गाडीच्या डिकीमध्ये मृतदेह ठेवताना गूगलनं पाहिलं?

गुगल स्ट्रीट व्ह्यू इमेज

फोटो स्रोत, Google Maps Streetview

    • Author, रॉबर्ट ग्रीनॉल
    • Role, बीबीसी न्यूज

एक माणूस त्याच्या कारच्या डिकीमध्ये प्लास्टिकची पांढरी मोठी पिशवी ठेवत असल्याचं गुगल स्ट्रीट व्ह्यू इमेजमध्ये दिसलं. त्यामुळं खुनाच्या एका प्रकरणाचा उलगडा करण्यात मदत झाल्याचं स्पॅनिश शहर पोलिसांनी सांगितलं आहे.

Google ॲपच्या मदतीनं वापरकर्त्यांना जगभरातील रस्त्यांचे फोटो पाहता येतात. कॅमेरे लावलेल्या कारच्या माध्यमातून वेळोवेळी हे फोटो क्लिक केले जात असतात.

अशाच एका कारची आणि त्या कारद्वारे काढलेल्या फोटोची खुनाचं प्रकरण उलगडण्यात मदत झाली आहे.

या प्रकरणात पीडित व्यक्तीचा मृतदेह काढला जात असतानाच नेमका क्षण फोटोमध्ये कैद झाला.

गुगल मॅप तयार करताना Satellite and ariel imagery म्हणजे उपग्रह छायाचित्र आणि आकाशातून काढण्यात आलेल्या छायाचित्रांच्या मदतीने एक अचूक नकाशा तयार केला जातो.

यामध्ये अधिक भर घातली जाते ती Street View द्वारे. यासाठी सुरुवातीच्या काळात गुगलने काय केलं, तर जेव्हा 2007 मध्ये अमेरिकेत हे फीचर लाँच करण्यात आलं तेव्हा गुगलने कार्स, बोटी, स्नोमोबील आणि इतर वाहनांवर 360 डिग्री फोटो कॅमेरे लावले आणि या वाहनांनी सगळ्या रस्त्यांचे फोटो काढले. नंतर जगभरात हीच गोष्ट करण्यात आली. अगदी वाळवंटामध्ये गुगलने उंटावरही कॅमेरे लावले होते.

सुरुवातीच्या उपग्रह छायाचित्रांच्या पहिल्या लेयरवर ही स्ट्रीट व्ह्यूच्या माहितीची पुढची लेयर लावली जाते.

दरवर्षी गुगल मॅप्सच्या फीचर्समध्ये आणि क्षमतांमध्ये सुधारणा होत गेली. म्हणजे आधी फक्त नकाशा दाखवणारं अॅप, त्यावेळची ट्रॅफिकची स्थिती दाखवू लागलं. त्या परिसरातले उद्योग, महत्त्वाची ठिकाणं, स्मारकं, बागा यासगळ्याविषयीची माहितीही या अॅपमध्ये आली. आता या गुगल मॅपच्या स्ट्रीट व्ह्यूचा उपयोग एका हत्येचं प्रकरण उलगडण्यासाठी केला गेला आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एक व्यक्ती बेपत्ता होऊन तिची हत्या झाली होती. याप्रकरणी आरोप असलेल्या दोघांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. बेपत्ता व्यक्तीचे तुकडे केलेले अवशेष गेल्या आठवड्यात स्मशानभूमीत सापडले होते.

उत्तरेकडील सोरिया प्रांतातील ताजुएको शहरात गेल्या 15 वर्षांत पहिल्यांदाच Google कार पोहोचली होती.

या कारच्या फोटोंमध्ये कुणीतरी मोठ्या पांढऱ्या पिशवीची वाहतूक करत असल्याचं अंधुकपणे दिसत आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

असं असलं तरी, या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी हे फोटो पुरेसे आहेत असं नसल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

एल पेस वृत्तपत्रानुसार, या प्रकरणातील पीडित व्यक्ती 33 वर्षीय क्यूबन नागरिक आहे. तो ऑक्टोबर 2023 मध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या फोनवरून एका नातेवाईकाला मेसेजद्वारे मिळाली आणि ही बाब नातेवाईकाला संशयास्पद वाटली.

लाल रेष
लाल रेष

पीडित माणूस एका महिलेला भेटला होता. तो स्पेन सोडत होता आणि त्यावेळी त्याला फोन नको होता, असं नातेवाईकानं पोलिसांना सांगितलं.

या वर्षी 12 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती. ती या बेपत्ता झालेल्या पुरुषाची पार्टनर (सहकारी) होती. तसंच पीडित व्यक्तीची माजी सहकारी असलेल्या एका पुरुषालाही अटक केली होती.

या महिन्याच्या सुरुवातीला एक कुजलेला मृतदेह जवळच्या स्मशानभूमीतून काढण्यात आला होता. तो पीडित व्यक्तीचा असल्याचं सांगण्यात आलं होतं.

या प्रकरणातील आरोपींना कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.