You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वंदे भारत एक्स्प्रेससाठी 23 गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत दोन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन्सना हिरवा झेंडा दाखवला. मुंबई- सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत.
पण या 2 वंदे भारत एक्स्प्रेससाठी मध्य रेल्वेला 16 एक्स्प्रेस ट्रेन्सच्या वेळेत बदल करावा लागणार आहे. एक्स्प्रेस ट्रेन्ससह 6 लोकल आणि एका डेमू सेवेच्या वेळेत बदल होणार आहे.
म्हणजे, दोन वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असली, तरी इतर रेल्वेंमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपलं नियोजन काहीसं बदलावं लागणार आहे.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला 455 किलोमीटरचा प्रवास करण्यास 6 तास 30 मिनिटांचा वेळ लागणार आहे. या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसला या प्रवासासाठी 7 तास 55 मिनिटे इतका वेळ लागायचा. म्हणजे, प्रवाशांचा सुमारे दीड तास वाचणार आहे.
तर, मुंबई-शिर्डी हा एरवी सहा तासांमध्ये होणारा प्रवास वंदे एक्सप्रेसमधून 5 तास 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.
या दोन्ही रेल्वे मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आल्या. मात्र, स्वतंत्र ट्रॅकच्या अनुपलब्धतेमुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होणार आहे.
त्यानुसार, रेल्वे प्रशासनाने एक जाहिरात देऊन इतर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकातील बदलाची माहिती सर्व प्रवाशांना दिली आहे.
कोणकोणत्या रेल्वेंच्या वेळापत्रकात बदल?
सोलापूर-मुंबई मार्गावरची प्रसिद्ध अशा सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या वेळेत बदल होणार आहे.
11 फेब्रुवारीपासून म्हणजे शनिवारपासून सिद्धेश्वर एक्स्प्रेस सोलापूरहून रात्री 10.40 ऐवजी 10.30 वाजता सुटणार आहे. सोलापूरहून रात्री निघून सकाळी मुंबईत येणारी अतिशय सोयीची अशी ही ट्रेन आता 10 मिनिटं लवकर सुटणार आहे.
नवी दिल्ली- बेंगळुरू एक्स्प्रेस सोलापुरातून बंगळुरूच्या दिशेने 10.40ऐवजी 10.55ला रवाना होईल. 15 मिनिटांनंतर आता ही ट्रेन सोलापुरातून निघेल. 10 तारखेपासून हा बदल लागू झाला आहे.
नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12114) या ट्रेनच्या दौंड स्थानकातील वेळेत बदल होणार आहे. ही ट्रेन पूर्वी सकाळी 7.23ला दौंड इथे येऊन 7.25 ला रवाना व्हायची. नव्या वेळापत्रकानुसार ही ट्रेन दौंडला 10 मिनिटांनंतर म्हणजेच 7.33ला येईल आणि 7.35ला रवाना होईल. ही ट्रेन पुण्याला सकाळी 9.05 ऐवजी आता अर्ध्या तासानंतर म्हणजे 9.30ला पोहोचणार आहे.
नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12136) ही ट्रेन दौंडला 7.23 ऐवजी 7.33ला येईल आणि 7.25 ऐवजी 7.35ला रवाना होईल. ही ट्रेन पुण्याला 9.05 ऐवजी 9.30ला पोहोचेल.
बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस दौंडला 7.33ला पोहोचून 7.35ला रवाना होईल. ही ट्रेन पूर्वीच्या वेळापत्रकात 7.23ला दौंडला येत असे आणि 7.25ला पुण्यासाठी रवाना होत असे. ही ट्रेनही पुण्याला 9.05ऐवजी 9.30ला पोहोचणार आहे.
हावडा-पुणे दुरंतो एक्स्प्रेस पुण्याला 9.40ऐवजी 9.45ला पोहोचणार आहे.
जसीडीह-पुणे एक्स्प्रेस ही ट्रेनही पुण्याला 9.40ऐवजी 9.45ला पोहोचणार आहे.
जम्मू तावी-पुणे एक्स्प्रेस आता पुण्याला 3.55 ऐवजी 4.00वाजता येणार आहे.
इंदूर-दौंड एक्स्प्रेस आता दौंडला 10.20 ऐवजी 10.30 वाजता पोहोचणार आहे.
हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस ही ट्रेन वाडी स्थानकात रात्री 2.00 वाजता येईल आणि 2.05 वाजता रवाना होईल. ही ट्रेन पुण्याला 8.55 ऐवजी 9.00 वाजता पोहोचणार आहे.
मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस ही सीएसटी इथून 6.15 ऐवजी आता 5.30लाच रवाना होणार आहे. 11 फेब्रुवारी अर्थात शनिवारपासून हा बदल लागू होईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रयागराज एक्स्प्रेस नाशिकरोड इथे आता 9.10 ला पोहोचेल आणि 9.15ला रवाना होईल. 12 फेब्रुवारी अर्थात रविवारपासून हा बदल लागू होईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या कँट एक्स्प्रेस नाशिकला 9.10ला पोहोचेल आणि 9.15ला रवाना होईल. 11 तारखेपासून हा बदल अमलात येईल.
वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही ट्रेन एलटीटी इथे 10.55 ऐवजी 11.10 वाजता पोहोचेल.
हावडा-मुंबई एक्स्प्रेस ही एलटीटी स्थानकात रात्री 11.00 ऐवजी 11.45 वाजता पोहोचेल. हा बदल 10 फेब्रुवारीपासून लागू झाला आहे.
मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेस ट्रेन सीएसटी इथून 10.45 ऐवजी 10.40 वाजता सुटणार आहे. 14 फेब्रुवारी अर्थात मंगळवारपासून हा बदल लागू होणार आहे.
पुणे-लोणावळा लोकलच्या वेळापत्रकात बदल
एक्स्प्रेस ट्रेनच्या बरोबरीने पुण्याहून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल ट्रेन्सच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.
पुणे तळेगाव लोकल तळेगावला 9.47 ऐवजी 9.43ला पोहोचणार आहे.
पुणे लोणावळा लोकल ही पुण्याहून 9.55 ऐवजी 9.57ला सुटेल.
पुणे-बारामती लोकल दौंडहून 8.20 ऐवजी 8.25ला सुटेल.
लोणावळा-पुणे लोकल शिवाजी नगर येथून 7.38 ऐवजी 7.40ला सुटेल.
पुणे लोणावळा लोकल 8.05 वाजता शिवाजीनगर पर्यंतच चालवली जाईल.
पुणे लोणावळा लोकल पुण्याहून 8.35 ऐवजी 8.37ला सुटेल आणि लोणावळ्याला 9.50 ऐवजी 9.57ला पोहोचेल.
डेमू सेवेच्या वेळेतही बदल
पुणे सोलापूर डेमूच्या सेवेतही बदल करण्यात आला आहे.
पुणे सोलापूर डेमू गाडी पुण्याहून 8.30 ऐवजी आता पाच मिनिटं लवकर 8.25 सुटणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)