हजारो वर्षांपूर्वीच्या माया संस्कृतीचं एक गुपित, जे आजही पाण्याच्या फिल्टरमध्ये सापडतं...

माया संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, अॅलेक्स फॉक्स
    • Role, बीबीसी

टिकाल हे माया सभ्यतेमधील आर्थिक व विधींसंदर्भातील केंद्र होतं. पण इथल्या दगडी महालांच्या व मंदिरांच्या बांधकामासाठी एका मौलिक पदार्थावर प्रभुत्व मिळवणं गरजेचं होतं.

ग्वाटेमालातील टिकाल हे प्राचीन माया सभ्यतेची ओळख सांगणारं शहर आहे. चहुबाजूंनी उंचचउंच चुनखडीच्या पिरॅमिडसदृश रचना इथे पाहायला मिळतात. ही जागा वर्षावनांना लागून असल्यामुळे माकडांच्या आरोळ्या आणि टूकन पक्ष्यांचे आवाज तिथे ऐकू येतात.

ओझी वाहून नेणारी जनावरं, धातूची अवजारं किंवा चाक यांच्या मदतीविना बांधलेल्या या महाकाय इमारती माया सभ्यतेतील एका सर्वांत प्रभावशाली नगर-राज्यामधल्या राजांचं व पुरोहितांचं सत्तास्थान होत्या. या नगर-राज्यामध्ये मॅक्सिकोतील युकातान द्विपकल्प, ग्वाटेमाला, बेलिझ, त्याचप्रमाणे होंडुरास व एल साल्वादोर यांचा समावेश होता.

अलीकडेच लेझरच्या सहाय्याने करण्यात आलेल्या हवाई सर्वेक्षणानुसार, अनेक शतकं घनदाट जंगलात लपलेल्या टिकालमधील या साठ हजारांहून अधिक इमारतींमध्ये कोणे एकेकाळी जवळपास एक कोटी ते दीड कोटी लोक राहत असावेत. हे ठिकाण त्या काळी आर्थिक व विधीविषयक समारंभांचं केंद्र होतं.

टिकालमधील प्रत्येक महाकाय दगडी महालात व मंदिरामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रकाशाचा वावर राहील अशी रचना आहे. त्यामुळे माया सभ्यतेतील वास्तुरचनाकार व खगोलशास्त्रज्ञ यांची क्षमता ठळकपणे जाणवते. पण ग्रहणांचा अचूक अंदाज बांधण्यासाठी व ही गगनवेधी बांधकामं करण्यासाठी टिकालमधील माया लोकांना एका मूलभूत गोष्टीवर वर्चस्व मिळवणं आवश्यक होतं, ती गोष्ट म्हणजे पाणी.

आसपास नद्या अथवा सरोवरं नसल्यामुळे माया लोकांना टिकालमध्ये मोठमोठ्या तलावांची जाळी निर्माण करावी लागली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे पावसाचं पाणी गोळा करून साठवण्यासाठी हे तलाव वापरण्यात आले.

आठव्या शतकात या शहरात सुमारे 40 हजार ते दोन लाख 40 हजार लोक राहात असावेत, असा अंदाज आहे. या लोकांना कोरड् मोसमांमध्येही पुरेल इतकं पाणी तलावांमध्ये साठवलं जात असे. या तलावांमुळे टिकालमध्ये माया संस्कृती एक हजार वर्षांहून अधिक काळ टिकली. सुमारे इसवीसनपूर्व सहाशेपासून सुमारे इसवीसन 900 पर्यंत इथे माया संस्कृती तग धरून होती.

गेल्या वर्षी पुरातत्त्वज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करून माया संस्कृतीच्या औष्णिक कामगिरीचा आणखी एक सखोल आयाम शोधला. टिकालमधील तलावांमधून गोळा केलेल्या गाळाच्या नमुन्यांवरून असं लक्षात आलं की, पाश्चात्त्य अर्धगोलाच्या ज्ञात इतिहासातील सर्वांत जुनी पाणी गाळण्याची व्यवस्था माया लोकांनी निर्माण केली होती.

माया संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

माया संस्कृतीमधील ही जलशुद्धीकरणाची यंत्रणा इतकी प्रगती होती की, त्यात वापरला जाणारा झिओलाइट हा महत्त्वाचा पदार्थ आजही फिल्टरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. झिओलाइट हे ज्वालामुखीजन्य खनिज असून मुख्यत्वे अॅल्युमिनियम, सिलिकॉन व ऑक्सिजन यांपासून बनलेले असते.ज्वालामुळीची राख व अल्कलाइन भूजल यांच्यात प्रक्रिया होऊन झिओलाइटची निर्मिती होते.

हे खनिज विविध रूपांमध्ये उपलब्ध होतं आणि त्याची भौतिक व रासायनिक गुणवैशिष्ट्यं अनन्य स्वरूपाची असतात, त्यामुळे अवजड खनिजापासून ते सूक्ष्मजीवांपर्यंत विविध प्रदूषणकारी घटक गाळणं त्याला शक्य होतं. झिओराइटचे सुटे कण सच्छिद्र, पिंजऱ्यासदृश रचनेचे असतात, त्यामुळे गाळणी म्हणून त्यांच्याद्वारे उत्कृष्ट परिणाम साधला जातो. तसंच ते ऋणभारित असतात, त्यामुळे इतर घटक चटकन त्यांना चिकटतात. याचा अर्थ, पाणी झिओलाइटमधून जात असताना, निलंबित कण झिओलाइटच्या दाण्यांना चिकटतात, तर फटींमधून पाणी वाहत राहतं.

टिकालमधील- आता कोरिएन्टल म्हणून नामकरण झालेल्या एकाच तलावात पुरातत्त्वज्ञांना झिओलाइट सापडलं असलं, तरी कोरिएन्टमधील पाणी खासकरून पिण्यासाठी वापरलं जात होतं, हे तिथे सापडलेल्या मातीच्या भांड्यांच्या तुकड्यांवरून लक्षात येतं.

माया संस्कृतीत जलशुद्धीकरणासाठी झिओलाइटचा वापर होणं, ही जगाच्या ज्ञात इतिहासात जलशुद्धिकरणासाठी खनिज वापरल्याची पहिली घटना असल्याचं संशोधक म्हणतात. माया संस्कृती लुप्त झाल्यानंतर सुमारे 1800 वर्षांनी 1627 साली ब्रिटिश वैज्ञानिक रॉबर्ट बेकन यांनी वाळूद्वारे पाणी गाळण्याची यंत्रणा निर्माण केली होती.

माया संस्कृतीमधील झिओलिटद्वारे जलशुद्धिकरण करणारी यंत्रणा पहिल्यांदा सुमारे इसवीसनपूर्व 164 मध्ये बांधली गेली असावी, असं अभ्यासक म्हणतात.

त्यापूर्वी प्राचीन ग्रीकमध्ये सुमारे इसवीसनपूर्व 500 मध्ये 'हिपोक्रॅटिक' अस्तरण म्हणून ओळखली जाणारी कापडी गाळणी वापरली जात असे. पण माया लोकांची पद्धत खूप जास्त परिणामकारक होती, कारण त्यात जीवाणू व शिसेयांसारखे अदृश्य प्रदूषणकारी घटकही बाजूला काढण्याची क्षमता होती.

"ग्रीस, इजिप्त, भारत किंवा चीन यांसारख्या ठिकाणी प्राचीन जगतात दिसून आलेली तंत्रज्ञानीय क्षमता अमेरिका खंडातील आदिवासी लोकांना विकसित करता आली नाही, असं पुरातत्त्वज्ञांनी व मानवशास्त्रज्ञांनी पारंपरिकरित्या गृहित धरलं होतं, ही बाब मला एक देशी अमेरिकी म्हणून सतत त्रस्त करत होती," असं सिनसिनाटी विद्यापीठातील पुरातत्त्वीय भूगर्भशास्त्रज्ञ केनेथ टॅन्करस्ले सांगतात.

माया संस्कृतीमधील झिओलाइटच्या वापराची नोंद घेणाऱ्या अभ्यासप्रकल्पातील ते प्रमुख लेखक आहेत. "या व्यवस्थेमुळे माया लोकांना एक हजारांहून अधिक वर्षं पिण्यासाठी सुरक्षित पाणी मिळत राहिलं. या तुलनेत तत्कालीन इतर गाळणीव्यवस्था प्राथमिक स्वरूपाच्या होत्या- ग्रीसमधील गाळणीची पद्धत केवळ कापडाच्या पिशव्या वापरणारी होती."

माया संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या ग्वाटेमालामध्ये उत्तरेकडील भागात टिकाल हे ठिकाण आहे. या भागात केवळ दोनच ऋतू आहेत- खूप पाऊस पडणारा एक ऋतू, तर खूप कोरडं वातावरण असणारा दुसरा ऋतू. पावसाळ्यात आकाशातून पाणी कोसळत असलं, तरी मातीच्या पातळ उच्चस्तरातून ते पटकन झिरपतं आणि कॅल्शिअमसंपन्न जुनखडी मिसळेल इतकं आम्लमय होऊन जातं. यातून निर्माण होणाऱ्या भूप्रदेशाला भूगर्भशास्त्रज्ञ 'कार्स्ट' असं संबोधतात. त्यात अनेक ठिकाणी घाण पाणी साठणारे खळगे व गुंफा निर्माण होतात, अशा ठिकाणी पाणी राखणारी जमीन भूपृष्ठाच्या 200 मीटर खाली आढळते- म्हणजे माया लोकांना पोचता येणार नाही इतकं खोल!

जवळपास वापरता येतील असे जलसाठे नसल्यामुळे या मध्य अमेरिकेतील नगरातील रहिवाश्यांनी पावसातील पाणी दीर्घ काळ साठवून ठेवण्यासाठीचे मार्ग शोधून काढले. टिकाल डोंगरांच्या मधोमध वसलेलं आहे, त्यामुळे माया लोकांनी कुशलतेने डोंगरउतारांचा वापर करून तिथलं पाणी तलावांमध्ये साठवलं. पहिल्या व दुसऱ्या मंदिरांच्या दरम्यान मध्यवर्ती मोकळा चौकासारखा भाग आहे, त्याच्या बाजूला मुख्य दुर्ग आहे आणि तिथे मोठे दगड बसवलेले आहेत.

माया संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

या रचनेमुळे पावसाचं पाणी कालव्यांमध्ये आणून जवळच्या मंदिरातल्या व महालातल्या तलावांमध्ये साठवण्याची सोय झाली. टिकाल इथे भेट देणाऱ्या आधुनिक युगातील पाहुण्यांना हे तलाव शोधण्यासाठी काही जास्तीचे प्रयत्न करावे लागतात. आज हे तलाव बहुतांशाने मातीतल्या खळग्यांच्या रूपातच आहेत, पण काही दगडी बंधारे एकेकाळी या शहराची तहान भागवण्याइतका प्रचंड जलसाठा राखून असायचे, ते आजही माहीतगार निरीक्षकाला सापडतात.

इथल्या महालाजवळच्या तलावात एकेकाळी अंदाजे तीन कोटी 10 लाख लीटर पाणी साठवलं जात असे, आणि झिओलाइटने शुद्धिकरण केल्या जाणाऱ्या कोरिएन्टल तलावात पाच कोटी 80 लाख लीटर पाणी साठवण्याची क्षमता होती.

2010 सालच्या दरम्यान संशोधकांनी केलेल्या क्षेत्रअभ्यासातून कोरिएन्टल गाळणीव्यवस्थेचा शोध लागला. या वेळी संशोधकांनी टिकाल तलावांमधील गाळाचे 10 नमुने गोळा केले. या नमुन्यांमध्ये अवजड खनिज पाऱ्याचं धोकादायक पातळीवरील प्रदूषण आढळलं आणि टिकालजवळच्या महालातील व मंदिरातील तलावांमध्ये विषारी शेवाळ वाढल्याच्या खुणा आढळल्या. नवव्या शतकात सत्ताधारी अभिजनांनी हे शहर सोडलं तेव्हाच्या बदलांची ही चिन्हं होती.

महालातील व मंदिरातील तलाव विषारी होत असताना कोरिएन्टल तलाव मात्र स्वच्छ होता, ही लक्षणीय बाब होती. टँकरस्ले यांनी कोरिएन्टलमधील नमून्यांचं सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यांना त्यात मातीचे चार भिन्न स्तर दिसले. त्यात स्फटिकी गारगोटी व झिओलाइटचे अंश होते. असे अंश इतर कोणत्या तलावात सापडले नव्हते.

या संशोधकंच्या चमूने आसपासच्या परिसराचा आढावा घेतला असता अशा प्रकारच्या मातीचे कोणतेही नैसर्गिक स्त्रोत तिथे आढळले नाहीत. झिओलाइटचाही मागमूस नव्हता. याचा अर्थ, तलावात पाणी प्रवेश करतं त्या ठिकाणी गाळणी म्हणून वापर करण्याकरता हेतूतः ही सामग्री इथे आणण्यात आल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं.

योगायोगाने या प्रकल्पातील एका संशोधकाला टिकालच्या ईशान्येला 30 किलोमीटरांवर असणाऱ्या एका सखल भागाची माहिती होती. बाजो दे अझ्यूकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी स्फटिकासारखी स्वच्छ दिसणारी माती असून गोड चवीचं पाणीही होतं. इथले खडकांमध्ये व मातीमध्ये झिओलाइट असल्याचंही चाचण्यांनंतर स्पष्ट झालं. टिकालमधील झिओलाटचा स्त्रोत इथे असावा, असं संशोधकांच्या लक्षात आलं.

"नक्की काय झालं होतं हे टाइम-मशिन नसल्यामुळे आपल्याला कळू शकत नाही. पण 'इथल्या स्फटिकी ज्वालामुखीजन्य खडकातून स्वच्छ व गोड पाणी मिळत असेल, तर कदाचित आपणही या दगडाचा वापर करून आपल्याला स्वच्छ पाणी मिळवू शकतो,' असा विचार टिकालमधील कोणी केला असणं स्वाभाविक वाटतं," असं टँकरस्ले म्हणतात.

माया संस्कृती

फोटो स्रोत, Getty Images

पेतातेस या वनस्पतीच्या पानांमध्ये झिओलिटची रेती ठेवून गाळण्या तयार केल्या जात असाव्यात, असा संशोधकांचा अंदाज आहे. या गाळण्या नंतर चुनखडीच्या विटांच्या सच्छिद्र भिंतींमध्ये ठेवल्या जात असाव्यात. तलावात येणाऱ्या पाण्याच्या वाटेत माया लोक अशा भिंती उभारत होते. या रेतीनेही पाणी स्वच्छ दिसायला लागलं असतं, पण त्याचा सूक्ष्मजीवांवर किंवा पाऱ्यावर काही परिणाम झाला नसता. झिऑलाइटची भर घातल्यामुळे माया लोकांना आधुनिक प्रमाणकांच्या आधारेही स्वच्छ ठरेल असं पाणी मिळू लागलं.

"झिऑलाइट खासकरून काय परिणाम साधतंय, हे कदाचित माया लोकांना कळलं नसेलही, पण पाणी स्वच्छ ठेवण्याचं महत्त्व त्यांना कळलं होतं. हे तंत्रज्ञान व पर्यावरणाचं त्यांचं ज्ञान वापरून त्यांनी प्यायचं पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा उभी केली," असं इलिनॉय विद्यापीठातील मानवशास्त्र लिसा लुसेरो सांगतात. (या संशोधनप्रकल्पात लुसेरो यांचा सहभाग नव्हता).

झिओलाइट असलेल्या रेतीच्या चार स्तरांवरून असं सूचित होतं की, जोरदार पाऊस पडताना पाण्याच्या झोतामुळे गाळण्या फुटून जात होत्या आणि मग वेळोवेळी त्या पुन्हा बांधल्या जात असत.

माया संस्कृतीच्या काळातील झिओलाइट आधारित गाळणीव्यवस्था केवळ कोरिएन्टल या एकाच ठिकाणी सापडली असली, तरी ती इतरत्र वापरली जात असण्याचीही शक्यता आहेच.

ग्वाटेमालातील मिराप्लोरेस म्युझियमच्या संचालिका आणि महालात व मंदिरात तलावामधील प्रदूषण शोधणाऱ्या अभ्यासाच्या सह-लेखिका लिवी ग्राझिओसो अशी आशा व्यक्त करतात की, या निष्कर्षांमुळे माया प्रदेशातील तलावांचा अधिकअभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळेल.

"हे तंत्रज्ञान केवळ टिकालमध्ये वापरात असेल, असं मला वाटत नाही," असं ग्राझिओसो म्हणतात. "माया जगतामध्ये सर्वत्र तलाव होते आणि त्यातील केवळ मोजक्याच तलावांचा अभ्यास झाला आहे, पण त्यांचा अभ्यास केला नाही तर आणखी माहिती मिळणार नाही."

सोन्याच्या किंवा मौल्यवान खड्यांच्या मानवनिर्मित चकाकत्या वस्तूंपलीकडे जाऊन संशोधकांनी शोध घेतला, तर किती संपन्न गोष्टी हाती लागू शकतात, हे या शोधातून स्पष्ट होतं, असं टँकरस्ले म्हणतात.

टिकालला भेट देणाऱ्या लोकांनी केवळ इथली बांधकामांनी अचंबित होऊन थांबू नये, तर एक हजार किंवा अगदी दोन हजार वर्षांपूर्वी यंत्रांविना किंवा मालवाहू जनावरांविना ज्या लोकांनी हे बांधकाम केलं त्यांच्याबद्दलही चिंतन करायला हवं, असं टँकरस्ले सुचवतात.

"त्यांची उपलब्धी किती मोठी होती, याचा विचार करा. आणि हे काही लोप पावलेले लोक आहेत असं मानू नये, त्यांच्या उपलब्धी या मध्य अमेरिकेतील आधुनिक आदिवासी लोकांचा वारसा आहेत, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)