Electric bike car incentive : ई-बाईक खरेदीवर सवलत, खरेदीची हीच योग्य वेळ?

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या. ई-कार किंवा ई-बाईक हे वाहन क्षेत्रातलं आपलं भवितव्य आहे असं सगळेच मानतात.

केंद्र सरकारनेही वेळोवेळी ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याविषयी सुतोवाच केलंय. त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्रात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी ई-पॉलिसी आणली आहे.

2025 पर्यंत नवीन वाहनांच्या खरेदीत 10% वाहनं ही इलेक्ट्रिक असावीत असं उद्दिष्ट या धोरणात आहे. आपला देश आणि महाराष्ट्र ई-वाहनांच्या क्रांतीसाठी तयार आहे का? ई-वाहनांचं भवितव्य देशात काय आहे?

काय आहे राज्यसरकारचं ई-वाहन धोरण?

दोन वर्षांपूर्वी किया मोटार्सने भारतात आपली पहिली एसयुव्ही लाँच केली तेव्हा त्या घटनेची भरपूर चर्चा झाली. कारण, कियाची तेव्हाची एसयुव्ही पेट्रोल-डिझेलवर चालणारी असली तरी किया ही कंपनी जगभरात इलेक्ट्रिक कारसाठी ओळखली जाते. आणि अशा कंपनीचं भारतात येणं आपल्याला हेच सांगतं ती कंपनीबरोबरच ई-कारचा जमाना देशात येतोय.

मागच्या दोन्ही अर्थसंकल्पात केंद्रसरकारने ई-वाहनांचं महत्त्व अधोरेखित केलंय. त्याला अनुसुरून देशात आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि गुजरात सारख्या राज्यांनीही आक्रमक ई-वाहन धोरणं आणली.

महाराष्ट्रातही पहिलं ई-वाहन विषयक धोरण 2018मध्येच आलंय. पण, आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यात आणखी सुधारणा केलीय. येत्या एका वर्षांत तुम्ही ई-कार किंवा ई-बाईक घेणार असाल तर तुम्हाला मिळणार आहेत भरपूर सवलती. कशा ते बघा...

ई-वाहनांच्या खरेदीवर भरपूर आर्थिक सवलती

  • पहिल्या 1,00,000 ई-बाईक खरेदी करणाऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे.
  • 31 डिसेंबर 2021 पूर्वी तुम्ही ही बाईक खरेदी केलीत तर अर्ली बर्ड प्राईझ म्हणून तुम्हाला अतिरिक्त 15,000रु सवलत मिळेल.
  • यासाठी बॅटरी क्षमता 3 किलोवॅट पर्यंतची असली पाहिजे.
  • या काळात घेतलेल्या बाईक मोडीत काढायच्या झाल्या तर त्यावरही 7000 रुपयांची सवलत मिळणार आहे.
  • ई-कार खरेदी करणाऱ्यांसाठी पण, दर किलोवॅट बॅटरीला 5000 रुपयांची सवलत आहे. आणि ही सवलत 30 किलोवॅट बॅटरीपर्यंत मिळणार असल्यामुळे ई-कार खरेदी करणाऱ्याला एकूण 1,50,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकेल.
  • इथंही अर्ली बर्ड सवलतीची सोय आहे. 31 डिसेंबर 2021 आधी नोंदणी केलीत तर तुम्हाला एकूण 2,50,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकेल.

पण, ई-वाहनांसाठी फक्त कार खरेदी करणं पुरेसं नाहीए. बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन आणि कारच्या तसंच बॅटरीच्या देखभालीसाठी सेवा केंद्र असणंही आवश्यक आहे. तीच नसतील तर इ-कार आणि इ-बाईक घेऊन काय उपयोग?

ई-बाईक, ई-कार घेणं व्यवहार्य आहे का?

नवं इलेक्ट्रिक वाहन धोरण असंही सांगतं की, येत्या चार वर्षांत सात महत्त्वाच्या शहरांमध्ये मिळून 2,500 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यातली 1,500 मुंबईत, 500 पुण्यात, नाशिक आणि नागपूरमध्ये 150, औरंगाबादमध्ये 75, अमरावतीमध्ये 30 आणि सोलापूरमध्ये 20 चार्जिंग स्टेशन असतील.

सोसायट्यांना गृहप्रकल्प उभारताना ई-वाहनांच्या पार्किंगची सोय करून देणं बंधनकारक असेल. कारण, अशा पार्किंगमध्येही चार्जिंग पॉइंट देता येतो. याशिवाय कॉर्पोरेट इमारती आणि सरकारी कार्यालयांमध्येही अशा सोयी करण्यात येणार आहेत.

इतकंच नाही तर या कारसाठी लागणाऱ्या बॅटऱ्या राज्यांतच बनाव्यात यासाठी कंपन्यांनाही सवलती देण्यात येणार आहेत.

आणि हे सगळं करून 2025 पर्यंत ई-वाहनांच्या नवीन नोंदणीचं प्रमाण एकूण नोंदणीच्या किमान 10% असावं असं उद्दिष्टं महाराष्ट्राने ठेवलं आहे.

इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांच्या सोसायटीचे महासंचालक सोहिंदर गिल यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

"नवं धोरण इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. केंद्र सरकारने यापूर्वी दाखवलेली दिशा आणि लोकांमध्ये त्याविषयीची जागृती करण्याच्या दृष्टीने बरीच स्पष्टता या धोरणात आहे. लोकांना ई-वाहन खरेदी करण्यासाठी त्यामुळे प्रोत्साहनच मिळेल," असं ते सांगतात.

ई-वाहन किती सुरक्षित?

इलेक्ट्रिक वाहनांसाठी सध्या देशातच नाही तर परदेशातही कुतुहलाचं वातावरण आहे. पण, अलीकडेच मुंबईत एक ई-बाईक जळण्याचं प्रकरण घडलं होतं. ई-बाईक्स सुरक्षित आहेत ना? तुम्ही आम्ही इतक्यातच त्या खरेदी कराव्यात का?

ऑटो क्षेत्रात बराच काळ पत्रकारिता करणारे अमेय नाईक यांच्या मते सरकारी धोरणांमुळे ई-वाहनांचे दर कमी होत आहेत ही सगळ्यांत सकारात्मक गोष्ट आहे.

"ई-बाईक घेण्याची ही योग्य वेळ आहे. अशा बाईक घरच्या घरीही चार्ज होऊ शकतात. आणि कमी अंतरासाठी त्या वापरता येऊ शकतात. पण, ई-कार घ्यायची असेल तर अजूनही दर सर्वसाधारणपणे परवडणारे नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधाही पूर्णपणे तयार नाहीत," अमेय नाईक यांनी सांगितलं.

"आदित्य ठाकरेंना हवी आहे तशी इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती घडवून आणायची असेल तर सार्वजनिक वाहतूक म्हणजे बस, टॅक्सी आणि रिक्षांमध्येही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर सुरू झाला पाहिजे. चीन आणि इतर देशात तसे प्रयत्नही सुरू झालेत. भारतात सार्वजनिक वाहतूक ई-वाहनांनी सुरू होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायची गरज आहे," असं अमेय नाईक यांना वाटतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)