कलका ते शिमला टॉयट्रेनचा स्वप्नवत प्रवास, कसा कराल हा प्रवास?

    • Author, विशाखा निकम
    • Role, बीबीसी मराठी

'हॅलो, हाय नमस्कार मी विशाखा निकम...' म्हणत तुमच्याशी कनेक्ट होण्यात जेवढा आनंद आहे ना तेवढाच आनंद मला माझ्या प्रवासाचं वर्णन करताना होतो. तर हो यावेळी 'भटकभवानी' पोहोचलेली हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या शिमल्याला.

खरंतर कोणी मला 'समुद्र किनारा की डोंगर दऱ्या तुला कुठे जायला आवडेल?' असा प्रश्न विचारला तर मी आनंदानं 'पहाडों में सुकून हैं' असं उत्तर देते.

तर आम्हाला आठवड्याला 2 सुट्ट्या असतात काय करायचं तर मग मी 'सुकून'च्या शोधात डोंगर दऱ्यावर भटकत असते.

शनिवारी ऑफीस करायचं आणि रात्री बस पकडून पायाला भिंगरी बसवत निघायचं, भटकायला…

तर तसं शिमल्याला मी यापूर्वीही गेलेले आणि हो माझं प्रेम असलेल्या टॉय ट्रेनमध्ये बसलेही होते, मात्र तरीही ही टॉय ट्रेन मला पुन्हा पुन्हा खुणावत होती.

दिल्ली ते शिमला प्रवास कसा कराल?

2 ते 3 दिवस शिमल्यासाठी भरपूर आहेत. तिथे मॉल रोड, कुफरी, तारादेवी मंदीर हीच काही ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. दिल्लीवरून तुम्हाला थेट शिमल्याची बस घेता येते, मात्र त्यापेक्षा भन्नाट प्रवास आज मी तुम्हाला सांगते. तो म्हणजे टॉय ट्रेनचा.

खरंतर अनेकांसाठी शिमल्याला जायचं टॉय ट्रेन हे एक कारण असतं. तर दि्ललीवरून मी सेमी स्लिपर बस पकडली ती कलकापर्यंत, कालका हे ठिकाण तुम्ही अनेकांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये ऐकलं आणि पाहिलं असेलच.

साधारण जनरलचं तिकिट 65 रुपये ते प्रॉपर रिझर्व्हेशन 550 रुपये अशी ही टॉय ट्रेनची तिकिटं असतात. ही ट्रेन तुम्हाला 5 तासांत शिमल्याला सोडते. हा धमाकेदार प्रवास आहे, मी माझा अनुभव सांगायचा झाला तर तुम्ही शिमल्यात जेवढी धमाल करणार नाही ना तेवढी धमाल या टॉयट्रेनमध्ये येते.

कलका, टॉय ट्रेन, हिरवळ आणि मी... एक स्वप्नवत प्रवास

हरियाणात येणारं कालका हे टॉय ट्रेन्सचं एक मोठं स्टेशन आहे. याचा उत्तम इतिहासही आहे. पहाटे 4 पासून या टेन्स सुरू होतात. या 5 तासांच्या कलका ते शिमला या प्रवासात तुम्ही प्रचंड समृद्ध होता. 'कस्तो मजा है रेलैमा' ते 'मैं अपनी ही फेवरेट हूं' म्हणणारी करिना कपूर तुमच्या समोर येते, अरे हो 'मेरें सपनो की रानी' हे गाण मी कसं विसरू शकते.

तर प्रचंड पाऊस सुरू होता त्यात पहाटे 4 चा काळोख आणि मी हातात एक मोठी बॅग घेऊन भिजतच या स्टेशनच्या दिशेनं चालत होते, वर्णन करताना तुम्हाला जाणवतंय की नाही माहिती नाही पण मला माझ्यात 'जब वी मेट'मधली गीत दिसत होती.

स्टेशनवर पोहोचले तिकिट काढलं आणि बसले ट्रेनमध्ये. छोटुशी ट्रेन, लहान लहान खिडक्या, रिमझिम रिमझिम पाऊस, हिरवी गार झाडी समदं कसं ओक्केमध्ये वाटत होतं. ते म्हणतात ना 'सफर खुबसुरत हैं मंजिलसे भी' तसंच काही तरी... आठवड्याभराचा धकवा आणि रात्रभराचा प्रवास हे काही जाणवतच नव्हतं. हा एक स्वप्नवत प्रवास वाटत होता.

या ट्रेनमध्ये बसल्यावर जाणवतं की आपल्यासारखे सगळेच इथे हा प्रवास अनुभवण्यासाठी आले आहेत. ट्रेनमध्ये बसल्याबसल्या आपोआप सगळ्यांचे फोन वर निघाले आणि सगळ्यांनाच म्हणजे अगदी माझ्यासारख्या तरुणांना ते शेजारी बसलेल्या साठीतल्या काका काकूंना फोटो काढण्याचा मोह आवरलाच नाही.

आम्ही फोटो काढण्यात व्यग्र झालो तेवढ्यात ट्रेनची आयकॉनिक शिट्टी वाजली आणि तिनं हळूहळू वेग धरायला सुरुवात केली. एका बाजूला पर्वत आणि त्यावर आलेली पाझर तर दुसऱ्या बाजूला मस्त झाडी-डोंगर-दरी आणि पाऊस...

शेजरी ते 60-65 वर्षाचं कपल एकमेकांचे सुंदर फोटो घेतंय आणि मी आपली कॉफीच्या प्रेमात आनंद घेत होते. हा प्रवास कितीही सुंदर असला ना तरी साधारण 3 तासांनंतर ट्रेनमधला नाश्ता केल्यावर छान डुलकी येतेच. त्यामुळे फोटोसेशन झालं आणि मी मस्त एक पडी मारली... ते सरळ उठले शिमल्यालाच.

शिमल्यात काय काय फिरायचं...

आता फक्त प्रवासाचं कौतुक करून कसं चालेल ज्यासाठी हा प्रवास केला त्याबद्दलही बोलायला हवं ना... तर शिमल्यात फार काही फिरण्यासारखं नसलं तर पहिल्यांदा अनुभवण्यासारखं भरपूर आहे.

मॉल रोड - हिमाचल प्रदेशाचं उत्तम दर्शन घडवून देणाऱ्या या रोडवर तुम्हाला लंडनमध्ये असल्याची फिलींग येते, फक्त हो लंडनला माकडं आहेत की नाही माहिती नाही इथे ही माकडं तुम्हाला साधं काही खाऊही देत नाही ना रस्त्यानं व्यवस्थित चालू देत. हा त्रास फक्त या रोडला नाही तर संपूर्ण शिमल्यात आहे.

मला तर रोहित शेट्टीच्या चित्रपटात गाड्या फिरतात ना तसं फिरवलंय माकडांनी. त्यामुळे 'अनुभवाचे बोल' बाकी काही नाही. त्याशिवाय सगळं फिरून 6 ते 8 हा वेळ सूर्यास्तासाठी ठेवाच.

कुफ्रीसाठी तुम्ही खास वेळ काढाच, थोडं कमर्शिअलाझेशन झालंय पण घोड्याच्या पाठीवर बसून डोंगरावर जाण्याची धमाल वेगळीच आहे.

सफरचंदाची झाडं, अॅडव्हेंचर आणि गुलाबी थंडी. अगदी मनमोहक वातावरण आहे. याशिवाय तारादेवी मंदिर पाहायला मी गेलेले. डोंगरावर असलेलं हे मंदीर प्रचंड सुंदर आहे आणि खूप शांत फिलिंग तिथे येते. बाकी आणखी काही लहान-मोठी मंदीरं आणि ठिकाणं आहेत पण मला सुट्ट्या दोनच होत्या...

कलका-शिमला 'टॉय ट्रेन'चा इतिहास

ब्रिटीश राजवटीत म्हणजे साधारण 1898 मध्ये कलका-शिमला या टॉय ट्रेनच्या कामाला सुरूवात झाली आणि 1903 मध्ये या रुळाचं काम पूर्ण झालं.

भारतीय रेल्वे नेटवर्कशी शिमल्याला जोडण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. किमान 800 पूल आणि व्हायाडक्ट्सच्या क्रॉसओव्हरसह 96 किलोमीटर उंच प्रवास करणारी रेल्वे किंवा रस्ता अशी याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद आहे.

प्रचंड उंचीवर असूनही ही टॉय ट्रेन दर तासाला साधरण 22 किमीच्या वेगानं प्रवास करते ही कमालीची गोष्ट आहे आणि तो अनुभव एक कमाल फिलिंग आहे.

टॉय ट्रेनबद्दल बॉलिवूडला असलेलं आकर्षण

तर एकूणच रेल्वे आणि बॉलिवूड असं एक घट्ट नातं आहे असं मला तरी वाटतं. अगदी 90 व्या दशकापासून ते अलीकडेच्या सिनेमांपर्यंत म्हणजेच आराधना, दिल से, परिनिता ते जब वी मेट. बॉलिवूडचं टॉय ट्रेनवरचं हे प्रेम अगदी ठळक दिसून येतं. त्यातच निसर्गाच्या कुशीत असलेली टॉय ट्रेन चित्रपट निर्मात्यांच्या, कलाकारांच्या आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या अगदी मनात बसलेली आहे.

मेरे सपनो कीं रानी कब आयेगी तू : राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि किशोर कुमार यांचं 'आराधना' या चित्रपटातील 'मेरे सपनो कीं रानी कब आयेगी तू' या गाण्यात टॉय ट्रेनच्या खिडकीत बसून आपल्या सुंदर अभिनयानं रसिक प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या शर्मिलाला कोण बरं विसरू शकतं. हे गाणं कदाचित बॉलीवूड आणि रेल्वेमधील रोमान्सचं सर्वोत्तम उदाहरण आहे. या गाण्यात दार्जिलिंगमधील टॉय ट्रेन दाखवण्यात आली आहे.

कस्तो मज्जा है रेलैमा : माझं आवडतं गाणं… स्वानंद किरकिरे यांचे शब्द, विद्या बालन आणि सैफ अली खानचा रोमॅन्स, सोनू निगम आणि श्रेया गोशाल यांचा सुरेल आवाज आणि 'पहाडोंकी रानी' टॉय ट्रेन हे गाणं एव्हरग्रीनच आहे.

जब वी मेट : माझ्या आयुष्यातील खूप जवळचा चित्रपट 'जब वी मेट'. एक रेल्वे सुटण्यावरून सुरू झालेल्या या चित्रपटाचा प्रत्येक सीन मला एक वेगळा आनंद देऊन जातो. शाहिद अर्थात आदित्य जेव्हा पळत-पळत टॉय ट्रेन पकडतो आणि त्याची गीत त्याच्या मागे जाऊन ती ट्रेन पकडते… उ्फ्फ्फ… तो सीन तर आयुष्यात मला रिक्रियेट करायचाच आहे. मला माहितीये तुमच्यापैकी अनेकांची हीच इच्छा असेल.

म्हणून हा प्रवास पुन्हा पुन्हा करावा वाटतो…

मी तशी फिल्मीच आहे. एखाद्या चित्रपटातल्या नटीसारखी मी स्वत:च्याच आयुष्यात भिरभिरत असते आणि ते सगळे क्षण जगण्याची माझी इच्छाही असते.

जन्माला 90व्या शतकाच्या शेवटाला आले असले तरी माझा जीव त्याहून जुन्या गोष्टींमध्ये जास्त अडकतो. आता अगदीच स्वत:ला शर्मिला समजत कोणी राजेश खन्ना बनत माझा पाठलाग करणार नाही मात्र हो टॉय ट्रेनमध्ये बसून हा प्रवास अनुभवणंसुद्धा माझ्यासाठी प्रचंड सुख देणारं असतं.

प्रत्येक प्रवास आपल्याला काही तरी देत असतो आणि मोठ्या मनानं आपण ते स्वीकारायचं असतं… मी प्रवास वेगवेगळ्या कारणांसाठी करते कधी आयुष्यातील गुंताऱ्यातून लांब पळण्यासाठी, कधी कामाचा ताण दूर करण्यासाठी तर कधी आपण जिवंत आहोत पण आपण खरंच आयुष्य जगतोय का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी.

तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की 'या प्रवासानं मला काय दिलं?' तर हो या प्रवासात मी अधिक फिल्मी झाले आणि एखाद्या लहानशा टॉय ट्रेननं जसं प्रचंड मेहनत करत ओठत-ताणत प्रवाशांना आनंद देत उंचचउंच चालत राहावं तसंच आपणही आयुष्यात अवती-भवती असलेल्या प्रत्येकाला सोबत घेत आनंद वाटत आयुष्यात उंच भरारी घ्यावी हेच मी या प्रवासात शिकले. असं मला तरी वाटतं….

तुम्ही प्रवास का करता?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)