You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भुयार खोदून रेल्वे इंजीनची चोरी? नेमकं प्रकरण काय?
बिहारच्या बरौनी भागात काही चोरट्यांनी बोगदा खोदून रेल्वे इंजिन चोरल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर हे इंजिन भंगारात विकल्याचंही या बातम्यांमध्ये सांगण्यात आलं.
ज्या ठिकाणाहून हे रेल्वेचं इंजिन चोरीला गेलं तो भाग पूर्व-मध्य रेल्वे अर्थात ईसीआर अंतर्गत येतो.
बीबीसीने या व्हायरल बातमी मागचं सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यासाठी बीबीसीने हाजीपूर येथील पूर्व मध्य रेल्वेचे प्रवक्ते वीरेंद्र कुमार यांच्याशी संपर्क केला.
वीरेंद्र कुमार यांनी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "ही पूर्णपणे खोटी बातमी आहे. जर बोगदा खोदून साधी कार चोरता येत नसेल, तर हे तर रेल्वेचं इंजिन आहे. चोरट्यांनी भिंत फोडून इंजिनचे काही भाग चोरलेत."
ते पुढं सांगतात की, "ज्या इंजिनमधून चोरी झाली ते डिझेलवर चालणारं इंजिन आहे. आणि काही काळापर्यंत हे इंजिन वापरातही होतं. रेल्वेच्या टीमने छापेमारी करून चोरी झालेले 95 भाग जप्त केलेत."
सोबतच रेल्वे मंत्रालयाकडून या संदर्भातील एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलंय. मंत्रालयाचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिन चोरीची बातमी धादांत खोटी आणि दिशाभूल करणारी आहे.
प्रकरण नेमकं काय आहे?
तर ही घटना बरौनी येथील गढहरा लोको शेडमध्ये घडली आहे. इथल्या यार्डमध्ये सुमारे 16 रेल्वे इंजिन ठेवण्यात आलेत. बऱ्याचदा देखभाल करण्यासाठी सुद्धा हे इंजिन लोको शेडमध्ये ठेवले जातात.
कधीकधी रेल्वेचे खूप जुने इंजिन भंगारात विकले जातात. बऱ्याचदा लाइट साइडिंगच्या कामासाठी काही कंपन्या या इंजिनांची खरेदी करतात.
पॉवर प्लांट्स किंवा एखाद्या मोठ्या कारखान्याच्या कमी अंतराच्या वाहतुकीसाठीही या रेल्वे इंजिनचा वापर केला जातो.
त्यामुळे खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही ठिकाणी वापरात येतील म्हणून जुने लोकोमोटिव्ह खरेदी केले जातात.
भारतातील रेल्वेच्या मालमत्तेचं रक्षण करणं ही रेल्वे संरक्षण दलाची (RPF) जबाबदारी आहे.
रेल्वेच्या प्रॉपर्टीची चोरी झाल्याच्या बातम्या खूप वेळा आल्या आहेत.
रेल्वेचा ट्रॅक उघड्यावर असतो. त्यामुळे इथं पर्यंत पोहोचणं फारसं अवघड नसतं. त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी आरपीएफच्या वतीने सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात.
याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी आरपीएफकडून वेळोवेळी विशेष मोहीमही राबवली जाते.
गढहरा लोको शेडमधून इंजिन चोरीला गेल्याची बातमी मागच्या 15 दिवसांपूर्वी समजली. आता तर असे आरोप होतायत की, याच ठिकाणाहून कित्येकदा रेल्वेच्या संपत्तीची चोरी झाली आहे.
यावेळी 7 नोव्हेंबरला आरपीएफकडून तपासणी सुरू होती. या तपासादरम्यान गढहरा यार्डची एक भिंत तुटल्याचं दिसलं. तिथं कोणीतरी वारंवार फेऱ्या मारल्याचं पावलांच्या ठशांवरून समजत होतं. त्यानंतर आरपीएफने संबंधित इंजिनिअरला बोलावून इंजिनची तपासणी करायला सांगितलं. यावेळी जुन्या रेल्वे लोकोमोटिव्हचे काही पार्ट्स आणि मोटारीच्या केबल्स कापून गायब झाल्याचं तपासणी झाल्यानंतर आढळलं. या पार्ट्समध्ये असलेल्या तांब्याच्या आणि अॅल्युमिनिअमच्या तारांना भंगारातही खूप मोल असतं. पण तेच लोखंडाच्या तारा स्वस्त असतात.
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
रेल्वेची संपत्ती गायब झाल्यानंतर रेल्वे आणि दक्षता पथकाने रात्रीच्या वेळी पाळत ठेऊन काही चोरट्यांना पकडलं. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली, त्यांचे मोबाईल डिटेल्स तपासण्यात आले.
रेल्वे सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, या चोरट्यांमध्ये गुड्डू कुमार नावाचा व्यक्ती होता. त्याच्याबरोबर पाच जण होते. गुड्डू कुमारला पळून जाताना पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण उरलेले पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले.
आरपीएफच्या वतीनेही तपासणी करण्यात आली आहे. यात एकावरून दुसऱ्याची आणि दुसऱ्या वरून तिसऱ्या गुन्हेगाराची ओळख पटवण्यात आली. अशा प्रकारे गेल्या दोन आठवड्यात मोहीम राबवून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
तसेच या प्रकरणात मुझफ्फरपूर मधून सनी कुमार नावाच्या व्यक्तीलाही पकडण्यात आलंय. त्याच्याकडे बऱ्याच चोरीच्या वस्तू होत्या, त्याही जप्त करण्यात आल्यात.
या चोरीच्या प्रकरणात जवळपास चौदा लाखांचा माल आणि तारांची चोरी झाल्याचा अंदाज आहे. त्यातील मोठा भाग बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये विकण्यात आलाय. या चोरीनंतर रेल्वे प्रशासनाने अकरा लाखांहून अधिक किमतीचा चोरीला गेलेला माल परत मिळवल्याचा दावा केलाय.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)