AI ने सुचवलेल्या रेसिपीचा पिझ्झा लाँच केला आणि सुपरहिट झाला,चविष्ट पदार्थांसाठी तंत्रज्ञानाचा वापर

फोटो स्रोत, Dodo Pizza
- Author, पॅड्रेग बेल्टन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॉटेल मालकांची मदत करू शकते का? नवीन चवदार पदार्थ तयार करण्यासाठी त्याची मदत कशी होऊ शकते? याबाबत जाणून घेऊया.
स्पार्तक अरुतयुनयान दुबईमध्ये असलेल्या डिलिव्हरी चेन डोडो पिझ्झाचे मेन्यू डेव्हलपमेंट हेड आहे. त्यांनी 'चॅट जीपीटी'ला दुबईतला सर्वोत्तम पिझ्झाची रेसिपी तयार करायला सांगितलं.
"त्याने रेसिपी तयार केली. आम्ही ती लाँच केली. ती लोकप्रिय झाली आणि ती आता आमच्या मेन्यूचा भाग आहे," असं ते म्हणाले.
दुबईची लोकसंख्या तीस लाखांच्या घरात आहे. त्यातील 90 टक्के लोक बाहेरून आलेले आहेत.
स्पार्तक सांगतात की, "इथं जगभरातले वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक आहेत. त्यात भारतीय, पाकिस्तानी, फिलिपिन्स, अरब आणि युरोपातील लोकांचा समावेश आहे."
शहरातील सांस्कृतिक विविधता लक्षात घेऊन स्पार्तक यांनी चॅट जीपीटीला पिझ्झाची रेसिपी तयार करायला सांगितली होती.
त्यावर चॅट जीपीटीने काही सूचना केल्या होत्या. त्यात टॉपिंग म्हणून अरबी श्वारमा चिकन, इंडियन ग्रिल्ड पनीर, मिडल ईस्ट झा’अतर हर्ब्स आणि पांढऱ्या तिळाची चटणी यांचं कॉम्बिनेशन होतं.
डोडो पिझ्झाचे ग्राहक या पिझ्झाची तोंड भरून स्तुती करतात.
स्पार्तक यांच्या मते, "शेफ म्हणून मी या साहित्याचा पिझ्झा तयार करण्यासाठी कधीही वापर केला नसता. पण खरं तर या सर्व चवींचं मिश्रण अतिशय कमालीचं होतं."
एआयनं स्ट्रॉबेरी आणि पास्ता, ब्ल्यूबेरी आणि सांजा हा पिझ्झाही सुचवला होता. मात्र त्यांचा मेन्यूमध्ये समावेश झाला नाही.
जगाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत प्रयोग
'डेल्लाज वेलवेट टाकोज'मध्ये काम करणाऱ्या वेनेसियो वेलिस यांनीही कामासाठी एआयचा वापर केला.
त्या या हॉटेलमध्ये कलिनरी डायरेक्टर आहेत.
एआयबद्दल त्यांच्या मनात खूप उत्सुकता आहे. म्हणूनच टाकोज तयार करण्याची जबाबदारी त्यांनी एआयवर सोपवली आहे.
त्या म्हणाल्या की, त्यांनी एआयला दिलेल्या सूचनेत (प्रॉम्प्ट) आठ पदार्थांचा वापर करण्यास सांगितलं होतं. त्यात एक तॉर्तिया आणि एका प्रोटिनचा समावेश असावा असं वाटत होतं.

फोटो स्रोत, Spartak Arutyunyan
त्या म्हणतात, "या प्रक्रियेत काही वेगळंच कॉम्बिनेशन समोर आलं. रेड करी, नारळ तोफू आणि अननस यांच्यापासून काही चविष्ट पदार्थ तयार होऊ शकेल याची मला खात्री नव्हती."
विलिस यांना यापैकी तीन रेसिपी आवडल्या. त्यातून विलिस यांनी प्रॉन्स आणि स्टीक टाकोज यांची निवड केली आणि लोकांपुढं ही रेसिपी सादर केली.
त्यानंतर एका आठवड्यात 22000 टाकोजची विक्री झाली.
त्या म्हणतात, "तुम्हाला नवीन काय करायचं हे कळत नाही तेव्हा एआय हे अतिशय चांगलं टूल आहे. त्यामुळं आपलंही डोकं चालायला लागतं. हे कॉम्बिनेशन चांगलं आहे, पण अमुक तमुक करू शकतो असं वाटायला लागतं. आपण कधी विचारही केला नाही अशाही सूचना एआय देतं."
पण विलिस पुढे म्हणतात की, "मी पूर्णपणे एआयवर विसंबून राहू शकत नाही. रेसिपी निवडण्यासाठी आणि ती अंतिम करण्यासाठी शेफची गरज असतेच."
एआयची कल्पना सर्वांनाच आवडत नाही
अनेक लोकांना एआय आवडत नाही. लंडनमध्ये कॉकटेल तयार करणारे ज्युलियन. डी. फिरल म्हणतात की त्यांना एआय वापरायला आवडत नाही, कारण ते ज्या सूचना देतं त्यात कॉमन सेन्स नसतो.
सिएटलमध्ये असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील भाषातज्ज्ञ एमेली बेंडर यांच्या मते, "एआय चॅटबॉट म्हणजे काही जादू नाही. तोही सगळं ऑनलाईन वाचून शिकला आहे."
"चॅट जीपीटी रेसिपीसारखं काहीतरी सांगतो, याचा अर्थ ती रेसिपी इंटरनेटवर आधीपासूनच आहे."

फोटो स्रोत, Venecia Willis
त्या म्हणतात की, “एआयनं ही रेसिपी एखाद्या कुकिंग ब्लॉगमधून चोरली असेल. त्यामुळं वाचकांची संख्या, जाहिरातीतलं उत्पन्न कमी आलं असावं,” भविष्यात मात्र एआयची बरीच मदत होऊ शकते हेही त्या मान्य करतात.
त्या पुढे म्हणतात की, "विविध घटक पदार्थाचं वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण करत चविष्ट लागणारं कॉम्बिनेशन शोधून त्यातून रेसिपी तयार करा असंही एआयला सांगितलं जाऊ शकतं."
पण, त्यासाठी तुमच्याकडं खूप अभ्यासपूर्ण प्रश्न हवेत असंही मत त्या व्यक्त करतात.
ट्रेंड जाणून घेण्यासाठी एआय चा वापर
युकेचं सुपर मार्केट चेन 'वेटरोज' एआयचा वापर करून सोशल मीडियावर खाद्यपदार्थांविषयी सध्या काय ट्रेंड सुरू आहे याची माहिती घेतं.
"स्मॅश बर्गर" याच ट्रेंडचा एक भाग असून ते सातत्यानं चर्चेत आहे.


वेटरोजच्या इनोव्हेशन मॅनेजर लिझी हेवूड सांगतात की, "स्मॅश बर्गर सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, हे आम्ही पाहिलं. आम्ही स्मॅश बर्गर लाँच केलं आणि त्याचवेळी युकेमध्ये तीन ते चार स्मॅश बर्गर हॉटेल उघडली."
कुकीजबद्दल त्या म्हणाल्या की, "एआयनं कुकीजच्या सर्चमध्ये गेल्या वर्षीपासून आतापर्यंत 80 ते 90% वाढीची नोंद केली आणि तीन महिन्याच्या आत त्यांना आमच्या ट्रायल स्टोअर्समध्ये लाँच केलं आहे."
शेफ जीपीटी
सिंगापूरमध्ये राहणाऱ्या इटालियन वंशाच्या स्टीफन कांटू यांनी एक ॲप तयार केलं आहे. तुमच्याकडं उपलब्ध असलेल्या वस्तूंनुसार हे ॲप वेगवेगळे रेसिपी सुचवतं. या ॲपला त्यांनी शेफ जीपीटी असं नाव दिलं आहे.
एका सॉफ्टवेअर कंपनीत ते काम करतात. ते म्हणतात, "मी इटालियन आहे. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो."
चॅट जीपीटीला रेसिपी विचारताना हा ॲप तयार करण्याचा विचार आल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, Waitrose
या ॲपमध्ये ड्रॉपडाऊन मेन्यू आहे. त्यातून तुमच्या स्वयंपाक घरात कोणकोणत्या वस्तू आहेत याची निवड तुम्ही करू शकता. तुम्ही चांगले कुक नसाल तर एआय एक रेसिपी आणि त्या पदार्थाचा फोटो तुमच्यासमोर सादर करतो.
कांटू म्हणतात की, हे ॲप लाँच केल्यावर एक-दीड आठवड्याच्या आत त्यांना 30000 यूझर्स मिळाले.
तिकडं दुबईमध्ये डोडो पिझ्झाचे स्पार्तक यांच्या मते, एआयकडं एक रंजक टूल म्हणून बघायला हवं पण त्याच्या आधारावर तुम्ही संपूर्ण मेन्यू तयार करू शकत नाही.
मात्र, दुबईच्या डोडो पिझ्झावरून ऑनलाइन ऑर्डर करणारे ग्राहक एआयनी सुचवलेले पिझ्झा टॉपिंग निवडू शकतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











