15 महिने बाळ पोटातच? 'बाळंतपणा'त वेदना झाल्या, पण बाळ कसं जन्मलं हेच माहिती नाही?

- Author, येमिसी आडेगोके, चिआगोझी न्वोनवू, लिना शेखोनी
- Role, बीबीसी आफ्रिका आय
तिच्या हातातला ‘होप’ हा मुलगा तिचाच असल्याचं चिओमा खात्रीनं सांगत होती. त्याच्या जन्माआधी गर्भधारणेसाठी ती आठ वर्षे प्रयत्न करत होती. त्यामुळे अचानक झालेलं हे बाळ म्हणजे तिला चमत्कारच वाटत होता.
“हे बाळ माझंच आहे,” ती ठामपणे म्हणाली.
नायजेरियाच्या सरकारी कार्यालयात चिओमा तिचे पती इके यांच्यासोबत बसली होती. गेले तासभर या जोडप्याची कसून उलटतपासणी केली जात होती.
नायजेरियातील अनॅमब्रा राज्याच्या महिला आणि समाज कल्याण विभागाच्या आयुक्त इफी ओबिनाबो यांना खरंतर घरगुती वाद सोडवण्याचा चांगला अनुभव होता. पण हा प्रश्न काही साधा नव्हता.
चिओमा आणि इके म्हणत असले तरी होप हे त्यांचं जैविक अपत्य नाही, असं इके यांच्या कुटुंबातल्या 5 लोकांना वाटत होतं. खोलीत तेही उपस्थित होते.
बाळाला पोटात 15 महिने वाढवल्याचं चिओमा म्हणत होती. तिच्या अशा विसंगत बोलण्यावर कुटुंबातल्या लोकांना आणि आयुक्तांनाही विश्वास ठेवता येत नव्हता.
इके यांच्या कुटुंबियांकडून चिओमावर मूल होण्यासाठी दबाव टाकला जात होता. चिओमाकडून इतक्या वर्षात गोड बातमी आली नाही, तेव्हा त्यांनी इके यांच्यामागे दुसऱ्या महिलेशी लग्न करण्यासाठी तगादा लावला होता.
मनातल्या उद्वेगासकट चिओमानं मूल होण्यासाठी खास उपचार करणाऱ्या एका दवाखान्याकडे धाव घेतली. त्यातूनच आई होण्यासाठी आतूर झालेल्या महिलांना लक्ष्य बनवून लहान बाळांची तस्करी करणाऱ्या एका नव्या घोटाळ्याचा उदय झाला.
या घोटाळ्याचा शोध घेण्याऱ्या बीबीसीच्या प्रतिनिधींना चिओमा आणि आयुक्त यांच्यातल्या या चर्चेत सामील व्हायची परवानगी मिळाली. चिओमा, इके आणि या लेखातल्या इतर अनेकांची नावं आम्ही बदलली आहेत.
जगातल्या सगळ्यात जास्त जन्म दर असणाऱ्या देशांपैकी नायजेरिया एक आहे. मूल जन्माला घालण्याचा प्रचंड दबाव इथं महिलांवर टाकला जातो. मूल न होणाऱ्या महिलेचा इतका छळ होतो की, अगदी तिला बहिष्कृतही केलं जातं.
मग अशा दबावाखाली जगणाऱ्या महिला त्यांचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अगदी टोकाचे निर्णय घेतात.

अशाच एका गरोदरपणाच्या घोटाळ्याचा शोध 'बीबीसी आफ्रिका आय' गेल्या एका वर्षापासून घेत आहे.
यात फसवणूक करणारे डॉक्टर किंवा नर्स बनून आपल्याकडे गरोदर राहण्यासाठी ‘जादुई उपचार’ असल्याची खात्री महिलेला पटवून देतात. उपचाराच्या सुरुवातीला हजारो डॉलर्सचा खर्च होतो. एक इंजेक्शन, एक पेय आणि योनीमार्गातून आतमध्ये घालायचं एक औषध असं या उपचाराचं स्वरूप असतं.
तपासासाठी आम्ही ज्या महिलांशी किंवा अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांना हे औषध नेमकं काय आहे, तेच माहीत नव्हतं. पण त्या औषधाने त्यांच्या शरीरात बदल झाल्याचं अनेक महिलांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे, त्यांचं पोट वाढल्याने त्या गरोदर असल्याची खात्रीच महिलांना झाली.
हे उपचार घेत असलेल्या महिलांना इतर कोणत्याही डॉक्टरकडे किंवा रुग्णालयात न जाण्याची ताकीद दिली होती. बाळ गर्भाशयाच्या बाहेर वाढत असल्याने कोणत्याही गर्भधारणेच्या चाचणीत किंवा सोनोग्राफीमध्ये ते दिसणार नाही असं त्यांना सांगितलं गेलं.
बाळंतपणाची वेळ आली की एका दुर्मिळ आणि महागड्या औषधानेच कळा सुरू होतील असं सांगितलं. त्यामुळे अर्थातच उपचाराचा खर्च वाढला.


हे बाळंतपण कसं होतं याचा प्रत्येक महिलेचा अनुभव वेगळा आणि मन विचलित करणारा आहे. काहींना भूल दिली गेली आणि त्या उठल्या तेव्हा त्यांच्या पोटावर सिझेरियन सर्जरीसारखे व्रण होेते. काहींना गुंगीचं इंजेक्शन दिलं गेलं. त्यानं महिलांना अर्धवट जाग असताना, भास होतायत अशा अवस्थेत त्यांना बाळाला जन्म दिला असल्याचं वाटलं.
मार्ग कोणताही वापरला तरी शेवटी महिलांच्या हातात त्यांनी जन्माला घातलेलं बाळ होतं.
बाळंतपणाची वेळ आली, तेव्हा डॉक्टरांनी कंबरेत एक इंजेक्शन देऊन जोर लावायला सांगतिलं, असं चिओमा आयुक्तांना सांगत होती. तिचं बाळ नेमकं कसं बाहेर आलं हे ती सांगू शकली नाही, पण बाळंतपणात खूप वेदना झाल्याचं ती म्हणते.
आमच्या गटातल्या काही लोकांनी या गुप्त दवाखान्याला भेट दिली. गेल्या आठ वर्षांपासून बाळ होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्याचं नाटक त्यांनी रचलं आणि डॉ. रुथ नावाच्या एका महिलेशी त्यांचा संपर्क आला.
अनॅमब्रा राज्याच्या दक्षिण पूर्व भागातल्या इहीआला शहरातल्या एका तोडक्या-मोडक्या हॉटेलमध्ये या तथाकथित डॉ. रुथ त्यांचा दवाखाना दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चालवतात.
त्यांच्या खोलीबाहेर हॉस्पिटलच्या आवारात डझनभर महिला वाट पाहत थांबल्या होत्या. काहींचं पोट बाहेर आल्याचं स्पष्ट दिसत होतं. सगळ्या वातावरणात एक सकारात्मक उर्जा भरली होती. मध्येच गरोदर राहिल्याचं सांगून एका महिलेसाठी खोलीत उत्सव साजरा केला गेला.
रुग्ण बनून गेलेली आमची वार्ताहार डॉ. रुथला भेटायला गेली, तेव्हा हे उपचार खात्रीनिशी काम करतात असं तिला सांगितलं गेलं.
त्यानंतर भविष्यात होणाऱ्या बाळाचं लिंग ठरवण्यासाठी एक इंजेक्शन घेण्याबद्दल डॉ. रुथ यांनी सुचवलं. खरंतर हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्यच आहे.
इंजेक्शन नको, असं आमच्या वार्ताहारानं सांगितल्यावर डॉ. रुथ यांनी घरी घेऊन जाण्यासाठी गोळ्यांचा चुरा असलेलं एक पाकीट आणि काही गोळ्याही दिल्या. शिवाय, नवऱ्यासोबत लैंगिक संबंध कधी ठेवायचे याबद्दलही काही सूचना दिल्या.

या सुरुवातीच्या उपचाराला साधारण 3,50,000 नायजेरियन नाइरा म्हणजे साधारण 205 डॉलर्स इतका खर्च आला.
या खोट्या डॉक्टरने दिलेल्या कोणत्याही गोळ्या न घेता किंवा त्यांनी सांगितलेल्या सूचना न पाळता आमची वार्ताहार चार आठवड्यांनी पुन्हा रुग्ण बनून गेली.
सोनोग्राफीसारख्या दिसणारं एक मशीन या वार्ताहाराच्या पोटावर फिरवून चाचणी करत असल्याचं दाखवलं. त्यानंतर हृदयाच्या ठोक्यांचा आवाज आला आणि डॉ. रुथने आमच्या वार्ताहाराचं गर्भधारणा झाल्याबद्दल अभिनंदन केलं.
जोडप्याने आनंद झाला असल्याचं दाखवलं.
गोड बातमी दिल्यानंतर बाळाच्या जन्मासाठी एक दुर्मिळ आणि महागडं औषध कसं गरजेचं आहे हे समजवून सांगण्यात डॉ. रुथ गुंतल्या. त्याची किंमत साधारणपणे 15 ते 20 लाख नाइरा म्हणजे जवळपास 1,180 डॉलर्स असल्याचं त्यांनी सांगितलं.
या औषधाशिवाय गरोदरपणाचा काळ नऊ महिन्यांपेक्षाही जास्त होईल असंही त्या म्हणाल्या. विज्ञानाची सगळी सूत्रं धाब्यावर लावून “बाळ कुपोषित होईल आणि त्याच्या पोषणासाठी आणखी कष्ट घ्यावे लागतील,” असं डॉ. रुथ सांगत होत्या. बीबीसीने त्यांच्यावर लावलेल्या आरोपांवर डॉ. रुथ यांनी अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
या अशा दाव्यांवर महिला किती विश्वास ठेवतात हे माहीत नाही. पण ऑनलाइन ग्रुप्सवर गरोदरपणाविषयी इतकी खोटी आणि चुकीची माहिती येत असते की ते अशक्यही वाटत नाही.
चुकीच्या माहितीचं जाळं
अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत महिलेला गर्भधारणेविषयी माहीत नसण्याला वैद्यकीय भाषेत गुप्त गर्भधारणा किंवा क्रिप्टिक प्रेग्नन्सी म्हटलं जातं.
पण या प्रकारच्या गर्भधारणेबद्दल खूप चुकीची माहिती फेसबुकवरच्या ग्रुप्स आणि पेजेसवर असल्याचं बीबीसीच्या तपासादरम्यान आढळलं.

अमेरिकेतली एक महिला खास क्रिप्टिक प्रेग्नन्सीवर एक पेज चालवते. अनेक वर्ष गरदोर असल्याचं आणि तिचा प्रवास विज्ञानाच्या भाषेत सांगताच येणार नाही असं ती म्हणते.
काही खासगी फेसबुक ग्रुप्समधल्या अनेक पोस्ट्स या खोट्या उपचारांना बढावा देण्यासाठी धार्मिक शब्दांचा वापर करतात. अनेक वर्ष प्रयत्न करूनही मूल होत नसेल आणि अचानक गर्भधारणा झाली तर त्याला ‘चमत्कार’ म्हटलं जातं.
या सगळ्या खोट्या माहितीनं अशा घोटाळ्यात बायका सहजपणे अडकतात.
या ग्रुपवर फक्त नायजेरियाच नाही, तर दक्षिण आफ्रिका, कॅरेबियन आणि अमेरिकेतले लोकही सदस्य आहेत.
अशाच ग्रुप्सवर घोटाळ्यामागे असणारी माणसं घुसतात. त्यांच्या खोट्या उपाचारांमध्ये रस घेणाऱ्या महिलांचा मोठा गट त्यांना इथे उपलब्ध होतो.
एकदा त्यांनी उपचार घ्यायची तयारी दाखवली की त्यांना व्हॉट्सॲपवरच्या खासगी ग्रुपमध्ये घेतलं जातं. तिथे ग्रुपचे ॲडमिन गुप्त दवाखान्यांची माहिती देतात आणि प्रक्रिया कशी असते हे सांगतात.
‘मी अजूनही गोंधळात आहे’
हे उपचार पूर्ण करण्यासाठी स्कॅमर्सना नवजात बाळांची गरज असते, असं अधिकारी सांगतात. त्यासाठी गर्भपात बेकायदेशीर आहे, अशा देशातल्या विशेषतः लहान वयाच्या असहाय्य गरोदर मुलींना ते हेरतात.
चिओमाने होपला जन्म दिला त्या दवाखान्यावर अनॅमब्रा राज्याच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारी 2024 मध्ये छापा टाकला.
या छाप्याचं चित्रीकरण बीबीसीच्या हाती आलं. त्यात दोन इमारती असलेला मोठा परिसर दिसत होता.
एका खोलीत ग्राहकांसाठी वैद्यकीय उपकरणं ठेवली होती, तर दुसऱ्या खोलीत अनेक गरोदर महिलांना त्यांच्या मर्जीविरोधात डांबून ठेवलं होतं. त्यातल्या काही तर फक्त 17 वर्षांच्या होत्या.

त्यांना इथं फसवून आणल्याचं काही महिलांनी सांगितलं. त्यांचं बाळ कुणाला विकलं जाणार आहे, हेही त्यांना माहीत नव्हतं.
गरोदर असल्याचं कुटुंबाला सांगायची हिंमत न झालेल्या काही ऊजू (नाव बदललं आहे) सारख्या महिला होत्या. त्यांनी त्यातून असा मार्ग काढला. त्यांना बाळासाठी 800,000 नाइरा म्हणजे जवळपास 470 डॉलर्स देऊ केले असल्याचं त्यांनी सांगितलं.
बाळ विकायच्या विचाराचा पश्चाताप होतो का असं विचारल्यावर ती म्हणाली, “मी अजूनही गोंधळात आहे.”
बाळांचा पुरवठा पूर्ण करण्यासाठी ऊजूसारख्या असहाय्य महिलांना स्कॅमर्स भक्ष्य करतात, असं आयुक्त ओबिनाबो सांगतात. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
कसून तपासणी केल्यानंतर आयुक्त ओबिनाबो यांनी होपला दूर घेऊन जायची धमकी चिओमाला दिली.
तरीही चिओमा तिच्या म्हणण्यावर ठाम होती. शेवटी तीही पीडित असल्याचं आणि काय झालं हे तिलाही माहीत नसल्याचं आयुक्तांनी मान्य केलं. या आधारावर चिओमा आणि इके यांना बाळ स्वतःकडे ठेवायची परवानगी मिळाली. पण बाळाचे जैविक पालक पुढे आले तर त्यांना बाळ द्यावं लागेल असंही सांगितलं.
शेवटी काहीही झालं तरी महिला, प्रजनन, त्याबद्दलचे हक्क आणि दत्तक घेण्याविषयीचा दृष्टीकोन बदलत नाही तोपर्यंत असे घोटाळे होतच राहणार आहेत अशी सूचना तज्ञ देतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











