वक्तृत्वानं व्यासपीठं गाजवली अन् वादांनी राजकीय कारकीर्द; धनंजय मुंडेंचा राजीनामा

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आशय येडगे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे.

या हत्येतील आरोपींचा संबंध असलेल्या खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली.

या प्रकरणी कारवाई सुरु असताना 3 मार्च रोजी संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आले. त्यानंतर आज (4 मार्च) धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

यापूर्वी सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनी देखील धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री न करण्याची किंवा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचीही विनंती केली होती.

या निमित्तानं धनंजय मुंडेंचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया.

नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून तब्बल 1 लाख 40 हजार 224 मतांनी विजय मिळवला.

त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यापेक्षाही 40 हजार मतं अधिकची घेऊन धनंजय मुंडे यांनी हा विजय मिळवला होता.

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देखील दिलं गेलं. त्यानंतर धनंजय मुंडे हेच बीडचे पालकमंत्री होणार असं चित्र असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचे वाल्मिक कराड यांच्याशी असणारे कथित संबंध, हत्येनंतर दोन दिवसांनी एका खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि वाल्मिक कराड यांची धनंजय मुंडे यांच्याशी असणारी जवळीक, या सगळ्या कारणांमुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे असं दिसतंय.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी भाजपच्या युवा मोर्चातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.

कधीकाळी बीड जिल्ह्यातील पट्टी वडगावचे जिल्हा परिषद सदस्य आणि बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या राजकीय पदांवर काम केलं.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांची कारकीर्द अनेक वादांनी देखील गाजली आहे.

2011 साली झालेल्या परळी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी पक्षाचा व्हीप धुडकावून लावणं, ज्यांच्या नेतृत्वात भाजपचं काम सुरु केलं त्या गोपीनाथ मुंडेंची साथ सोडणं, त्यानंतर 2021मध्ये एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लावलेला बलात्काराचा आरोप, करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंवर लावलेले आरोप, करुणा शर्मा यांच्यासोबत असणाऱ्या नात्याची खुद्द धनंजय मुंडेंनी दिलेली कबुली, मागच्या सरकारमध्ये बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी 'पालकमंत्रिपद भाड्याने दिल्याची' त्यांच्यावर झालेली टीका आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर झालेले आरोप अशा सगळ्या वादविवादांमुळे धनंजय मुंडे नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

याचनिमित्ताने धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास कसा राहिला आहे? सध्या सुरु असलेल्या वादाचे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काय परिणाम होऊ शकतात? आणि मुळात धनंजय मुंडे यांच्या कारकिर्दीत कोणकोणते वाद निर्माण झाले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

गोपीनाथ मुंडेंचे संभाव्य वारसदार, पण...

गोपीनाथ मुंडे राज्य पातळीवर काम करत असताना, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात त्यांचेच पुतणे धनंजय मुंडे त्यांचं राजकारण पाहायचे. गोपीनाथ मुंडे यांचे संभाव्य वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत होतं.

धनंजय मुंडे साधारणत: 2000-2004 च्या काळात मुंडे भाजपच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते. याचकाळात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी धनंजय मुंडे यांची ओळख झाल्याचं बोललं जातं.

धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार असणार अशी चर्चा सुरु होती.

मात्र, 2009च्या विधानसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आणि काका पुतण्याच्या नात्यात पहिल्यांदा दुरावा आला.

त्यानंतर डिसेंबर 2011 परळी नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला.

त्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या गटाचे दीपक देशमुख यांना यांना 26 तर जुगलकिशोर लोहिया यांना 6 मते मिळाली.

जुगलकिशोर लोहिया यांना गोपीनाथ मुंडे यांनी समर्थन दिलं होतं. त्यावेळी धनंजय मुंडे हेदेखील भाजपमध्येच होते. मात्र त्यांच्या नगरसेवकांनी भाजपचा व्हीप धुडकावत दीपक देशमुख यांना निवडून आणलं होतं.

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Facebook/DhananjayMunde

पंकजा मुंडेंना विधानसभेची उमेदवार दिल्याने नाराज झालेल्या धनंजय मुंडेंना विधानपरिषद देण्यात आली होती. मात्र तरीही त्यांची नाराजी दूर झाली नव्हती.

नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर देखील धनंजय मुंडे यांनी विजय मिळवला. त्यावेळी राज्यात भाजपचं नेतृत्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंना त्यांच्याच पुतण्याने, त्यांच्याच होमग्राउंडवर धक्का दिल्याची चर्चा माध्यमांमध्ये झाली होती.

यापाठोपाठ धनंजय मुंडेंचे वडील (आणि गोपीनाथरावांचे भाऊ) पंडितअण्णा मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर धनंजय मुंडे केवळ तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये होते.

भाजप सोडताना पंडितअण्णा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली होती.

"(प्रमोद) महाजनांच्या कुटुंबात जे घडले ते आमच्या कुटुंबातही होईल अशी मला भीती वाटते," असं म्हणून पंडितअण्णा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडली होती.

2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले.

गोपीनाथ मुंडेंनंतर धनंजय मुंडेंनी त्यांचं वलय मिळवलंय का?

2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंना स्वतःच्या मतदारसंघात म्हणजेच बीडमध्ये लक्ष केंद्रित करून राहावं लागलं.

ही लोकसभा निवडणूक जिंकून मुंडे दिल्लीत गेले आणि मोदी कॅबिनेटमध्ये ग्रामविकास मंत्री झाले. पण मंत्री झाल्याच्या आठव्याच दिवशी त्यांचा दिल्लीत अपघातात मृत्यू झाला.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळी आणि पर्यायाने बीडच्या राजकारणात धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे यांचा संघर्ष सुरु झाला.

एवढी वर्षं वडिलांसोबत राजकारण केलेल्या पंकजा मुंडेंसमोर धनंजय मुंडे यांनी मोठं आव्हान उभं केलं होतं.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी बाजी मारली.

विधानसभा निवडणुकीनंतर वैद्यनाथ बँक आणि वैद्यनाथ साखर कारखान्याच्या निवडणुका झाल्या.

या निवडणुकांमध्येही भाऊ-बहीण समोरासमोर होते. पण या दोन्ही संस्था ताब्यात ठेवण्यात तेव्हा पंकजा मुंडे यांना यश आलं.

धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोला अभिवादन करताना

फोटो स्रोत, Facebook/DhananjayMunde

दुसरीकडे धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली आणि वरिष्ठ सभागृहाचा विरोधी पक्षनेता देखील बनवलं.

डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं. या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं होते.

तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.

घरच्याच मैदानावर बहीण भावांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. स्वतःच्याच विधानसभा मतदारसंघातील नगरपालिकेत पंकजा मुंडे यांना पराभव पत्कारावा लागला.

नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मुंडे कुटुंबीयांमध्ये वर्चस्वाची जोरदार लढाई सुरू झाली होती.

त्यानंतर 2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.

दरम्यान, यावेळस पंकजा यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. माजी मंत्री सुरेश धस यांची साथ त्यांना लाभली.

धनंजय आणि पंकजा यांच्या वादामुळे बीडमधल्या स्थानिक निवडणुकांकडे राज्याचं लक्ष जातं. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.

अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते.

मात्र, पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणूक पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलने समितीवर मोठा विजय मिळवला.

2024 येता येता पंकजा आणि धनंजय मुंडे यांची दिलजमाई झाल्याचं दिसतंय. पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी दिवसरात्र एक केल्याचं दिसून आलं. परळी आणि बीडमध्ये पहिल्यांदाच ताई आणि दादांचे कार्यकर्ते एकत्र येऊन भाजपच्या विजयासाठी झटले मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

त्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर संधी दिली आणि मंत्रिमंडळात स्थानसुद्धा. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून देवेंद्र फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये जागा निर्माण केली.

त्यामुळे या बहीण भावांचा संघर्ष संपला, दोघांनाही मंत्रिपदं मिळाली पण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे यावर काय परिणाम होतात? हे येणारा काळच सांगू शकेल.

'2019 च्या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही'

2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात लोकसंपर्क वाढवला होता.

धनंजय मुंडेंचं आक्रमक वक्तृत्व, तरुण कार्यकर्त्यांची फळी आणि राजकीय व्यवस्थापनाच्या जोरावर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी गोपीनाथ मुंडे आणि नंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं.

याबाबत बोलताना परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयपाल लाहोटी म्हणतात की, "धनंजय मुंडे यांच्याकडे सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम करण्याची हातोटी होती.

धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतानाच मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. आम्हीसुद्धा आधी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत होतो आणि नंतर आम्ही धनंजय मुंडे यांच्यासोबत जाणं पसंत केलं. धनंजय मुंडे यांनी त्यांचा लोकसंपर्क आणि वक्तृत्वाच्या जोरावर परळीवर वर्चस्व निर्माण केलं."

2014 मध्ये पंकजा मुंडे यांना मिळालेली सहानुभूती या 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांच्या मदतीला आली नाही.

त्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. आणि राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते सामाजिक न्याय मंत्रीबनले. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला एकनाथ शिंदे यांचं सरकार अस्तित्वात आलं.

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Facebook/DhananjayMunde

मात्र, 2023मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात धनंजय मुंडे सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये त्यांनी कृषिमंत्री म्हणून काम केलं. यासोबतच बीडचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं.

2019 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकार्याने एक सरकार स्थापन झालं होतं. ते सरकार फारकाळ टिकलं नाही पण अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ नेण्यात धनंजय मुंडे यांची भूमिका असल्याचं बोललं गेलं.

धनंजय मुंडेंवर एका महिलेचे बलात्काराचे आरोप आणि नंतर माघार

धनंजय मुंडे महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषिमंत्री असताना यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला होता. 11 जानेवारी 2021 रोजी या महिलेने तक्रारीचं पत्र ट्वीट केलं होतं. पण या महिलेचे आरोप म्हणजे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार असल्याचं सांगत मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

तसेच, धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलं होतं. तसंच आरोप करणाऱ्या महिलेच्या बहिणीशी आपले परस्पर सहमतीने संबंध होते. या संबंधातून दोन मुले झाली असून त्यांचा सांभाळही आपण करत असल्याचा खुलासा मुंडे यांनी यावेळी केला होता.

हे प्रकरण चांगलंच तापलेलं असताना 22 जानेवारी 2021 रोजी संबंधित महिलेने पोलिसांकडे जाऊन तिने केलेली तक्रार मागे घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनीही धनंजय मुंडेंवरील आरोपाप्रकरणी आमचा चौकशी करून निर्णय घेण्याचा निष्कर्ष योग्यच होता, असं म्हटलं होतं.

धनंजय मुंडे

फोटो स्रोत, ANI

ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या मते, "धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे होते आणि त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता होती. पण ज्या महिलेनं बलात्काराची तक्रार केली, त्या महिलेविरोधातच अनेकांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार केल्यामुळे या प्रकरणात विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला होता."

या संपूर्ण प्रकरणात त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेची चर्चा त्यावेळी झाली होती.

करुणा शर्मा यांनी काय आरोप केले होते?

12 जानेवारी 2021 रोजी धनंजय मुंडे यांनी त्यांचे करुणा शर्मा या महिलेसोबत 2003 पासून परस्पर सहमतीने संबंध असल्याची कबुली दिली होती. धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली होती.

करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वांत पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी 2021 मध्ये. त्याआधी केवळ राजकीय वर्तुळांमध्ये आणि दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा होती.

मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली होती.

करुणा शर्मा

फोटो स्रोत, FACEBOOK/KARUNA DHANANJAY MUNDE

करुणा शर्मा यांनी आजवर वेगवेगळे व्हीडिओ आणि पोस्ट मधून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत. सप्टेंबर 2021मध्ये करुणा शर्मा यांना बीड जिल्ह्यातील परळीत अटक देखील करण्यात आली होती.

करुणा शर्मा यांनी अटकेनंतर "धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला," असा आरोप केला होता.

धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द बीडमधील परळीतून सुरू झाली. धनंजय मुंडेंचं राजकारण जवळून पाहणारे बीडमधील पत्रकार उद्धव मोरे सांगतात, "करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं माहीत नव्हतं. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेंनी स्वत:च करुणा शर्मांबाबत नात्याचा खुलासा केला. तेव्हा परळी आणि बीडमधील लोकांना करुणा शर्मा हे नाव माहीत झालं."

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाली. धनंजय मुंडे यांच्या शपथविधीला करूणा शर्मा आणि त्यांची दोन मुलं उपस्थित असल्याचा फोटो त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

धनंजय मुंडे यांनी मात्र या प्रकरणावर मौन बाळगलं आहे.

धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांची मैत्री

बलात्काराचे आरोप झालेल्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडेंना फायदा झाला, असं मत लोकसत्ताचे बीड प्रतिनिधी वसंत मुंडे यांनी मांडलं होतं.

वसंत मुंडे म्हणाले, "देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यातील मैत्री जगजाहीर आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर फडणवीसांनी सार्वजनिक सामंजस्याची भूमिका घेतली. पोलीस तपासात काय निष्पन्न होतं, त्यावर भूमिका घेऊ, असं फडणवीस यांनी म्हटलं. केवळ आरोपांवर आधारित भूमिका त्यांनी घेतली नाही. यामुळे निश्चितच धनंजय मुंडे यांना फायदा झाला."

राजकीय विश्लेषकांच्या मते देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची अत्यंत घनिष्ठ मैत्री होती.

धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या राजकारणाचा अभ्यास करणारे मुक्त पत्रकार अनिरुद्ध जोशी सांगतात, "राजकीय पटलावर मुंडे-फडणवीस विरोधात दिसत असले तरी, मित्र म्हणून एकमेकांच्या अत्यंत जवळ होते. गोपीनाथ मुंडे विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस त्यांच्या जवळचे होते. विधानसभेत एखाद्या विषयावर महत्त्वाची नोट बनवण्यासाठी, माहिती देण्यासाठी फडणवीस कायम गोपीनाथ मुंडेंच्या सोबत रहायचे. धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबातीलच. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत ते कायमच असायचे. तेव्हापासूनच मुंडे-फडणवीस एकमेकांची शैली चांगले ओळखतात."

देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Facebook/DhananjayMunde

1990 च्या दशकात देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. वयाच्या 27व्या वर्षी 1997 मध्ये फडणवीस महापौर बनले. त्यानंतर दोन वर्षांत त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली.

परळीच्या स्थानिक राजकारणाचा अभ्यास असलेल्या कैलास तांदळे यांनी सांगितलं की, "युवा मोर्चात फडणवीस-मुंडे एकत्र काम करायचे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अनेकवेळा नागपुरहून परळीला येत असत. तेव्हापासून दोघांमध्ये चांगला संपर्क आहे.तसेच फडणवीसांचा महापौर ते आमदार होण्याचा प्रवास परळीतून सुरू झाला असं म्हटलं तर अयोग्य ठरणार नाही. युवा मोर्चात सहकारी असल्याने धनंजय मुडेंनी विधासभेसाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव लावून धरलं. फडणवीसांना तिकीट मिळण्यात मुंडे यांची महत्त्वाची भूमिका होती."

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात पाउल ठेवलं होतं. धनंजय मुंडे देखील भाजपच्या संघटनांमधून युवा मोर्चाचे पदाधिकारी बनले होते.

धनंजय मुंडे यांच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा गोपीनाथ मुंडेसोबत चांगला कनेक्ट झाला.

तर अनिरुद्ध जोशी म्हणतात, "मुंडे-फडणवीस घराण्यात घरचे संबंध आहेत. उमेदीच्या काळात मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस गोपीनाथ मुंडे यांच्याच घरी रहायचे."

संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवणार?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबर रोजी शरण आले. सीआयडी कार्यालयातच त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना केजला पाठवण्यात आलं.

या प्रकरणातील इतरही आरोपीना अटक झाली आहे. मात्र सगळ्यात जास्त चर्चा होतेय ते खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांची. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता टीका केली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, "राज्यात कायदा सुव्यस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. एका सरपंचाला उचलून नेलं जातं आणि त्याचा खून केला जातो. वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे. वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे. ज्या नेत्याचं पाठबळ या प्रकरणातील आरोपींना असल्याचं बोललं जातंय, त्या नेत्याला मंत्रीपद दिलं जातं."

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे

फोटो स्रोत, FACEBOOK/WALMIKKARAD

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "या प्रकरणातील एक आरोपी वाल्मिक कराड याची गुन्हेगारी पार्श्वभूमी बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पोरांनाही माहिती आहे. वाल्मिक कराडने कोणालीही उचलावं, कोणालाही मारावं आणि त्याचा मृतदेह गायब करावा असा आजपर्यंतचा बीडचा इतिहास आहे. मंत्रिमंडळाची स्थापना होण्याआधी हे सगळं घडतं आणि त्याची दखलीही घेतली जात नाही. चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करताना दिसतात, हे संस्कारक्षम राज्याची मानहाणी करणारं आहे."

वाल्मिक कराड यांना धनंजय मुंडे यांचं संरक्षण असल्याचा आरोप बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटलं की, "पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर पालकमंत्रीपद भाड्यानं दिल्याचं म्हटलं होतं. ते वाल्मिक कराडला दिले होते का, असा सवाल त्यांनी केला."

ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात की, "महाराष्ट्रातील नेत्यांवर याआधी देखील भ्रष्टाचार आणि इतर आरोप झाले आहेत. या प्रकरणात मात्र आधी अपहरण, खंडणी आणि हत्या झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रतिमेवर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. खरंतर धनंजय मुंडे यांनीच राजीनामा देऊन या प्रकरणापासून लांब राहायला हवं होतं. मात्र त्यांचा राजीनामा न घेऊन त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर कुरघोडी केली असल्याचं दिसत आहे."

देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे

फोटो स्रोत, Facebook/DhananjayMunde

सुधीर सूर्यवंशी पुढे म्हणाले की, "अजित पवार यांनी या प्रकरणात काहीही न बोलून स्वतःच नुकसान करून घेतलं आहे. त्यांच्या नेतृत्वावरच यानिमित्ताने प्रश्न उभे राहिले आहेत. दुसरीकडे काहींचा असा अंदाज आहे की धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या जुन्या मैत्रीमुळे मुंडे यांना मदत झाली आहे. मात्र याउलट धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेऊन त्यांच्या राजकीय प्रतिमेचं मोठं नुकसान करण्याचा प्रयत्न होतो आहे का? हे तपासलं पाहिजे. खरंतर भाजपने ज्या ओबीसी मतांच्या जोरावर राज्यात एवढा मोठा विजय मिळवला त्याच समाजातील नेत्यांना अशा पद्धतीने अडचणींना आणून, त्यांचा प्रभाव कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. भाजपला या समाजाची मते हवी आहेत पण या समाजाचा मोठा जनाधार असलेला एकही नेता राज्यात उदयास यावा असं त्यांना वाटत नाही की काय अशी शंका येऊ लागली आहे."

या सगळ्या आरोपांना उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड हे त्यांचे सहकारी असल्याचं कबूल केलं आहे. यासोबतच माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात सीआयडी चौकशी लावली आहे." या प्रकरणात त्यांचा कुठेही संबंध नसल्याचं देखील मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदापासून मात्र त्यांना लांब राहावं लागेल असं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी 6 डिसेंबरच्या संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेतल्या.

या भेटींनंतर धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा झाली. मात्र धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)