सोन्याच्या बदल्यात सेक्स, अवैध खाणींमधील जळजळीत वास्तवाचा ग्राऊंड रिपोर्ट

नतालिया कॅवलकॅन्टे
फोटो कॅप्शन, नतालिया कॅवलकॅन्टे म्हणतात की, सेक्स वर्कर म्हणून मिळालेल्या पैश्यांमधून त्यांनी स्वतःच घर बांधलं आहे.
    • Author, ताइज करंजा आणि एमा एल्स
    • Role, बीबीसी ब्राझील

डेयान लेटी यांना कधीही सेक्स वर्कर बनायचं नव्हतं. पण वयाच्या 17 व्या वर्षी त्यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.

त्यावेळी पतीच्या अंत्यसंस्कारासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. डेयान या ब्राझीलच्या उत्तरेकडील पॅरा राज्यातल्या इटैतुबा इथे राहतात.

हे शहर ब्राझीलच्या मध्यभागी आहे आणि त्या भागात मोठ्या प्रमाणावर अवैध सोन्याच्या खाणीचा व्यवसाय चालतो. डेयान यांच्या एका मैत्रिणीने त्यांना सल्ला दिला, की ॲमेझॉन जंगलाच्या अंतर्गत भागात जाऊन खाण कामगारांसोबत सेक्स करून त्यांना पैसे कमवता येतील.

गेल्या 16 वर्षांपासून इटैतुबात राहणाऱ्या महिलांचा हाच दिनक्रम आहे. अनेक महिला तिथल्या सोन्याच्या खाणींमध्ये जेवण बनवण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, तिथल्या खानावळीत काम करण्यासाठी किंवा मग सेक्स वर्कर म्हणून जातात.

सोन्याच्या खाणींमध्ये जाण्याच्या अनुभवाबाबत बोलताना डेयान लेट्टी म्हणतात की, "खाणीत जाणं जोखमीचं काम आहे. तिथे जाणं जुगार खेळल्यासारखं आहे. तिथे महिलांचं गंभीर शोषण केलं जातं. त्यांना मारहाण केली जाऊ शकते किंवा त्यांना धमकावलं देखील जातं."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्या म्हणाल्या की, "एकदा मी माझ्या बेडरूममध्ये झोपले होते, तेव्हा एक माणूस खिडकीतून उडी मारून त्या खोलीत आला. आणि त्याने माझ्या डोक्यावर बंदूक रोखली. त्यांना असं वाटतं की पैसे दिल्यानंतर ते आम्हा महिलांचे मालकच झाले आहेत."

डेयान लेटी यांनी वयाच्या 18व्या वर्षी त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. आता सात जणांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

महिलांसाठी ही एक अत्यंत सामान्य बाब आहे

नतालिया कॅवलकॅन्टे यांनी वयाच्या 24 व्या वर्षी या खाणींजवळच्या वस्तीमध्ये सेक्स वर्कर म्हणून काम सुरु केलं.

त्या म्हणाल्या की, "या शहरातल्या सगळ्याच महिला सेक्स वर्कर म्हणून काम करत आहे असं मी म्हणणार नाही. पण हे काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी नाहीये."

त्यांनी सांगितलं की, "इथे सेक्स वर्कर असणं ही एक अत्यंत सामान्य गोष्ट आहे आणि आम्हाला त्याची पर्वाही नाही."

हे काम करत असतानाच नतालिया यांनी एका बार मालकाशी लग्न केलं. त्यानंतर त्या एका वेश्यागृहाच्या मालकीण म्हणून काम करू लागल्या.

ॲमेझॉनच्या वर्षावनांमध्ये असलेल्या या खाणींच्या गावात माणसाचं जगणं खूप कठीण आहे.

कोट कार्ड

या गावातले बहुतांश रस्ते नेहमी धुळीने माखलेले असतात. या गावात एक चर्च आहे आणि दारूचं दुकान आहे. खाणीत काम करणारे लोक गावच्या बाहेर लाकडांपासून बनवलेल्या झोपड्यांमध्ये राहतात.

ज्या महिलांना येथे स्वयंपाक करायचा आहे त्यांना छावणीत पुरुषांसोबतच राहावं लागतं.

नतालिया यांनी सांगितलं की, हे खाण कामगार गावात तेव्हाच दिसतात जेव्हा त्यांना खाणीत काम करत असताना सोनं सापडतं आणि खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असतात.

या महिलांनी सांगितलं की काही काही वेळा या खाण कामगारांना सेक्स करण्यापूर्वी अंघोळ करण्याची विनंती करावी लागते. ब्राझीलमध्ये वेश्यागृह चालवणं बेकायदेशीर नाही.

पण, नतालिया म्हणतात की, त्यांनी यासाठी कधीही कमिशन घेतलं नाही. त्यांनी बारमध्ये लोकांना फक्त नोकरी दिली आणि तिथल्या खोल्या भाड्याने दिल्या.

ब्राझील सरकार म्हणतं की हा आकडा 80 हजारांपासून 8 लाखांपर्यंत असू शकतो.
फोटो कॅप्शन, ब्राझील सरकार म्हणतं की, हा आकडा 80 हजारांपासून 8 लाखांपर्यंत असू शकतो.

इतर महिलांना या व्यवसायात आणण्याबाबत त्यांना काय वाटतं? असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या की, "कधी कधी मला वाटतं, मी सुद्धा या टप्प्यातून गेले आहे, आणि मला माहित आहे की ते चांगलं नाही. पण, मग मला वाटतं, मुलींनाही कुटुंबं असतात, मुलं असतात. त्यांचं पालनपोषण करावं लागतं."

लग्नाआधी नतालिया यांनीही भरपूर पैसे कमावले होते. आता इटैतुबामध्ये त्यांचं स्वतःच घर आहे. त्यांच्याकडे एक मोटारसायकलसुद्धा आहे. याशिवाय खाण कामगारांसोबत केलेल्या सेक्सच्या बदल्यात त्यांना मिळालेलं सोनंही आहे.

एकदा सेक्स केल्यानंतर त्या बदल्यात खाणकामगाराकडून त्यांना दोन ते तीन ग्रॅम सोनं मिळायचं. आता नतालिया यांना अभ्यास करून वकील किंवा आर्किटेक्ट व्हायचं आहे.

त्या सांगतात की, इटैतुबामध्ये अशा काही महिला आहेत ज्यांनी व्यवसायातून कमावलेल्या पैशातून तिथे स्वतःच स्थान निर्माण केलं आहे.

इटैतुबाला 'गोल्ड नगेट सिटी' असंही म्हणतात.

असं असलं तरी एवढ्या हिंसक आणि अराजकता माजलेल्या परिसरात जाऊन काम करणं हे महिलांसाठी खूप जोखमीचं ठरू शकतं.

खाणींच्या परिसरात कोणते धोके आहेत?

खाणींमुळे पर्यावरणाचं नुकसान होतं हे अनेकांना ठाऊक आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, खाणींच्या परिसरात हिंसा, शारीरिक शोषण आणि तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होते. याविषयी फारसं बोललं जात नाही.

मौल्यवान धातूंचा व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, या खाणींमधून मिळणाऱ्या अवैध सोन्याला कायदेशीर खाणींच्या सहकार्याने वैध बनवलं जातं.

इन्स्टिट्यूटो एसकोल्हास या थिंक टॅन्कच्या मते, कॅनडा, स्वित्झर्लंड आणि ब्रिटन हे ब्राझीलच्या सोन्याचे प्रमुख ग्राहक आहेत. ज्या ज्या ठिकाणी उत्खनन होतं, त्या त्या ठिकाणांहून मिळणाऱ्या सोन्यापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त सोनं युरोपात पाठवलं जातं.

रायली सँटोस
फोटो कॅप्शन, खाणींच्या परिसरात असणाऱ्या एका गावात रायली सँटोसची हत्या करण्यात आली होती. तिने कथितरित्या एका पुरुषासोबत सेक्स करण्यास नकार दिला होता.

खाणींच्या परिसरात असणाऱ्या गावांमध्ये होणाऱ्या महिलांच्या हत्या देखील लपून राहत नाहीत.

गेल्या वर्षी 26 वर्षांच्या रायली सँटोसचा मृतदेह तिच्या खोलीत सापडला होता. ही खोली कुइउ-कुइउ सोन्याच्या खाणीजवळ होती, जी इटैतुबापासून 11 तासांच्या अंतरावर आहे.

रायली सँटोस यांच्या बहीण रायलेन म्हणतात की, "एका व्यक्तीने तिच्या बहिणीला सेक्सच्या बदल्यात पैसे देण्याची ऑफर दिली होती. पण ती संबंध ठेवायला तयार नव्हती."

यानंतर त्या व्यक्तीने माझ्या बहिणीला शोधून काढलं आणि तिला इतकी मारहाण केली की त्यातच तिचा मृत्यू झाला.

रायलेन यांनी सांगितलं की, "माझा जन्म एका खाणीत झाला. मी खाणीत वाढले आहे. आणि आता मला या खाणींमध्ये राहण्याची भीती वाटते."

रायली सँटोस यांच्या मृत्यूप्रकरणात आता एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ब्राझीलमधल्या खाणींचा परिसर

मागच्या दहा वर्षांमध्ये ब्राझीलमधल्या अवैध सोन्याच्या खाणींच्या परिसरात दुपटीने वाढ झाली आहे. सध्या ब्राझीलमध्ये 2 लाख 20 हजार हेक्टरवर अवैध खाणी पसरल्या आहेत.

या परिसरात नेमक्या किती महिला काम करतात, हे कुणालाही माहीत नाही. तसेच या अवैध खाणींमध्ये काम करणाऱ्या बेकायदेशीर कामगारांची संख्या देखील कुणाला माहीत नाही. ब्राझील सरकार म्हणतं की हा आकडा 80 हजारांपासून 8 लाखांपर्यंत असू शकतो.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या राजवटीत सरकारने अवैध खाणी बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत.

डेयान लेटी
फोटो कॅप्शन, डेयान लेटी

या खाणींमधून मिळणाऱ्या सोन्याची खरेदी थांबवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आले आहेत. मात्र सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने, याठिकाणी नशीब अजमावायला येणाऱ्यांचा लोंढा थांबत नाहीये.

डेयान लेटी यांना आता सोन्याच्या खाणींच्या परिसरात काम करायचं नाहीये. कारण, या भागात अनेक अडचणी येत असून, जीवाची जोखीम वाढली आहे. मात्र त्यांना दोन तीन महिन्यांसाठी का होईना परत तिथे जायचं आहे.

तिथे दोन-तीन महिने काम करून, त्यांना एक स्नॅक बार सुरु करायचा आहे. एकटी काम करत असताना त्यांना नेहमी त्यांच्या मुलांची चिंता सतावत असते.

त्या म्हणतात की, "मला यश मिळेपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. कारण, मला असं वाटतं की एकदिवस माझी मुलं माझ्या कष्टाची जाण ठेवून म्हणतील की, आमच्या आईने कधीच हार मानली नाही."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.