सुरतमध्ये जे हात हिऱ्यांना पैलू पाडतात, त्यांच्यावरच आर्थिक संकट कसे आले?

सुरतमध्ये हिऱ्यावर काम करणारे एक कर्मचारी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, शीतल पटेल
    • Role, बीबीसी गुजराती

सुरत म्हटलं की ऐतिहासिक काळापासून ते वर्तमानापर्यंत एकच चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. ते म्हणजे, प्रचंड व्यापार, आर्थिक सुबत्ता आणि समृद्धी.

गेल्या काही दशकांमध्ये सुरतमधील हिऱ्यांचा व्यापार प्रचंड भरभराटीला आला होता. पण दोन-तीन वर्षांपासून सुरतमधील हिरे उद्योग प्रचंड मंदीला तोंड देत आहे.

हिऱ्यांना पैलू पाडणारे हजारो युनिट्स आणि लाखो हिरे कामगार या मंदीच्या तडाख्यात सापडले आहेत.

मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली असून काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. जागतिक मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या हिरे उद्योगाचं वास्तव मांडणारा हा रिपोर्ट.

सुरत हे देशातीलच नव्हे तर जगातील हिरे व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र आहे. हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी आणि पॉलिश करण्याच्या उद्योगासाठी सुरत प्रसिद्ध आहे.

28 वर्षांचे निकुंज टांक सुरतमध्ये डायमंड पॉलिशर (Diamond Polisher) म्हणजे हिऱ्यांना झळाळी देण्याचं काम करायचे. मे महिन्यात नोकरी गेल्यापासून ते खूपच हताश झाले होते.

हिऱ्यांना पॉलिश करणाऱ्या एका छोट्या कारखान्यात किंवा युनिटमध्ये ते सात वर्षांपासून काम करत होते. मात्र, ते युनिट आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आणि बंद पडले.

परिणामी निकुंज आणि त्यांच्यासारखे इतर डझनभराहून अधिक कर्मचारी बेरोजगार झाले.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

निकुंज यांच्यावर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. कारण, कुटुंबात ते एकटेच कमावते होते. त्यांचे आईवडील, पत्नी आणि मुलगी या सर्वांची जबाबदारी निकुंज यांच्यावरच होती.

शिवाय, त्यांच्याकडे कोणतीही बचत वा शिल्लक पैसादेखील नव्हता. त्यामुळे, नोकरी जाताच निकुंज आणि त्यांचं कुटुंब आर्थिक संकटात सापडलं.

"त्याला दुसरी नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तो या आर्थिक संकटाचा भार पेलू शकला नाही. त्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं," असं त्याचे निवृत्त वडील जयंती टांक सांगतात. निकुंज यांनी 2 ऑगस्टला आत्महत्या केली होती.

"आता त्याची पत्नी आणि 14 महिन्यांच्या मुलीची काळजी कोण घेणार?" असा प्रश्न जयंती टांक विचारतात.

निकुंज यांच्या आत्महत्येनंतर सुरत पोलिसांनी त्यासंदर्भात तक्रार नोंदवली.

"पोलिस तपासातून समोर आलं की निकुंज टांक यांच्या आत्महत्येला हिरे व्यवसायातील मंदी कारणीभूत होती. त्यांच्या मन:स्थितीवर बेरोजगारीचा अतिशय विपरित परिणाम झाला होता. यासंदर्भातील तपास सुरू आहे," असं सुरतमधील अमरोली पोलिस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

निकुंजभाई पटेल यांचे पालक अद्यापही दु:खात आहेत.

फोटो स्रोत, RUPESH SONAVANE

फोटो कॅप्शन, निकुंजभाई पटेल यांचे पालक अद्यापही दु:खात आहेत.

मंदीच्या भोवऱ्यात सापडलेला हिरे उद्योग

गेली काही वर्षे सुरतमधील हिरे व्यवसायासाठी अतिशय खडतर ठरली आहेत. जगातील जवळपास 90 टक्के हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम सुरतमध्येच होते. साहजिकच सुरत हे हिरे उद्योगाचं केंद्र आहे.

इथे हिऱ्यांना पॉलिश करणारे पाच हजाराहून अधिक युनिट आहेत. या युनिट्समधून हिऱ्यांना पैलू पाडणारे, पॉलिश करणारे आठ लाखांहून अधिक कर्मचारी, कारागीर काम करतात.

पण अलीकडच्या काळात ही परिस्थिती बदलली.

सुरत हे जागतिक हिरे उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र आहे (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुरत हे जागतिक हिरे उद्योगाचं महत्त्वाचं केंद्र आहे (फाईल फोटो)

रशियानं 2022 मध्ये युक्रेनवर हल्ला केला, तेव्हापासून युरोपिय देशांनी रशियावर निर्बंध टाकले आहेत.

त्याचाच भाग म्हणून मार्च 2024 मध्ये 27 देश सदस्य असलेली युरोपियन युनियन तसंच G7 या संघटनांनी रशियातल्या खाणीतून काढलेल्या हिऱ्यांच्या आयातीवर बंदी घातली. हे हिरे तिसऱ्या देशातून युरोपियन देशांत आयात केले जायचे.

या बंदीचा मोठा फटका सुरतमधील हिरे व्यवसायाला बसला. शिवाय, मार्च 2025 पर्यंत हे निर्बंध लागू असल्याने परिस्थिती आणखी बिघडली.

कोव्हिडच्या संकट काळात अनेक महिने लॉकडाऊन होतं.

तसंच मंदावलेली निर्यात, चीन आणि इतर पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थेत मंदी आल्यामुळे या देशांकडून हिऱ्यांची घटलेली मागणी अशा अनेक आव्हानांना हिरे उद्योग मागील काही वर्षांत तोंड देत आहे.

त्याशिवाय प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांची मागणी वाढते आहे.

प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे हे खाणीतील खऱ्या हिऱ्यांपेक्षा बरेच स्वस्त असतात. याचाही मोठा फटका खऱ्या हिऱ्यांच्या बाजारपेठेला बसला आहे.

हिऱ्यांच्या आयात बंदीचा मोठा फटका सुरतमधील हिरे व्यवसायाला बसला.

फोटो स्रोत, RUPESH SONAVANE

फोटो कॅप्शन, हिऱ्यांच्या आयात बंदीचा मोठा फटका सुरतमधील हिरे व्यवसायाला बसला.

भारतात पैलू पाडण्यासाठी, पॉलिश करण्यासाठी जे कच्चे हिरे आयात केले जातात; त्यातील 30 टक्क्यांहून अधिक हिरे रशियातून येतात.

सुरतमध्ये त्यावर पैलू पाडले जातात, पॉलिश केलं जाते आणि मग पाश्चिमात्य देश, चीन यांसारख्या बाजारपेठांमध्ये त्यांची निर्यात केली जाते.

रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत.

"रशियावरील निर्बंधामुळे रशियातून येणारे हिरे उपलब्ध नाहीत," असं इंडियन डायमंड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दिनेश नवाडिया सांगतात.


दिनेश नावडिया, अध्यक्ष, इंडियन डायमंड इन्स्टिट्यूट

फोटो स्रोत, RUPESH SONAVANE

फोटो कॅप्शन, दिनेश नावडिया, अध्यक्ष, इंडियन डायमंड इन्स्टिट्यूट

"2008 च्या जागतिक वित्तीय संकटाच्या काळात सुरतच्या हिरे उद्योगातील जवळपास 1,000 युनिट बंद पडले होते. त्यामुळे दोन लाखांहून अधिक कामगार बेरोजगार झाले होते. मात्र सध्याची परिस्थिती त्याहूनही अधिक गंभीर आहे.

"कारण कोव्हिडच्या संकटानंतर G7 देश, युएई आणि चीनसारख्या प्रमुख बाजारपेठांमधून हिऱ्यांना असलेली मागणी खूपच घटली आहे," असं सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देताना दिनेश सांगतात.

"2021 पासून हिरे उद्योग मंदीला तोंड देतो आहे. कारण कोव्हिडनंतर पैलू पाडलेल्या, पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या किंमतीत सातत्यानं चढउतार होत आहेत."

दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली परिस्थिती

गुजरातची हिरे कामगारांची युनियन ही हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या कामगारांची महत्त्वाची संघटना आहे.

या युनियननं बीबीसीला सांगितलं की गेल्या 16 महिन्यात रोजगार गमावल्यानंतर 65 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर मागील फक्त सहा महिन्यात तीस हजारांहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत.

बीबीसीनं आत्महत्या केलेल्या नऊहून अधिक हिरे कामगारांच्या कुटुंबांची भेट घेतली.

या कुटुंबांनी त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूचा आणि बेरोजगारीचा दोष हिरे उद्योगातील मंदीला दिला. त्याचबरोबर त्यांनी असंही सांगितलं की त्यांना अत्यल्प मदत मिळाली आहे.

"कोणतीही बचत नसताना आणखी किती दिवस आम्ही तग धरणार?" असा प्रश्न हिऱ्यांना पॉलिश करणारे 35 वर्षांचे दिपक हिरपारा यांनी हताश होऊन विचारला. तीन महिन्यांपूर्वीच त्यांची नोकरी गेली आहे.

ते सुरतेमधील वराछा या उपनगरात राहतात. त्यांच्यावर पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी आहे. बेरोजगारीच्या काळात सासरच्या मंडळींकडून मिळत असलेल्या आर्थिक मदतीवर त्यांची गुजराण सुरू आहे.

हिऱ्यांची पारख, पॉलिशिंग, पैलू पाडणे, अशी अनेक कामे सुरतमध्ये केली जातात.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, हिऱ्यांची पारख, पॉलिशिंग, पैलू पाडणे, अशी अनेक कामे सुरतमध्ये केली जातात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बंद पडणारे किंवा कामगारांना काढून टाकणारे युनिट्स हे छोटे किंवा मध्यम स्वरुपाचे आहेत. या युनिट्समध्ये काम करणारे कामगार प्रामुख्यानं दोन प्रकारचे असतात.

पहिला प्रकार म्हणजे जे कच्च्या हिऱ्यांच्या हाताळणीशी निगडीत काम करतात. दुसऱ्या प्रकारचे कामगार हिऱ्यांना पैलू पाडतात, पॉलिश करतात आणि हिऱ्यांना आकार देतात.

"सुरतमधील हिरे उद्योग अत्यंत वाईट परिस्थितीतून जातो आहे," असं कुमार कनानी म्हणाले. ते सुरतमधील वराछा मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. ते सांगतात की, आत्महत्यांच्या प्रकरणांचा पोलीस तपास करत आहेत.

"या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीशी मी सातत्यानं संपर्कात आहे. हिरे उद्योगातील कामगार, व्यापारी आणि व्यावसायिकांना सर्व प्रकारची मदत पुरवण्यास राज्य सरकार तयार आहेत. मी या सर्वांना विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मागण्या मांडाव्यात जेणेकरून राज्य सरकारला आवश्यक ती पावलं उचलता येतील," असं कनानी म्हणाले.

2022 मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेतील सोने आणि हिरे व्यापाराचं योगदान जवळपास 7 टक्के होतं.

2023- 2024 च्या आर्थिक वर्षात देशातील रत्नं आणि दागिन्यांची निर्यात 22.27 अब्ज डॉलर इतकी होती. मात्र मागणीअभावी त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत यामध्ये 14.94 टक्क्यांची घसरण झाली होती.

नोकर कपातीचं संकट

सुरतमधील हिरे उद्योगात होत असलेल्या मोठ्या नोकरकपातीला कामगार संघटनांनी अतिशय गांभीर्यानं घेतलं आहे. त्यामुळेच त्यांनी जुलै 2024 मध्ये एक हेल्पलाइन सुरू केली.

"ऑगस्ट महिन्यात आत्महत्या रोखण्यासाठीच्या आमच्या हेल्पलाइन नंबरवर हिरे कामगारांकडून 1600 हून कॉल आले," असं भावेश टांक सांगतात. ते डायमंड वर्कर्स युनियन गुजरातचे उपाध्यक्ष आहेत.

मात्र, असे अनेकजण होते ज्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही.

भावेश पुढे माहिती देतात, "यातील बहुतांश जणांनी आम्हाला नोकरी मिळवून देण्यासाठी किंवा आर्थिक मदतीसाठी कॉल केला होता."

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

हिरे उद्योगातील कामगारांव्यतिरिक्त दलाल आणि व्यापाऱ्यांना देखील या परिस्थितीचा फटका बसला आहे.

"मी अशी परिस्थिती यापूर्वी कधीही पाहिलेली नाही," असं 49 वर्षांचे दिलीप सोजित्रा म्हणतात. सुरतमधील हिरे उद्योगात काम करणाऱ्या जवळपास 5,000 हिरे दलालांपैकी ते एक आहेत. हिऱ्यांचे हे दलाल ग्राहक, व्यापारी आणि इतर दलालांना हिऱ्यांची विक्री करण्याचं काम करतात.

"मागील कित्येक दिवसांपासून आम्ही कामाशिवाय बसून आहोत. इथं क्वचितच हिऱ्यांची खरेदी किंवा विक्री होते आहे," असं ते सांगतात.

हिरे उद्योग

फोटो स्रोत, RUPESH SONAVANE

सुरतमध्ये हिऱ्यांना पॉलिश करणारे 15 मोठे युनिट्स आहेत. या युनिटसची वार्षिक उलाढाल 10 कोटी डॉलर हून अधिक आहे. इतर सर्व युनिट लहान आणि मध्यम स्वरुपाचे आहेत.

सुरतमध्ये डी बीअर्स, रिओ टिंटो, रशियाच्या अलरोसा (Alrosa)या हिऱ्यांशी निगडीत खाण समूहाकडून आणि आफ्रिकेतील खाणींमधून हिऱ्यांची आयात केली जाते.

"भारत हिरे उद्योगाच्या सर्वात खालच्या पायरीवर आहे. कच्चा म्हणजे खाणीतून येणाऱ्या हिऱ्यांसाठी आणि पैलू पाडून विक्रीसाठी तयार केलेल्या हिऱ्यांसाठी आपण जागतिक बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत," असं किर्ती शाह म्हणतात.

ते आघाडीचे हिरे निर्यातदार आहेत.

"पैलू पाडलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीसाठी अमेरिका, हाँगकाँग, युएई आणि बेल्जियम या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी 80 टक्के हिऱ्यांची निर्यात याच बाजारपेठांमध्ये होते."

"G7 देश, युएई आणि चीन या देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये असलेल्या मंदीमुळे एकूणच रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत ऑगस्टपासून 23 टक्क्यांची घसरण झाली आहे."

जागतिक बँकेनं जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भात नोंदवलेल्या ताज्या अंदाजानुसार जागतिक अर्थव्यवस्था सलग तिसऱ्या वर्षी मंदावण्याची शक्यता आहे.

सध्या सुरू असलेल्या इस्रायल-गाझा, रशिया-युक्रेन युद्धांचाही हिरे उद्योगाला मोठा फटका बसला आहे.

"जागतिक पातळीवर असलेल्या मंदीमुळे पॉलिश केलेल्या हिऱ्यांचा व्यवसाय 25-30 टक्क्यांहून घसरला आहे," असं किरण जेम्सचे चेअरमन वल्लभ लखानी म्हणतात.

हिरे उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेत हिऱ्यांची घटलेली मागणी आणि त्यातुलनेत वाढलेला पुरवठा अशा विचित्र परिस्थितीमुळे 2023 मध्ये पैलू पाडलेल्या हिऱ्यांच्या किंमतीत 5 ते 27 टक्क्यांची घसरण झाली आहे.

"बाजारपेठेत हिऱ्यांची मागणी मर्यादित स्वरुपाची किंवा घटलेली आहे. मात्र असं असताना देखील हिरे व्यावसायिकांनी पैलू पाडलेल्या हिऱ्यांचं उत्पादन सुरूच ठेवल्यामुळे बाजारपेठेत हिऱ्यांचा जास्तीचा पुरवठा झाला आहे."

"हिऱ्यांना पैलू पाडणारे युनिट्स सुरू राहावेत यासाठी असं करण्यात आलं होतं. मात्र बाजारपेठेतील मंदीमुळे त्यांच्या तोट्यांमध्ये वाढ होत गेली," असं हिऱ्यांना पैलू पाडणाऱ्या एका युनिटचे मालक असलेल्या महेश विरानी यांनी सांगितलं.

प्रयोगशाळेतील हिऱ्यांचा दबाब

अलीकडे प्रयोगशाळेत हिरे तयार केले जात आहेत जे खाणीतील हिऱ्यांपेक्षा तुलनेनं स्वस्त असतात. त्यामुळे त्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

साहजिकच खऱ्या हिऱ्यांच्या व्यापाराला प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांमुळे तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

हिरे उद्योग

फोटो स्रोत, Getty Images

यासंदर्भात सुरत डायमंड ब्रोकर्स असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल नकरानी म्हणतात, "जुलै 2022 मध्ये प्रयोगशाळेत तयार झालेले हिरे 300 डॉलर प्रति कॅरटच्या भावानं विकले जात होते. आज तेच हिरे 78 डॉलर प्रति कॅरट किंवा त्याहून कमी किंमतीला विकले जात आहेत."

"या गोष्टीचा हिरे उद्योगावर विपरित परिणाम होतो आहे. खाणीतून आलेल्या कच्च्या हिऱ्यांच्या किंमतीत घसरण झाल्यावर आणि पैलू पाडलेल्या, पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या किंमतीत वाढ झाल्यावरच या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते."

सुरत डायमंड बॉर्स (SDB) मध्ये गेल्यावर मंदीची धग जाणवते. सुरत डायमंड बोर्स हे हिरे व्यावसायिकांसाठीचे जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स असून ते 67 लाख चौरस फुटांमध्ये विस्तारलेले आहे. अलीकडेच त्याचे उद्घाटन झाले आहे.

सुरत डायमंड बोअर्स

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सुरत डायमंड बोअर्स

"2022 मध्ये 23 अब्ज अमेरिकन डॉलर किंमतीच्या पैलू पाडलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची निर्यात झाली होती. 2023 मध्ये हेच प्रमाण घसरून 16 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत खाली होते. तर 2024 मध्ये ते फक्त 12 अब्ज अमेरिकन डॉलर इतकंच राहण्याचा अंदाज आहे."

"हिरे उद्योगात असलेल्या मंदीमुळे व्यापारी सुरतला स्थलांतरित होऊ शकले नाहीत हे यातून स्पष्ट होते," असं सुरत डायमंड बोर्समधील मंदीबाबत बोलताना एसडीबीचे उपाध्यक्ष गोविंद ढोलकिया सांगतात.

मात्र, प्रतिकूल परिस्थिती असतानाही आगामी सणासुदीच्या हंगामात हिरे उद्योगाला पुन्हा सुगीचे दिवस येतील अशी सर्वांना आशा आहे.

"हिरे उद्योगानं आजवर अनेक चढउतार आणि आव्हानांना तोंड दिलं आहे. 2008 च्या जागतिक आर्थिक संकटातून हा उद्योग पुन्हा उभा राहिला. मंदीचं हे संकट देखील दूर होईल. मला वाटतं की दिवाळी, नाताळ आणि नववर्षाच्या हंगामात हिरे व्यवसायाला चालना मिळेल आणि मंदी दूर होईल," असं हिरे उद्योगाबद्दल आशावादी असलेले दिलीप सोजित्रा सांगतात.

(नोट: आत्महत्या करणं ही एक गंभीर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात असाल तर गुजरात सरकारच्या 'जिंदगी हेल्पलाइन 1096' किंवा भारत सरकारच्या 'जीवनसाथी हेल्पलाइन 1800 233 3330' या क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे मित्र आणि नातेवाईकांशीही तणावा संदर्भात बोललं पाहिजे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)