OpenAI विरोधात बोलणारा सुचीर बालाजी अमेरिकेतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळला

फोटो स्रोत, LinkedIn
- Author, अॅलिस डेव्हिस
- Reporting from, वॉशिंग्टन डीसी
ओपनएआयमध्ये संशोधक म्हणून काम करणाऱ्या आणि कंपनीतील गैरप्रकारांबाबत आवाज उठवणाऱ्या (व्हिसलब्लोअर) 26 वर्षीय संशोधकाचा मृतदेह सॅन फ्रान्सिस्कोच्या अपार्टमेंटमध्ये सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 वर्षांच्या सुचीर बालाजी यांच्याबाबत त्यांना एक कॉल आला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी सुचीर यांचा मृतदेह आढळून आला आहे.
सॅन फ्रान्सिस्कोच्या वैद्यकीय तपासणी कार्यालयाने सुचीर यांनी आत्महत्या केली असल्याचं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचंही या कार्यालयाने म्हटलं आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये बालाजीनं ओपनएआय या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कंपनीमध्ये चालणाऱ्या गैरप्रकारांबाबत आवाज उठवला होता.
याआधीही देखील ओपनएआय ही कंपनी ज्या पद्धतीने माहिती (डेटा) गोळा करते, त्याविरोधात या कंपनीवर खटले दाखल करण्यात आले आहेत.


ऑक्टोबर महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सने बालाजी यांची एक मुलाखत प्रकाशित केली होती.
या मुलाखतीत बालाजी यांनी आरोप केला होता की, 'ओपनएआयने चॅटजीपीटी हे ऑनलाईन चॅटबॉट विकसित करताना अमेरिकन कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केले आहे.'
न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखानुसार, बालाजी यांनी चार वर्ष या कंपनीत संशोधक म्हणून काम केलं. त्यानंतर ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, "ओपनएआयनं चॅटजीपीटी तयार करण्यासाठी वापरलेल्या डेटा(माहिती)चा वापर करणं हे अमेरिकेतील कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन आहे. तसंच चॅटजीपीटी सारख्या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचं नुकसान होत आहे," असंही म्हटलं होतं.
ओपन एआयनं म्हटलं की, 'त्यांचं मॉडेल सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीवरच स्वतःला प्रशिक्षित करतं.'

फोटो स्रोत, Getty Images
ऑगस्ट महिन्यात सुचीर बालाजी यांनी ओपनएआय ही कंपनी सोडली आणि त्यानंतर ते काही वैयक्तिक प्रकल्पांवर काम करत असल्याची माहिती त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिली होती.
सुचीर बालाजी कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथे वाढले आणि नंतर त्यांनी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात संगणक शास्त्रासाठी प्रवेश घेतला.
सीएनबीसी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार ओपनएआयच्या प्रवक्त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "आज मिळालेल्या या बातमीमुळे आम्हाला अतीव वेदना होत आहेत. या कठीण काळात आम्ही सुचीरच्या प्रियजनांसाठी प्रार्थना करतो."
ओपनएआय या कंपनीच्या विरोधात न्यूयॉर्क टाईम्ससह अमेरिका आणि कॅनडातील वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी खटले दाखल केले आहेत. तसेच जॉन ग्रिशम सारख्या बेस्ट सेलर लेखकांच्या गटाने देखील असे खटले दाखल केले आहेत.
ओपनएआय त्यांच्या सॉफ्टवेअरला प्रशिक्षित करण्यासाठी बेकायदेशीरपणे बातम्यांचा वापर करत असल्याचा दावा या खटल्यांमध्ये करण्यात आला आहे.
ओपनआयतर्फे नोव्हेंबर महिन्यात बीबीसीला सांगण्यात आलं होतं की, "निर्माते (Creators) आणि इनोव्हेटर्ससाठी न्याय्य असणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉपीराईट तत्त्वांचे पालन करूनच आमचं सॉफ्टवेअर काम करतं."
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











