BBC EXCLUSIVE: 2022 मध्ये 13 हजार गुरं रेल्वेला धडकली, RTI मधून ही माहिती आली समोर

    • Author, अर्जुन परमार, अनंत झणाणे आणि व्हिज्युअल जर्नलिझ्म,
    • Role, बीबीसी न्यूज

वंदे भारत या गाडीने आता रेल्वेच्या इतर वेगवान गाड्यांच्या मांदियाळीत मानाचं स्थान पटकावलं आहे. उशिराने चालणाऱ्या गाड्या आणि गाड्यांची दयनीय स्थिती पाहता भारताच्या रेल्वे क्षेत्रात हा एक सकारात्मक बदल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा या रेल्वेचं उद्घाटन केलं असून त्यांना भारतात होणाऱ्या वेगवान बदलाचं प्रतीक असल्याचं म्हटलं होतं.

मात्र काही तज्ज्ञांच्या मते या उपक्रमात सगळ्यांत मोठा अडथळा आहे, तो म्हणजे या रेल्वेखाली येणारी गुरं आणि त्यामुळे होणारा उशीर.

30 सप्टेंबर 2022 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर ते मुंबईदरम्यान वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन केलं.

6 ऑक्टोबर 2022 ला गाडी नेहमीप्रमाणे मुंबईहून गांधीनगरच्या दिशेने निघालेली असताना वटवा आणि मणीनगर स्टेशनदरम्यान काही म्हशी या गाडीला येऊन धडकल्या.

दुसऱ्याच दिवशी 7 ऑक्टोबरला वंदे भारत गाडीला एका गाय येऊन धडकली.

29 ऑक्टोबरला घडलेल्या आणखी एका घटनेत वंदे भारतला आणखी एक जनावर येऊन धडकलं. त्यामुळे गाडीला 15 मिनिटांचा उशीर झाला.

बीबीसीने सरकारला विचारणा केली की किती वेळा एखाद्या जनावराने किंवा प्राण्याने गाडीला धडक दिली आणि सुधारणेसाठी किती खर्च झाला?

सरकारने दिलेल्या उत्तरात, फक्त 2022 मध्येच अशा 13,160 घटना घडल्याचं सरकारने सांगितलं. 2019 पेक्षा या घटनांमध्ये ही वाढ 24 टक्के आहे. 2019 मध्ये 10609 वेळा गुरं ट्रेन ला येऊन धडकली होती.

रेल्वेच्या नऊ विभागांनी ही माहिती बीबीसीला दिली.

त्यानुसार, गेल्या चार वर्षांत जनावरांना रेल्वेची धडक बसल्याच्या 49 हजार घटना समोर आल्या.

त्यामध्ये, उत्तर मध्य रेल्वे विभागात 2022 मध्ये सर्वाधिक 4500 वेळा अशा घटना घडल्याचं या विभागाने सांगितलं.

रेल्वेचं नुकसान

या घटना टाळण्यासाठी काय पावलं उचलली हे सांगण्यासाठी डिसेंबर 2021 मध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एक सविस्तर उत्तर दिलं होतं.

त्यात जनावरांच्या नेहमीच्या रस्त्यांवर जाळ्या उभारणं, रेल्वे रुळांवरचा कचरा उचलणं आणि रुळांवर हिरवं कापड ठेवणं, मोठी शहरं येतानाचे मार्ग सुधारणं अशा अनेक उपायांचा समावेश आहे.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात रेल्वे मंत्रालयाला कोणतंही आर्थिक नुकसान झालं नाही असं सांगितलं.

मात्र भारतीय रेल्वेने बीबीसीला दिलेल्या उत्तरात दक्षिण मध्ये रेल्वे आणि उत्तर रेल्वेने गाड्यांच्या देखभालीसाठी आणि डागडुजीसाठी 2022 मध्ये 1.3 कोटी रुपये खर्च केल्याचं सांगितलं. उत्तर रेल्वेने 1.28 कोटी रुपय खर्च केले तर दक्षिण मध्ये रेल्वेने 2 लाख रुपये खर्च केले.

2019 मध्ये दक्षिण मघ्ये रेल्वेने 2.4 लाख रुपये खर्च केले.

पश्चिम रेल्वेने ट्विट केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, अशा घटनांना इंग्रजीत Cattle run over असं म्हणतात. याचा रेल्वेच्या कामकाजावर विपरित परिणाम होतो आणि अपघातांची शक्यता वाढते.

“अशा धडका बसल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येते. तसंच रेल्वेच्या मालमत्तेचं नुकसान होतं आणि वाहतुकीस अडथळा येतो.” असंही या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आलं आहे.

रेल्वे कायदा 1989 नुसार जनावरांच्या मालकांना या गुन्ह्यासाठी शिक्षा होते. “रेल्वेच्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारी कोणतीही कृती” असं या गुन्ह्याचं स्वरुप आहे.

जर गुन्हा सिद्ध झाला तर एक वर्षाचा तुरुंगवास होतो आणि दंडही होऊ शकतो. त्यांच्यावर घुसखोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिन्याचा तुरुंगवास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा होते.”

पश्चिम रेल्वेने या 2019-22 या काळात एकूण 191 खटले दाखल केले आहेत आणि 9100 रुपये दंड ठोठावला आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळाली आहे.

जनावरांची धडक थांबवण्यासाठी कुंपण उभारता येतं का?

पश्चिम रेल्वेने केलेल्या ट्विटनुसार, 23 जानेवारी 2023 रोजी या विभागात रेल्वेमार्गाभोवती धातूचे कुंपण लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

मुंबई-अहमदाबाद या 622 किलोमीटर मार्गावर जनावरे रेल्वेसमोर येण्याच्या घटना टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठीचे टेंडरही देण्यात आले असून काम वेगाने सुरू आहे.

वंदे भारत रेल्वेच्या समोरील निमुळत्या भागावर बहुतांश जनावरे धडकली आहे. Fibre Reinforced Plastic चा वापर करूनसुद्धा या भागाचं नुकसान होतं. हे कव्हर रेल्वेकडून पुन्हा बसवण्यात येतं.

मात्र अशा घटनांमुळे गाडीला विलंब होतो. लागतो. रेल्वे रुळाला कुंपण घालणं हाच यावरचा एकमेव उपाय आहे असं समजलं जातं.

अशा अडचणी का येतात, यावर भाष्य करताना रेल्वेचे माजी उच्चपदस्थ अधिकारी राकेश चोप्रा म्हणाले, “याआधी ट्रेन इतक्या वेगाने धावत नव्हत्या. अशा घटनांमुळे ट्रेन रुळावरून घसरण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू शकतात. यामुळे प्रवाशांचं आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.”

चोप्रा पुढे म्हणतात, "केवळ असं कुंपण लावणं हा या समस्येवरील उपाय नाही, याची कल्पना रेल्वेलासुद्धा आहे. अशा घटना थांबवायच्या असतील तर काहीतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे."

2022 मध्ये वंदे भारतच्या घटना झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने आजूबाजूच्या गावातल्या प्रमुखांना नोटिसा पाठवल्या.

अरुणेंद्र कुमार यांनी रेल्वे प्रशासनात बराच काळ काम केलं आहे. त्यांच्या मते, या समस्येवर उपाय शोधण्यासाठी रेल्वे ट्रॅकजवळ राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ते म्हणतात, “आपण काही जागा शोधू शकतो आणि असे अपघात टाळण्यासाठी गायी म्हशी कुठे धडकतात ते ओळखून एक झोन तयार करता येईल. कुंपण घालणं किंवा रेल्वे लाईनची उंची वाढवणं हा एक तोडगा आहे मात्र तो अतिशय महागडा आहे.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)