असा देश ज्याला 'नवीन दुबई' म्हटलं जातंय, ‘जणू संपूर्ण देशाला लॉटरीच लागलीय’

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लिओनार्डो पेरिझी
- Role, बीबीसी ब्राझील
शिव मिसीर आणि हेमंत मिसीर अनुक्रमे 19 आणि 16 वर्षांचे असताना 1982 साली आपला मूळ देश गयाना सोडून कॅनडाला गेले होते.
गयाना सोडल्यावर त्यांच्या मनात एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे, आपण आपलं भविष्य स्वत: घडवायचं.
जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या गयाना देशाला त्यांनी रामराम ठोकला आणि इतर हजारो तरूण नागरिकांप्रमाणे चांगल्या आयुष्याच्या शोधात विकसित देश गाठला.
तिथे कमावलेल्या पैशातून त्यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावायला सुरुवात केली आणि रिअल इस्टेट आणि फायनान्समध्ये करिअर केलं.
पण 39 वर्षांनंतर 2021 मध्ये त्यांनी आपल्या पूर्वीच्या निर्णयाच्या विपरित परतीची वाट चोखाळली. शिव आता 60 वर्षांचे आहेत.
“आता (गयानाला) माघारी जाण्याची वेळ आली आहे," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
अलिकडच्या वर्षांत गयानाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अब्जावधी पेट्रो-डॉलर्सनी दोन भावांना देशात माघारी परतण्याचं आमिष दाखवलंय.
देशाची राजधानी असलेल्या जॉर्जटाऊन येथे उच्च श्रेणीतील मालमत्तांची विक्री आणि भाड्याने देणारी एक रिअल इस्टेट कंपनी त्यांनी स्थापन केली आहे.
शिव आणि हेमंत हे गयानाच्या नव मध्यमवर्गाचे दोन प्रतिनिधी आहेत. अलीकडच्या वर्षांत देशात तेल उत्खनन सुरू झाल्यानंतर ते विकसित देशांतून माघारी आले आहेत.
एकेकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेला गयाना 2019 पासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जातोय.
अभूतपूर्व आर्थिक वाढ
दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील सुरीनाम आणि व्हेनेझुएला या दोन देशांमध्ये गयाना वसलेला आहे.
आजघडीला आठ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेला हा देश सुरूवातीच्या काळात ऊस उत्पादनासाठी डच वसाहत म्हणून उदयास आला.
डच लोकांनंतर इथे इंग्रज आले आणि 1966 पर्यंत इथे ब्रिटिशांची वसाहत होती. त्याच वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळालं.

फोटो स्रोत, BBC Brazil
2015 मध्ये अमेरिकन तेल कंपनी एक्सॉन मोबिलने गयानाच्या किनाऱ्यावर तेलाचे मोठे साठे सापडल्याची घोषणा केली. या तेलाच्या साठ्याचा आर्थिकदृष्ट्या वापर केला जाऊ शकत होता.
त्यानंतरच्या वर्षांमध्ये, एक्सॉन मोबिल, अमेरिकन हेस आणि चीनी कंपनी सीएनओओसीच्या संघाने गयानाच्या किनाऱ्यापासून 200 किलोमीटर अंतरावर विहिरी खोदल्या.
दुबईसोबत तुलना
या देशात आतापर्यंत सुमारे 11 अब्ज बॅरल तेलाचे साठे सापडले आहेत, परंतु ताज्या अंदाजानुसार हे प्रमाण 17 अब्ज बॅरलपर्यंत जाऊ शकतं.
ब्राझीलच्या सध्याच्या 14 अब्ज बॅरल तेलाच्या साठ्यापेक्षा हे अधिक असेल. 2019 पर्यंत गयानाची अर्थव्यवस्था शेती, सोनं आणि हिऱ्यांच्या खाणकामावर आधारलेली होती.
मात्र, तेल उत्खननातून मिळणाऱ्या महसूलाने देशाच्या एकूण विकास दरात किंवा जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं.

फोटो स्रोत, BBC Brazil
2020 मध्ये ब्राझीलचे तत्कालीन अर्थमंत्री पाउलो गुडेझ यांनी गयानाची तुलना संयुक्त अरब अमिरातीमधील त्या शहरासोबत केली, जे तेल संपत्तीचं प्रतीक बनलंय.
पाउलो गुडेझ तेव्हा म्हणाले होते, "ही या प्रदेशाची नवी दुबई आहे." आणि या संदर्भात समोर येणारी आकडेवारी खरोखरंच दखल घेण्यासारखी आहे.
'आयुष्यात एकदाच मिळणारी संधी'
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) चा अंदाज आहे की देशाचा जीडीपी 2019 ते 2023 दरम्यान $5.17 अब्ज वरून $14.7 अब्ज होईल, ही वाढ तब्बल 184 टक्के आहे.
एकट्या 2022 मध्ये जीडीपी वाढीचा दर 62 टक्के राहिला आहे.
त्याचप्रमाणे, दरडोई जीडीपी (रहिवाशांच्या संख्येने भागलेली देशाची संपत्ती) 2019 मध्ये 6,477 अमेरिकन डॉलर वरून 2022 मध्ये 18,199 अमेरिकन डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
अधिक तुलना करायची झाल्यास, हा आकडा 2022 मधील ब्राझीलच्या दरडोई जीडीपीच्या दुप्पट आणि ग्वांटेमालाच्या दरडोई जीडीपीपेक्षा तिप्पट आहे.
गयानासाठी जागतिक बँकेच्या प्रतिनिधी म्हणून काम पाहणा-या डेलिटा डोरेटी यांनी बीबीसीला सांगितलं की, गयानाकडून खूप अपेक्षा आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
“या देशाला लॉटरी लागली आहे असं वाटतंय आणि ही आयुष्यात एकदाच मिळणारी संधी आहे," असं त्या म्हणाल्या.
तेलामुळे झालेल्या विकासाचा परिणाम लक्षात घेता देशातील अर्थव्यवस्थेचा इतर क्षेत्रांवर देखील सकारात्मक परिणाम झालाय.
‘आयएमएफ’च्या मते 2022 साली जीडीपीमध्ये तेला व्यतिरिक्त झालेली वाढीचा दर 11.5 टक्के नोंदवण्यात आलाय. राजधानी जॉर्जटाऊनसारख्या प्रमुख शहरांमध्ये त्याचा प्रभाव पाहायला मिळतोय.
रुग्णालयं, महामार्ग, पूल आणि बंदरं यांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबतच अमेरिकेतील मॅरिएट आणि बेस्ट वेस्टर्न सारख्या आंतरराष्ट्रीय हॉटेल साखळ्यांवर क्रेन आणि बांधकाम मजूर काम करताना पाहायला मिळतायत.
नवीन महामार्गांसोबत देशभरातील बांधकाम उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी ट्रॅक्टर, उत्खनन आणि इतर अवजड बांधकाम उपकरणांनी भरलेली डझनवारी नवी गोदामं उभी राहिली आहेत.
नव मध्यमवर्ग
मिसीर बंधूंनी याच आर्थिक प्रगतीमुळे गयानाला परतण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा कायमचा निर्णय नाहीए.
2021 पर्यंत दोघेही त्यांचा नवीन व्यवसाय चालवण्यासाठी टोरोंटो (कॅनडा) आणि जॉर्जटाउन दरम्यान नियमित प्रवास करायचे.
तेलाच्या महसूलातून उदयोन्मुख मध्यमवर्ग आणि देशातील सध्याच्या उच्चभ्रूंसाठी संधी निर्माण केल्या आहेत, याकडे ते लक्ष वेधतात.
"लोकांना सुरक्षित वाटू लागलंय. त्यांना असं वाटतंय की आपण अशा एखाद्या गोष्टीचा भाग आहोत ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो," असं मिसीर सांगतात.

फोटो स्रोत, BBC Brazil
"गयानामध्ये अनेक श्रीमंत लोक रिअल इस्टेटमध्ये किंवा तेल उद्योगाच्या पुरवठा साखळी नेटवर्कमध्ये काम करतात”, असं ते म्हणतात.
शिव मिसीर म्हणतात की ते अमेरिका किंवा कॅनडामध्ये राहणाऱ्या गयानाच्या इतर नागरिकांना ओळखतात जे तेलाच्या वाढत्या नफ्यातून नफा मिळविण्याच्या आशेने गयानामध्ये मालमत्ता किंवा जमिनीत गुंतवणूक करत आहेत. गयानामध्ये आल्यावर ते आपोआप नवीन मध्यमवर्गाचा भाग बनतात.
"गयानाचे अनेक मूळ निवासी माघारी येत आहेत. ते गेटेड कम्युनिटीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतायत, जिथे त्यांना आधुनिक घरं आणि वैयक्तिक सुरक्षितता मिळेल. त्यांनी आपलं आयुष्य अमेरिका आणि कॅनडामध्ये व्यतीत केलंय. त्यांना इथेही तेच जीवन जगायचंय आहे." असं मिसीर म्हणतात.
शिव मिसीर धनाड्य ग्राहकांना आपली सेवा देतात.
या देशातील उच्चभ्रू वर्ग अजूनही महागड्या वस्तूंची खरेदी परदेशात जाऊन करतो, म्हणूनच गयानामध्ये एकही लक्झरी स्टोअर नाही, असं ते म्हणतात
आकर्षक बाजार
हॉलंड आणि ब्रिटनची वसाहत असूनही गयानाने कॅरिबियन प्रदेशातील त्यांच्या इतर शेजाऱ्यांप्रमाणे अमेरिकेसोबत घनिष्ठ व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंध जपले आहेत.
अमेरिकेपासून गयाना विमानाने चार तासांच्या अंतरावर आहे.
मिसीर सांगतात की, गयानाच्या उच्चभ्रू वर्गातील बहुतांश लोकं आपल्या मुलांना अमेरिका, कॅनडा किंवा युरोपमध्ये शिक्षणासाठी पाठवतात. तिथल्या जीवनशैलीचा उपभोग घेण्यासाठी ते स्वत: मुलांसोबत तिथे जात असतात.
शिव मिसीर म्हणतात की, अलीकडच्या काळात गयानाने केलेल्या वेगावान प्रगतीमुळे देशातील श्रीमंत वर्गाला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळालंय.
"उदाहरण द्यायचंच झालं तर, आमचा व्यवसाय देखील यापैकी एक आहे,” असं ते सांगतात.
मिसिर बंधूंची रिअल इस्टेट एजन्सी मूव्हीटाउन शॉपिंग सेंटरमध्ये आहे. 2019 मध्ये त्यांनी जॉर्जटाउनमध्ये याची सुरुवात केलेली. त्याच वर्षी देशात तेल उत्खननाच्या कामाला सुरूवात झालेली.
जगाच्या नजरेतून
तेलामुळे आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे परिस्थिती कशी वेगाने बदलली आहे याचे इतरही काही संकेत आहेत.
जगभरातील कंपन्या इकडे आकर्षित होतायत. इथल्या पायाभूत सुविधांच्या बांधकाम प्रकल्पांमध्ये त्यांना सहभागी व्हायचंय. अनेक दशकांपासून या देशाला याची गरज होती.
अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारने 2019 मध्ये पायाभूत सुविधा प्रकल्पांवर $187 दशलक्ष खर्च केले. 2023 पर्यंत ही रक्कम 247 टक्क्यांनी वाढून $650 दशलक्षपर्यंत पोहोचली.
जागतिक बँकेच्या डिलेटा डोरेट्टी सांगतात, "मी सुमारे दोन वर्षे गयानामध्ये राहिले. "प्रत्येक वेळी जेव्हा मी परत आले तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी बदल झालाय. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात खूप काम केलं जातंय, नवीन रस्ते आणि हॉटेल्स बांधली जातायत. देशात मोठ्या प्रमाणात नवीन व्यवसाय सुरू होत आहेत हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
गयानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी जगातील इतर देशसुद्धा आकर्षित होत आहेत.
गयानाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमंत्री देवदत्त इंदर बीबीसीच्या ब्राझील सेवेला सांगतात, "आमच्याकडे युरोप, चीन, भारत, अमेरिका, कॅनडा आणि ब्राझीलमधील कंपन्या कार्यरत आहेत. या यादीत चीन हा प्रमुख खेळाडू आहे."
चिनी कंपन्यांच्या एका संघाने नुकतंच नवीन पुलाचं टेंडर मिळवलंय. त्याला बँक ऑफ चायना द्वारे वित्तपुरवठा करण्यात आला आहे. पण इथे चीनला देखील प्रतिस्पर्धी आहेत. 2022 मध्ये एका भारतीय कंपनीने $106 दशलक्ष किमतीची महामार्ग बांधकाम निविदा जिंकली होती.











