चीन अरुणाचल प्रदेशला 'दक्षिण तिबेट' का म्हणतो?

पूर्व लडाखच्या एलएसी म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून भारत आणि चीननं दोन दिवसांपूर्वीच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

लष्करावरचा तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवर पूर्वी होती तशी स्थिती पुन्हा तयार करण्यासाठी 13 व्या टप्प्यातली वरिष्ठ सैन्य कमांडर पातळीवरची चर्चा सुरू होती. ही चर्चा या आरोप-प्रत्यारोपांसह कोणताही तोडगा न निघता संपुष्टात आली.

त्यात चीननं अरुणाचल प्रदेशमध्ये बुधवारी झालेल्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दौऱ्यावर आक्षेप व्यक्त केला आहे. सीमावाद वाढेल असं भारतानं काहीही करू नये असा इशारा चीननं दिला आहे.

चीननं व्यक्त केलेल्या आक्षेपावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं काही तासांमध्ये प्रत्युत्तर दिलं. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याला भारतापासून वेगळं करता येणार नाही, असं भारतानं स्पष्ट केलं. भारतीय नेत्यांच्या दौऱ्यांवर घेण्यात येणाऱ्या आक्षेपाला काहीही अर्थ नसल्याचं भारतानं म्हटलं आहे.

यापूर्वी चीननं 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अरुणाचल दौऱ्यालाही विरोध केला होता. तसंच 2020 मध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल दौऱ्यावरही आक्षेप घेतला होता.

भारतानं प्रत्येकवेळी चीनचा आक्षेप फेटाळून लावला आहे. चीन अरुणाचल प्रदेशमध्ये 90 हजार चौरस किलोमीटर जमिनीवर दावा करत आहे. तर चीननं पश्चिमेला अक्साई चीनमधील 38 हजार चौरस किलोमीटर भागावर अवैध ताबा घेतला असल्याचं भारताचं म्हणणं आहे.

"चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तिबेटला गेले तेव्हा भारतानं काही म्हटलं नव्हतं. एवढंच नाही तर भारतीय सीमेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तळावर शी जिनपिंग एक रात्र राहिलेही होते. चीनची युद्धासाठीची तयारी म्हणून त्याकडं पाहण्यात आलं. पण व्यंकय्या नायडूंच्या अरुणाचल दौऱ्यावर चीननं घेतलेला आक्षेप म्हणजे फार काही आश्चर्यकारक बाब नाही," असं मत प्रसिद्ध संरक्षणतज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी ट्वीटद्वारे मांडलंय.

"चीन भारताबरोबरचे संबंध अत्यंत वाईट पद्धतीनं हाताळत आहे. हे त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं अपयश ठरू शकतं," असं मत, चीनच्या इतिहासावर पुस्तक लिहिलेले मायकल शुमॅन यांनी या मुद्द्याबाबत ट्वीट करत म्हटलंय.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र सचिव राहिलेले कंवल सिब्बल यांनीही चीनच्या आक्षेपावर भारतानं दिलेल्या उत्तराला रिट्वीट केलं.

"चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचं वक्तव्य अत्यंत आक्रमक, आव्हान देणाऱ्या भाषेतलं आहे. आपलं उत्तर हे फारच उदारपणे दिलेलं आहे. वाद वाढू नये यासाठी काही ठोस कारणं असू शकतात, त्यामुळेच कदाचित आपण धमकीचा सूर वापरला नाही. मात्र आपल्याला आणखी कठोर शब्दांत उत्तर देता आलं असतं," असं ते म्हणाले.

दक्षिण तिबेट

चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेट म्हणतो. दोन्ही देशांमध्ये 3,500 किलोमीटर (2,174 मैल) लांबीची सीमा आहे. 1912 पर्यंत तिबेट आणि भारत यांच्यात कोणतीही स्पष्ट सीमा आखण्यात आली नव्हती.

या भागावर मुघल किंवा इंग्रज कुणीही राज्य केलं नव्हतं. भारत आणि तिबेटच्या लोकांना सीमेबाबत निश्चितपणे काहीही ठोस असं माहिती नाही.

ब्रिटिश राज्यकर्त्यांनीही कधी या सीमेबाबत विचार केला नाही. मात्र, तवांगमध्ये बौद्ध मंदिर आढळलं तेव्हा सीमारेषेचा शोध आणि अभ्यास सुरू झाला.

1914 मध्ये शिमल्यामध्ये तिबेट, चीन आणि ब्रिटिश भारताच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी सीमा निश्चित करण्यात आली.

चीननं तिबेटला कधीही स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली नाही. 1914 च्या शिमला कराररातही ते मान्य केलं नाही. 1950 मध्ये चीननं तिबेट पूर्णपणे ताब्यात घेतलं. तिबेटच्या बौद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं, तवांग हा चीनचा भाग राहावा, अशी चीनची इच्छा होती.

चीन आणि तिबेट

1949 मध्ये माओत्से तुंग यांनी पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना केली. एक एप्रिल 1950 ला भारतानं याला मान्यता दिली आणि द्विपक्षीय संबंध प्रस्थापित केले. चीनला अशाप्रकारे महत्त्वं देणारा भारत हा पहिलाच बिगर कम्युनिस्ट देश होता.

1954 मध्ये भारताने तिबेटच्या बाबतीतही चीनचं सार्वभौमत्व मान्य केलं. म्हणजेच तिबेट चीनचा भाग आहे, हे भारतानं मान्य केलं. 'हिन्दी-चीनी, भाई-भाई' ही घोषणाही तेव्हा समोर आली.

1914 मध्ये शिमला करारानुसार मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचं मान्य करण्यात आलं. मात्र 1954 मध्ये नेहरू यांनी एका करारांतर्गत तिबेट हा चीनचा भाग असल्याचं मान्य केलं.

जून 1954 ते जानेवारी 1957 दरम्यान चीनचे पहिले पंतप्रधान चाऊ एन लाई हे चारवेळा भारताच्या दौऱ्यावर आले. ऑक्टोबर 1954 मध्ये नेहरूदेखील चीनला गेले.

1950 मध्ये चीननं तिबेटवर हल्ला सुरू केला आणि त्याला ताब्यात घेतलं. तिबेटवर चीननं केलेल्या हल्ल्यानं संपूर्ण परिसरातील भूराजकीय स्थितीच बदलून टाकली.

चीननं हल्ला करण्याच्या आधी तिबेटची चीनच्या तुलनेत भारताशी अधिक जवळीक होती. अखेर तिबेट एक स्वतंत्र देश राहिला नाही. चीननं 1950 च्या दशकाच्या मध्यात भारतीय हद्दीतही घुसखोरी करायला सुरुवात केली होती. 1957 मध्ये चीननं अक्साई चीनच्या मार्गे पश्चिमेला 179 किलोमीटर लांब रस्ता तयार केला.

सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक सर्वप्रथम आमने-सामने आले ते 25 ऑगस्ट 1959 ला. चीनच्या गस्त घालणाऱ्या तुकडीनं नेफा फ्रंटियरवर लोंगजूमध्ये हल्ला केला होता. याचवर्षी 21 ऑक्टोबरला लडाखच्या कोंगकामध्येही गोळीबार झाला.

त्यात 17 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला. चीननं ही कारवाई स्वसंरक्षणासाठी केल्याचं सांगितलं. तर भारतानं त्यावेळी, 'सैनिकांवर अचानक हल्ला करण्याल आला' असं सांगितलं होतं.

एलएसी झाली एलओसी?

"चीन आणि भारतादरम्यान सीमावाद असला तरी, दोन्ही देशांमध्ये सीमेवर गेल्या 40 वर्षांपासून एकदाही गोळीबार झालेला नाही,'' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जून 2017 रोजी रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमच्या चर्चेत म्हटलं होतं. चीननं पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचं स्वागत केलं आणि ते उचलून धरलं होतं.

मात्र, भारत आता असं म्हणू शकत नाही. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यात भारताच्या 20 सैनिकांचा मृत्यू झाला होता. तर चीनमधून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे चार सैनिक मारले गेले होते.

चीनच्या हल्ल्यानंतर तिबेटचे बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना पळून जावं लागलं होतं. 31 मार्च 1959 ला दलाई लामांनी भारतात पाऊल ठेवलं होतं. 17 मार्च रोजी ते तिबेटची राजधानी ल्हासामधून पायी निघाले होते. हिमालयातील डोंगर पार करत ते 15 दिवसांनी भारतीय हद्दीत दाखल झाले होते.

एप्रिल 2017 मध्ये तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला तर चीननं त्याला कठोर विरोध दर्शवला. भारतानं याची परवानगी द्यायला नको होती. भारताला याचा काही फायदाही होणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)