You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मोदी-अदानी, भाई-भाई'च्या घोषणेवर नरेंद्र मोदी विरोधकांवर भडकले, म्हणाले, ‘एकटा पुरून उरतोय’
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (गुरुवार) आभार व्यक्त करण्यासाठी भाषण सुरू करताच राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला.
"मोदी-अदानी भाई-भाई" या घोषणा देत विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. तसंच यावेळी जेपीसीची मागणी विरोधकांनी केलीय.
राज्यसभेच्या अध्यक्षांनी विरोधकांना शांत होण्याचं आवाहन केलं, पण विरोधकांनी त्यांना दाद दिली नाही.
"एवढ्या महत्त्वाच्या सभागृहात बसणाऱ्या लोकांची भाषा देशाला निराश करणारी आणि दुर्दैवी अशी आहे," विरोधी पक्षाच्या गोंधळानंतर नरेंद्र मोदींनी शायरी म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
मोदी म्हणाले की,
किचड उसके पास था, मेरे पास गुलाल
जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल
त्यामुळे तुम्ही जितका चिखल आमच्यावर फेकाल तेवढीच कमळं फुलत राहतील. तुम्ही कमळ फुलवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो.
त्यावर विरोधकांनी 'वुई वॉन्ट जेपीसी'ची घोषणा सुरू केली.
नेहरुंच्या नावावरून टीका
यावेळी मोदींनी काँग्रेसवर नेहरू नावाच्या मुद्द्यावरून जोरदार आरोप केले.
ते म्हणाले, "एका कुटुंबाच्या नावावर 600 योजना होत्या, मी हे पेपरमध्ये वाचलं आहे. मी काही त्याची शाहनिशा नाही केली. पण नेहरूंचं नाव घेतलं नाही की काही लोक दुखावतात. माझा प्रश्न त्यांना आहे की, त्यांच्या पिढीतील लोक त्यांचं आडनाव नेहरू का ठेवत नाहीत? यात लाजिरवाणी गोष्ट नाहीये. ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. आम्ही त्यांचं नाव आम्ही नक्कीच घेऊ, पण त्यांच्या पिढ्यांनी देखील नेहरू हेच आडनाव लावावं."
पंतप्रधान पुढे म्हणाले की, "आमचा आणि राज्य सरकारांचा सातत्याने संघर्ष होतो असे आरोप केले जातात. पण काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी 90 वेळा कलम 356 चा वापर करून राज्यांमधील सरकार बरखास्त केलं आहे.मोदी पुढे म्हणाले की, "एकट्या इंदिरा गांधींनी हे कलम 50 वेळा वापरून राज्यांमधील सरकार बरखास्त केलं आहे. यात केरळमधील कम्युनिस्ट सरकार असो किंवा तमिळनाडूमधील करुणानिधी आणि एमजीआर यांचा सरकार असो, कोणालाही यातून सुट मिळाली नाही.
मोदी पुढे म्हणाले की, "एक वेळ अशी होती की विरोधकांची सत्ता पंचायतीपासून ते संसदेपर्यंत होते. पण त्यांनी देशांसाठी काम केलं नाही. आज आमच्या सरकारची ओळख निर्माण झाली आहे ती आमच्या प्रयत्नांमुळे. आम्ही प्रत्येक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही कोणत्याही समस्येपासून दूर पळून जाणारे लोक नाही."
पंतप्रधान पुढे म्हणाले की, "आम्ही 'हर घर नल' योजना सुरू केली आणि ही योजना देशातील कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो. पण एक काळ असाही होता की ज्या काळात त्यांचे पंतप्रधान पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करायला जायचे, यावरून त्यांची कार्यशैली समजते. आम्ही सत्तेवर आलो तेव्हा देशातील तीन कोटी घरात नळातून पाणी मिळत होतं. पण आज हाच आकडा वाढून 11 कोटी झालाय."
त्यावर 'जेपीसी पे कुछ तो बोलो', 'भाषणबाजी बंद करो', अशा घोषणासुद्धा विरोकांनी दिल्या.
काँग्रेसने गेल्या 6 दशकांमध्ये देशाची वाट लावली. एकाही समस्येवर काँग्रेसला ठोस उपाय करता आला नाही, असा आरोप यावेळी पंतप्रधानांनी केला.
"त्यांच्या काळात योजना रखडायच्या, स्थगित व्हायच्या पण आता आमचं सरकार पीएम गतिशक्ती योजनेच्या माध्यमातून योजनांचा वेग वाढवत आहे. जेव्हा केव्हा कोणाला सत्ता हवी असते त्यावेळेस आश्वासन दिली जातात. पण फक्त आश्वासनांनी काही होत नाही. जसं की काँग्रेसने म्हटलं होतं 'गरीबी हटाव' पण जनतेने तर काम बघितलं. विकास विकासाची गती आणि प्रयत्न हे सुद्धा लोकांनी बघितले."
"देशातील लोकांसाठी महत्त्वाचं असं म्हणत त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केलं. मात्र आजही निम्मी जनता बँकांच्या दारापर्यंत पोहोचू शकलेली नाही. मग आमचं सरकार सत्तेवर आल्यावर जनधन योजनेच्या माध्यमातून आम्ही गरिबांना बँकांशी जोडलं. गेल्या नऊ वर्षात आम्ही 48 कोटी लोकांना जनधन खात्याशी जोडण्यात यशस्वी झालोय.""काल मल्लिकार्जुन खरगे तक्रार करत होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार माझ्या भागात येतात. मी त्यांना सांगू इच्छितो की, कर्नाटकात एक कोटी 70 लाख जनधन खाती उघडली गेली आहेत ते बघा. त्यांच्याच भागात आठ लाखाहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत."
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "गेल्या नऊ वर्षांत आम्ही आदिवासी लोकांसाठी 500 एकलव्य मॉडेलच्या शाळा मंजूर केल्या आहेत. ही संख्या चारपट जास्त आहे. तसेच या शाळांमध्ये 38 हजार शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशाने काँग्रेसला वारंवार नाकारलंय. पण आजही काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष कट कारस्थान करायचं सोडत नाहीयेत. पण जनता मात्र त्यांच्याकडे डोळसपणे बघते आहे आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी नाकारते आहे."
मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटलं की, "60 वर्षं काँग्रेसने केवळ खड्डेच खड्डे खोदलेत. भले ही त्यांचा हेतू तसा नसेल, पण त्यांनी ते केलंय. खड्डा खोदत असताना त्यांनी देशाची 6 दशकं वाया घालवली. आणि त्याचवेळी जगातील इतर लहान लहान देश यशाची शिखरं पादाक्रांत करत होते."
त्यावर विरोधकांनी 'झुठा भाषण बंद करो,'च्या घोषणा सुरू केल्या.
"एक काळ असा होता की, भारत औषधांची मोठी बाजारपेठ होती. पण कोविडच्या काळात आपण लस तयार केली आणि सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं. पण आजही देशातील युवाशक्ती आणि शास्त्रज्ञांना अपमानित करण्याचे प्रयत्न सुरूच असतात."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जनधन योजना आधार कार्ड आणि मोबाईल हीच त्रीशक्ती आहे. यामुळे गेल्या काही वर्षात सत्तावीस लाख कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यात जमा झाले. त्यामुळे मधल्या कोणत्याही सिस्टीमच्या हातात जाऊ शकणारे दोन लाख कोटींहून अधिक रुपये वाचले. आता ज्यांना हे पैसे मिळाले नाहीत त्यांनी ओरड करणं स्वाभाविक आहे."
बुधवारी लोकसभेत बोलताना मोदींनी राहुल गांधीना अनेक टोले हाणले होते.
"काही व्यक्तींच्या भाषणामधून त्यांची क्षमता कळते. पण अशा व्यक्तिंच्या भाषणानंतर पूर्ण इको सिस्टीम, समर्थक आनंदी झाले. म्हणत होते की, ये हुई ना बात! अशा लोकांसाठी म्हटलं गेलं आहे की, ये कह कह के हम दिल को बहला रहे है; वह चल चुके है, वह अब आ रहे है..." असं मोदी म्हणाले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)