लोखंडी सळईने अंगभर चटके, जालन्यात तरुणाला अमानुष मारहाण; नेमकं प्रकरण काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सोमनाथ कन्नर
- Role, बीबीसी मराठीसाठी
एकीकडे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला असताना जालन्यातूनही असंच एका अमानुष मारहाणीचं प्रकरण समोर आलं आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका तरुणाला अमानुष मारहाण करून तप्त सळईने चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी भोकरदन तालुक्यातील आन्वा शिवारातील महादेव मंदिराच्या परिसरात कैलास गोविंदा बोऱ्हाडे (वय 37) याच्यासोबत हा प्रकार घडला आहे.
या घटनेचा व्हीडीओ प्रसारित झाला असून या प्रकरणातील आरोपी तरुणाच्या उघड्या शरीरावर लालबुंद सळईने चटके देत असल्याची हृदयद्रावक दृश्ये दिसत आहेत.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुण कैलास बोऱ्हाडे यांनी पारध पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कैलास हे बुधवारी (26 फेब्रुवारी) रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान कार्ला-जानेफळ या रस्त्यावर असणाऱ्या वटकेशवर महादेव मंदिरात दर्शनास गेले होते.
त्यावेळी आरोपी सोनू उर्फ भागवत दौड याने 'मंदिरात स्त्रिया असल्याने तू मंदिरात जाऊ नको' असे सांगितलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सोनू दौड याने कैलास यांना मंदिराच्या पाठीमागील बाजूस ओढत नेले.


तिथे महाप्रसाद बनवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या चुलीमध्ये लोखंडी सळई तापवून कैलास यांच्या पूर्ण अंगावर चटके दिले; तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाणही केली.
या तक्रारीनंतर पारध पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी सोनू दौड याला अटक केली असून दुसरा आरोपी नवनाथ दौड हा फरार आहे. त्याचा शोध पारध पोलीस घेत असल्याची माहिती पारध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे.
आरोपी दौड आणि कैलास बोऱ्हाडे यांच्यातील वाद जुना
या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू दौड आणि कैलास बोऱ्हाडे यांचे एकमेकांना लागूनच शेत आहे. वर्षभरापूर्वी सोनू आणि कैलास यांच्यात पाईपलाईन टाकण्यावरून वाद झाला होता. या वादावेळी 'मी कोण आहे, तुला माहिती नाही. मी तुला पाहून घेईन. तुला सोडणार नाही,' अशा स्वरुपाची धमकीही दिली होती. तो राग डोक्यात ठेवून सोनू दौड याने हे कृत्य केलं आहे, असं तक्रारदाराचं म्हणणं आहे.

सोनू दौड याचा भाऊ नवनाथ दौड हा माजी जिल्हा परिषद सदस्य असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भोकरदन तालुकाध्यक्ष आहे.
नवनाथ दौड याच्या सांगण्यावरूनच सोनू याने आपल्याला मारहाण केली असल्याचे कैलास बोऱ्हाडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
प्रकरणाला राजकीय वळण
या प्रकरणातील आरोपी हे मराठा समाजाचे असून पीडित तरुण हा धनगर समाजातील आहे.
घटनेचा व्हीडीओ आणि फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असता धनगर समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आन्वा येथे पीडित तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच, जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन फरार आरोपी नवनाथ दौड याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "दौड कुटुंबाची गावामध्ये दहशत आहे. तसेच या दौड भावांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. धनगर समाज कमी संख्येत असल्याने त्यांची दहशत आहे. सोन्या दौड याचा भाऊ नवनाथ दौड हा मनोज जरांगेंच्या जवळचा कार्यकर्ता आहे. याप्रकरणी कारवाई न झाल्यास आम्ही जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू."
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावरुन सत्ताधारी ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "जालन्यातील अत्याचाराकडे ओबीसी नेते गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. छगन भुजबळ, नवनाथ पडळकर, लक्ष्मण हाके किंवा पंकजा मुंडे हे ओबीसींचे नेते आहेत. यापैकी कोणीही जालना येथील घटनेकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत."
विधिमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे पडसाद

फोटो स्रोत, Getty Images
मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा विधानसभा अधिवेशनावेळी मांडला.
ते म्हणाले, "या प्रकरणातील आरोपी हे 'उबाठा गटा'चे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर याआधीही अनेक गुन्हे नोंद आहेत. आरोपींवर 'मकोका'अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भटक्या विमुक्तांसाठी ऍट्रॉसिटी सारखा संरक्षक कायदा करण्याची विनंती आम्ही करणार आहोत."
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही या प्रकरणावरुन विधानसभेमध्ये आक्रमक झाल्याचं दिसून आलं. ते म्हणाले की, "तो धनगर माणूस होता. आपण अहिल्याबाई होळकरांना शिवपिंड हातात घेऊन दाखवतो. त्या समाजाच्या व्यक्तीला मंदिरात जाताना अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे. धनगर आहे म्हणून आपण बोलायचं नाही का? कोण करणार या गोष्टीचा निषेध? मला पोलिसांना वा सरकारला दोष द्यायचा नाहीये, पण मला एवढंच म्हणायचं आहे की, महाराष्ट्र कुठे चालला आहे?"
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विधिमंडळात दिली माहिती
या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहात या प्रकरणाची माहिती दिली.
ते म्हणाले, "कैलास बोऱ्हाडे याच्यासोबत घडलेला प्रकार अत्यंत अमानुष आहे. याबाबत मी जालना एसपींसोबत बोललो असून या प्रकरणी 'मकोका'अंतर्गत करावाई करण्याच्या सूचना दिल्या आहे. तसेच बोऱ्हाडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याचा सर्व खर्च शासन करणार आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सरकार करेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











