कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे डिमेन्शिया रुग्णांचं आयुष्य सोपं होईल का?

पीट मीडलटोन

फोटो स्रोत, Pete Middleton

फोटो कॅप्शन, पीट मीडलटोन
    • Author, क्रिस्टन रो
    • Role, टेक्नोलॉजी रिपोर्टर

इंग्लडमधल्या नॉरदॅम्प्टनशायरमध्ये आपल्या पत्नीसोबत राहणारे पीट मिडलटन फार पूर्वीपासून तंत्रज्ञानाचा वापर करतात. 1980 मध्ये रॉयल एअर फोर्समध्ये काम करताना संगणकाचा वापर सुरू केल्यानंतर त्यांनी अनेक प्रोग्रॅमिंगच्या भाषा शिकून घेतल्या होत्या.

गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय झाल्यानंतर त्यांना त्याची फार उत्सुकता वाटू लागली. फोटो एडिट करणं, मेसेजचं भाषांतर करणं आणि संशोधन करणं अशा कामांसाठी ते कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करतात.

एकूणात, मिडलटन निवृत्तीनंतरही बरंच काम करतात. त्यांचं छंद जोपासणं आणि डिमेन्शियावर एक ब्लॉग लिहिणं, यासोबतच ते अल्झायमर सोसायटीचे स्वयंसेवक, समिती सदस्य आणि अनुभवी समुपदेशक म्हणूनही काम पाहतात.

पाच वर्षांपूर्वी त्यांना डिमेन्शिया असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्यांच्या स्मृतीत होणारे बदल त्यांना जाणवायला लागले.

“मी अजूनही मोबाईल ॲप्सवर लिहू शकतो. पण माझा टेलिफोन कुठे ठेवलाय तेच माझ्या लक्षात राहत नाही.” ते उदाहरणादाखल सांगतात.

ही त्रुटी भरून काढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला नक्कीच मदत होईल, असं मिडलटन यांना वाटतं.

“लोकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे करून घ्यायचं ठरवलं तर ते त्यांच्या आत्मसन्मानासाठी आणि आत्मविश्वासासाठीही चांगलं ठरेल. त्यामुळे, ते दीर्घकाळ स्वतंत्रपणे जगू शकतील. असं झालं तर इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सिस्टम या आरोग्य व्यवस्थेपासून आणि केअर होम्सपासूनही त्यांना लांब राहता येईल,” असंही ते सांगतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेले अनेक मोबाइल अ‍ॅप्स डिमेन्शियासोबत जगणाऱ्या व्यक्तींना रोजचं आयुष्य जगायला मदत करू शकतात.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'सायमन' हे अशाच प्रकारचं अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप जिओ ट्रॅकिंग आणि मशीन लर्निंगचा वापर करतं आणि त्या माध्यमातून वापरकर्त्याच्या गरजा स्वत:हूनचं ओळखतं. वापरकर्त्याला मदत करण्यासाठी ते काही नोटिफिकेशन्सही पाठवतं.

“उदाहरणार्थ, ॲप वापरणारी व्यक्ती बँकेत गेली आहे, हे ओळखून हे ॲप स्वत:चं त्या व्यक्तीला विसरेलला पासवर्ड सांगतं,” फिओना कॅराघर सांगतात. त्या अल्झायमर सोसायटीच्या संशोधन विभागाच्या व्यवस्थापक आहेत.

या सायमन ॲपचं 'बेटा टेस्टींग' सुरु आहे. बेटा टेस्टींग म्हणजे हे ॲप लॅबच्या बाहेर लोकांमध्ये कसं काम करतं, याची चाचणी होय.

'फ्लोरेन्स प्रोजेक्ट' हा याच क्षेत्रातला एक मोठा कार्यक्रम आहे. डिमेन्शिया असलेल्या रुग्णांसाठी उपयोगी पडू शकेल, असं संवादाचं तंत्रज्ञान तयार करणं यावर या फ्लोरेन्स प्रोजेक्टचा भर आहे.

“या माध्यमातून डिमेन्शियाच्या रुग्णांना चांगल्या पद्धतीने संवाद करता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यामुळे डिमेन्शिया असलेल्या रुग्णांचा त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांसोबतचा संवाद कमी होणार नाही, तर त्यांना मदत होईल,” असं ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड युनिवर्सिटीमधल्या 'ह्यूमन-सेंटर्ड कम्प्यूटींग' या विषयाच्या प्राध्यापिका जॅनेट विलेस सांगतात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

प्राध्यापिका विलेस यांच्याही आईला डिमेन्शिया आहे. त्या फ्लोरेन्स प्रोजेक्टवर काम करणाऱ्या टीमचाच भाग आहेत. आपण तयार केलेलं प्रोडक्ट्स क्लिष्ट नसावं, तसंच ते वापरण्यासही सहज-सोपं असावं, यादृष्टीने ही टीम कार्यरत आहे.

त्यामुळेच त्यांनी डिमेन्शियासोबत जगणाऱ्या आणि अशा रुग्णांची काळजी घेण्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्यांचा समावेश आपल्या टीममध्ये केला आहे.

या प्रोजेक्टच्या माध्यमातून आतापर्यंत तीन ऍप्स बनवले गेलेत. त्यामध्ये डायरी, म्युझिक प्लेअर आणि डिजिटल फोटो स्क्रिन यांचा समावेश आहे. वापरायला अगदीच सहज-सोपं असणारं आणि एखादंच बटन असणारे हे 'सिंगल-फंक्शन डिव्हाईस' आहेत.

या डिव्हाईसवरचा मजकूर दूरवरुनही बदलता येऊ शकतो. म्हणजे, देशाच्या दुसऱ्या एखाद्या भागात राहणारा नातेवाईकही म्युझिक प्लेअरमधल्या प्लेलिस्टमध्ये आणखी गाण्यांचा समावेश करु शकतो. त्यासाठी डिमेन्शिया असलेल्या रुग्णाने फक्त आपल्या स्क्रिनवर त्यासाठीची परवानगी द्यावी लागते.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हे डिव्हाईसेस 'पर्सनलाईझ'देखील करता येतात. म्हणजे, वापरकर्त्यानुसार त्यात बदल शक्य आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हे डिव्हाईसेस 'पर्सनलाईझ'देखील करता येतात.

फोटो स्रोत, The Florence Project

फोटो कॅप्शन, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने हे डिव्हाईसेस 'पर्सनलाईझ'देखील करता येतात.

प्रत्येक रुग्णासाठी एक 'नॉलेज बँक'देखील तयार केली जाते. त्यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले जातात किंवा ते काय बोलतायत याकडे लक्ष दिलं जातं. ध्वनी शब्दबद्ध करणं आणि कधी कधी त्याचं भाषांतर करणं, या गोष्टीही केल्या जातात. ही माहिती डिव्हाईसवर नोंदवली जाते.

उदाहरणार्थ, एखाद्या नव्या पार्ट टाइम केअरटेकरची येण्याची वेळ झाली असेल तर त्याच्या येण्याची सूचना म्हणून 'डायरी डिव्हाईस'वर त्याचा फोटो दिसेल.

प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असल्याने त्याच्या गरजा आणि प्राधान्यंही वेगळी असू शकतात. त्यामुळे, डायरीवर काय माहिती दिसणार, ते वापरकर्त्याच्या गरजांनुसार अगदी सोप्या पद्धतीने दाखवता येऊ शकतं.

हे डिव्हाईस तयार करण्यात घाई होऊ नये असं प्रोजेक्ट टीमला वाटतं. गेल्या दहा वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. आता त्याच्या पहिली चाचणी घेतली जात आहे.

“तंत्रज्ञान कोणतंही असो, पण त्याची नकारात्मक बाजू अशी की इतर लोकांपेक्षा डिमेन्शियाच्या लोकांसाठी ते अधिक वाईट ठरू शकतं,” प्राध्यापिका विलेस सांगतात. माहितीची सुरक्षा आणि गोपनियता ही डिमेन्शिया असलेल्या लोकांसाठी जास्त महत्त्वाची गोष्ट असल्याचं त्या नमूद करतात.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले चॅटबॉट्सदेखील कम्पॅनियन रोबोट्समध्ये वापरले जात आहेत. 'हिरो चॅन' हा चेहरा नसलेला, मिठी मारता येईल असा सॉफ्ट थेरपी रोबोट अगदी असाच आहे. डिमेन्शिया असलेल्या रुग्णांनी याच्याशी गप्पा मारल्या तर त्यांचा ताण कमी होतो, असं संशोधक सांगतात.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

या रोबोटमध्ये स्पिकर आणि मायक्रोफोनसोबतच 'चॅटजीपीटी'चाही समावेश करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहे. हे सगळं असूनही त्याचं वजन 800 ग्रॅमपेक्षा कमी राहील, असा प्रयत्न आहे. हा रोबोट केअर होम्समध्ये राहणाऱ्या डिमेन्शियाच्या रुग्णांना वापरायला देऊन काही चाचण्या घेण्यात आल्या.

“या रोबोटसोबत मारलेल्या साध्या गप्पाही रुग्णांना आमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक गुंतवून ठेवणाऱ्या होत्या.” असं हिडेनोबू सुकीओका म्हणतात. ते क्योटोमधील ॲडव्हान्स्ड टेलिकम्युनिकेशन्स रिसर्च इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल येथे रोबोटिसिस्ट म्हणून काम करतात.

“पण या सगळ्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी संपर्क कमी होऊ नये हे डिमेन्शियाची काळजी घेताना पाहिलं पाहिजे,” कॅराघर सांगतात.

“उलट, त्यामुळे डिमेन्शियाच्या रुग्णांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना फायदा होईल, अशी सोय करायला हवी,” असं त्यांनी पुढे सांगितलं.

डेनिस फ्रोस्ट हे फ्लोरेन्स प्रोजेक्टच्या प्रत्यक्ष अनुभव असलेल्या तज्ज्ञांच्या समितीत काम करतात. ते प्रोग्रॅमर म्हणून निवृत्त झाले आहेत. ते डिमेन्शिया असलेल्या रुग्णांसाठी समाजात वावरणं फार महत्त्वाचं असल्याची बाब अधोरेखित देतात.

“डिमेन्शिया असलेल्या कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात.” मीडलटन सांगतात.

फोटो स्रोत, Christine Ro

“कृत्रिम बुद्धिमत्तेशी संवाद वाढवण्यापेक्षा माणसांशी संवाद वाढवण्यावर भर द्यावा असा सल्ला मी देईन. शेवटी कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या जगण्या-मरण्याची काळजी खरंच घेऊ शकेल का?”

मिडलटन यांना मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता फार आश्वासक वाटते. पण डिमेन्शियाच्या रुग्णांसाठी असलेलं कोणतंही तंत्रज्ञान हे विविध प्रकारच्या लोकांच्या गरजांप्रमाणे बदलता येण्याजोगं व्हावं, यावर अधिक भर देतात.

“डिमेन्शिया असलेल्या कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात.” मिडलटन सांगतात.

“माझ्यासाठी जे काम करतं, ते कदाचित माझ्या शेजाऱ्यासाठी उपयोगी नसेल. अगदी त्याला डिमेन्शिया असला तरीही. त्यामुळे प्रोडक्ट्स तयार करताना डेव्हलपर्सने फक्त डिमेन्शिया असलेल्या लोकांचा विचार करून चालणार नाही; तर डिमेन्शियाचे वेगवेगळे टप्पेही पहावेत आणि त्या त्या माणसाच्या क्षमतांशी जुळवून घेण्यासाठी प्रयत्न करावेत,” मिडलटन पुढे सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)