कमला हॅरिस यांच्या तामिळनाडूमधील आजोळी काय चर्चा सुरू आहे?

- Author, शारदा व्यंकटसुब्रमण्यन
- Role, बीबीसी प्रतिनिधी
थुलसेंद्रपुरम. तामिळनाडूमधील एक छोटंसं गाव. चेन्नई शहरापासून 300 किमी दूर. तर वॉशिंग्टनपासून सुमारे 14 हजार किमी दूर. तिथं एकेकाळी कमला हॅरिस यांचे आजी - आजोबा राहायचे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत हॅरिस यांचं नाव चर्चेत आलं आहे. तेव्हापासून या गावात त्यांचे मोठे बॅनर लागले आहेत.
कमला हॅरिस निवडणूक जिंकाव्या म्हणून गावातील मंदिरात पूजा आणि प्रार्थना केली जात आहे. याशिवाय गावात मिठाईही वाटली जात आहे.
गावातील मंदिरासाठी देणगी देणाऱ्यांच्या यादीत हॅरिस यांच्या आजोबांचंही नाव आहे.
अमेरिकेतल्या निवडणुकीबद्दल थुलसेंद्रपुरम गावात जोरदार चर्चा सुरू आहे.
जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर हॅरिस यांचं नाव पुढे येतंय. त्यानंतर आता गावकरी निवडणुकीतील प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवून आहेत.
हॅरिस यांचा अभिमान
“जगातील सर्वात शक्तिशाली देशात हॅरिस पोहोचल्या ही काही सोपी गोष्ट नाही. आम्हाला त्यांचा खरोखर अभिमान आहे. एकेकाळी भारतीयांवर परकीयांचं राज्य होतं. आता भारतीय व्यक्ती शक्तिशाली राष्ट्राचं नेतृत्व करत आहेत,” असं निवृत्त बँक व्यवस्थापक कृष्णमूर्ती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
ते याच गावचे रहिवाशी आहेत.
या गावच्या महिलांमध्येही विशेष अभिमानाची भावना आहे. हॅरिस यांच्या रुपात त्या स्वत:च्या आशा-आकांक्षा पाहतायत. एक महिला किती यश गाठू शकते, ते यातून पाहतायत.

“गावतल्या प्रत्येकाला कमला हॅरिस यांच्याविषयी माहिती आहे. माझी बहीण, माझी आई, अशाप्रकारे त्यांना इथे ओळखलं जातंय,” असं गावातील ग्रामपंचायत सदस्य अरुलमोझी सुधाकर सांगतात.
“कमला हॅरिस यांनी इथल्या मातीशी नाळ कायम ठेवलीय. त्याचा त्यांना विसर पडला नाही. त्यामुळे आम्ही फार आनंदीत आहोत,” असंही सुधाकर सांगतात.

चार वर्षांपूर्वी जेव्हा हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवड झाली तेव्हा या गावात फटाके वाजवण्यात आले. मोठे बॅनर लावण्यात आले होते.
तेव्हा निवडणुकीनंतर गावजेवण ठेवण्यात आलं होतं. शेकडो लोकांनी सांबर आणि इडली खाल्ली. त्यामध्ये हॅरिस यांचे नातेवाईकही होते.
शास्त्रज्ञ होत्या डॉ. श्यामला गोपालन
कमला हॅरिस यांच्या आई डॉ. श्यामला गोपालन या स्तनाच्या कर्करोगावर संशोधन करत होत्या.
त्यांनी 1958 मध्ये अमेरिकेत स्थलांतर केलं. पण त्याआधी श्यामला काही वर्षं चेन्नईत राहिल्या. गोपालन यांचे आईवडील हे थुलसेंद्रपुरम गावात राहायचे.
कमला हॅरिस यांनी एकदा त्यांची आईविषयी सोशल मीडियो पोस्ट केली होती. त्यामध्ये त्या म्हणाल्या, “माझी आई श्यामला, 19 वर्षांची भारतातून एकटीच अमेरिकेत आली. ती एक शास्त्रज्ञ आणि एक मानवी हक्क कार्यकर्ती होती. तसंच दोन मुलींची ती स्वाभिमानी आई होती.
द हिंदू वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हॅरिस यांची आई श्यामला गोपालन यांचं निधन झाल्यानंतर कमला हॅरिस आणि त्यांची बहीण चेन्नईत आल्या. तिथं त्यांनी आपल्या आईच्या अस्थी समुद्रात विसर्जित केल्या.

कमला हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ओकलँडमध्ये 1964 मध्ये झाला होता. त्यांचे वडील मूळचे जमैकाचे तर आई मूळच्या भारतीय वंशाच्या होत्या.
आई वडिलांच्या घटस्फोटानंतर कमला यांच्या आईनं एकटीनं त्यांना वाढवलं.
श्यामला यांनी त्यांच्या दोन्ही मुली कमला आणि माया यांना भारतीय संस्कृतीचा वारसा जपत लहानाचं मोठं केलं.
आईबरोबर कमला अनेकदा भारतातही येत होत्या.
पण, तसं असलं तरी त्यांनी अमेरिका आणि आफ्रिकेची संस्कृतीही स्वीकारली होती. मुलींनाही त्यांनी तशी संमिश्र शिकवण दिली. त्यामुळं लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचा दृष्टीकोन त्यांना मिळत गेला.

अमेरिका निवडणुकीशी संबंधित या बातम्याही वाचा -

जीवनावर आईचा प्रभाव
कमला यांनी त्यांच्या 'द ट्रुथ वी होल्ड' नावाच्या आत्मचरित्रात याबाबत उल्लेख केल आहे.
"माझ्या आईला चांगल्या प्रकारे जाणीव होती की, ती दोन कृष्णवर्णीय मुलींना वाढवत आहेत.आपण ज्या भूमीचा स्वीकार केला आहे, ती आपल्या मुलींकडे कृष्णवर्णीय मुली म्हणूनच बघेल हेही त्यांना माहिती होती. त्यामुळं आम्ही आत्मविश्वासपूर्ण कृष्णवर्णीय महिला बनावं याची काळजी त्यांनी घेतली."
कमला यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या आई श्यामला गोपालन यांचा जन्म चेन्नईत झाला होता.

फोटो स्रोत, KAMALA HARRIS
1958 मध्ये न्यूट्रिशन आणि एंडोक्रनॉलोजीमध्ये पीएचडी करण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या. नंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या क्षेत्रात त्या संशोधक बनल्या होत्या.
हॅरिस यांचे मामा गोपालन बालचंद्रन हे प्राध्यापक आहेत. त्यांचे आजोबा पी.व्ही. गोपालन हे IFS अधिकारी होते.
1960 च्या दशकात त्यांनी झांबियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार म्हणूनही काम केले.
गावकरी म्हणतात की ते कदाचित अमेरिकेपासून हजारो मैल दूर असतील, परंतु त्यांना कमला यांच्या आजवरच्या वाटचालीशी जोडलेले वाटते. त्यांना आशा आहे की हॅरिस एखाद्या दिवशी त्यांना भेटेल किंवा त्यांच्या भाषणात गावाचा उल्लेख सापडेल.











