जॉर्जियात वायूगळतीने मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये भारतीय जोडप्याचा समावेश

फोटो स्रोत, Kulveer Singh/BBC
जॉर्जियातील एका स्की रिसॉर्टमध्ये कार्बन मोनोऑक्साइडच्या विषबाधेमुळे 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये 11 भारतीय लोकांचा समावेश आहे.
16 डिसेंबर रोजी जॉर्जियातील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात या घटनेची माहिती दिलीय.
या मृतांमध्ये लोकांमध्ये वाढदिवस साजरा करत असलेला एक भारतीय माणूस आणि एक भारतीय जोडपं यांचा समावेश होता.
समीर कुमार जे काही महिन्यांपूर्वीच जॉर्जियामध्ये आले होते. त्यांचा, रविंदर सिंग आणि गुरविंदर कौर या जोडप्यासोबत गुदौरी मधील एका भारतीय रेस्टॉरंटच्या वर मृत्यू झाला, असं त्यांच्या नातेवाईंकांचं म्हणणं आहे.
जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की कार्बन मोनॉक्साईड या वायूमुळे विषबाधा झाल्यानं 12 जणांचा मृत्यू झाला. त्यात एकजण जॉर्जियाचा नागरिक होता.
भारत सरकारनं सांगितलं आहे की ते पीडितांच्या कुटुंबांच्या संपर्कात आहेत आणि या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत मायदेशी आणण्याचं काम करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जॉर्जियाची राजधानी तिबिलिसी येथे असणाऱ्या भारतीय दूतावासाच्या निवेदनात म्हटलं आहे की, "जॉर्जियातील गुडौरी येथे झालेल्या 11 भारतीय नागरिकांच्या दुर्दैवी निधनाबद्दल कळाल्यानंतर तिबिलिसीमधील भारतीय दूतावासाला दुःख झालं आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो.
"भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांसोबत या नागरिकांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांसोबत संपर्कात आहोत आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहोत."
जॉर्जियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉर्जियातील गुडौरी येथे त्या देशातील सर्वात मोठं आणि उंचीवर असणारं एक स्की रिसॉर्ट आहे.
या रिसॉर्टमधील रेस्टॉरंटच्या वरच्या झोपण्याच्या जागेत एकूण 12 मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी 11 मृतदेह हे भारतीय नागरिकांचे आहेत, तर एक मृतदेह हा जॉर्जियाच्या नागरिकाचा आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, "प्राथमिक चाचण्यांमध्ये मृतदेहांवर हिंसाचार झाल्याचे कोणतेही चिन्ह दिसून आले नाहीत आणि हा अपघात असल्याचं सध्यातरी दिसून येत आहे."


पोलीस म्हणाले की, शुक्रवारी (13 डिसेंबर) या इमारतीतील वीज गेल्यानंतर तेलावर चालणारा जनरेटर चालू करण्यात आला होता.
या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक भारतीय रेस्टॉरंट आहे. याच ठिकाणी शनिवारी (14 डिसेंबर) हे मृतदेह आढळून आले आहेत.
अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि पीडितांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

फोटो स्रोत, @IndEmbGeorgia
जॉर्जियामधलं गुडौरी हे स्कीईंग आणि स्नोबोर्डिंगसाठी लोकप्रिय असणारं पर्यटन स्थळ आहे. हिवाळ्यातील खेळांचा आनंद घेण्यासाठी इथे जगभरातून पर्यटक येत असतात.
शियाला जॉर्जियाशी जोडणाऱ्या प्राचीन जॉर्जियन मिलिटरी रोडवरील व्यापारी चौकी म्हणूनही गुडौरी ओळखलं जातं. 19 व्या शतकापासून या चौकीचा वापर होत होता.
जॉर्जियाची राजधानी तिबिलिसच्या उत्तरेस सुमारे 120 किलोमीटर अंतरावर हे शहर आहे. या शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 2,200 मीटर ((7,200फूट) इतकी आहे. जॉर्जियाच्या मत्सखेता-मतियानेती प्रदेशातील काकेशस पर्वतांमध्ये हे ठिकाण आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











