'दोघींचा खून करुन तो माझ्या रुममध्ये आला पण प्रकाशाच्या एक झोतानं माझा जीव वाचला'

फोटो स्रोत, Kathy Kleiner Rubin
कॅथी क्लिनर रुबिन हे नाव तसं फारसं लोकांसाठी परिचित नाही. पण कॅथीची हत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचं नाव ऐकल्यानंतर मात्र, अनेकांचा भुवया उंचावल्याशिवाय राहत नाही.
मृत्यूच्या दाढेतून सुटल्याची उपमा कॅथी यांना तंतोतंत लागू होते.
खरं पाहता कॅथी यांनी सर्वात आधी अवघ्या 12 वर्षांच्या असताना मृत्यूचा थेट सामना केला होता. त्यावेळी त्यांना ल्युपस हा प्रतिकारशक्तीशी संबंधित आजार झाला होता. त्यासाठी त्यांना किमोथेरपी घ्यावी लागली होती.
या आजाराचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर त्या 1978 मध्ये फ्लोरिडाच्या स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये आनंदी जीवन जगत होत्या. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना जीवनातला सर्वांत मोठा धक्का बसला.
कॅथी राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये त्या रात्री एक अज्ञात व्यक्ती शिरला होता. तो होता सिरियल किलर टेड बंडी.
त्यानंतर जे घडलं ते अत्यंत भयावह होतं. टेड बंडीनं केलेल्या हल्ल्यामध्ये त्या हॉस्टेलमधील दोन जणींचा मृत्यू झाला होता. तर कॅथी आणि त्यांची रुममेट दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या.
या घटनेनंतरही कॅथी अगदी सर्वसामान्य जीवन जगल्या. त्यांचा दृढविश्वास एवढा ठाम होता की, त्यांनी मुलाला 37 वर्षांचा होईपर्यंत याबाबत काहीही समजू दिलं नव्हतं.
कॅथी यांनी एमिली ले ब्यू लुचेसी यांच्या साथीनं त्यांच्या स्वतःच्या जीवनाबाबत एक पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव 'अ लाइट इन द डार्क: सर्व्हायविंग मोअर दॅन टेड बंडी' असं आहे.
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या आऊटलूक कार्यक्रमात त्यांनी जीवनातील या घटनांबद्दल माहितीही दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
कॅथी क्लिनर रुबिन यांचा जन्म फ्लोरिडाच्या मियामीमध्ये झाला होता.
त्यांची आई क्युबाची तर वडील अमेरिकन होते. चांगल्या कुटुंबांमध्ये अनेक चुलत भावांच्या साथीनं त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण अवघ्या 5 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला.
आनंदी बालपण ते गूढ आजार
त्यांच्या आईनं एका जर्मन वंशाच्या व्यक्तीशी दुसरं लग्न केलं. त्यांचेही कॅथीबरोबर चांगले संबंध होते. "ते खरंच खूप चांगले होते. मी कधी विचारही केला नसेल, एवढे ते चांगले होते. त्यामुळं मी त्यांना सावत्र नव्हे तर खरे वडीलच समजायची."
कॅथी यांच्या आई कडक स्वभावाच्या असल्या तरी त्यांचा कॅथीवर खूप प्रभाव होता. घरी उशिरा येण्यासारख्या गोष्टींसाठी त्यांनी कॅथी आणि त्यांच्या भावंडांसाठी नियम केले होते आणि ते सर्वांना पाळावेच लागत होते.
पण वयाच्या 12 व्या वर्षी कॅथी यांना अचानकपणे आजारी असल्यासारखं वाटू लागलं. "सहावीच्या वर्गातील ते अखेरचे दिसत होते. मला कायम सुस्ती आणि थकवा जाणवत असायचा मला काहीही करायची इच्छा नसायची."

फोटो स्रोत, Kathy KleIner Rubin
शाळेनंतर घरी गेल्या तेव्हा त्यांना ताप आलेला असायचा आणि त्या अंथरुणावर झोपी जायच्या. एका बालरोग तज्ज्ञांनी त्यांना मियामी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची शिफारस केली होती.
त्याठिकाणी त्या तीन महिने राहिल्या. पण त्यांना नेमका काय आजार आहे, हे शोधण्यात डॉक्टरांना यश आलं नाही.
कॅथी यांच्या शरिरावर कोणती तरी गोष्ट हल्ला करत आहे, असं त्यांना वाटत होतं. पण त्यांना कशी मदत करावी हे त्यांना कळत नव्हतं. डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. कारण त्या किती दिवस जगतील याची त्यांना शाश्वती नव्हती.
कॅथी यांना ल्युपस नावाचा असाध्य रोग होता. त्यात शरिराची रोग प्रतिकार शक्तीच निरोगी पेशींवर हल्ला करत असते.
या लक्षणांवर उपचारानं नियंत्रण मिळवणं त्यावेळी प्रचंड आव्हानात्मक होतं. डॉक्टरांनी त्यांना किमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला होता. 12 वर्षाच्या मुलीसाठी ते अत्यंत कठीण ठरणार होतं.
एकटेपणानं घेरलेलं वर्ष
"माझे केस गळायला लागले आणि टक्कल पडलं. मी सातवीत होते. एका शिक्षकाबरोबर घरीच असायचे आणि फक्त खिडकीतून बाहेर पाहता येत होतं. फक्त इतर मुलांना खेळताना पाहू शकत होते,"असंही त्यांनी म्हटलं.
त्यांना एवढा एकटेपणा जाणवत होता की, कधी-कधी त्या ऑपरेटरला कॉल करण्यासाठी फोनवर "0" क्रमांक दाबायच्या आणि दुसऱ्या लाईनवरचा आवाज ऐकत बसायच्या.
पण त्यांना मागं हटण्याची इच्छा नव्हती. बराच वेळ त्या अंथरुणावर पडून असायच्या. तरीही आई-वडील येण्याआधी त्या कपडे घालून तयार व्हायच्या आणि टीव्ही पाहण्यासाठी लिव्हींग रूममध्ये जायच्या. जणू काहीच झालेलं नाही, असा दिखावा त्या करायच्या.
वर्षाच्या अखेरीस त्यांना बरं वाटू लागलं. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्यांनी इतरांप्रमाणं सामान्य दिनचर्या सुरू केली.
"त्यांना जीवन जगायचं होतं. कारण त्यांनी त्याचा आनंद घेतलेला होता. मी ल्युपसला निरोप देणार होते, कारण आयुष्यभर त्या आजाराबरोबर राहण्याची माझी इच्छा नव्हती. तसंच शाळेत परत जाण्याची, शॉपिंग करण्याची, मुलीसारखं वागण्याची वेळ आली होती."
विद्यापीठातील नवं जीवन
हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर त्यांनी गेन्सविलेमध्ये फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी (एफएसयू) मध्ये जायचं ठरवलं.
"हे विद्यापीठ मियामीपासून सर्वांत दूर होतं. तिथं निवासी शिक्षणासाठी मोठी सूट मिळाली होती," असं त्यांनी मान्य केलं. आईच्या कठोर शिस्तीतून बाहेर पडता येईल, असा तिचा विचार होता.
"प्रथमच विद्यापीठात जाणाऱ्या सर्वांप्रमाणेच, मलाही पार्ट्यांमध्ये जायचं होतं, थोडा अभ्यासही करायचा होता. नवे मित्र बनवायचे होते आणि नव्या विद्यार्थ्यांसारखा आनंद मिळवायचा होता."
एफएसयूमध्ये कॅथी यांचं पहिलं वर्ष फार चांगलं गेलं. त्यांना सोरोरिटीमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं.
सोरोरिटी हा हॉस्टेलसारखा मुलींचा एक सोशल क्लब होता. त्याठिकाणी मुली एका छताखाली राहून विविध अॅक्टिव्हिटी करायच्या.
त्यांच्या सोरोरिटीबद्दल सांगायचं झाल्यास त्याला, ची ओमेगा म्हटलं जातं होतं. त्यांचं घर एखाद्या वाड्यासारखं महाकाय होतं.
"ते एक मोठं घर होतं. घरात एक पूर्ण डायनिंग हॉल, लिव्हिंग रूम आणि एंटरटेनमेंटसाठी मोठा हॉल होता. त्याठिकाणी एक मोठा सोफा आणि टीव्ही होता," असं त्यांनी सांगितलं.
हॉलमध्ये सुंदर नक्षीदार पायऱ्या होत्या. त्या एका मोठ्या भागाकडं जायच्या. त्याठिकाणी 30 बेडरूम होते.

फोटो स्रोत, Kathy Kleiner Rubin
कॅथी यांच्या बेडरूममध्ये खिडक्या होत्या. त्या खिडक्या पार्किंगच्या दिशेनं उघडायच्या. त्यामुळं फार काही आकर्षक दिसत नसल्याचं बेडची डोक्याची बाजू त्या खिडक्यांकडं केली होती. सूर्याची किरणं त्यातून आत आल्यानंतर प्रकाशानं एवढं लख्ख व्हायचं की, कायम उजेड राहावा म्हणून आम्ही पडदा उघडा ठेवायचं ठरवलं होतं, असं कॅथी म्हणाल्या.
ती अत्यंत आनंदी, उबदार आणि सुरक्षित जागा होती. अडचण होती ती फक्त समोरच्या दाराची. कुलूप तुटलेलं असल्यानं ते उघडं राहायचं.
त्यावेळी अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आणि विशेषतः पश्चिम किनारी भागातील महिलांच्या हत्येच्या प्रकारांनी सगळ्यांच्या चिंता वाढलेल्या होत्या.
टेड बंडी नावाच्या एका सिरियल किलरच्या त्या सगळ्या बळी ठरल्या होत्या.
पण कॅथी फ्लोरिडामध्ये शांतता आणि आनंदात राहत होत्या. तिथून तो भाग फार दूर होता. देशाच्या दुसऱ्या कोपऱ्यातल्या टेड बंडी नेमका कोण आहे, हेही कॅथी यांना माहिती नव्हतं.
पण 14 जानेवारी 1978 च्या रात्रीनंतर सर्वकाही बदललं.
हल्ल्याची रात्र
ती शनिवारची रात्र होती.
कॅथी ओळखीच्या एका दाम्पत्याच्या लग्नासाठी गेलेल्या होत्या. त्यांच्या ओळखीचे इतरही लोक तिथं होते. पण सोमवारी कॅल्कुलसची परीक्षा असल्याचं त्यांना एकदम आठवलं. त्यामुळं त्या बेडरूममध्ये परतल्या. त्याठिकाणी त्यांची रूममेटही अभ्यास करत होती.
त्या रात्री सुमारे 11:30 वाजता झोपल्या. पण काही तासांनी कोणीतरी तुटकं कुलूप असलेल्या दारातून हॉलमध्ये शिरलं आणि पायऱ्यांनी वर गेलं.
दरवाजामध्येच सापडलेला एक लाकडाचा दांडा त्याच्या हातात होता. तो दांडा घेऊन बेडरूमच्या बाहेर फिरत होता.
"तो व्यक्ती मार्गरेट बोमन असलेल्या बेडरूममध्ये शिरला. त्यानं लाकडानं तिच्यावर हल्ला केला, गळा दाबला आणि तिची हत्या केली," असं कॅथी म्हणाल्या.
त्यानंतर तो लिसा लेव्हीच्या खोलीत शिरला. तिच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. त्यानं त्याच लाकडानं तिच्यावर हल्ला केला. तिला चावा घेतला आणि तिचीही हत्या केली.
चावल्याच्या खुणा बोटांच्या ठशा सारख्याच होत्या. त्या खुणा नंतर मारेकऱ्याची ओळख पटवण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
पण हल्लेखोराचं काम संपलेलं नव्हतं. हल्लेखोर जागा ओलांडून पुढं गेला आणि कॅथी आणि त्यांची मैत्रीण असलेल्या रूममध्ये शिरला.
कॅथी आणि त्यांची मैत्रीण बाहेरच्या घटनेबद्दल काही माहिती नसल्यानं शांतपणे झोपलेल्या होत्या. पण दाराला गालिचा घासला गेल्यानं कॅथी यांना जाग आली.

फोटो स्रोत, Kathy Kleiner Rubin
"मी बेडवर बसून पाहत होते. पण काय होतं आहे ते मला समजत नव्हतं. मला माझ्या बेडच्या शेजारी सावलीसारखं काहीतरी दिसलं. मी पाहिलं तेव्हा त्यानं हात वर उचलला होता आणि त्याच्या हातात लाकडाचा एक दांडा होता," असं कॅथी आठवत सांगू लागल्या.
"याच लाकडाच्या दांड्यानं त्यानं मार्गारेट आणि लिसाची हत्या केली होती."
हल्लेखोरानं कॅथीच्या चेहऱ्यावर एवढ्या जोरात हल्ला केला, की तिचा जबडा तीन ठिकाणी अक्षरशः तुटला होता.
कॅथीला तिथंच सोडत त्यांच्या मैत्रिणीवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर पुढं सरकला. कॅथी ओरडणार होत्या, पण तोंड पूर्णपणे फाटलेलं होतं त्यामुळं त्यांना ओरडणंच काय पण त्यांना पुटपुटणंही शक्यच नव्हतं.
हल्लेखोरानं कॅथी यांना मारण्यासाठी पुन्हा त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यानं लाकडाचा दांडा असलेला हात हल्ल्यासाठी उचलला, पण त्याचवेळी पडदे उघडे असलेल्या खिडक्यांमधून प्रकाशाचा एक झोत आला आणि त्यामुळं संपूर्ण खोलीत प्रकाश पसरला.
"एका मुलीला डेटवरून परत हॉस्टेलवर सोडण्यासाठी आलेल्या कारचा तो प्रकाश होता. प्रकाशामुळं हल्लेखोराला क्षणभर काहीच समजलं नाही. तो बेडरूमच्या बाहेर पडला आणि पायऱ्यांवरून हॉलकडे धावला आणि समोरच्या दारातून पळून गेला. पण तिथं आलेल्या कर्मचाऱ्यानं त्याला पाहिलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
त्याचदरम्यान अनेक जखमा झाल्यानंतरही कॅथी कसंबसं स्वतःला सावरत जागेवरून उठल्या.
"मला चेहऱ्यावर चाकूसारखं काहीतरी जाणवलं. हातानं हनुवटी पकडावी लागली. त्या कर्मचाऱ्यानं मला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आणि एका आपत्कालीन नंबरवर कॉल केला."
"मला एका स्ट्रेचरवर बसवलं आणि लाकडी पायऱ्यांवरून खाली नेलं. पोलिसांच्या गाड्यांचे लाईट, फायर ट्रकचे लाल लाइट, अॅम्ब्युलन्सचे लाईट दिसत होते आणि पोलिसांच्या रेडिओचा आवाज ऐकू येत होता. मी एखाद्या कार्निव्हलमध्ये आहे, असं मला वाटत होतं," असं कॅथी त्या घटनेबाबत सांगताना म्हणाल्या.
आधी त्यांच्या जखमांवर उपचार करुन रक्त वाहणं बंद केलं. त्यानंतर त्यांना थेट शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यात आलं आणि तिथं त्यांचा जबडा तारेनं शिवण्यात आला होता.
त्यांना सहा आठवडे हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्यादरम्यान त्यांना फक्त स्ट्रॉच्या मदतीनं दूध सेवन करता येत होतं.
खटल्याची सुनावणी
गंभीर जखमांनंतरही कॅथी यांचा शारिरिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत राहण्याचा दृढनिश्चयच होता.
पण सर्वांत आधी त्यांना 1979 मध्ये खटल्यात हल्लेखोराचा सामना करावा लागणार होता.
मार्गरेट बोमन आणि लिसा लेव्ही यांच्या हत्या आणि कॅथी आणि त्यांच्या रूममेटला गंभीर जखमी केल्यानंतर टेड बंडी लगेचच फ्लोरिडाला गेला. त्याठिकाणी त्यानं 12 वर्षांची विद्यार्थिनी किम्बर्ली लीचचं अपहरण करत तिची हत्या केली. अखेर एक-दोन महिन्यांनंतर त्याला अधिकाऱ्यांनी अटक केली.
कॅथी यांनी सुनावणीदरम्यान हल्ल्याची संपूर्ण कहाणी सांगितली. त्यावेळी बंडी त्यांच्यासमोरच बसलेला होता. त्याला हवं ते तो करणारच अशा आविर्भावानं तो पाहत होता.
कॅथी यांना बंडीची ओळख पटवता आली नव्हती. तरीही त्यांची साक्ष, इतरांच्या साक्षी आणि फॉरेन्सिक तसंच इतर पुराव्यांच्या आधारे त्यांना हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात यश आलं.
"मला त्यामुळं हायेसं वाटलं. मग मी मागच्या दारानं न्यायालयाच्या कक्षाच्या बाहेर निघाले. जवळजवळ मला उलटीच झाली होती."
टेड बंडीला दोन हत्या आणि तीन हत्यांचे प्रयत्न या प्रकरणांत दोषी ठरवण्यात आलं. त्यासाठी ज्युरीला फार विचार विचार करावा लागला नाही. त्यांना सात तासांपेक्षाही कमी वेळ लागला. नंतर त्यांच्यावर आणखी खटले चालवून त्यांना गुन्ह्यांसाठी दोषी ठरवलं जाणार होतं.

फोटो स्रोत, Kathy Rubin
त्याला सुनावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी जवळपास 10 वर्षं लागली. कॅथी यांनी त्यादरम्यान मुलगा मायकलला जन्म दिला होता. त्यांचा घटस्फोट झाला होता आणि त्यांचे सध्याचे पती स्कॉटबरोबर त्यांनी दुसरं लग्नंही केलं होतं.
टेड बंडीला जानेवारी 1989 मध्ये फ्लोरिडामध्ये इलेक्ट्रिक चेअर द्वारे फाशी देण्यात आली. कॅथी यांनी फाशीच्या कारवाईदरम्यान उपस्थित राहण्यास नकार दिला. पण स्कॉटबरोबर त्यांनी घरी टीव्हीवर बातम्यांमधून कव्हरेज पाहिलं.
"मी जोपर्यंत तुरुंगासमोर शववाहिनी जाताना पाहिली नाही, तोपर्यंत मला विश्वासच बसला नाही. मी रडायला सुरुवात केली. सगळ्याच पीडितांसाठी मी रडत होते. अनेकांना मारून त्यानं अकाली आपल्यापासून दूर नेलं होतं."
तेव्हापासून टेड बंडी काही बाबतीत एक प्रसिद्ध नाव बनलं. चित्रपट, डॉक्युमेंटरी आणि पुस्तकांमधून तो अमर झाला. स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करणारा एक आकर्षक, बुद्धिमान व्यक्ती असं त्याचं चित्रण करण्यात आलं.
पण कॅथीसाठी बंडी हा आकर्षणाचा विषय नव्हता. तर एकटा आणि आजारी व्यक्ती होता. एक तरुण व्यक्ती म्हणून त्यानं केलेलं वर्तन हे प्रौढ झाल्यानंतर केलेल्या गुन्ह्यांचा अंदाज येणारं असंच होतं.
"त्यानं प्राण्यांना मारलं होतं. इतर मुलांबरोबरही तसंच वर्तन केलं होतं. त्याचं वर्तन सामान्य नव्हतं आणि ते सामान्य नसल्याचं त्यालाही माहिती होतं," असंही त्या म्हणाल्या.
सामान्य जीवनाला सुरुवात
यापुढं बंडी कोणाला नुकसान पोहोचवणार नाही, हे समजल्यानंतर कॅथी यांना दिलासा वाटत होता.
हल्ल्याच्या अनेक वर्षांनंतरही त्या शांत होत्या. कारण त्यांना लवकरात लवकर सामान्य जीवन सुरू करायचं होतं.
मुलगा मायकलं 37 वर्षांचा होईपर्यंत याबाबत काही सांगितलं नव्हतं. अखेर कॅथीनं रोलिंग स्टोनला मुलाखत दिल्यानंतर मायकलनं त्याबाबत वाचलं होतं.
"मला याबाबत काहीही माहिती नव्हतं. तू खूपच नॉर्मल आहे," असं तो मला म्हणाला.
नॉर्मल शब्दानं त्यांना दिलासा मिळाला. बंडीमुळं त्यांच्याबरोबर जे घडलं त्यातून बाहेर पडल्याची जाणीव त्यांना झाली. कारण त्यांना नॉर्मलच राहायचं होतं. फक्त मायकलसाठीच नव्हे तर कुटुंबासाठी.
कॅथी या केवळ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात क्रूर सिरियल किलरच्या तावडीतून वाचलेल्या नाहीत. तर त्या 12 व्या वर्षी ल्युपस आणि 34 वर्षांच्या असताना स्तनांच्या कॅन्सरमधूनही बचावल्या होत्या.
"मी नेहमी म्हटलं आहे की, तुम्हाला स्पर्धेत धावत राहावं लागेल. आता मोठं झाल्यानंतर मला असं वाटतं की, आपल्याला खूप वेगानं चालावं लागतं आणि अडथळ्यांच्या पलिकडं पाहावं लागतं. कारण पुढं काहीतरी चांगलं घडणार असतं," असं कॅथी म्हणाल्या.











