रहस्यमयपणे बेपत्ता झाल्यानंतर सापडत आहेत मृतदेह; कठुआमधील हत्या कट की कट्टरतावाद्यांचं काम?

फोटो स्रोत, Family Handout
- Author, माजिद जहाँगीर
तीन सामान्य नागरिकांची हत्या झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातल्या बिलावर गावात तणावाचं आणि भीतीचं वातावरण तयार झालं आहे.
या हत्यांवरून जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतही गेल्या सोमवारी गदारोळ झाला.
वरूण ठाकूर (15) जोगेश सिंह (32) आणि दर्शन सिंह (40) अशी तीन मृतांची नावं आहेत.
त्यांचे मृतदेह सुरक्षा रक्षकांना 8 मार्चला कठुआच्या दुर्गम भाग असलेल्या मल्हारमध्ये नदीच्या जवळ सापडले.
हे तिघंही एकमेकांचे नातेवाईकच लागतात. 5 मार्चला गावात एका वरातीसोबत जात असताना ते अचानक गायब झाले होते.
या घटनेचा अनेक बाजूंनी तपास केला जात असल्याचं पोलिस सांगत आहेत.


'ते कधी गायब झाले आम्हाला कळालंच नाही'
मृतांचे नातेवाईक असलेले अक्षय कुमार हे बीबीसी हिंदीशी फोनवर बोलत होते. तिघेही कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले असल्याचा दावा त्यांनी केला.
सरकारने याचा तपास करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली.
घटनेच्या दिवशी काय झालं ते सांगताना अक्षय म्हणाले, "आमच्या घरी लग्न होतं. दुपारी चार वाजता वरात निघाली. जिथं पोहोचायचं होतं तिथं जाण्यासाठी जवळपास चार तास पायी चालत जावं लागणार होतं. चालताना हे तिघे मागे राहिले. आम्हाला वाटलं ते आपापले येतील. पण ते सापडलेच नाहीत."

फोटो स्रोत, ANI
"आम्ही जात होतो तो रस्ता जंगलातून जातो. ते कधी गायब झाले आम्हाला कळालंच नाही. समजलं असतं तर त्याच क्षणी त्यांना शोधायला निघालो असतो किंवा तक्रार दाखल केली असते."
"आम्ही दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा जंगलात पोलिसांसोबत त्यांना शोधण्यासाठी गेलो," असं अक्षय सांगत होते.
पोलिसांनी त्यांना शोधायचा प्रयत्न केला नाही असा त्यांचा आरोप आहे. "शोधमोहिम जोरानं सुरू आहे असं ते फक्त त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगत होते. असं करत चार दिवसांनी पोलिसांना मृतदेह सापडले. तिथून दोन हजार फूट वर एका उंच ठिकाणी त्यांचं सामानही सापडलं," ते पुढे म्हणाले.
तिघांचे जीव तर गेले. पण त्यांच्यामागे राहिलेल्या कुटुंबियांंचं काय होणार? असंही अक्षय पुढे विचारत होते.
या प्रकरणानंतर दोन दिवस बिलावरचा बाजार बंद होता. लोकांनी आंदोलनंही केली आहेत.
एका महिन्यात तीन घटना
कठुआच्या बिलावर भागात गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.
यावर्षीच 16 फेब्रुवारीला रोशन लाल आणि शमशेर या दोघांचे मृतदेह या भागातल्या बथेरी गावात एका नदीजवळ सापडले होते.
तेव्हाही बिलावरवासियांनी बंद पाळला होता आणि आंदोलनं केली होती.

फोटो स्रोत, Ishant Sudan
त्यानंतर 8 मार्चला तिघांचे मृतदेह सापडल्यानंतर कठुआ जिल्ह्याच्या हरदू गावांतल्या गुर्जर समुदायातली दोन मुलं, दीन मोहम्मद (15) आणि रहमत अली (12) गायब झाले.
दोघे चुलत भाऊ होते. ते हरवल्याची तक्रार कठुआतल्या राजबाग पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.
दोघे जनावरं चरायला गेले होते असं नातेवाईक सांगतात. जम्मूचे पोलीस उपमहानिरीक्षक शिव कुमार मंगळवारी त्यांच्या नातेवाईकांना घरी भेटायला गेले होते.
भीतीचं वातावरण
बिलावर आणि आसपासचा परिसर घनदाट जंगलानं वेढलेला आहे. हा भाग अतिशय दुर्गम आहे.
समोर आलेल्या घटना बिलावरच्या वरच्या भागात घडलेल्या दिसतात.
स्थानिक लोक बहुतेक शेती आणि पशुपालनाचं काम करतात. हिंदू आणि मुस्लीम लोकं मिळून मिसळून राहतात.
अशा पद्धतीच्या घटनांमुळे संपूर्ण भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे, असं बिलावरचे स्थानिक पत्रकार इशांत सुदान सांगत होते. विशेषतः रात्रीच्या वेळी भीती जाणवते.

फोटो स्रोत, Ishant Sudan
"कठुआच्या वरच्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये जबरदस्त भीती बसलीय. रात्रीच्यावेळी कोणालाही जंगलाच्या बाजूला जायचं असेल तर तो एकटा जातच नाही. संध्याकाळ सरत आली की लोक जंगलाच्या बाजूला फिरकणं बंदच करतात."
"गायी-म्हशी, बकऱ्या लोकं जंगलात चरण्यासाठी घेऊ जात असत. पण अशापद्धतीच्या घटना समोर येऊ लागल्यापासून लोकांनी तेही बंद केलं आहे," इशांत पुढे सांगत होते.
"गेल्या अनेक दिवसांपासून हे सुरू आहे. कठुआ शहरात सर्व काही आलबेल आहे. पण आसपासच्या भागातलं वातावरण बिघडलेलं आहे," ते म्हणाले.
तपास अजून सुरू आहे
तीन व्यक्तींच्या हत्येचा तपास सुरू असल्याचं पोलिस उपमहानिरीक्षक शिव कुमार यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं. लवकरच सत्य परिस्थिती समोर येईल असं ते म्हणाले.
"अनेक बाजूंनी तपास करत आहोत. अजून तपास पूर्ण झाला नसल्याने काही सांगता येणार नाही," ते म्हणाले
कठुआत गेल्या एक महिन्यात अशा अनेक घटना समोर आल्यात. त्यामागे काय कारण असू शकतं याबद्दल बोलताना शिव कुमार म्हणाले, "सगळ्या प्रकरणांचा तपास सुरू आहे."
एका महिन्यात पाच लोकांच्या हत्येमागे कट्टरतावाद्यांचा हात आहे का असंही त्यांना विचारलं गेलं. मात्र, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच सांगता येईल असं ते म्हणाले.
बिलावरमधलं वातावरण आता स्थिर झालं असून बाजारही उघडला आहे, असंही ते पुढे म्हणाले.
'सखोल आणि कसून तपास केला जाईल'
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 10 मार्चला या हत्याकांडावर चिंता व्यक्त केली. आरोपींना शिक्षा दिली जाईल असंही ते म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत हेही त्यांनी सांगितलं.
"कठुआचे वरूण सिंह, योगेश सिंह आणि दर्शन सिंह यांच्या हत्येने मला अतीव दुःख झालं आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र-परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे," ते एक्स या सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणतात.
"या प्रकरणाचा सखोल आणि कसून तपास करायचे आदेश मी दिले आहेत. मृतांच्या कुटुंंबीयांना सगळ्या पद्धतीने मदत केली जाईल," ते म्हणाले.
आरोपींना लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल असा विश्वासही त्यांनी लोकांना पुढे दिला.
राजकारणाच्या पलीकडचा प्रश्न
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) च्या नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी सामान्य नागरिकांच्या हत्येवरून सरकारवर टीका केली आहे. कठुआ आणि बिलावरमधल्या कायदा व्यवस्थेत झालेल्या बिघाडावर त्यांनी प्रश्न विचारलेत.
गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटनांच्या तपासाची मागणी त्या करत आहेत.
सोमवारी बिलावरला जाण्याची इच्छा असताना त्यांना जाऊ दिलं नाही असं माध्यमांशी बोलताना इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्यांनी त्यांची अडवणूक केली असे आरोप त्यांनी लावलेत.
पोलीस निष्पक्षतेनं काम करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे.
या तीन हत्या कट्टरतावाद्यांनी केल्या आहेत असं केंद्राचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 9 मार्चला म्हटलं होतं. 'एक्स'वर ते लिहितात, "कठुआ जिल्ह्यातल्या जंगलाच्या भागात तीन तरुणांची कट्टरतावाद्यांनी केलेली हत्या अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे. या शांत भागातलं वातावरण बिघडवण्यामागे मोठं कारस्थान दिसून येतं."
बिलावर मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार सतीश शर्मा बीबीसी हिंदीशी फोनवर बोलताना सांगत होते की परिस्थिती बिघडवण्याचा दोष आज जे लोक भाजपला देत आहेत, खरं तर त्यांच्यामुळेच या घटना घडत आहेत.
"सुरक्षेवर भाजपचं नियंत्रण आहे आणि अशा घटना थांबवण्याची जबाबदारी भाजपचीच आहे असं म्हणणाऱ्यांना मी सांगू एक इच्छितो. गेल्या सत्तर वर्षात त्यांनी या भागात रस्ता बनवला असता तर आज तीन सामान्य नागरिकांची हत्या झाली नसतील. लग्न होतं त्या जागेपर्यंत चालत जावं लागतं," ते म्हणाले.
"त्यांच्याकडे संपूर्ण देशाचीच कायदा व्यवस्था होती. मग काश्मीरमधली दगडफेक बंद का करता आली नाही? हे सगळं राज्यपालांचं प्रशासन आल्यानंतरच शक्य झालं. काश्मीर झाल्यावर आता जम्मूमधली परिस्थिती बिघडवण्याचे प्रयत्न सुरू झालेत," असं ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, ANI
"या प्रकरणाचा स्पष्ट आणि स्वच्छ तपास व्हावा असं आम्हाला वाटतं. त्यातूनच सत्य समोर येऊ शकेल. कठुआ मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आमदार डॉक्टर रामेश्वर यांच्याशीही आम्ही बोललो. राजकारण सोडून या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. गेल्या काही महिन्यांपासून अशा घटना सातत्याने घडत असल्याचं ते सांगत होते. सुरक्षा संस्थांना त्यांच्या कामात सतर्कता आणण्याची गरज आहे."
भाजपने केलेल्या आरोपांवर डॉक्टर रामेश्वर म्हणाले की, "यावर कोणत्याही पद्धतीचं राजकारण करणं बरोबर नाही. लोकांना सुरक्षित वाटत नाही. हा प्रश्न सगळ्यांचा आहे. सगळ्यांनी मिळून या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत."
नॅशनल कॉन्फेन्सचे प्रवक्ते इमरान नबी डार बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "हा प्रश्न फक्त कठुआमध्ये घडणाऱ्या घटनांचा नाही. तर संपूर्ण जम्मू क्षेत्रात गेल्या काही काळात जे काही सुरू आहे त्याबद्दलचा आहे."
"जम्मूच्या अनेक भागात याआधी लक्षित हत्येचे प्रकार घडले आहेत. कट्टरतावाद्यांचा लवलेशही नाही अशा भागातही या घटना घडल्यात. ही सगळ्यांसाठी काळजीची गोष्ट आहे", असं डार यांचं म्हणणं आहे.
भाजपच्या आरोपांवर उत्तर देताना डार म्हणाले की, "प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. पण प्रश्न विचारण्यापेक्षा सुरक्षा मजबूत करणं जास्त महत्त्वाचं होतं", असं ते म्हणाले.
जम्मूच्या अनेक भागात भीतीचं वातावरण आहे. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
2019 मध्ये जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा काढून टाकला गेला आणि राज्य केंद्रशासित प्रदेश असल्याचं जाहीर केलं गेलं.
तेव्हापासून जम्मू-काश्मीरचा कारभार उपराज्यपाल पाहतात.
जम्मूमध्ये कट्टरतावाद वाढलाय?
गेल्या चार वर्षांत जम्मूतल्या अनेक भागात कट्टरतावादानं डोकं वर काढलं आहे. जम्मूच्या पुँछ आणि राजोरी जिल्ह्यातून सर्वात जास्त दहशतवादी घटना समोर येत आहेत.
2021 पर्यंत जम्मू भागातून कट्टरतावादी हालचाली फार कमी वेळा समोर येत होत्या.
2021 च्या जुलैपासून 2024 पर्यंत जम्मूच्या भागात 33 कट्टरतावादी घटना समोर आल्या.
2024 च्या पहिल्या सात महिन्यात जम्मूत आठ कट्टरतावादी हल्ले झाले. त्यात 11 सुरक्षारक्षक मारले गेले आणि 18 सैनिक जखमी झाले.
याच काळात जम्मूतल्या 12 सामान्य नागरिकांची हत्या केली गेली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











