हर्षिता ब्रेला कोण आहे, जिचा मृतदेह लंडनमध्ये गाडीच्या डिकीत सापडला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आयुष्याचं सुंदर स्वप्नं तिच्या मनाशी होतं...मात्र भोळ्याभाबड्या हर्षिता ब्रेलाच्या वाट्याला आला छळ आणि मृत्यू
    • Author, समिरा हुसैन
    • Role, दक्षिण आशिया प्रतिनिधी, दिल्ली

महिलांवरील अत्याचाराची नवनवीन प्रकरणं सातत्यानं समोर येत असतात. त्यातही पती-पत्नीतील वाद किंवा सासरच्या मंडळींकडून महिलेचा होणारा छळ आणि त्यातून घडणारे गुन्हे अनेकदा समोर येत असतात.

परदेशात जाऊन सुखी संसार करण्याचं आणि एक छान, सुंदर आयुष्य जगण्याचं स्वप्नं अनेक मुलींचं असतं. हर्षिता ब्रेला ही अशीच भविष्याची स्वप्नं रंगवणारी तरुणी होती.

मात्र हर्षिताच्या वाट्याला वेगळंच आयुष्य आलं. इतकंच नाही तर तिला जीवाला देखील मुकावं लागलं. हर्षिता ब्रेलाच्या विवाहानंतरच्या छळाची आणि मृत्यूची हेलावून टाकणारी कहाणी...

हर्षिता ब्रेला यांनी कथितरित्या त्यांच्या आईला सांगितलं होतं की त्यांचा पती 'त्यांचा जीव घेणार आहे'.

पूर्व लंडनमध्ये एका कारच्या डिकीमध्ये हर्षिता यांचा मृतदेह सापडण्याच्या काही आठवडे आधी त्यांनी आपल्या आईला हे सांगितलं होतं.

पोलिसांना वाटत आहे की, या 24 वर्षीय तरुणीची नॉर्थम्पटनशायरमधील कॉर्बी शहरात 10 नोव्हेंबरला गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर हर्षिताचा मृतदेह इलफोर्डला नेण्यात आला. 14 नोव्हेंबरला हर्षिताचा मृतदेह सापडला होता.

हर्षिता यांचे पती पंकज लांबा हे या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आहेत.

"त्यानं तिचं आयुष्य अतिशय दयनीय केलं होतं," असं हर्षिता यांच्या आई सुदेश कुमारी यांनी बीबीसीला सांगितलं. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

"ती म्हणाली होती की, मी पुन्हा त्याच्याकडे जाणार नाही. तो मला मारून टाकेल," असं सुदेश कुमारी म्हणाल्या.

ब्रेला कुटुंबाची न्यायाची प्रतीक्षा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हर्षिता यांच्या कुटुंबाला वाटतंय की, पंकज लांबा भारतात आहेत. त्यामुळे भारतीय पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. मात्र भारतीय पोलीस त्यांचं ऐकत नाहीत. तर स्थानिक पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की, युकेमधील अधिकाऱ्यांनी त्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केलेली नाही.

53 वर्षांचे सतबीर ब्रेला हर्षिता यांचे वडील आहेत. दिल्लीतील घरातील फारसं फर्निचर न नसलेल्या दिवाणखान्यात मुलीच्या फोटोची फ्रेम हातात धरून हुंदके देत एक बाप आपल्या मुलीसाठी न्यायाची याचना करत होता.

"मी तिला नेहमी म्हणायचो, मी जेव्हा मरेन तेव्हा तुझ्या हातानंच माझे अंत्यसंस्कार व्हावेत अशी माझी इच्छा आहे. मात्र मला जराही कल्पना नव्हती की मलाच तिचे अंत्यसंस्कार करावे लागतील," असं आपल्या लेकीच्या मृत्यूच्या दु:खात बुडालेल्या सतब्रीर ब्रेला यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

मृत्यूपूर्वी काही आठवडे अगोदर हर्षिताचा गर्भपात झाला होता, असं देखील तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

हा कथित गुन्हा युकेमध्ये घडल्यामुळे स्वत:हून या गुन्ह्याची दखल घेत त्याचा तपास करू शकत नाहीत, असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. या गुन्ह्याची भारतात तक्रार दाखल केल्याशिवाय इथे फारसं काही करता येणार नाही.

तर युकेतील नॉर्थम्पटनशायर पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाचा "ते वेगानं तपास करत आहेत" आणि त्यासाठी "वेगवेगळ्या स्तरावर चौकशी देखील" करत आहेत.

मात्र या प्रकरणात ते भारतातील अधिकारी किंवा पोलिसांच्या संपर्कात आहेत की, नाही याबद्दल त्यांनी काहीही सांगितलं नाही.

सहाय्यक मुख्य कॉन्स्टेबल एम्मा जेम्स यांनी सांगितलं की, "आमच्या तपासाची विश्वासार्हता राखणं आणि हर्षिताला न्याय मिळवून देणं हे आमच्यासाठी सर्वात प्राधान्याचं आहे. म्हणूनच या प्रकरणातील काही पैलूंबाबत आम्ही सध्या भाष्य करू शकत नाही."

हर्षिताच्या बाबतीत नेमकं काय घडलं?

सतब्रीर ब्रेला आणि हर्षिताची बहीण सोनिया डबास या दोघांनी सांगितलं की, पंकज लांबा यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे हर्षिताला मारहाण केल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं.

मात्र तरीही त्यांना याबाबत फार स्पष्टपणे माहिती नव्हती. पण 29 ऑगस्टला हर्षितानं वडिलांना, सतब्रीर ब्रेला यांना फोन करून सांगितल्यावर त्यांना सर्व चित्र स्पष्ट झालं.

3 सप्टेंबरला पंकज लांबा यांना अटक करण्यात आली आणि दोन दिवसानंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्यावर त्यांच्याविरोधात डोमेस्टिक व्हायलन्स प्रोटेक्शन ऑर्डर (DVPO)देण्यात आली.

पोलीस आणि न्यायालयासमोर घरगुती हिंसाचार किंवा छळाचं प्रकरण येतं, तेव्हा पीडितेचं संरक्षण करण्यासाठी युकेमधील न्यायालय हा आदेश देतं.

बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.
बीबीसी मराठीच्या बातम्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा.

यानुसार त्यांना हर्षिताचा छळ करणं, हर्षिताला धमकावणं या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला. तसंच लांबा यांना 480 पौंडाचा दंडदेखील पोलिसांकडे भरावा लागला.

या आदेशाची मुदत 28 दिवसांसाठी होती. 1 ऑक्टोबरला या आदेशाची मुदत संपली. मात्र हर्षिताची बहीण सोनिया डबास म्हणाल्या की, हर्षिता आणि त्यांच्या कुटुंबियांना वाटलं की, या आदेशाची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंतच आहे.

नॉर्थम्पटनशायर पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी हर्षिताला या आदेशाच्या मुदतीबद्दल सांगितलं होतं.

'ती निर्मळ, निरागस होती'

हर्षिता आणि पंकज लांबा यांचा ऑगस्ट 2023 मध्ये कायदेशीर विवाह झाला होता. 22 मार्च 2023 ला या जोडप्याचा पारंपरिक भारतीय पद्धतीनं लग्नसोहळा पार पाडला.

हर्षिता यांचे पती म्हणजे पंकज लांबा युकेतील कॉर्बी शहरात वास्तव्यास असल्यामुळे पतीबरोबर राहण्यासाठी एप्रिलअखेर हर्षिता युकेत गेल्या होत्या.

"ती खूपच साधीभोळी होती. ती लोकांवर चटकन विश्वास ठेवायची. एका दृष्टीनं ती मनानं अजूनही लहानच होती. ती अतिशय निर्मळ मनाची होती, निरागस होती."

हर्षिताची आई
फोटो कॅप्शन, हर्षिताची आई

हर्षिताच्या आई सुदेश कुमारी यांनी सांगितलं की, लग्नानंतर नवं आयुष्य सुरू करण्यासाठी हर्षिता युकेला जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी नवी दिल्ली विमानतळावर त्यांनी लेकीला शेवटचं पाहिलं होतं.

"मला निरोप देताना हर्षिता खूप रडत होती. मला हे माहिती नव्हतं की, माझी लेक त्या दिवशी माझा शेवटचा निरोप घेत होती," असं सुदेश कुमारी म्हणाल्या. लेकीच्या शेवटच्या भेटीबद्दल बोलताना सुदेश कुमारींच्या अश्रूंचा बांध फुटला होता.

हर्षिताच्या बहीण सोनिया डबास, आई शेजारी एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांनी दावा केला की, हर्षिताच्या पतीनं सुरूवातीपासूनच हर्षितावर खूप बंधनं घातली होती.

हर्षिताचा छळ आणि मृत्यू

सोनिया डबास पुढे म्हणाल्या, "व्यक्तीश: तो मला आवडला नव्हता. त्याने माझ्या बहिणीला (हर्षिता) माझ्याशी बोलण्यास मनाई केली होती. हर्षितानं आम्हाला सांगितलं होतं की, आम्ही तिला फोन करू नये. पंकज जवळपास नसताना ती आम्हाला फोन करत जाईल."

सोनिया डबास म्हणाल्या, "पंकज हर्षिताची फसवणूक करत होता. तो तिला एक छान आयुष्य जगण्याचं स्वप्न दाखवत होता. त्याच्या या फसवणुकीला ती बळी पडत होती. तिचा त्याच्यावर विश्वास होता. ती त्याच्या जाळ्यात सापडत राहिली."

सोनिया डबास म्हणाल्या की, त्यांच्या बहिणीकडे पैसे नसायचे. पैशांसाठी हर्षिता पूर्णपणे पंकजवर अवलंबून होती. हर्षिता एका वेअरहाऊसमध्ये नोकरी करत होती. मात्र हर्षिताचं बँक खातं आणि तिला मिळणाऱ्या पगारावर पंकजचं पूर्ण नियंत्रण होतं.

"ती स्वत:साठी एक साधं चॉकलेटदेखील विकत घेऊ शकत नव्हती. ती एक अतिशय वेदनादायक आयुष्य जगत होती. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत होता," असं आपल्या बहिणीच्या आयुष्याची व्यथा मांडताना सोनिया म्हणाल्या.

पंकज लांबा यांना अटक करण्यात आल्यानंतर हर्षिता यांना घरगुती छळाचा, अत्याचाराचा मोठा धोका असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी सुरक्षिततेसाठी हर्षिताला एका आश्रयस्थानात ठेवलं.

उत्तर नॉर्थम्पटनशायर कौन्सिलचे प्रमुख जेसन स्मिथर्स यांनी सांगितलं की, त्याचवेळी हर्षितासाठी एक सुरक्षा योजना तयार करण्यात आली.

हर्षिताच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, तेव्हाच हर्षिताची तब्येत बिघडली आणि हर्षिताला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तिथे हर्षिताला कळालं की त्या गरोदर आहेत. मात्र दुर्दैवानं काही दिवसात त्यांचा गर्भपात झाला.

मुलीशी शेवटचं बोलणं झाल्यानंतर हर्षिताच्या कुटुंबियांनी तीन दिवसांनी आपल्या मुलीच्या सुरक्षिततेच्या चिंतेमुळे नॉर्थम्पटनशायर पोलिसांशी संपर्क केला.

त्यांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतरच हर्षिताचा मृतदेह सापडला आणि हर्षिताच्या हत्येचा तपास सुरू झाला.

पोलीस दलानं हे प्रकरण इंडिपेंडन्ट ऑफिस फॉर पोलीस कंडक्ट (IOPC)कडे पाठवलं आहे. हर्षिताचा छळ होत असल्याबद्दल आधीच पोलिसांकडे तक्रार आलेली असल्यानं हे पाऊल उचलणं बंधनकारक आहे.

आयओपीसी ही इंग्लंडमधील एक स्वतंत्र संस्था आहे. पोलीस दलाविरोधात करण्यात आलेल्या तक्रारी हाताळण्याचं काम ही संस्था करते.

हर्षिताचा मृतदेह भारतात आणल्यानंतर, 3 डिसेंबरला हर्षिताच्या अंत्यसंस्कारासाठी ब्रेला कुटुंबाच्या भारतातील घराबाहेर डझनावारी लोक जमले होते.

सहाय्यक मुख्य कॉन्स्टेबल एम्मा जेम्स म्हणाल्या की नॉर्थम्पटनशायर पोलीस हर्षिताच्या कुटुंबाच्या नियमितपणे संपर्कात होते.

त्या पुढे म्हणाल्या, "मला ही बाब स्पष्ट करायची आहे की, हर्षिता ब्रेला आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या प्रकरणाची उकल करण्यासाठी नॉर्थम्प्टनशायरमधील डिटेक्टिव्हची एक टीम चोवीस तास काम करत आहे."

या प्रकरणाच्या तपासाबद्दल असलेली उत्कंठा लक्षात घेता तपास कुठपर्यंत आला आहे हे जाणून घेण्याची हर्षिताच्या कुटुंबाची आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा असणं स्वाभाविक आहे.

ही बाब लश्रात घेत सहाय्यक मुख्य कॉन्स्टेबल एम्मा जेम्स यांनी पुढे सांगितलं की, "या प्रकरणातील आमच्या तपासाबद्दल आणि हर्षिताच्या मारेकऱ्याच्या शोधाबाबत सर्वसामान्य लोकांना देण्यासाठी आमच्याकडे जेव्हा अधिक माहिती असेल तेव्हा आम्ही ती नक्कीच देऊ."

आकृती थापर यांचं अतिरिक्त वार्तांकन

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)