'आता आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो,' नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

सीरियातील एका महिलेने बीबीसीला सांगितले की, असद राजवटीत तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले आणि काही तुरुंगात आहेत.
फोटो कॅप्शन, सीरियातील एका महिलेने बीबीसीला सांगितले की, असद राजवटीत तिच्या कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले आणि काही तुरुंगात आहेत.
    • Author, बारबरा प्लेट-अशर
    • Role, बीबीसी न्यूज
    • Reporting from, दमास्कस

सीरियामध्ये अनेक दिवसांपासून गृहयुद्ध सुरू होतं. 8 डिसेंबर 2024 इस्लामिक बंडखोर गटानं अलेप्पो, हमा आणि होम्स शहरांनंतर राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. त्यानंतर, बंडखोरांनी सीरियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून गेले असून सीरिया आता 'मुक्त' झाला आहे, असा दावा त्यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर बीबीसीनं नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांनी मॉस्कोत आश्रय घेतल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.

आम्ही पोहोचलो तेव्हा जिकडेतिकडे वाहनांचा खच पडला होता. लोकांच्या प्रार्थनेचा आवाज कानावर पडत होता तर कोठे कुणी बंडाचा झेंडा फडकावत होता.

रात्रभर दमास्कस बंडखोरांच्या ताब्यात गेल्याच्या आणि राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या सुरू होत्या. यानंतर लेबनॉनमध्ये राहणारे सीरियाई नागरिक राजधानीजवळील सीमावर्ती शहर मसानाकडे निघू लागले.

आम्ही तेथे एक दिवस थांबून रिपोर्टिंग करण्याचा विचार केला होता. पण, सीरियाई नागरिक तेथून निघाल्याची माहिती मिळताच आम्हीही छोटीशी बॅग भरून दमास्कसला पोहचण्याच्या आशेनं तेथून निघालो.

आमच्या बाजूलाच एक कुरळ्या केसांचा माणूस होता सीमेपलीकडे जाण्यासाठीचे त्याचे प्रयत्न सुरू होते. तो रडत होता.

त्याचं नाव हुसेन होतं, तो राष्ट्राध्यक्ष बशर अल-असदचा समर्थक असल्याचं त्यानी आम्हाला सांगितलं.

"आत काय घडेल काहीच माहीत नाही. बहुतेक ते आम्हाला मारुन टाकतील, ही अराजकता आहे", असं हुसेन म्हणाला.

"जो कोणी सरकार किंवा सैन्यात काम करत होता, त्यांना सुरक्षितरीत्या बाहेर पडता येईल, असं बंडखोरांकडून सांगण्यात आलंय. मात्र, तसं खरंच होईल का? त्यांनी दिलेलं आश्वासन खरं ठरलं नाही, तर आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील," असं हुसेन सांगत होता.

हुसैन आपल्या कुटुंबासह निघाला होता. मात्र, त्याच्याकडे लेबनॉनमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक कागदपत्र नव्हते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

तासाभरानंतर आम्ही सीरियात दाखल झालो. दमास्कसचा रस्ता मोकळा होता. जसंजसं आम्ही राजधानीच्या जवळ पोहचू लागलो तसे आम्हाला आम्हाला माघारी जाणाऱ्या सैन्याची चिन्हं दिसू लागली. त्यांनी लष्करी जीप आणि रणगाडे तसेच सोडून दिले होते. सैनिकांनी काढून फेकलेली गणवेश रस्त्यावर विखुरलेली होती.

रस्त्यांवर वाहतूक सुरू होती, पण दुकानं बंद होती. लोक मध्यवर्ती उमय्याद चौकात जमले होते. असद यांच्या पाच दशकाहून अधिकच्या हुकूमशाहीच्या अनपेक्षित अंतानं आपण भारावून गेल्याचं वडील आणि मुलांनं सांगितलं.

सशस्त्र पुरुष हवेत गोळ्या झाडत होते, उत्सवाचा हा कर्णकर्कश आवाज सतत चालू होता. सतत ऐकू येत होता. आम्हाला एक लहान मुलगा दिसला तो जखमी होता त्याला उचलून नेत होते.

सामान्य नागरिक आपल्या वाहनातून शांततेचं चिन्ह दाखवत फिरत होते. 'आता असद गेला आहे, त्यामुळे येथील परिस्थिती चांगली होईल', असं ते म्हणत होते.

"या क्षणाचे वर्णन केले जाऊ शकत नाही," अशा शब्दांत दमास्कसमधील एका व्यक्तीने आपली भावना व्यक्त केली
फोटो कॅप्शन, "या क्षणाचे वर्णन केले जाऊ शकत नाही," अशा शब्दांत दमास्कसमधील एका व्यक्तीने आपली भावना व्यक्त केली

एकाबाजूला एक वृद्ध महिला आनंद साजरा करत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. "धन्यवाद, धन्यवाद, हुकूमशहा पडला. हुकूमशहा पडला!" म्हणत ती जणू प्रार्थना करत होती.

असदच्या राजवटीत तिच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला होता, तर काही तुरुंगात डांबले गेल्याचं तिनं सागितंल.

मी चार लहान मुलांसोबत असलेल्या एका जोडप्याजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

"आम्ही खूप आनंदी आहोत, या आनंदाचं वर्णन शब्दात करता येणार नाही. आम्ही आमच्या आयुष्याची कित्येक वर्षं हुकूमशाहीत काढली. 2014 साली आम्ही तुरुंगात होतो आणि आता देवाच्या कृपेनं बाहेर आलो आहोत. आमची माणसं, आमच्या लढवय्यांमुळं आम्ही जिंकलो, आम्ही महान सीरियाची उभारणी करणार आहोत," असं तो म्हणाला.

"आमच्या बंधू-भावांना आवाहन करतो की ज्यांना देश सोडून जावं लागलं होतं, त्यांनी परत यावे. आम्ही त्यांचं खुल्या मनानं तुमचं स्वागत करू," असं तो म्हणाला.

दमास्कसवर ताबा मिळवल्यानंतर बंडखोरांनी असा आनंद साजरा केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दमास्कसवर ताबा मिळवल्यानंतर बंडखोरांनी असा आनंद साजरा केला.

दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद हे अज्ञातस्थळी पळून गेल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्यांनी मॉस्कोमध्ये आश्रय घेतल्याची माहिती रशियन सूत्रांच्या हवाल्यातून मिळाली.

आम्ही त्यांच्या दमास्कसच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथे कोणतीही मौल्यवान किंवा उपयोगी वस्तू शिल्लक नव्हती.

आम्ही पाहिलं की लोक तेथून फर्निचर बाहेर नेत होते, आणि त्यांना थांबवणारं कोणीही नव्हता. बंडखोरांनी स्वातंत्र्य तर आणलं, पण येथे सुरक्षितता दिसून येत नाहीये.

लुटारूंनी जवळपासच्या इतर इमारतींमध्येही घुसखोरी केली होती - प्रभारी सरकार नसतानाही या बद्दलची चिंता वाढत होती.

दमास्कसच्या रस्त्यांवर गाड्यांमध्ये आनंद साजरा करतांना नागरिक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दमास्कसच्या रस्त्यांवर गाड्यांमध्ये आनंद साजरा करतांना नागरिक
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"परिवर्तन हवंच पण ते योग्य मार्गानं व्हायला हवं," असं 36 वर्षीय अल दादौच म्हणाले. ते आपल्या तीन मुलांसह शेजाऱ्यांबरोबर बाहेर उभे होते. "तो महत्त्वाचं म्हणजे तो नुकताच निघून गेलाय."

मी विचारले – बशर अल-असद का?

"होय! पाहा, मला अजूनही त्याचे नाव घेण्याची भीती वाटतेय", अल दादौच म्हणाले. "पण तो फक्त निघून गेला, हे स्वार्थीपणाचं लक्षण आहे. जोपर्यंत नवीन अध्यक्ष सत्ता घेत नाही, तोपर्यंत आमच्या राष्ट्राध्यक्षांनी किमान सैन्य किंवा पोलिसांना त्या भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करायला हव्या होत्या."

"दोन दिवसांपूर्वी मी त्यांना स्वार्थी असं म्हणू शकलो नसतो. तसं करणं म्हणजे स्वत:वर संकट ओढावून घेण्यासारखं होतं. पण आता बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत," असंही ते म्हणाले.

"आता तुम्ही खरंच मोकळा श्वास घेऊ शकता, सहज फिरू शकता. तुम्ही आपले मत व्यक्त करू शकता. तुम्ही निर्भयपणे तुम्हाला त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टींबद्दल व्यक्त होऊ शकता. कारण, आता परिस्थिती बदलली आहे. मला आशा आहे की हा चांगला बदल आहे. पण आम्ही 13 वर्ष (गृह युद्धाच्या) खोट्या आशेत जगलो."

सीरियात झालेल्या बदलानंतर हा देश आनंद आणि भय यांच्यात अडकला असून शांततेची आशेसह अराजकतेबद्दल चिंतित आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.