भूमिका घेतली होती, कारण त्यांना भीती वाटत होती की अमेरिकेच्या लष्करी कारवाईचं पुढचं लक्ष्य सीरिया असू शकतं.
तर बशर यांच्या भूमिकेनंतर अमेरिकेनं त्यांच्या इराकवरील ताब्याला विरोध करणाऱ्या बंडखोरांना होत असलेल्या शस्त्रांस्त्रांच्या तस्करीकडे डोळेझाक केली आणि सीरिया-इराक सीमेतून दहशतवाद्यांना सीमा ओलांडण्यास परवानगी दिली, असा आरोप सीरियावर केला.
डिसेंबर 2003 मध्ये अमेरिकेनं सीरियावर वेगवेगळ्या कारणांसाठी निर्बंध लादले. यामागे फक्त इराक संदर्भातील सीरियाची भूमिका हेच कारण नव्हतं, तर लेबनॉनमधील सीरियाच्या उपस्थितीशीही त्याचा संबंध होता.

फोटो स्रोत, Getty Images
फेब्रुवारी 2005 मध्ये लेबनॉनचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांची मध्य बैरूतमध्ये एका मोठ्या स्फोटात हत्या करण्यात आली. रफिक हरीरी लेबनॉनमधील सीरियाच्या प्रमुख विरोधकांपैकी एक होते. त्यामुळेच या हत्येमुळे सीरिया आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांकडे तात्काळ बोटं दाखवण्यात आली.
या हत्येनंतर लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू झाली. शिवाय सीरियावरील आंतरराष्ट्रीय दबाव वाढला. परिणामी 30 वर्षांच्या लष्करी उपस्थितीनंतर सीरियानं लेबनॉनमधून माघार घेतली.
असं असून देखील बशर अल-असद आणि त्यांचा महत्त्वाचा मित्र असलेल्या हिजबुल्लाहनं हरीरी यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग असल्याची बाब सातत्यानं फेटाळली.
अगदी 2020 मध्ये विशेष आंतरराष्ट्रीय लवादानं हिजबुल्लाहच्या एका सदस्याला या हत्येत सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवल्यानंतर देखील बशर यांच्याकडून या हत्येतील सहभाग नाकारण्यात आला.
अरब स्प्रिंग
बशर अल-असद यांच्या राजवटीच्या पहिल्या दशकात इराणबरोबरचे सीरियाचे संबंध आणखी मजबूत झाले. तर कतार आणि तुर्कीबरोबर सीरियाचे संबंध वाढले. अर्थात नंतरच्या काळात यात बदल झाले.
सौदी अरेबियानं बशर यांना सुरुवातीला पाठिंबा दिल्यानंतर देखील सौदी अरेबिया बरोबरच्या सीरियाच्या संबंधांमध्ये चढ-उतार येत राहिले.
एकंदरीतच, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत बशर अल-असद यांनी आपल्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवलं. थेट लष्करी संघर्ष टाळून हुशारीनं ते मार्ग काढत राहिले.
एका दशकभराच्या सत्तेनंतर असद यांच्या राजवटीचं वर्णन हुकुमशाही राजवट असंच केलं जाऊ शकत होतं. कारण सरकारच्या विरोधातील आवाजाचं दमन सुरूच होतं.
डिसेंबर 2010 मध्ये बशर यांच्या पत्नी अस्मा अल-असद यांनी व्होग मासिकाला (Vogue) मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी दावा केला होता की सीरियामध्ये 'लोकशाही' आहे.
त्याच दिवशी, एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं थप्पड लगावल्यामुळे मोहम्मद बोअझिझि या एका ट्युनिशियन भाजी विक्रेत्यानं स्वत:ला पेटवून घेतलं. यातून ट्युनिशियामध्ये एक उठाव झाला आणि त्याद्वारे तिथले राष्ट्राध्यक्ष झाइन एल अबिदिन बेन अली यांची राजवट उलथवून टाकण्यात आली.
मात्र ट्युनिशियातील उठाव हे जणू निमित्त ठरलं किंवा एक ठिणगी ठरली. कारण ट्युनिशियातील या उठावानं अनपेक्षितपणे अरब जगतातील क्रांतिकारी चळवळींना प्रेरणा दिली. उठावाचं हे वारं इजिप्त, लिबिया, येमेन, बहरिन आणि सीरियापर्यंत पोहोचलं.

फोटो स्रोत, Getty Images
व्होग मासिकातील अस्मा अल-असद यांची मुलाखत मार्च 2011 मध्ये "अ रोझ इन द डेझर्ट"
या मथळ्याखाली प्रकाशित झाली (नंतर ही मुलाखत मागे घेण्यात आली). या मुलाखतीत सीरियाचं वर्णन "बॉम्बस्फोट, तणाव आणि अपहरण यातून मुक्त असलेला देश" असं करण्यात आलं होतं.
मात्र आगामी महिन्यांमध्ये सीरियाची ही प्रतिमा नाट्यमयरित्या बदलणार होती.
मार्चच्या मध्यापर्यंत दमास्कसमध्ये आंदोलनं झाली. काही दिवसांनी दारा या सीरियाच्या दक्षिणेकडील शहरात मुलांनी भिंतीवर असद-विरोधी घोषणा लिहिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि दारा शहरात देखील आंदोलनं सुरू झाली.
सीरियातील लोकांना संबोधित करण्यापूर्वी बशर अल-असद यांनी दोन आठवडे वाट पाहिली. सीरियाच्या संसदेत त्यांनी आश्वासन दिलं की, सीरियाच्या विरोधातील 'कारस्थान' हाणून पाडलं जाईल. त्याचबरोबर त्यांनी हे देखील कबूल केलं की अनेक लोकांच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत.
दारामध्ये सुरक्षा दलांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारामुळे परिस्थिती आणखी चिघळली. यानंतर सीरियातील अनेक शहरांमध्ये बशर अल-असद यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी आंदोलनं करण्यात आली.
त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणेनं हिंसक मार्गांचा अवलंब केला. त्यांनी या गोष्टीचा दोष "परदेशी शक्तींच्या मदतीनं तोडफोड आणि घातपात करणाऱ्यांना" दिला.
काही महिन्यांतच परिस्थिती इतकी चिघळली की, सरकारी सुरक्षा दलं आणि विरोधी गट यांच्यात सशस्त्र चकमकी होऊ लागल्या. देशभरातील विरोधी गटांनी सीरियन सरकारच्या विरोधात शस्त्रं हाती घेतली होती.
आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप, जिहादी आणि युद्ध गुन्हे
सीरियातील संघर्ष जसजसा वाढत गेला, तसतसा त्यातील आंतरराष्ट्रीय शक्तींचा सहभाग देखील वाढत गेला. परिणामी युद्धात मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही वाढत गेली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार सीरियामध्ये या कालावधीत लाखो लोक मारले गेले.
रशिया, इराण आणि इराणचा पाठिंबा असलेले सशस्त्र गट यांनी सीरियाच्या सुरक्षा दलांना या संघर्षात मदत केली. तर तुर्की आणि आखाती देशांनी बशर अल-असद यांच्या विरोधातील सशस्त्र गटांना पाठिंबा दिला.
सुरुवातीला असद-विरोधी निदर्शनं लोकशाही आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्यासाठी करण्यात आलेली असली, तरी लवकरच त्यातील सांप्रदायिक गटबाजी समोर आली.
काही विरोधी गटांनी सीरियन सरकारवर सुन्नी बहुसंख्य लोकांऐवजी अलावाइट समुदायाची बाजू घेतल्याचा आरोप केला.
आखातातील प्रादेशिक हस्तक्षेपामुळे सांप्रदायिक फूट आणखीनच वाढली. इस्लामिक कट्टरतावादी गटांनी अलावाइट समुदायाच्या विरोधातील भूमिका घेतली.
तर हिजबुल्लाहच्या नेतृत्त्वाखालील इराणशी एकनिष्ठ असलेले सशस्त्र शिया गटांचे सैनिक असद सरकारला पाठिंबा देण्यासाठी सीरियामध्ये शिरले.
तिकडे सीरियाच्या शेजारी असलेल्या इराकमध्ये इस्लामिक कायद्याची अत्यंत कठोर स्वरुपात व्याख्या करणाऱ्या एका कट्टरतावादी गटाचा उदय होत होता. तो गट म्हणजे इस्लामिक स्टेट (IS).
सीरिया आणि इराकमधील यादवी युद्धाचा फायदा उचलत इस्लामिक स्टेटनं सीरियामधील काही भूभाग देखील ताब्यात घेतला. सीरियाच्या पूर्वेतील रक्का हे शहर त्यांनी राजधानी म्हणून घोषित केलं.

फोटो स्रोत, Getty Images
ऑगस्ट 2013 मध्ये दमास्कसच्या जवळ विरोधी गटांच्या ताब्यातील पूर्व घौटामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्यात शेकडो लोक मारले गेले.
पाश्चात्य शक्ती आणि सीरियातील विरोधी गटांनी या हल्ल्यासाठी असद सरकारला जबाबदार ठरवलं.
असद सरकारनं मात्र या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचा आरोप नाकारला. मात्र आंतरराष्ट्रीय दबाव आणि धमक्यांमुळे सीरिया त्यांच्याकडील रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा नष्ट करण्यास तयार झाला.
अर्थात यामुळे सीरियातील यादवी युद्धात होत असलेल्या अत्याचारांचा शेवट झाला नाही. पुढच्या काळात देखील रासायनिक हल्ले झाले.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयोगांनी सीरियातील सर्व बाजूंवर युद्ध गुन्ह्यांचा आरोप लावला. यात हत्या, छळ आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांचा समावेश होता.
2015 मध्ये असं वाटत होतं की, बशर अल-असद सरकार कोसळेल. कारण त्यावेळी सीरियातील मोठ्या भूभागावरील त्यांचं नियंत्रण संपलं होतं. मात्र रशियन सैन्याच्या हस्तक्षेपानंतर ही परिस्थिती बदलली आणि बशर अल-असद यांनी सीरियातील प्रमुख भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवलं.
गाझातील युद्ध
2018 ते 2020 दरम्यान प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय करारांमुळे अशी स्थिती निर्माण झाली की, सीरियातील बहुतांश भूभागावर सीरियन सरकारचं नियंत्रण निर्माण झालं. तर उत्तर आणि ईशान्य भागात इस्लामिक विरोधी गट आणि कुर्दिश गटांचं संयुक्त नियंत्रण होतं.
या करारांमुळे असद यांची स्थिती मजबूत झाली आणि हळूहळू त्यांना अरब मुत्सद्दी मंचावर पुन्हा स्थान मिळालं.
2023 मध्ये अरब लीगमध्ये सीरियाचा पुन्हा समावेश करण्यात आला. अरब देशांनी दमास्कसमध्ये आपले दूतावास पुन्हा सुरू केले.
असद यांच्या राजवटीच्या तिसऱ्या दशकात सीरियामध्ये प्रचंड आर्थिक संकट निर्माण झालं. मात्र असं वाटलं की या मोठ्या संकटावर त्यांनी मात केली.
मात्र ऑक्टोबर 2023 मध्ये हमासनं इस्रायलवर अचानक हल्ला केला. त्यानंतर गाझा युद्धाची सुरूवात झाली. या युद्धाची व्याप्ती लेबनॉनपर्यंत पोहोचली. बशर अल-असद यांचा सहकारी असलेल्या हिजबुल्लाहवर या युद्धाचा परिणाम झाला.

फोटो स्रोत, Getty Images
या युद्धात हिजबुल्लाहचं मोठं नुकसान झालं. यात त्यांचे नेते हसन नसरल्लाह देखील मारले गेले.
ज्या दिवशी लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी झाली, त्याच दिवशी हयात तहरीर अल शामच्या (HTS) नेतृत्वाखालील सीरियातील बंडखोर गटांनी सीरियात अचानक हल्ला सुरू केला आणि अलेप्पो हे सीरियातील दुसरं सर्वात मोठं शहर ताब्यात घेतलं.
सीरियातील बंडखोर गट वेगानं पुढे सरकले. त्यांनी हमा आणि सीरियातील इतर शहरांवर ताबा मिळवला. तर सीरियातील दक्षिण भाग देखील सरकारच्या हातातून निसटत गेला.
सद्य परिस्थितीत बशर अल-असद यांची स्थिती अनिश्चित दिसते. इराण आणि रशिया ही सीरियाची मित्रराष्ट्र देखील कदाचित त्यांच्या मदतीला येऊ शकणार नाहीत.
सीरियातील सशस्त्र बंडखोर गट महत्त्वाच्या शहरांच्या जवळ पोहोचत असताना, सीरिया आणि त्याहीपलीकडे एक प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे, "असद यांची राजवट वाचेल का? की अखेर त्यांच्या राजवटीचा शेवट झाला आहे?"
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











