डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत वारंवार दिसलेल्या लॉरा लूमर कोण आहेत?

- Author, बर्न्ड डेबुसमैन ज्यु., मर्लिन थॉमस
- Role, बीबीसी न्यूज आणि बीबीसी व्हेरीफाईड
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आणि यंदा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणूक प्रचार मोहीम वादात सापडली आहे. ट्रम्प यांच्या सोबत लॉरा लूमर वारंवार दिसल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे.
अमेरिकन संसदेची निवडणूक लढवलेल्या लॉरा लूमर कट्टर उजव्या विचारसरणीच्या राजकीय कार्यकर्ता आहेत आणि 2020 साली त्यांनी अमेरिकन संसदेची निवडणूकही लढवली होती.
पण त्या एक काँस्पिरसी थिएरीस्ट (Conspiracy theorist) म्हणजे एखाद्या घटनेमागे मोठं षड्यंत्र असल्याचा दावा करणारी व्यक्ती म्हणूनही ओळखल्या जातात. त्यांनी आजवर अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत.
साहजिकच लॉरा लूमर यांच्या उपस्थितीचा ट्रम्प यांच्या प्रचारसभांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं रिपब्लिकन नेत्यांना वाटत आहे.
लॉरा लूमर यांनी 2020 साली फ्लोरिडा राज्यातून अमेरिकेच्या संसदेची निवडणूक लढवली होती. पण त्या डेमोक्रेटिक उमेदवार लुईस फ्रॅंकेल यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या.
लॉरा लूमर यांचे वादग्रस्त दावे
लॉरा लूमर मुस्लीमविरोधी वक्तव्य आणि वादग्रस्त दावे पसरवण्यासाठी चर्चेत अनेकदा चर्चेत येतात.
अमेारिकेवर झालेला 9/11 चा हल्ला हा 'इनसाईड जॉब' म्हणजे देशांतर्गत कटाचाच भाग होता, असा एक वादग्रस्त दावा त्यांनी केला होता.
त्यामुळेच या हल्ल्याच्या स्मृतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासोबत लॉरा दिसल्या, तेव्हा अनेकांसाठी ते धक्कादायक होतं. काही अमेरिकन माध्यमांनीही यावर रागही व्यक्त केला.


31 वर्षीय लॉरा मंगळवारी ट्रम्प यांच्यासमवेत विमानातून फिलाडेल्फिया येथे प्रेसिडेन्शियल डिबेटसाठी गेल्या होत्या.
या चर्चेदरम्यान, ट्रम्प यांनी एक निराधार वक्तव्य केले होते. हैती इथून आलेले स्थलांतरीत ओहायो राज्यातल्या एका शहरात पाळीव प्राणी मारून खात असल्याचा दावा तेव्हा ट्रम्प यांनी केला होता.
पण तसं काहीही घडल्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही, असं शहरातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बीबीसी व्हेरिफायनंही ट्रम्प यांचा दावा निराधार असल्याची पुष्टी केली.
ट्रम्प म्हणाले होते, की ‘ही गोष्ट मी टीव्हीवरही ऐकली होती.’ प्रत्यक्षात मात्र डिबेटपूर्वी लॉरा लूमर यांनीच हा दावा पसरवला होता.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या लॉरा यांनी आपल्या 12 लाख फॉलोअर्स असलेल्या एक्स अकाउंटवरून हा दावा मांडला होता.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प आणि लूमर यांच्यात नेमकं किती सख्य आहे हे अजून स्पष्ट नाही. पण लूमर यांची पोस्ट आणि फिलोडेल्फियातील त्यांची उपस्थिती यावर काही रिपब्लिकन नेते नाराज झाल्याचं दिसलं.
ट्रम्प यांनी जो निराधार दावा केला, त्यासाठी लूमर यांनाच जबाबदार ठरवलं गेलं. अर्थात ट्रम्प यांच्यासोबत उपराष्ट्राध्यक्षपदासाठी शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जेडी वेंस यांनीही असेच खोटे दावे केले होते.
रिपब्लिकन नेत्यांचा संताप आणि ट्रम्प यांचे स्पष्टीकरण
ट्रम्प यांच्या प्रचार अभियानाशी निगडित एका निनावी व्यक्तीने अमेरिकन वेबसाईट सेमाफोरला दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्यासोबत लूमर यांच्या वाढत्या जवळीकतेमुळे रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या चिंता वाढवल्या आहेत.
लूमर यांना ट्रम्प यांना निवडणूक प्रचार मोहिमेच्या नियमावलीची काळजी असल्याचं दिसत नाही, असं या व्यक्तीने सांगितले.
रिपब्लिकन पक्षाच्या अनेक जेष्ठ नेत्यांनीही सार्वजनिकरीत्या लूमर यांच्यावर टीका केली आहे आणि ट्रम्प यांच्या अंतर्गत गोटात लूमर यांचा समावेश करण्यास विरोध केला आहे.
नॉर्थ कॅरोलिनाचे सिनेटर थोम टिलिस यांनी एक्स या समाजमाध्यमावर लूमर यांना 'क्रेजी काँस्पिरसी थियोरिस्ट'' म्हणून संबोधले आहे आणि त्या रिपब्लिकन पक्षात फूट पाडण्यासाठी बेताल वक्तव्य करत असल्याचं म्हटलं आहे.
टिलिस लिहितात, "ट्रम्प यांना विजयापासून दूर ठेवण्याचे काम डेमोक्रेटिक पक्षापेक्षा लूमरच अधिक प्रभावीपणे करत आहेत."
13 सप्टेंबरला कॅलिफोर्नियातील एका संमेलनात ट्रंप यांनी लूमर आपली केवळ एक समर्थक असल्याचे सांगितले.
लूमर यांनी 9/11 च्या हल्ल्याबाबत आणि कमला हॅरिस यांच्याबाबत काय वक्तव्य केलं हे मला माहित नसल्याचंही ते म्हणाले.
"मी लूमरवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तिला योग्य वाटेल ते ती बोलते. ती स्वतंत्र आहे," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसीने याबाबत लूमर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.
पण समाजमध्यमांवर लूमर यांनी लिहिलं आहे की, "मी ट्रम्प यांना मदत करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करत आहेत. ट्रम्प हीच अमेरिकेची शेवटची आशा आहे."
त्या लिहतात, "अनेक पत्रकार उत्सुकतेनं फोन करून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला आहे. मी सध्या माझ्या शोध आणि बातम्या तयार करण्याच्या कामात व्यस्त आहे. माझ्याजवळ तुमच्या काँस्पिरसी थिअरी ऐकण्यास वेळ नाही."
लॉरा लूमर कोण आहेत?
लॉरा लूमर यांचा जन्म 1993 साली अमेरिकीतील अॅरिझोना प्रांतात झाला. त्या स्वतःला एक मुक्त पत्रकार म्हणवतात.
त्यांनी व्हेरिटास तसंच अॅलेक्स जोन्स इन्फोवॉर्स सारख्या संघटनांमध्ये सक्रिय कार्यकर्ता आणि प्रवक्ता म्हणून काम केले आहे.

फोटो स्रोत, Reuters
लूमर यांनी 2020 साली ट्रम्प यांच्या पाठिंब्यानं अमेरिकेच्या संसदेचं कनिष्ठ सभागृह म्हणजे हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हसाठी फ्लोरिडा राज्यातून रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
मात्र डेमोक्रेट उमेदवार लोईस फ्रॅंकल यांनी त्यांचा पराभव केला.
दोन वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा फ्लोरिडा राज्यातल्याच दुसऱ्या एका जागेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्राथमिक निवडणूक लढवली, पण रिपब्लिकन पक्षाच्या डॅनियल वेबस्टर यांना पराभूत करणे त्यांना जमले नाही.
आता त्या ट्रम्प यांचं भरभरून समर्थन करत असल्यानं तसंच काँस्पिरसी थियरींना खतपाणी घालत असल्यानं चर्चेत आहेत. कमला हॅरिस या कृष्णवर्णीय नाहीत, तसंच अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा मुलगा ट्रम्प यांच्या हत्येसाठी सांकेतिक मेसेज करत आहे, असे अनेक दावे त्यांनी केले आहेत.
समाजमाध्यमांवर अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्याने त्यांना फेसबुक, इन्टाग्रामवर बंदी घातली आहे.
तसंच मुस्लीम चालकांबाबत आक्रमक वक्तव्य केल्यानं उबर आणि लिफ्ट सारख्या प्लॅटफॉर्म्सनी आपल्यावर बंदी घातली आहे असं त्या सांगतात. इस्लामद्वेषी असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही त्या सांगतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
लूमर अनेकदा ट्रम्प यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात आणि याआधीही त्या ट्रम्प यांच्या मार-ए-लागो या फ्लोरिडा येथील निवासस्थानीही दिसून आल्या होत्या.
या वर्षाच्या सुरूवातीला त्या ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या खासगी विमानाने अयोवा राज्यात गेल्या होत्या, जिथे ट्रम्प यांनी त्यांचं स्टेजवरून कौतुक केलं होतं. ट्रम्प यांनी लूमर यांचे व्हिडिओ ट्रूथ सोशल या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरही शेअर केले होते.
गेल्या वर्षी न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या बातमीनुसार, आपल्या प्रचाराची धुरा लॉरा लूमर यांनी सांभाळावी अशी इच्छा ट्रम्प यांनी व्यक्त केली होती, पण त्यांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनीच यावर चिंता व्यक्त केल्यावर त्यांनी माघार घेतली.
एनबीसी न्यूजनं जानेवारीत प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या एका निकटवर्तीयानं म्हटलं होतं की, “ट्रम्प यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लूमर या एक ओझं वाटतात.”
ट्रम्प समर्थकांनाही नको आहेत लूमर
ट्रम्प यांच्या एक समर्थक मार्जरी टेलर ग्रीन यांनी या आठवड्यात लूमर यांच्या वतीने कमला हॅरिस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा अधोरेखित केला.
'हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर व्हाईट हाऊस करीच्या वासाने भरून जाईल', असे लूमर म्हणाल्या होत्या.
लूमर यांचे हे वक्तव्य अत्यंत वाईट आणि वंशभेदवादी असल्याचे मार्जरी टेलर ग्रीन यांनी म्हटले आहे. त्या म्हणाल्या, "असे वक्तव्य रिपब्लिकन पक्ष आणि MAGA (मेक अमेरिका ग्रेट अगेन ही ट्रम्प समर्थक रिपब्लिकन चळवळ) पाठीशी घालणार नाहीत."
ट्रम्प यांच्या रिपब्लिक गोटातला हा वाद ते लूमर यांच्यासोबत न्यूयॉर्क आणि पेन्सिल्वेनियातील 9/11 स्मृती कार्यक्रमात एकत्र दिसल्यावर दुसऱ्याच दिवशी समोर आला आहे.
असोसिएटेड प्रेसनं त्या कार्यक्रमात लॉरा यांना विचारलं होतं की तुम्ही इथे कशा आलात, तेव्हा त्यांनी सांगितलं, "मी ट्रम्प यांच्या प्रचारमोहिमेसाठी काम करत नाही. मला इथे पाहुणी म्हणून बोलावण्यात आले आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











