सीरियातील परिस्थितीबाबत भारताची भूमिका काय?

 डोनाल्ड ट्रम्प आणि सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

सीरिया सरकारच्या विरोधात बंड पुकारलेला गट हयात तहरीर अल-शामने (HTAS) राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.

एका काळ्या युगाचा अंत होऊन नव्या युगाची सुरुवात होत असल्याचं या बंडखोर गटानं त्यांच्या टेलिग्रामवरील चॅनलवरुन म्हटलंय.

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांनी देश सोडून पलायन केलं असून, सीरिया आता 'मुक्त' देश असल्याचं त्यांनी म्हटलं.

यासह गेल्या पाच दशकात असद यांच्या सत्ताकारणामुळं विस्थापित झालेले किंवा कैदेत राहिलेले नागरिक आता देशात परतु शकतात, असंही या गटाकडून सांगण्यात आलंय.

'हा एक नवा सीरिया असेल जेथे उत्तम न्यायव्यवस्थेसह प्रत्येकजण शांततेनं जगू शकेल', असंही बंडखोरांनी म्हटलंय.

दरम्यान, बंडखोरांनी सैदनाया तुरुंगातून हजारो कैद्यांना मुक्त केलं असल्याचंही म्हटलं आहे. या तुरुंगात असद यांच्या विरोधकांचा कथितरित्या छळ केला जायचा, असं त्यांचं म्हणणं आहे.

राष्ट्राध्यक्ष पळून गेल्यानंतर सार्वजनिक सस्थांची जबाबदारी आता पतंप्रधान पार पाडणार असल्याचं बंडखोरांनी म्हटलंय.

राजधानी दमास्क येथे जमलेले नागरिक
फोटो कॅप्शन, राजधानी दमास्क येथे जमलेले नागरिक

हयात तहरीर अल-शाम गटाकडून त्यांच्या सैनिकांना काही काळ दमास्कसमधील सार्वजनिक संस्थांच्या जवळ जाण्यास बंदी केली आहेत.

दरम्यान, याआधी वृत्तसंस्था रॉयटर्यनं सीरियाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं राष्ट्रपती बशर अल-असद हे राजधानी दमास्कस सोडून अज्ञातस्थळी पळून गेले असल्याचं सांगितलं.

याआधी बंडखोरांनी सीरियातील तिसरं मोठं आणि महत्वाचं शहर 'होम्स'वर ताबा मिळवला होता.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

सीरियातील बंडखोर कमांडर हसन अब्दुल घनी म्हणाले होते की, आमच्या सैन्याने सीरियाचं मध्य शहर होम्स शहर 'पूर्णपणे मुक्त' केलं आहे.

हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचं सीरियाचे इस्लामी बंडखोर नेता अल-जुलानी म्हणाले. तसेच जे कोणी शरण येतील त्यांना इजा न करण्याचं आवाहन त्यांनी आपल्या सैनिकांना केलं.

टेलिग्रामवर जारी करण्यात आलेल्या एक व्हीडिओमध्ये, एचटीएस नेता अबू मोहम्मद अल-जुलानी म्हणाले, "ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो ते अखेर पूर्ण होताना दिसत आहे. आम्ही होम्स शहराला मुक्त केलं असून हा आमच्यासाठी एक ऐतिसाहासिक क्षण आहे."

इस्लामी हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटानं सीरियातील तिसरं सर्वात मोठं शहर होम्स ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्लामी हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटानं सीरियातील तिसरं सर्वात मोठं शहर होम्स ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, सीरियातील हयात तहरीर अल-शाम या इस्लामिक बंडखोर गटानं गेल्या काही वर्षांत देशातील सरकारविरोधात सर्वात मोठी कारवाई सुरू केली. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता.

हयात तहरीर अल-शामचा नेता अबू मोहम्मद अल-जुलानी

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, हयात तहरीर अल-शामचा नेता अबू मोहम्मद अल-जुलानी

गेल्या आठवड्यात इस्लामिक बंडखोरांनी धक्कादायक कारवाई करत खूपच वेगानं अलेप्पो शहर ताब्यात घेतलं होतं.

अलेप्पोच्या दक्षिणेला 110 किलोमीटर अंतरावर असलेल्या हमा शहरात 10 लाख रहिवासी आहेत. बंडखोर गटांनी हमा शहर ताब्यात घेतलं, यानंतर त्यांनी होम्सवरही त्यांनी ताबा मिळवला होता. तर आता राजधानी दमास्कसही ताब्यात घेतलं असून नव्या युगाची सुरुवात होत असल्याचं या गटानं म्हटलंय.

सीरियातील परिस्थितीबाबत भारताची भूमिका काय आहे?

सीरियातील सध्याच्या परिस्थितीवर भारताने सोमवारी प्रतिक्रिया दिली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, सीरियात घडणाऱ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

"आमचा विश्वास आहे की सीरियाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे."

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "आम्ही सीरियातील सर्व घटकांच्या हितसंबंधांचा आदर करून. सीरियामध्ये शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक नेतृत्वाखालील राजकीय प्रक्रियेचे समर्थन करतो."

परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन

फोटो स्रोत, MEAINDIA

"दमास्कसमधील आमचा दूतावास त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय समुदायाच्या संपर्कात आहे."

एचटीएएसच्या नेतृत्वाखालील बंडखोरांनी रविवारी (8 डिसेंबर) अलेप्पो, हमा आणि होम्सनंतर राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. यानंतर बंडखोर गटांनी सीरिया स्वतंत्र झाल्याचं सांगितलं.

या सर्व परिस्थितीत बशर अल-असद सीरियातून पळून गेले आहेत. रशियाच्या वृत्तसंस्था आणि सरकारी टीव्हीने क्रेमलिनच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशियाने असद आणि त्यांच्या कुटुंबाला मानवतावादी आधारावर आश्रय दिला आहे.

दमास्कसमधील इराणी दूतावासावर हल्ला

दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर हल्ला झाल्याचं इराणी माध्यमांनी म्हटलं आहे.

अल अरेबिया या अरबी वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये इराणी दूतावासाच्या इमारतीच्या बाहेरील भागाचं नुकसान झाल्याचं दिसत आहे.

या व्हीडिओत इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या दिसत असून, उध्वस्त झालेल्या खोल्यांमध्ये कागदपत्रं जमिनीवर विखुरलेली दिसत आहेत.

या व्हीडिओ फुटेजमध्ये इराणी कुड्स कमांडर कासेम सुलेमानी आणि हिजबुल्लाहचे नेते हसन नसराल्लाह यांचे पोस्टर जमावाने फाडल्याचं दिसत आहे. या दोघांचाही मृत्यू झालेला आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने प्रकाशित केलेल्या फोटोमध्ये दूतावासाच्या इमारतीचा समोरचा भाग दिसतोय. त्या इमारतीवर लावलेले पोस्टर फाडून टाकल्याचं दिसत आहे.

दमास्कसमधील इराणी दूतावास

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, दमास्कसमधील इराणी दूतावास

सीरियातील परिस्थिती आणि रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये बंडखोर गट घुसल्यानंतर अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.

याशिवाय रशिया आणि युक्रेन युद्धावरही त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथवरील पोस्टमध्ये लिहिले की, "असद गेले. त्यांनी आपला देश सोडला आहे. पुतीन यांच्या नेतृत्वाखालील रशिया आता त्यांना वाचवण्यात रस दाखवत नाही. रशियाने सिरीयात हस्तक्षेप करण्याचं कोणतं कारणही नव्हतं."

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युक्रेन युद्धामुळे रशियाचा सीरियातील रस कमी झाला आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, "युक्रेन युद्धामुळे रशियाचा सीरियामधील रस कमी झाला आहे. कारण युक्रेनसोबतच्या युद्धात सहा लाख रशियन सैनिक मारले गेले आहेत. रशिया आणि इराण आता कमकुवत देश आहेत."

ट्रम्प यांनी लिहिलं की, "युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे युद्ध थांबवण्यासाठी रशियासोबत करार करू इच्छितात. कारण युक्रेनचे चार लाख सैनिक आणि अनेक नागरिकही मारले गेले आहेत."

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "रशिया आणि युक्रेनमध्ये तात्काळ युद्धविराम झाला पाहिजे आणि वाटाघाटी सुरू झाल्या पाहिजेत. मी व्लादिमीर पुतिन यांना चांगले ओळखतो. त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची वेळ आली आहे. चीनही त्यांना मदत करू शकतो."

बशर अल-असद यांच्या पतनाचं युके, जर्मनी आणि फ्रान्सकडून स्वागत

पाश्चिमात्य देशांनी सिरीयात घडलेल्या घडामोडींचं स्वागत केलं आहे. बशर अल-असद यांची राजवट संपुष्टात आल्याने या देशांनी याचं स्वागत केलं आहे.

फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोशल मीडियावर करून लिहिलं आहे, "शेवटी अत्याचारी राजवटीचा अखेर झाला आहे."

"मी सीरियन लोकांना, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या संयमाला सलाम करतो. अनिश्चिततेच्या या क्षणी, मी त्यांना शांतता, स्वातंत्र्य आणि एकतेसाठी माझ्या शुभेच्छा पाठवतो. फ्रान्स मध्य पूर्वेतील सर्वांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध राहील."

फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन

फोटो स्रोत, Getty Images

जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी असद यांच्या पतनाला 'चांगली बातमी' म्हटलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सीरियाला स्थिर करण्यासाठी राजकीय तोडगा काढण्याची विनंती जर्मनीच्या चान्सलरनी केली आहे.

एएफपीने दिलेल्या माहितीनुसार स्कोल्झ म्हणाले की, "बशर अल-असद यांनी आपल्या लोकांवर क्रूरपणे अत्याचार केले. त्यांनी असंख्य जीव घेतले आहेत आणि असंख्य लोकांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडलं आहे, त्यापैकी बरेच लोक जर्मनीत आले आहेत,"

ब्रिटनचे उपपंतप्रधान अँजेला रेनर म्हणाले की, "जर असद राजवट पडली असेल तर सरकार 'त्या बातमीचे स्वागत करते'."

'अरब स्प्रिंग'च्या हुकूमशहांची अखेर?

फ्रँक गार्डनर, संरक्षण प्रतिनिधी

लिबियातले मुअम्मर गद्दाफी, ट्युनिशियातले बेन अली, येमेनमधले अली अब्दुल्लाह सालेह, इजिप्तचे होस्नी मुबारक आणि आता सीरियाचे बशर अल-असद.. 2011 मध्ये अरब स्प्रिंगच्या आंदोलकांनी ज्या नेत्यांना हुकूमशहा म्हटलं होतं त्या सगळ्यांची गच्छंती झाली आहे.

याशिवाय इराकमध्ये सद्दाम हुसैन यांचाही शेवट झाला. अर्थात अरब स्प्रिंगचा तो भाग नसला तरी अमेरिकेच्या नेतृत्वात केलेल्या हल्ल्यामुळेच ते घडलं होतं.

या आंदोलकांनी ज्या ज्या नेत्यांच्या विरोधात उठाव केला त्यापैकी, फक्त बहरीनचे राजे हमाद स्वतःचा बचाव करू शकले आहेत. कारण ते प्रजासत्ताक देशाचं नाही, तर अरब राजेशाहीने चालणाऱ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. अर्थात बहरीनच्या या रचनेची त्यांना मदत झालेली असली, तरी आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञांनी सुचवलेल्या काही सुधारणा त्यांनी केल्यामुळेच त्यांना हे शक्य झालं असं दिसतंय.

2011 मध्ये माझ्याशी बोलताना हमाद म्हणाले होते, "मलाही सीरियाच्या मार्गावर जावं लागलं असतं. पण त्याऐवजी मी त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचा निर्णय घेतला."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

हमाद यांनी काहीप्रमाणात त्या मागण्या मंजूर केल्या असल्या, तरी बहरीनमध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी अजून बराच मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. असं असलं तरी बशर यांच्या सीरियापेक्षा हा देश थोडा जास्त आनंदी होता.

पाच वर्षांच्या कार्यकाळात सीरियाच्या इस्लामिक स्टेटबाबत अनेक बातम्या आल्या असतील, परंतु सीरियामध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त मृत्यू हे सरकारने केलेल्या अत्याचारामुळेच झाले आहेत.

सीरियात बशर-अल-असद यांच्या पाडावामुळे तालिबानला आनंद झालाय का?

हफिजुल्ला मारूफ, बीबीसी अफगाण सेवा

सीरिया आणि अफगाणिस्तान हे शेजारी देश नाहीत. हे दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर आहेत.

सीरियात सुरू असलेल्या घडामोडींवर तालिबान सरकारकडून अद्याप कोणतेही औपचारिक वक्तव्य करण्यात आलेलं नसलं तरी तरी सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट पाहून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं.

सीरिया

फोटो स्रोत, EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK

फोटो कॅप्शन, इस्लामिक बंडखोरांनी रविवारी सीरियावर ताबा मिळवल्याचा दावा केला.

तालिबान कट्टरतावादी सुन्नी विचारांचे पालन करतात. एका तालिबानच्या सदस्याने मला सांगितलं की, "वैचारिक एकरूपतेमुळे सीरियातील जिहादी बंडखोरांबद्दल तालिबानला खूप सहानुभूती आहे."

तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तालिबानला आशा आहे की सीरियातील बंडखोर गट तालिबान सरकारने अफगाणिस्तानमध्ये लागू केल्याप्रमाणे 'शरिया कायदा' लागू करतील.

नेमकं प्रकरण काय?

सीरियात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धात आतापर्यंत जवळपास 5 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, सुमारे एक कोटी 20 लाख लोकांना घर सोडून पलायन करावं लागलंय. यापैकी सुमारे 50 लाख लोक आता निर्वासित आहेत किंवा परदेशात आश्रयाने राहत आहेत.

त्याची सुरुवात 2011 मध्ये झाली, जेव्हा बशर अल-असद सरकारने लोकशाही समर्थक आंदोलन दडपण्यासाठी कारवाई केली होती.

व्हीडिओ कॅप्शन, सीरिया : माजी राष्ट्राध्यक्षांचा पुतळा आंदोलकांनी पाडला, दमास्कस 'मुक्त' केल्याचा दावा

सीरियातील या ताज्या हल्ल्यांचे नेतृत्व इस्लामिक बंडखोर गट हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) आणि त्याचे तुर्कीय-समर्थित मित्रांनी केले आहे.

एचटीएस हा असद सरकारच्या विरोधात लढणाऱ्या सर्वात प्रभावी आणि प्राणघातक गटांपैकी एक मानला जात होता आणि इदलिबमध्ये हा गट आधीपासूनच सक्रिय होता.

उत्तर सीरियातील इदलिबमध्ये हवाई हल्ल्यांनंतर लोकांना परिसर रिकामा करावा लागला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उत्तर सीरियातील इदलिबमध्ये हवाई हल्ल्यांनंतर लोकांना परिसर रिकामा करावा लागला आहे.

दरम्यान, एका बाजूने कुर्दिश बंडखोर देखील पुढे सरकत असून त्यांनी सीरियाच्या पूर्व भागातील वाळवंट ताब्यात घेतलं आहे.

सीरियातील परिस्थिती लक्षात घेऊन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सीरियात प्रवासासाठीच्या सूचना जारी केल्या आहेत.

अमेरिका, रशिया, तुर्की, जॉर्डनसह इतर अनेक देशांनी देखील सीरियामधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली होती. सीरियामधील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचं त्यानी म्हटलं होतं.

सीरियातील परिस्थितीवर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातील परिस्थितीतीवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेनं या युद्धापासून दूर राहावं, असं म्हटलं होतं.

ट्रम्प यांनी एक्स(पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत म्हटलंय, "हे आमची लढाई नाही. ते स्वत: यातून मार्ग काढतील, अमेरिकेनं यात पडू नये."

डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातील परिस्थितीतीवर प्रतिक्रिया दिली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातील परिस्थितीतीवर प्रतिक्रिया दिली

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सीरियातील विरोधी सैनिकांनी विद्रोही पाऊल उचलत अनेक शहरं पूर्णपणे ताब्यात घेतली आहेत.

"रशिया जो युक्रेनमध्ये वाईटरित्या अडकला असून त्यांनी 6 लाखांहून अधिक सैनिकांना गमावलं आहे. ते आता सीरियातील वाढता तणाव आणि हल्ले रोखण्यास असमर्थ असल्याचं दिसतंय. सीरिया अनेक वर्षांपासून रशियाला आपला पाठिंबा दर्शवत आलाय."

'हयात तहरीर अल-शाम' बंडखोर गट काय आहे?

एचटीएसची स्थापना 2011 मध्ये 'जभात अल-नुसरा' नावाने झाली. हा गट अल कायदा या कट्टरतावादी संघटनेचा थेट सहयोगी होता.

इस्लामिक स्टेट (IS) गटाचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादीनेही ही संघटना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हा गट राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्वात प्रभावी आणि प्राणघातक गटांपैकी एक मानला जातो.

बंडखोर गट एचटीएसने सीरियात गृहयुद्ध पुन्हा पेटवले आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बंडखोर गट एचटीएसने सीरियात गृहयुद्ध पुन्हा पेटवले आहे

बीबीसी मिडल इस्टचे प्रतिनिधी सेबॅस्टियन अशर म्हणतात, "असं वाटतं की, क्रांतिकारी विचारांच्या ऐवजी जिहादी भूमिकेमुळेच या गटाला प्रेरणा मिळाली. त्याकाळी 'फ्री सीरिया'च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या मुख्य विद्रोही गटाशी या गटाचे मतभेद असल्याचंही समोर आलं होतं."

2016 मध्ये, या संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल-जवलानी याने सार्वजनिकरित्या अल कायदाशी संबंध तोडले. त्यांनी 'जभत अल-नुसरा' बरखास्त करून नवीन संघटना स्थापन केली.

एका वर्षानंतर, इतर अनेक समविचारी गट या संघटनेत विलीन झाले आणि या गटाला 'हयात तहरीर अल-शाम' असं नाव देण्यात आलं.

सीरियाचे पाश्चात्य देशांवर आरोप

राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांनी पाश्चात्य देश बंडखोर गटांना मदत करत असल्याचे आरोप केले आहेत.

याच आठवड्यात इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी सद्यपरिस्थितीसाठी अमेरिका आणि पाश्चात्य देशांना जबाबदार ठरवलं होतं.

बशर अल-असद यांनी बंडखोरांना 'दहशतवादी' घोषित केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी बंडखोरांचा बिमोड करणार असल्याचं म्हटलं होतं.

आपल्या चर्चेत बशर अल-असद म्हणाले होते की अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश या भूप्रदेशातील नकाशाला एक नवं स्वरूप देऊ इच्छितात.

बंडखोर

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, बंडखोर गटांवर मात करण्यासाठी असद सरकारला आपल्या मित्रराष्ट्रांच्या मदतीची अपेक्षा आहे.

तर इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, सीरियाचं सार्वभौमत्व वाचवण्यासाठी आणि सीरियात स्थैर्य निर्माण करण्यासाठी ते बशर अल-असद सरकारला मदत करणार आहेत.

बंडखोर गटांवर मात करण्यासाठी असद सरकारला आपल्या मित्रराष्ट्रांच्या मदतीची अपेक्षा आहे. सीरियामध्ये इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या विरोधात आधी लढलेल्या लेबनॉनस्थित हिजबुल्लाह या संघटनेनं देखील बशर सरकारला मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

हिजबुल्लाहचे नवे नेते नईम कासिम हे याच आठवड्यात म्हणाले होते की, सीरियामध्ये जे होतं आहे त्याला इस्रायल आणि अमेरिकाच जबाबदार आहे.

ते म्हणाले होते की, "इस्रायल आणि अमेरिकेला दहशतवादी गटांची मदत घेऊन सीरियातून बशर अल-असद यांचं सरकार उलथवून टाकायचं आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.