डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तसे, कमला हॅरिस यांचे वडील डाव्या विचारांचे आहेत का?

फोटो स्रोत, SU/Getty Images
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आणि यंदा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या कमला हॅरिस यांचे वडील चर्चेत आले आहेत.
कमला यांचे वडील मार्क्सवादी असल्यानं त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचे संस्कार झाले आहेत, अशा आशयाची वैयक्तिक आणि वादग्रस्त टीका त्यांचे प्रतिस्पर्धी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रंप प्रेसिडेंशियल डिबेटमध्ये सहभागी झाले होते.
त्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांनी ही टिप्पणी केली.
ट्रम्प तेव्हा म्हणाले होते की, "कमला मार्क्सवादी आहेत. त्यांचे वडील वडील मार्क्सवादी आहेत, ते अर्थशास्त्राचे मार्क्सवादी प्राध्यापक आहेत. कमला त्याच विचारधारेत वाढल्या आहेत."
ट्रम्प यांनी हे विधान केलं, त्यावेळी कमला हॅरिस यांच्या चेहऱ्यावर केवळ मंदस्मित पाहायला मिळाले.
कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांच्या आई श्यामला भारतीय होत्या. त्यामुळे भारतातही कमला चर्चेत असतात.
कमला हॅरिस स्वत:ही आपल्या आईविषयी भरभरून बोलताना दिसतात. मात्र भारतात कमला यांच्या वडिलांविषयी तेवढी माहिती नाही.
त्यामुळे ट्रम्प यांनी कमला यांच्या वडिलांविषयी वक्तव्य करताच, त्यांच्याविषयी सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.
डॉ. डोनाल्ड हॅरिस यांचा जमैकन वारसा
कमला यांचे वडील डॉ. डोनाल्ड जे. हॅरिस हे मूळचे जमैका या देशातील आहेत. डोनाल्ड हॅरिस आणि श्यामला गोपालन यांची भेट कॅलिफोर्नियाच्या बर्कले विद्यापीठात झाली.
मानवाधिकार चळवळीत दोघेही सहभागी झालेले होते, त्या ओळखीचे रुपांतर नंतर लग्नामध्ये झाले.
1964मध्ये कमला यांचा जन्म झाला. कमला पाच वर्षांची असताना त्यांचे आई-वडील विभक्त झाले.
पुढे कमला आणि त्यांच्या बहिणीचा सांभाळ आईनेच केला. त्यामुळेच नंतरच्या आयुष्यात कमला आपल्या वडिलांबद्दल फारशा बोलताना आढळल्या नाहीत, पण वडिलांविषयी त्यांच्या मनात कटुता नाही असं दिसतं.

फोटो स्रोत, YT/KAMALAHARRIS
काही काळापूर्वी एका कार्यक्रमात कमला म्हणाल्या होत्या, "माझे वडिलांनी सांगितलं की, 'रन कमला रन' म्हणजे कमला, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढव."
‘लहानपणापासूनच मला वडिलांनी निर्भय बनवले’, असेही कमला याआधी म्हणाल्या होत्या. .
डॉ. डोनाल्ड जे. हॅरिस यांनी बर्कले विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. ते आता 86 वर्षांचे आहेत आणि अर्थशास्त्राचे नामवंत प्राध्यापक आहेत.
1972साली ते स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि असा मान मिळवणारे ते पहिलेच कृष्णवर्णीय विद्वान ठरले होेते.
अर्थात, वर्णभेदामुळे त्यावेळी त्यांच्या नियुक्तीला काहींनी विरोधही केला होता, असे ‘स्टॅनफोर्ड डेली’च्या 1976मधील एका रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.


स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार डॉ. डोनाल्ड जे. हॅरिस यांनी अनेक वर्षे ‘द थिअरी ऑफ कॅपिटलिस्ट डेव्हलपमेंट’ अर्थात ‘भांडवलशाही विकासाचा सिद्धांत’ हा विषय शिकवला.
1998मध्ये निवृत्त झालेले डॉ. हॅरिस अद्यापही विद्यापीठाचे 'प्रोफ़ेसर एमेरिटस्' अर्थात उत्तम योगदान दिलेले सन्माननीय प्राध्यापक आहेत.
ते कॅनडा, इंग्लंड, भारत, केनिया, मलेशिया, सिंगापूर अशा जगभरातील विविध देशांमध्ये व्याख्यानांसाठी जात असतात.
याच दरम्यान डॉ. हॅरिस यांनी जमैकाशी असलेलं नातंही जपलं आहे. ते जमैकाच्या सरकारसाठी अर्थविषयक सल्लागार म्हणूनही अनेकदा काम करत आले आहेत.
जगभरातील अनेक विद्यापीठे तसेच दिल्ली येथील ‘स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये ते 1968 मध्ये ‘व्हिजिटिंग फेलो’ होते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
‘मार्क्सवादी शिक्का’ आला कोठून?
‘द टेलीग्राफ’ने छापलेल्या वृत्तानुसार स्टॅनफर्ड विद्यापीठात नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थी चालवत असलेल्या एका वृत्तपत्रामध्ये त्यांना 'मार्क्सवादी विद्वान' असे संबोधले होते.
मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वानुसार बाजारपेठेतील उत्पादन आणि उत्पन्न पातळी निश्चित करण्यासाठी ‘निओ-क्लासिक्ल इकॉनॉमिक्स’ अर्थात नव-अभिजात अर्थशास्त्रात मार्गदर्शन केले जाते. त्याकडे बघण्याचा डॉ. डोनाल्ड यांचा दृष्टीकोन फार वेगळा होता.
तेव्हा डॉ. हॅरिस मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक नव्हते. मुक्त अर्थव्यवस्थेपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवणारे प्राध्यापक म्हणून त्यांच्यावर टीकाही झाली होती. त्यामुळेच त्यांच्यावर मार्क्सवादाचा शिक्का बसला, असे सांगितले जाते.

फोटो स्रोत, Getty Images
रॉबर्ट ब्लेकर हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि ते डॉ. डोनाल्ड जे. हॅरिस यांचे विद्यार्थी होते. त्यांच्यासोबत ब्लेकर यांनी कामही केले आहे.
ब्लेकर यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये म्हटले होते, "प्राध्यापक हॅरिस अजिबात लाजाळू नव्हते. न्यायालयात तडफदारपणे युक्तीवाद करणाऱ्या वकील कमला हॅरिस यांना मी जेव्हा पाहिले, तेव्हा त्याच तडफेने परिसंवादात व्याख्यान देणारे त्यांचे वडील डॉ. डोनाल्ड हॅरिस मला आठवले."
एक पिता म्हणून आपल्या मुलींपासून दूर राहावं लागण्याविषयी डॉ. हॅरिस यांनी एका लेखामध्ये लिहिले होते, "दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईने मला माझ्या मुलींपासून तोडले. माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या माझ्या दोन्हीकडच्या आजींविषयी माझी मुलगी कमला आणि माया यांना मी सांगू शकलो नाही, याबद्दल मला आजही खेद वाटतो."
हा लेख ‘जमैका ग्लोबल’ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला होता.
राजकारणापासून चार हात दूर
1938 मध्ये जन्मलेले डॉ. डोनाल्ड सांगतात, आजीमुळे त्यांना अर्थशास्त्राची आवड निर्माण झाली. त्यांच्या घरी एक दुकान होते. त्यांचे बालपण आजोळघरी गेले.
तेथे उसाची शेती केली जात होती. त्यामुळे त्यांना जमैकाच्या अर्थव्यवस्थेतील साखरेचे महत्त्व कळले.
युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट इंडिज आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथूनही डॉ. हॅरिस यांनी शिक्षण घेतले होते.
डॉ. डोनाल्ड हॅरिस यांच्या धोरणांनी जमैकाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव टाकला आहे, असे पेनसिल्व्हेनियातील एका कॉलेजामधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक फ्लूनी हचिंसन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

या बातम्याही वाचा:

स्वतः कमला हॅरिस यांनी आपल्या अर्थतज्ज्ञ वडिलांविषयी लिहिले होते, "वडील आमच्या आयुष्याचा सदैव अविभाज्य घटक राहिले. आम्ही सुट्टीत त्यांना भेटायचो, त्यांच्यासोबत वेळ घालवायचो. पण आमचे पालनपोषण आईनेच केले."
जॅझ या संगीत प्रकाराचे प्रेमी असलेले डॉ. हॅरिस राजकारणापासून चार हात दूरच आहेत. कमला हॅरिस यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावर ते कधीही दिसलेले नाहीत.
‘मी राजकारण आणि मीडियापासून दूरच राहतो’, असे डॉ. हॅरिस यांनी नमूद केल्याचे ‘द इंडिपेंडेंट’ने छापले आहे.
कमला हॅरिस यांच्या आयुष्यावर आईचा प्रभाव
आईचा अर्थात दिवंगत श्यामला गोपालन यांचा मोठा प्रभाव कमला यांच्या आयुष्यावर आहे. आईच त्यांची प्रेरणा आहे. श्यामला यांचा जन्म चेन्नईत झाला होता. चार भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
श्यामला यांनी 19व्या वर्षीच दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ‘बर्कले’ विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी अर्ज केला.
हे विद्यापीठ त्यांनी अगोदर पाहिलेही नव्हते किंवा कॅलिफोर्नियालाही कधी गेलेल्या नव्हत्या.
1958 मध्ये ‘न्यूट्रीशिन अँन्ड एंडोक्रोनॉलोजी’ या विषयात पीएच. डीच. करण्यासाठी त्यांनी भारत देश सोडला. नंतरच्या काळात त्या ब्रेस्ट कॅन्सर क्षेत्रातील संशोधक बनल्या.
कमला हॅरिस म्हणाल्या होत्या, "त्या काळात आपल्या मुलीला देशाबाहेर पाठविण्याचा निर्णय माझ्या आजी-आजोबांसाठी किती कठीण असेल, याची कल्पनाही करणे अवघड आहे. त्यावेळी नागरी विमानसेवा नुकतीच सुरू झाली होती.
"एकमेकांशी संपर्क साधणे कठीण गोष्ट असण्याचा तो काळ होता. तरीही माझ्या आईने शेकडो किलोमीटरवरील परदेशात, कॅलिफोर्नियात जाण्यासाठी परवानगी मागितली आणि माझ्या आजी-आजोबांनी ती नाकारली नाही.
कमला यांनी लिहिलं होतं की "शिक्षण झाल्यावर श्यामला देशात परतेल आणि इथे आई-वडिलांच्या पसंतीने लग्न करेल अशी अपेक्षा केली जात होती, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











