2 उद्योजक मित्र, एकाची हत्या दुसऱ्याची आत्महत्या; अनैतिक संबंध की व्यवसायातलं भांडण?

फोटो स्रोत, Facebook
- Author, प्रियंका जगताप
- Role, बीबीसी मराठी
अनेक वर्षांपासून मैत्री असलेल्या दोन व्यावसायिकांचा एका पाठोपाठ मृत्यू झाला. आधी मैत्री, नंतर व्यावसायिक संबंध आणि कौटुंबिक संबंध असलेल्या या दोन व्यावसायिकांचे संबंध बिघडत गेले आणि त्यातून पुढे एक भयंकर घटना घडली.
त्यातल्या एका व्यावसायिकाची हत्या झाली तर दुसऱ्या व्यावसायिकाचा मृतदेह नदीत सापडला.
एक हत्या आणि एक अकस्मात मृत्यूच्या या प्रकरणाचा तपास चार राज्यातील पोलिसांकडून करण्यात आला.
22 सप्टेंबरला 52 वर्षीय उद्योगपती विनायक नाईक यांचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील हणकोण येथील घरी निर्घृणपणे खून करण्यात आला.
तर 25 सप्टेंबरला म्हणजेच या हत्येच्या तीन दिवसांनंतर 55 वर्षीय उद्योगपती गुरुप्रसाद राणे यांचा मृतदेह गोव्यातील मांडवी नदीत तरंगताना सापडला.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
उद्योजक विनायक नाईक यांची कारवार तालुक्यातील हणकोण या ठिकाणी राहत्या घरातच हत्या झाली.
पहाटे पाचच्या सुमारास तीन जणांनी विनायक यांच्यावर तलवार, चाकू आणि लोखंडी रॉडने हल्ला करत निर्घृण हत्या केली, असे कारवार पोलिसांनी बीबीसी मराठीला सांगितले. या हल्ल्यात विनायक यांच्या पत्नी देखील जखमी झाल्या.
पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहचले तेव्हा पूर्ण घरात रक्ताचा सडा पडलेला होता तर नाईक यांच्या पत्नीही जखी झाली असल्याचे त्यांना दिसले.
तीन दिवसानंतर गोव्यातील मांडवी नदीत गुरुप्रसाद राणेंचा मृतदेह सापडला.


गुरुप्रसाद राणे हे देखील व्यावसायिक होते आणि त्यांचे विनायक नाईक यांच्याशी व्यावसायिक संबंध होते त्यांच्यात आर्थिक व्यवहारही होत असत. तसेच या दोन्ही व्यावसायिकांचे एकमेकांच्या पत्नीशी देखील प्रेमसबंध होते. यावरुन राणे आणि नाईक यांच्यात वादही झाला होता, असे पोलिसांनी सांगितले.
इंडियन एक्सप्रेसने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने लिहिलेल्या बातमीत या प्रकरणाबद्दल म्हटलं आहे की, घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी देखील राणे आणि नाईक यांच्यात जोरदार भांडण झालं होतं.
या दोन्ही व्यावसायिकांच्या नात्यात असलेल्या गुंतागुंतीच्या संबंधातून ही हत्या झाली असावी, असं कारवार पोलिसांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
तर 'पुढील तपासात ही बाब लक्षात आली की ज्यांची हत्या झाली ते विनायक नाईक यांचे गुरुप्रसाद राणेंच्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध होते', असं पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांचा तपास
पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या असं लक्षात आलं की, ही हत्या दरोड्याच्या हेतूने झाली नाही तर कुणीतरी या हत्येची सुपारी दिली आहे. कारण त्यांच्या घरातील वस्तू आणि पैसे जागेवरच होते. हल्लेखोरांनी गुन्ह्यासाठी नंबर प्लेट नसलेली कार वापरली होती.
कारवार पोलिसांचा अंदाज होता की हल्ला करुन संशयित हे गोव्याकडे पळून गेले आहेत.
कारवार पोलिसांनी गोवा पोलिसांशी संपर्क साधला. गोवा पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांनी हल्लेखोरांना शोधले.
हल्लेखोरांपैकी एक जण गुरुप्रसाद राणेंचा विश्वासू होता त्यावरुन पोलिसांनी गुरुप्रसाद राणेंचा शोध सुरू केला.
गोवा पोलिसांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, "विनायक नाईक यांचा त्यांच्या घरी जाऊन खून करणाऱ्या बिहारमधील मासूम मंजूर पूर्णिया आणि जागीर या दोन व्यक्तींना रेल्वे पोलीस तसेच दिल्ली पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. नाईक यांची हत्या केल्यानंतर हे दोघेही मडगाव येथून रेल्वेने दिल्लीला गेले."
त्यानंतर गोवा पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि दिल्ली पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.
"यात एक तिसरी व्यक्ती होती त्या व्यक्तीचे नाव होते लक्ष्य ज्योतिनाथ केनारामनाय असे होते. हा आरोपी मूळचा आसामचा आहे आणि तो गुरुप्रसाद यांचा विश्वासू आहे. गुरुप्रसाद यांच्या सांगण्यावरुन लक्ष्यने विनायक नाईक यांची अन्य दोन साथीदारांच्या मदतीने हत्या केली. हत्या करुन तो विमानाने पळून जात असतानाच त्याला पोलिसांनी अटक केली," असे गोवा पोलिसांनी सांगितले.
आरोपींनी दिलेल्या जबाबानंतर पोलीस गुरुप्रसाद राणेंचा शोध घेत होते.

फोटो स्रोत, goapolice
या प्रकरणाचा तपास करणारे पर्वरी पोलीस स्टेशनचे पोलीस इन्सपेक्टर राहुल परब यांनी बीबीसी मराठीला सांगितले की, "25 सप्टेंबरला संध्याकाळी 4 च्या आसपास आम्हाला नदी किनारी मृतदेह वाहत आल्याचा फोन आला. मग मी माझ्या टीमसोबत घटनास्थळी गेलो आणि मृतदेह ताब्यात घेतला. त्यांच्या खिशात आम्हाला एक ओळखपत्र सापडलं. त्यावरून आम्ही त्यांच्या कुटुंबाशी संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या पत्नीला बोलावून मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली."
गुरूप्रसाद राणे यांनी आत्महत्या केली होती की तो एक खून होता यावर स्पष्टीकरण देताना इन्सपेक्टर राहुल परब म्हणाले की, "त्यांनी आत्महत्याच केली. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. शिवाय मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथे जवळच त्यांची गाडीसुद्धा आम्हाला मिळाली होती."
त्यांच्या आत्महत्याचे कारण काय असू शकतं, यावर बोलताना पोलीस निरीक्षक राहुल परब म्हणाले की, "कारवार पोलीस त्यांना शोधत होते. पण तिकडे त्यांना राणे सापडत नव्हते. भीतीपोटी त्यांनी ही आत्महत्या केली असावी."
दरम्यान, गुरूप्रसाद राणे यांच्या शव विच्छेदन अहवालानुसार शरीरात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे असं पोलिसांनी सांगितलं.


गुरुप्रसाद राणे आणि विनायक नाईक यांचे परस्परांशी कसे सबंध होते
या प्रकरणाचे वार्तांकन करणारे पत्रकार दीपक जाधव यांनी या दोन्ही उद्योजकांबद्दल अतिरिक्त माहिती बीबीसीला दिली.
दीपक जाधव सांगतात, "विनायक नाईक आणि गुरुप्रसाद राणे हे दोघेही हे मूळचे कारवारच्या हणकोण गावचे होते. व्यवसायासाठी विनायक नाईक पुण्याला गेले तर गुरुप्रसाद राणे गोव्यातील फोंडा येथे गेले."
नाईक यांनी पुण्यात इलेक्ट्रिकलच्या व्यवसायातून भरपूर पैसे कमावले आणि त्यांनी आपल्या मूळगावी मोठं घर देखील बांधलं होतं. या ठिकाणी ते अधून मधून येत असत.
तर गुरुप्रसाद राणेंनी मद्यविक्रीतून भरपूर पैसा कमावल्याचे जाधव सांगतात. दोन्ही व्यावसायिकांचे परस्परांच्या पत्नींशी संबंध होते आणि याची कल्पना दोघांच्याही कुटुंबीयांना होती. या गोष्टीशी त्यांच्या गावातही चर्चा होती", असं जाधव सांगतात.
या हत्येचे कारण काय असावे असे विचारले असता पोलिसांनी सांगितले की, दोघांमध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातूनही ही गोष्ट घडलेली असू शकते. पोलिसांचा तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.
विनायक नाईक हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने स्वतःच आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणाचे गूढ अजूनच वाढले आहे. पोलिसांच्या तपासात या प्रकरणासंदर्भातील अजून कोणते नवे खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











