नरेंद्र मोदी: बोहरा समुदायाच्या कार्यक्रमाला जाण्यानं भाजपाला मुस्लिम मतं मिळतील का?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

मुंबई महानगरपालिकेचे उपक्रम आणि नव्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाला 19 जानेवारीला येऊन गेल्यावर महिन्याभरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबईत येत आहेत. शुक्रवारी 10 फेब्रुवारीला पंतप्रधान मुंबईत येत आहेत.

मुंबईहून शिर्डी आणि सोलापूरला जाणाऱ्या दोन 'वंदे भारत' एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा कंदील दाखवून त्यांची सुरुवात मोदींच्या हस्ते होणं अपेक्षित आहे. पण त्याहीपेक्षा त्यांच्या शहरातल्या दुसऱ्या कार्यक्रमाची चर्चा अधिक आहे. तो कार्यक्रम मुस्लिमांतील दाऊदी बोहरा समुदायाचा आहे.

बोहरा मुस्लिम समुदायाच्या अंधेरी पूर्व मधल्या मरोळ इथल्या 'अरेबिक अकादमी'च्या उद्घाटनप्रसंगी नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्यावेळेस मोदी या समुदायाचे धर्मगुरू आणि प्रमुख असणाऱ्या सय्यैदाना मुफद्दल सैफुद्दिन यांच्यासोबत मंचावर असतील.

2018 मध्ये मोदींनी मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये जाऊनही बोहरा समुदायाच्या एका कार्यक्रमाला त्यांच्यासोबत हजेरी लावली होती. तेव्हा मध्य प्रदेशच्या निवडणुका जवळ होत्या. आताही मोदींच्या या मुंबई कार्यक्रमाचा संबंध मुंबईसह राज्यात नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांशी आहे का अशी चर्चा सुरू आहे.

भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या हिंदुत्ववादी राजकारणाचं एक अंग अथवा परिणाम हा मुस्लिमविरोध असल्याची टीका कायम त्यांचे विरोधक करतात. पण गेल्या काही काळात भाजपानं ठरवून मुस्लिम समाजाअंतर्गत काही समुदायांशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आहे. मुस्लिमांतले आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या पासमंदा समुदायाच्या जवळ जाण्याचे प्रयत्न पहायला मिळाले आहेत.

दाऊदी बोहरा हा मुस्लिमांतली आर्थिकदृष्ट्या सधन असलेला समुदाय हाही भाजपाला त्यांच्या राजकारणाशी सुसंगत वाटतो. बोहरा समाजाची मुस्लिमांमधली संख्या ही साधारण 10 टक्क्यांच्या आसपास मानली जाते आणि तो विशेषत्वानं गुजरात आणि महाराष्ट्र्रात वास्तव्याला आहे.

गुजरातमधले बोहरा मुस्लिम हे भाजपासोबत असल्याचा दावा कायम हा पक्षाकडून पूर्वीही करण्यात आला आहे.

पण आता मुंबईतला त्यांचा प्रभाव पाहता आणि येऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पाहता पंतप्रधान मोदींनी बोहरा समाजाच्या कार्यक्रमाला येणं राजकीयदृष्ट्या महत्वाचं मानलं जातं आहे. मुंबई महानगरपालिकेत मुस्लिम मत ही अनेक वॉर्डांमध्ये निर्णायक ठरू शकतात.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यांच्या रणनीतिमध्ये या मुस्लिम मतांना यंदा महत्त्व दिलं आहे आणि त्याचे परिणामही दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींचं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत महत्त्वाचं ठरत आहे.

मुंबई महापालिका आणि मुस्लिम मतं

मुंबईत मुस्लिम हा सर्वाधिक लोकसंख्येचा दुसरा समाज आहे आणि पन्नासहून अधिक वॉर्ड्सवर या समाजाचा थेट प्रभाव असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या गणितात त्यांचं महत्वं आहे कारण वॉर्ड्सची मतदारसंख्या ही विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांच्या तुलनेत कमी असते. थोडीथोडकी मतंही गणित बदलू शकतात.

2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची मुस्लिम लोकसंख्या ही 20.65 टक्के इतकी आहे. त्यावरुन गणितातलं महत्व समजावं. पूर्वी कॉंग्रेसकडे जाणारा हा समाज नंतर महापालिकेच्या गणितात समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, एआयएमआयएम यांच्याकडेही गेलेला दिसतो.

शिवसेना हा कायम कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून प्रतिमा असलेला पक्ष, पण 2017 च्या गेल्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत जे एकूण 31 मुस्लिम नगरसेवक निवडून आले त्यातले शिवसेनेचेही दोन नगरसेवक होते. सर्वाधिक मुस्लिम नगरसेवक कॉंग्रेसचे होते.

पण यंदाच्या निवडणुकीत अनेक गणितं बदललेली आहेत. शिवसेनेनं आपली हिंदुत्ववादी भूमिका, त्यांच्या म्हणण्यानुसार, अधिक व्यापक केल्यानंतर आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत 'महाविकास आघाडी' केल्यावर मुंबईतल्या मुस्लिम मतदारांकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणाचाही उल्लेख केला. आता प्रकाश आंबेडकरांशी युती केल्यावर सेनेला मुस्लिम आणि दलित मतांचा फायदा होऊ शकतो असं म्हटलं जातं आहे.

या पार्श्वभूमीवर यंदा मुंबई महापालिका जिंकायचीच असा चंग बांधलेल्या भाजपालाही आपल्या राजकीय गणितांमध्ये या मतांचा विचार करावा लागतो आहे. जरी आक्रमक हिंदुत्ववादी राजकारण भाजप देशात करत असला तरीही गेल्या काही काळात मुस्लिम समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतो आहे.

तसाच तो आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवून बोहरा मुस्लिम समुदायाला आकर्षित करतांना होतो आहे का आता प्रश्न आहे आणि मोदीचं मुंबईतल्या 'अरेबिक अकादमी'च्या उद्घाटना येणं हा त्यातलाच भाग आहे का?

"मोठे नेते जी कोणती गोष्ट करतात त्यामागे राजकारण नक्की असतं," राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात. भाजपाच्या राजकारणाचा त्यांचा जवळून अभ्यास आहे.

"दाऊदी बोहरा समाजाची मुसलमानांमध्ये साधारण 10 टक्के मतं आहेत. देशभरातला मुसलमान जो 2014 मध्ये नरेंद्र मोदींबाबत काहीसा मवाळ होता, तो आता अचानकपणे कुठेतरी ध्रुवीकरण करायला लागला आहे.

'मोदी नको' असा या समाजाचा एक अलिखित नियम झाला आहे. मुंबईची जी अतिमहत्त्वाची निवडणूक आहे त्यात मुस्लिम भाजपाला रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ असलेल्या शिवसेनेकडे जाऊ शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे बॅलन्स करायला की, आम्ही (भाजप) मुसलमानांचे विरोधक नाही, असा संदेश देण्यासाठी मोदी या मुंबईतल्या कार्यक्रमात जात असावेत," असं नानिवडेकर म्हणतात.

मोदी आणि भाजपाचा दाऊदी बोहरी समाजाशी संबंध

जरी राजकारणाची चर्चा मोदींच्या या कार्यक्रमाला येण्यामुळं होतं असली तरीही भाजपाच्या मते त्यांचे या मुस्लिम समाजातील वर्गाशी असलेले संबंध जुने आहेत आणि ते अगदी गुजरातपासून आहेत.

गुजरातमध्ये, विशेषत: दक्षिण गुजरातमध्ये, बोहरी समाज संख्येनं मोठा आहे. त्यामुळं मोदींचं येणं हे काही ठरवलेलं राजकारण नाही असं भाजपाचं म्हणणं आहे.

"नरेंद्र मोदींचे या दाऊदी बोहरा समुदायाशी जुने संबंध आहेत," असं महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी म्हणतात.

"2012 मध्ये सूरतमध्ये या बोहरा समाजाचं मोठं जागतिक संमेलन होतं. तेव्हा मला तिथं जाण्याची संधी मिळाली होती. तिथं सय्यैदाना सैफुद्दिन यांची भेट झाली. आम्हाला त्यांनी विशेष अतिथी म्हटलं आणि स्टेजवरुन सांगितलं की यांचे आपल्याशी जुने संबंध आहेत आणि आपण यांना सगळ्या पद्धतीचं सहकार्य करायचं आहे," भंडारी सांगतात.

मोदी त्या कार्यक्रमाला गेले नाहीत कारण आचारसंहिता होती. पण त्यांचे संबंध हे जुने आहेत. ते दोघांनीही जपले आहेत," माधव भांडारी 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणाले.

भंडारी यांच्या मते नरेंद्र मोदींच्या बोहरी समाजाच्या या कार्यक्रमाला जाण्याचं आणि महापालिका निवडणुकांचं कोणतंही ठरवलेलं टायमिंग नाही.

"हा मुंबईतला जो कार्यक्रम आहे तो साधारण आठ महिन्यांपूर्वी ठरला आहे. तेव्हा निवडणुकीची काहीही चर्चा नव्हती. त्यामुळे आता त्याचा निवडणुकीशी संबंध म्हणजे केवळ योगायोग आहे आणि तोही केवळ त्या झाल्या नाहीत म्हणून आहे. मोदी त्या कार्यक्रमाला येणारच होते. जर त्यातून काही राजकीय फायदा होणार असेल तर होईल. आम्ही त्याला कशाला नाही म्हणू? पण कार्यक्रमाचा हेतू तो नाही," भांडारी म्हणाले.

पण मृणालिनी नानिवडेकर म्हणतात की येऊ घातलेल्या निवडणुका पाहता भाजप आणि इतर पक्षांनीही असं हे 'आऊटरीच' कार्यक्रम सुरू केले आहेत.

"या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भेंडीबाजार इथं बोहरा मुस्लिमांच्या एका कार्यक्रमाला हजर होते. त्याला कॉंग्रेसचे अमिन पटेलही हजर होते. यातून समजतं की निवडणुकीच्या निमित्तानं या समुदायांशी 'आऊटरीच' कसा होतो," नानिवडेकर म्हणतात.

पण त्यांच्या मते बोहरा समाज हा कायम एका पक्षाच्या जवळ गेला आहे वा अनुकूल आहे असं म्हणता येणार नाही.

"दाऊदी बोहरा हा प्रगत समाज आहे. अशिक्षित मुस्लिमांपेक्षा या समाजाची स्थिती वेगळी आहे. ते नव्या कल्पना, विषय यांच्यासाठी खुले असतात. याच समुदायानं जेव्हा 2005 मध्ये मुंबईत 'सैफी' हॉस्पिटल सुरू केलं होतं तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग उद्घाटनाला आले होते.

फार पूर्वी सुरतला त्यांचा एक मोठा कार्यक्रम झाला होता तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुही तिथं गेले होते. त्यामुळे हा मुस्लिम वर्ग काही भाजप अनुकूल आहे असं नाही. पण पुढारलेला, श्रीमंत असा समाज असल्यानं तिथं जाणं महत्त्वाचं आहे," नानिवडेकर म्हणतात.

पण एक नक्की की या बोहरा समाजाचा मुंबईवर प्रभाव आहे आणि तो आर्थिक, राजकीय क्षेत्रांमध्ये यापूर्वीही पहायला मिळाला आहे. त्यामुळे या समाजाचा आणि त्यांचा मुंबईशी असलेल्या संबंधांचा इतिहास यानिमित्तानं समजून घेणं आवश्यक ठरेल.

बोहरा समाजाचा मुंबईशी संबंध कसा आला?

बोहरा हा गुजराती शब्द 'वहौराऊ' म्हणजेच व्यापार याचा अपभ्रंश आहे. ही मंडळी अकराव्या शतकात उत्तर इजिप्तमधून धर्मप्रचारकांच्या माध्यमातून भारतात आले.

सैय्यदानांच्या मृत्यूनंतर त्यांचे वंशज दाऊद बिन कुतुब शाह आणि सुलेमान शाह यांच्यात सैय्यदानांची पदवी आणि तख्त यावरून वाद झाला. ज्यावरून दोन मतं कायम झाली.

आणि दोन्हींच्या अनुयायांमध्ये विभाजन झालं. दाऊद बिन कुतुब शाहंना मानणारा दाऊदी बोहरा तर सुलेमान यांना मानणाऱ्यांना सुलेमानी बोहरा म्हटलं गेलं.

सुलेमानी बोहरा दाऊदी बोहरांच्या तुलनेत संख्येने खूपच कमी होते. काही काळानंतर त्यांच्या प्रमुखांनी आपलं मुख्यालय येमेनमध्ये उभारलं आणि दाऊदी बोहरांच्या धर्मगुरूंचं मुख्यालय मुंबईत कायम झालं.

दाऊदी बोहरांच्या 46व्या धर्मगुरूंच्या काळात या समाजातही विभाजन झालं आणि दोन उपशाखा तयार झाल्याचं सांगतात.

सध्या भारतात बोहरा मुस्लिमांची संख्या 20 लाख आहे. ज्यातले 12 लाख दाउदी बोहरा आहेत आणि उर्वरित इतर आहेत.

दोन मतप्रवाहांमध्ये विभाजन झाल्यावरही दाऊदी आणि सुलेमानी बोहरा समाजाच्या धार्मिक सिद्धांतांमध्ये फार मूलभूत फरक नाही. दोन्ही समाज सुफी आणि मजारींवर खास श्रद्धा ठेवतात.

सुलेमानी ज्यांना सुन्नी बोहरासुद्धा म्हटलं जातं, हनफी इस्लामी कायदे पाळतात. तर दाऊदी बोहरा समाज इस्माइली शिया समाजाचा उप-समाज आहे आणि दाईम-उल-इस्लामचे कायदे पाळतात.

हा समाज आपल्या पुरातन परंपरांशी जोडलेला समाज आहे. ज्यात केवळ आपल्या समाजातच लग्न करणंसुद्धा अंतर्भूत आहे. अनेक हिंदू प्रथाही या समाजात दिसतात.

भारतात दाऊदी बोहरा प्रामुख्याने गुजरातमध्ये सुरत, अहमदाबाद, वडोदरा, जामनगर, राजकोट, नवसारी, दाहोद, गोध्रा, महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, राजस्थानात उदयपूर, भिलवाडा, मध्य प्रदेशात इंदूर, बऱ्हाणपूर, उजैन, शाजापूर व्यतिरिक्त कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमध्ये वसले आहेत.

पाकिस्तानातील सिंध प्रांतांशिवाय इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, इजिप्त, इराक, येमेन आणि सौदी अरेबियातही दाउदी बोहरा समाज मोठ्या संख्येने आहेत.

वारसा आणि परंपरा

दाऊदी बोहरा समाजाचा वारसा फातिमा इमामांशी जोडलेला आहे. त्यांना पैगंबर हजरत मोहम्मद (570-632) यांचे वंशज मानलं जातं.

या समाजाची प्रामुख्याने इमामांवर श्रद्धा असते. दाऊदी बोहरा यांचे शेवटचे आणि 21वे इमाम तैयब अबुल कासीम हे होते. त्यांच्यानंतर 1132पासून आध्यात्मिक गुरूंची परंपरा सुरू झाली. त्यांना दाई-अल-मुतलक सैय्यदना म्हणतात.

दाई-अल-मुतलकचा अर्थ होतो सर्वोच्च सत्ता. अशी सर्वोच्च सत्ता ज्यांच्या कामकाजात कुठलीच आतली किंवा बाहेरची शक्ती दखल देऊ शकत नाही. त्यांच्या आदेशाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सरकार किंवा न्यायालयातही नाही.

दाऊदी बोहरा समाज सर्वसामान्यपणे शिक्षित, मेहनती, व्यापारी आणि समृद्ध असण्याबरोबरच आधुनिक जीवनशैली जगणारा आहे. मात्र सोबतच त्यांना धार्मिक समजलं जातं.

यामुळेच ते आपल्या धर्मगुरूशी पूर्णपणे समर्पित असतात. त्यांच्या प्रत्येक आदेशाचं ते निष्ठेने पालन करतात.

असगरी अली इंजिनियर आणि मुंबई

असगर अली इंजिनियर यांनी दाऊदी बोहरा समाजात सुधारणांसाठी प्रयत्न केले.

दाऊदी बोहरा समाजातील सुधारणावादी आंदोलनाची सुरुवात 1960च्या दशकात नौमान अली कॉन्ट्रॅक्टर यांनी केली. त्यांच्या काळात या आंदोलनाला फारशी गती मिळाली नाही. मात्र त्यांच्या निधनानंतर 1980मध्ये डॉ असगर अली इंजीनिअर यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. तेव्हा चळवळीचा विस्तार झाला. सुधारणा चळवळीसाठी त्यांनी मुंबईत अनेक उपक्रम केले, पुस्तकांचं लेखन केलं.

इंजिनीअर यांनी दाऊदी बोहरांचं वास्तव्य असलेल्या सर्व देशांचा दौरा केला. इतकेच नाही तर त्यांनी भारतातील विख्यात विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते, माजी न्यायमूर्ती, लेखक आणि कलाकारांना या चळवळीशी जोडलं.

2013 साली मुंबईतच त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर चळवळ थंडावली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)