International Picnic Day : 'बाईच्या जातीने एकटं फिरणं का आवश्यक आहे, अशी बनले मी सोलो ट्रॅव्हलर'

    • Author, विशाखा निकम
    • Role, बीबीसी मराठी

(18 जून हा आंतरराष्ट्रीय पिकनिक दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रवासामुळे आपलं व्यक्तिमत्व घडतं असं म्हटलं जातं पण ती प्रक्रिया नेमकी कशी होऊ शकते हे वाचा या ब्लॉगमधून.)

'बाईच्या जातीने असं एकटं फिरू नये, लोक काही चांगले राहिले नाहीत आता...', 'आई बाप कसे सोडतात असं बाहेर देव जाणे' हे शब्द मीही ऐकलेच पण त्यापलीकडे जाऊन मी स्वतःची प्रत्येक इच्छा पूर्ण करतेय. या प्रवासांनी मला काय दिलं असं विचारलं तर त्याचं उत्तर मी एका शब्दांत देईल...'आत्मविश्वास.'

ही गोष्ट नक्कीच 'ओव्हरनाइट' घडली नाही, यासाठी मला बरेच प्रयत्न करावे लागले आणि अजूनही ते सुरूच आहेत. त्याचीच ही गोष्ट...

माझ्यासारखं तुम्हीही कॉलेजमध्ये गोव्याची ट्रीप प्लॅन केली होती का? आणि एक मिनिट... ती रद्द झाली?

हो हो मला माहितीये कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडतंच... माझ्या घरच्यांनी माझे नाव ' भटकभवानी' ठेवलंय कारण मी सतत फिरतच असते आणि हो एकटीच.

नवीन आणि सोप्प्या भाषेत काय ते 'सोलो ट्राव्हलर'... असंच मित्रमैत्रिणींसोबतचे बेत रद्द होत गेले, कधी आई वडिलांनी परवानगी दिली नाही तर कधी मित्रमैत्रिणींच प्लॅन फसवला आणि मी एकटच भटकणं सुरू केलं.

तुम्हालाही फिरायला आवडतं का? पण दरवेळी कुणी सोबत नाही म्हणून प्लॅन कॅन्सल होतात? किंवा रोजच्या रुटीनचा कंटाळा आलाय? आणि आता स्वतःला वेळ द्यावा असं वाटतंय तर मग एकटं फिरणं हा उत्तम पर्याय आहे असं मला वाटतं.

अशी झाली सुरूवात…

शिक्षणासाठी 10 वीनंतरच घराबाहेर पडले, हॉस्टेलला राहायचे. मग काय अभ्यास झाला नाही किंवा कुणाशी भांडणं झाली तर मी एकटीच बाहेर पडायचे, फिरायचे आणि यात मज्जा येऊ लागली.

5 वर्षं कॉलेज झाल्यावर कामासाठी मुंबईत जाणं झालं, 9 तासांची शिफ्ट, दिवसभर ब्रेकिंगचा गोंधळ आणि ऑफिसातलं नको झालेलं वातावरण या सगळ्यांत जीव कासाविस होऊ लागला मग विरंगुळा म्हणून मुंबई फिरायला सुरूवात केली. अशी झाली माझी एकटं फिरण्याची सुरूवात.

दरवेळी कुणीतरी सोबत यावं, आपल्या ट्रिप्स आपण दुसऱ्याच्या बजेटनुसार आणि त्यांच्या वेळेनुसार प्लॅन कराव्या याचा मला कंटाळा यायचा. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम या पद्धतीनेच काम सुरू होतं, काही दिवस घरी अर्थात अमरावतीला, काही दिवस मुंबईत आणि काही पुण्यात असा माझा प्रवास दोनही वर्षं सुरूच होता.

या प्रवासात मज्जा येत नव्हतीच खरी पण त्यातल्या त्यात एका जागेवर बसण्यापेक्षा ते बरंच होतं. एक दिवस असंच दुपारच्यावेळी मी आणि माझी मोठी बहीण आयुष्यावर बोलू काही म्हणून बोलत बसलो आणि तिने मला 'वर्केशन' या कंसेप्टबद्दल सांगितलं.

मला हा कंसेप्ट हटकेच वाटला, मात्र पुणे-मुंबई-लोणावळा-खडकवासला-नागपुर-कोकण इथपर्यंत एकटं फिरणं ठीक होतं पण यावेळी मी चक्क हिमाचल प्रदेश गाठण्याचा प्लॅन करत होते. त्यामुळे घरी जरा जास्त मस्का मारण्याची, त्यांना विश्वासात घेण्याची कसरतच करावी लागली.

हिंमत केली आणि घरी फोन केला…. 'मला फिरायला जायचंय.. हिमाचल प्रदेशला. कुणी सोबत नाहीये म्हणून मी प्लॅन कॅन्सल करणार नाहीये, मी एकटीच जाणार…' हे म्हटल्यावर प्रत्येक आई प्रमाणे माझ्या आईनेही छान उत्तर दिलं.. ती म्हणाली 'बाबांना विचार आणि जा..'

तशी माझी आई फार हिमतीची आहे, मात्र यावेळी तिने माघार घेतली. ताईने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण तिचं उत्तर तेच होतं. शेवटी घाबरत बाबांना फोन केला आणि अनपेक्षित उत्तर मिळालं.

'जा… काही होत नाही, जे घडायचंच आहे ते पुण्यात किंवा मुंबईतही घडू शकतं त्यासाठी स्वत:च्या इच्छा मारू नये…' आणि हे ऐकून आम्ही दोघींनी लांब श्वास घेतला आणि तिकिटं बुक केली. ताईने दोन-तिन मैत्रिणींना फोन करायाला लावलाच की एकदा बघ तर विचारून पण कुणीच तयार नव्हतं या उलट 'एकटं जाऊ नको बरं का, तिकडची माणसं काही योग्य नाहीत' वगैरे सारखी सजेशन्स येत होती, शेवटी आम्ही तिकीटं बुक केलीच.

'वर्केशन' ही काय भानगड?

कोरोना काळात आपण सगळेच घरातून काम करत होतो, अशा काळात काही मंडळी वेगवेगळ्या ठिकाणांहून जसं हिमाचल, पंजाब, उत्तराखंड अशा भागातून काम करत होते. होस्टेलमध्ये राहून रोज जसं घरी आपण आयुष्य जगत होतो अगदी तसंच. दिवसभर काम केल्यावर विरंगुळा म्हणून तिथल्या कॅफेत जायचं, त्याठिकाणची संस्कृती काय आहे ती अनुभवायची आणि सुट्टीच्या दिवशी मस्त फिरायचं. असं असतं हे 'वर्केशन'.

आता तुम्ही म्हणाल की एवढा खर्च कसा करायचा हॉटेल्सचा खर्च, खाणं पिणं, प्रवासाचा खर्च, फिरायला जाताय म्हणजे शॉपिंग आणि बरंच काही. तर या वर्केशनसाठी खास होस्टेल्सची सोय आहे हे मला इन्स्टाग्रामवरुन कळलं.

या होस्टेल्समध्ये तुम्हाला राहण्याचा खर्च प्रतिदिवस साधारण 300 ते 400 रुपये एवढाच येतो. याशिवाय इथे गाईड्स असतात जे तुम्हाला त्याठिकाणची माहिती देतात, त्याच होस्टेलमध्ये तुमची खाण्याची सोय होते आणि चांगले मित्र-मैत्रिणी भेटतात ज्यांच्यासोबत तुम्ही फिरू शकता.

पहिल्याच प्रवासात तुफान गोंधळ…

मुंबई ते चंडीगड असं सकाळी 5 चं विमान होतं, त्याने चंडीगडला पोहोचले आणि तिथे गेल्यावर कळलं की पुढचं विमान, जे धर्मशालापर्यंत होतं ते रद्द झालंय.

अनोळखी शहर आणि एकटाच जीव, स्वत:ला समजवण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न करत होते मात्र मनात धाकधूक होतीच. अनेक प्रश्न मनात घर करू लागले होते 'मी एकटी येऊन चूक तर केली नाही ना? आता मी पुढे कशी पोहोचणार? रस्त्यात काही बरं वाईट झालं तर?' आणि बरंच काही.

कसंतरी स्वत:ला शांत केलं फ्रेश झाले आणि समोर एक कपल दिसलं… त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं, 'आता तुम्ही कसा प्रवास करणार आपण कॅबचा खर्च तिघं मिळून करूयात आणि निघूयात का?' त्यांनी माझ्याकडे एक लूक देऊन विचारलं, 'आप अकेली आयी हो?' मीही मोठ्या उत्साहात होकार दिला.

यातच त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे स्वत:ची गाडी आहे, मात्र माझ्या बायकोला विमानात बसायचंय म्हणून मी हे तिकीट केलं होतं… मग आता तुम्ही पेट्रोलच्या पैशांमध्ये तुमचा वाटा द्या आपण तिघे गाडीनेच निघूयात, मग आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि गाडी घेऊन मस्त रस्त्याने धमाल करत निघालो..

पोहोचेपर्यंत आमची एवढी गट्टी झाली की तो दादा म्हणाला.. 'भाई-भाभी को अब पैसे दोगी क्या तुम… अच्छेसे जाओ, पोहोचके फोन करना और लौटते समय एक दिन चंडीगडमें रुकना.'

हे ऐकून जगात चांगली माणसं अजूनही आहेत यावरचा माझा विश्वास आणखीच पक्का झाला.

ट्रेकिंगची धमाल आणि पॅराग्लायडिंगचं थ्रिल

तिबेटी लोकांनी वसलेलं धर्मशाला हे ठिकाण कमाल आहे. तिबेटीयन संस्कृती आणि निसर्गरम्य वातावरण मंत्रमुग्ध करणारं आहे. धर्मशाला जवळच मॅक्लोडगंज नावाचं सुंदर गाव आहे याच गावात मी होस्टेलला राहत होते.

पहिले 5 दिवस मी सुट्टीवरच होते त्यातला पहिला दिवस प्रवासात गेला आणि तो प्रवास इतका सुंदर होता की मला हे नवं व्यसन खुणावत होतं. मग काय, होस्टेलला ही धमाल मंडळी मिळाली. त्यातच काही लोक अशीही होती जी गेल्या एक वर्षापासून तिथेच राहत होती.

दुसऱ्याच दिवशी जवळजवळ 10 ते 12 किलोमीटरचा त्रिउंड ट्रेक पूर्ण केला तोही भर पावसात… ग्रुपमध्ये मी एकटीच मुलगी होते आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे मी गाईडबरोबर सगळ्यांत पुढे असायचे, रात्रभर टॉपवर मुक्काम ठोकलं रात्रभर पाऊस त्यात पाय प्रचंड त्रास देत होते पण सकाळच्या दृश्याचं सगळा थकवा घालवला आणि परतीचा रस्ता पकडला.

त्यानंतर आजूबाजूला असलेले महत्त्वाचे स्पॉट्स बघितले धर्मशाला फिरले त्यात पत्रकार आहे कळल्यावर थोडी चांगलीच वागणूक मिळाली त्रिउंड ट्रेक ज्याव्यक्तीने लीड केला त्याच व्यक्तीने हे सगळं फिरवलं छान फोटो-व्हीडिओ काढले.

त्यानंतर मी धर्मशालापासून अंदाजे 60-65 किमी अंतर असलेल्या बीर बिलिंग या ठिकाणी गेले.

समुद्रसपाटीपासून साधारणत: 8 हजार पेक्षा अधिकच्या उंचीवर असलेलं हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे. बिलिंग हे आशियातील सर्वांत उंच आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचावरील पॅराग्लायडिंग ठिकाण आहे.

8000 फूट उंच आकाशाला स्पर्श करून तुम्ही खाली जमिनीवर येता तो अनुभव शब्दात सांगणं कठीणच आहे. मी कधी आकाशपाळण्यात न बसलेली मुलगी, मात्र हिमाचल येऊन पॅराग्लायडिंग नाही केलं तर काय मजा.

…आणि वर्केशनला सुरूवात

पहिले पाच दिवस धमाल केल्यानंतर कामाला सुरुवात झाली. रोज नवा कॅफे किंवा नवी जागा शोधून तिथे काम करण्याची मजा काही औरच होती. तेथील प्रसिद्ध खाणं खायचं, फिरायचं आणि धमाल करत काम करायचं. या सगळ्यांत घरी दिवसाला दोन फोन हवेच… नाही तर गोंधळ उडायचा.

साधारण 10 दिवस असंच काम केलं आणि इच्छा नसतानाही परतीचा प्रवास सुरू केला. निघतानाच्या दिवशी होस्टेलमधील साधारण सगळेच जाऊ नकोचा मंत्रच जपत होते…

रस्त्याने निघताना ओळखीचे लोक 'अरे मॅडम जा रही हो… दशहरा करके जाते' असं म्हणत होते. हे सगळं ऐकल्यावर आपण आयुष्यात चांगली माणसं कमावलीत याची जाणीव झाली. त्यातील काही अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहेतच.

परतीच्या प्रवासा दरम्यान अमृतसरला दर्शन घेतलं आणि घरी निघाले.

हा प्रवास संपला मात्र नव्या प्रवासासाठी नवी उर्जा मिळाली.

घरी पोहोचल्यावर काही दिवस मन लागत नव्हतंच, सारखं तिकडेच जाऊन राहावं का? हा विचार यायचा पण काय प्रत्येक प्रवास थांबतोच ना? तसाच हाही थांबला. पण खऱ्या अर्थानं माझ्या 'सोलो ट्रिप'च्या प्रवासाला सुरुवात झाली.

माझं प्रवासवर्णन ऐकून, तिथे मी कसं राहिले हे सांगितल्यानंतर मी एकटी फिरू शकते यावर घरच्यांचा विश्वास बसला. आणि त्यांनी मला कुठेही जाण्याची परवानगी देऊन टाकली.

तेव्हापासून आतापर्यंत अनेक ठिकाणं गाठली. त्यात दिल्लीची सफर सुरू आहेच कारण कामासाठी आता नवं शहर गाठलंय.

या प्रवासांमुळे मला काही प्रश्नांची उत्तर सापडली..

-मुलींना एकटं फिरणं योग्य आहे का?

तर मी म्हणेन हो.. हे खूप गरजेचं आहे हे फक्त म्हणण्यापूरतं स्वातंत्र्य नाहीये. तर आपण आयुष्यात स्वावलंबी आहोत ही फिलींग आहे.

-बाहेरचं जग खरंच चांगलं आहे का?

तर माझ्या वडिलांनी पहिल्याच फोनवर म्हटल्याप्रमाणे… 'काही घडायचं असेलच तर ते जागा बघून घडत नाही.' त्यामुळे बाहेरचं जग आपल्या सारख्या लोकांनीच बनलंय आपण चांगले आहोत ना? स्वत:ला आपण सांभाळू शकतो ना हे जास्त महत्त्वाचं आहे.

-काम सांभाळून फिरणं होतं का?

हो, आपण काम करतोय म्हणजे स्वत:साठीच कमावतोय ना? मग स्वत:वर खर्च करताना का मागेपुढे बघायचं? सुट्टीचा दिवस फक्त आराम करायलाच नसतो आपण अनेक गोष्टी त्यात करू शकतो.

माझ्यातला आत्मविश्वास जागा झाला

एकूणच या सगळ्या प्रवासानं मला माझीच नव्यानं ओळख करून दिली. आत्मविश्वास असेल तर माणूस काहीही मिळवू शकतो असं म्हणतात पण तो आत्मविश्वास मिळवायला काय करावं? तर मला वाटतं मनमोकळं राहावं, फिरावं आणि स्वत:वर प्रेम करावं.

माझ्यात या प्रवासानं अनेक पद्धतीनं बदल घडवून आणलेत, एकटीच राहणारी मी अनोळखी लोकांमध्ये धमाल करायला शिकले, पुणे मुंबई हाच आपला कंफर्टझोन समजणारी मी आता कामासाठी दिल्लीला शिफ्ट झालीये, सोशल मीडियावर व्यक्त व्हायला शिकले आणि हो मान वर करून माझी मतं मांडायला मी शिकले.

एवढंच नाही तर माझ्या आई-वडिलांचा विश्वासही जिंकले. हे सगळं एका प्रवासाने शक्य झालं असं मी म्हणत नाहीये, पण या प्रवासातील लहान-सहान अनुभवांमुळेच शक्य झालं असं मी नक्की म्हणेन.

फक्त हिमाचल प्रदेश फिरून मी थांबले नाही, नंतर जयपूर, पुष्कर, आग्रा अशी अनेक ठिकाणं पाहिली पण त्या ट्रिपमध्ये काय धमाल केली हे तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगेन...

वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)