सीरियाचे प्रमुख बशर अल-असद यांच्या पाडावानंतर पश्चिम आशियातील देशांवर काय परिणाम होऊ शकतात?

फोटो स्रोत, Reuters
- Author, ह्युगो बचेगा
- Role, पश्चिम आशिया प्रतिनिधी
साधारणतः एक आठवड्यापूर्वी सीरियातील बशर अल-असद यांच्या सत्तेचा शेवट होणार आहे याची कल्पनाही कुणी करू शकत नव्हतं.
मात्र सीरियातल्या बंडखोर गटांनी अत्यंत आश्चर्यकारकरित्या, सीरियाच्या उत्तर-पश्चिमेकडील इदलिबमध्ये असणाऱ्या त्यांच्या तळावरून, असद राजवटीच्या विरोधात एक मोहीम सुरू केली.
सीरियासाठी हा काळ एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. 2000 साली बशर अल-असद यांचे वडील हाफिज यांचा मृत्यू झाला होता.
हाफिज यांनी तब्बल 29 वर्षे देशावर राज्य केलं होतं. त्यांच्यानंतर बशर यांनीही वडिलांप्रमाणेच अत्यंत कठोर पद्धतीने शासन केलं. त्यांची सीरियावर घट्ट पकड होती.
बशर अल असद यांना अत्यंत दडपशाहीने चालवली जाणारी एक राजकीय व्यवस्था वारशात मिळाली होती. या व्यवस्थेत विरोधात उठणारा एकही आवाज सहन केला जात नव्हता.
बशर सत्तेत आल्यानंतर अनेकांना ते थोडे कमी क्रूर असण्याची आणि मुक्त असण्याची शक्यता वाटत होती. पण अल्पावधीतच ही शक्यता फोल ठरली.


2011 साली बशर अल-असद यांच्या राजवटीविरुद्ध निघालेले शांततापूर्ण मोर्चे अत्यंत हिंसक पद्धतीने दडपण्यात आले. बशर यासाठी नक्कीच लक्षात राहतील. या दडपशाहीमुळेच पुढे गृहयुद्धाला तोंड फुटलं होतं.
सीरियातल्या गृहयुद्धामुळे पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे साठ लाख लोक विस्थापित झाले.
रशिया आणि इराणच्या मदतीने बंडखोरांना चिरडण्यात बशर यांना यश आलं आणि ते सत्तेत कायम राहिले.
रशियाने आपल्या शक्तिशाली हवाई शक्तीचा वापर केला तर इराणने सीरियाला लष्करी सल्लागार पाठवले आणि शेजारच्या लेबनॉनमध्ये त्याचे समर्थन करणाऱ्या हिजबुल्लाह नावाच्या सशस्त्र गटाने त्यांचे सैनिक सीरियामध्ये तैनात केले.
यावेळी मात्र असं काहीही घडलं नाही. पहिल्या बंडाला मोडून काढण्यासाठी मदत केलेल्या मित्रराष्ट्रांनी बशर यांची साथ सोडली.
कारण, हे दोन्ही देश आपापल्या आघाड्यांवर लढत आहेत. इराण जाणीव रशियाच्या मदतीशिवाय बशर यांचं सैन्य बंडखोरांचा सामना करू शकलं नाही, अनेक ठिकाणी या लष्कराला हयात तहरीर अल-शामच्या विरोधात लढण्याची इच्छाही नव्हती असं दिसून आलं.

फोटो स्रोत, Getty Images
मागच्या आठवड्यात सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर असणाऱ्या अलेप्पोवर बंडखोरांनी ताबा मिळवला होता. त्यासाठी त्यांना फारसा विरोधही झाला नाही. त्यानंतर त्यांनी हमा शहर ताब्यात घेतलं, आणि होम्स प्रांतातल्या महत्त्वाच्या प्रदेशांवर नियंत्रण मिळवलं.
सीरियाची राजधानी दमास्कसवर बंडखोरांनी पूर्व आणि दक्षिणेकडूनही चढाई केल्यामुळे दमास्कस एकटं पडलं. आणि काही तासांतच बंडखोरांनी बशर अल-असद यांची राजधानी असलेल्या या शहरावर आणि सत्तेवर नियंत्रण मिळवलं.
सुमारे पाच दशकांपर्यंत सीरियावर राज्य करणाऱ्या असद कुटुंबाच्या पाडावामुळे या प्रदेशातली सत्ता समीकरणं आता बदलणार आहेत असं दिसतंय.
सिरीयात घडलेल्या घटनांमुळे इराणच्या प्रभावाला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. इराण आणि हिजबुल्लाह यांच्यासाठी बशर अल-असद यांच्या नियंत्रणाखाली असणारा सीरिया अत्यंत महत्त्वाचा होता. या सशस्त्र गटाला हत्यारं आणि दारुगोळा पुरवण्यासाठी या संबंधांचा वापर केला जायचा.

फोटो स्रोत, Getty Images
इस्रायलविरुद्ध सुमारे वर्षभर चाललेल्या युद्धामुळे हिजबुल्लाह आधीच कमकुवत झाला आहे. त्यामुळे या संघटनेचं भविष्य सध्या अनिश्चित आहे.
येमेनमधल्या हुथी बंडखोर गटाला देखील इराणचं समर्थन होतं. या गटावर झालेल्या हवाई हल्ल्यांमुळे हुथीचं मोठं नुकसान झालं आहे. हे सर्व बंडखोर गट, इराकमधल्या सशस्त्र संघटना आणि गाझामधील हमासवर झालेल्या हल्ल्यांमुळे इराणची बाजू कमकुवत झाल्याचं दिसतंय. या प्रदेशातील प्रतिकाराची धुरीण म्हणून तेहरान या संघटनांकडे पाहत होतं.
इराणच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आता या नवीन परिस्थितीमध्ये इस्रायलमध्ये जल्लोष साजरा होत असेल. तुर्कीयेच्या आशीर्वादामुळेच या सर्व घटना घडल्याचं अनेकांना वाटत आहे.
मात्र सीरियातल्या काही बंडखोर गटांना मदत करणाऱ्या तुर्कीयेने हयात तहरीर अल-शामला मदत केल्याचं नाकारलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन यांनी काही काळासाठी बशर अल-असद यांच्यावर वाटाघाटी करून घेण्यासाठी दबाव आणला होता. जेणेकरून सीरिया शांत होईल आणि तुर्कीयेमध्ये आलेले सीरियाचे निर्वासित त्यांच्या देशात परतू शकतील.
सध्या तुर्कीयेमध्ये तीस लाखांपेक्षा जास्त सीरियन निर्वासित राहतात. तिथल्या स्थानिक राजकारणात निर्वासितांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र बशर अल-असद यांनी या दबावाला झुगारून लावलं होतं.
त्यामुळे असद यांच्या पराभवामुळे अनेक लोक आनंदित झाले आहेत.
खरा प्रश्न आहे आता सीरियामध्ये पुढे काय होईल? कारण बंडखोर गटांमध्ये प्रभावी असणाऱ्या हयात तहरीर अल-शाम या गटाची मुळं अल-कायदामध्ये आहेत. आणि त्यांचा इतिहास हिंसक राहिलेला आहे.
मागच्या काही वर्षांमध्ये हयात तहरीर अल-शामने 'राष्ट्रवादी संघटना' म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच त्यांनी सलोख्याची आणि तडजोडीची भाषाही वापरली आहे मात्र, अनेकांना या संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत शंका आणि चिंता वाटते.
त्याच वेळी, नाट्यमय बदलांमुळे एक धोकादायक पॉवर व्हॅक्यूम होऊ शकतो आणि शेवटी अराजकता आणि आणखी हिंसाचार होऊ शकतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











