पवार कुटुंब पुन्हा एक होण्याबाबत एवढ्या चर्चा का सुरू झाल्या? या चर्चांमागे किती तथ्य आहे?

- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का आणि राष्ट्रवादी पुन्हा एकसंध होणार का याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याला निमित्त ठरलं आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आई आशा पवार यांच्या वक्तव्याचं.
काही दिवसांपुर्वी रोहित पवारांची आई आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सुनंदा पवार यांनी देखील पवार कुटुंबीय एकत्र यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती.
कुटुंबातल्या सदस्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आता पडलेली दरी आणि फूट सांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत का याबद्दल चर्चा होते आहे.


आशा पवार काय म्हणाल्या?
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजित पवारांच्या आई आशा पवार पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्या. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना आशा पवार यांनी कुटुंब एकत्र येईल अशी इच्छा व्यक्त केली का, या प्रश्नाला होकार दिला. आशा पवार म्हणाल्या, "हे वर्ष सुखी जाऊदे. घरातले सगळे वाद संपुदे, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे केली आहे."
यावर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना विचारलं की, सगळीकडून संवाद सुरू होत आहेत. दोन्ही पवार एकत्र यावे असं वाटतं का? पांडूरंग ऐकेल का? या दोन्ही प्रश्नांना आशा पवार यांनी होकार दिला.
पण फक्त आशा पवारच नव्हे, तर अजित पवारांसोबत असणारे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा पवार हे आपले दैवत असल्याचं म्हटलं आहे.

आशा पवारांच्या वक्तव्याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, "आम्ही सगळे शरद पवारांना दैवत मानत आलो आहोत. आम्ही जरी राजकीय वेगळा मार्ग स्विकारला असला, तरी शरद पवारांबद्दल आदर आहे. पवार कुटुंब एक झालं तर आम्हाला आनंदच वाटेल. मी स्वतःला पवार कुटुंबाचा सदस्य समजतो. त्यामुळे जर हे घडून आलं, तर मला देखील आनंद होईल."
"माझं एवढंच म्हणणं आहे की, त्यांच्याबद्दलचा सन्मान कमी होणार नाही. उद्या काय होईल त्याची भविष्यवाणी मी आज करत नाही. आम्ही चांगले संबंध ठेवायचा नक्कीच प्रयत्न करू. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला गेलो. त्यानंतर अनेक तर्क वितर्क लावले गेले. मात्र, ते आम्हाला पितृतुल्य आहेत," असंही प्रफुल्ल पटेल यांनी नमूद केलं.

पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजित पवारांसोबत असणाऱ्या, नंतर शरद पवारांसोबत आलेल्या आणि फुटीच्या वेळी अजित पवारांची साथ देणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा दोन्ही पवार एकत्र यावेत, असं म्हटलं. तसेच बजरंगाच्या छातीत जसे प्रभू श्रीराम होते, तसे माझी छाती फाडली तर शरद पवार दिसतील, असंही वक्तव्य केलं.
झिरवाळ म्हणाले, "विरोधातला माणूस असो की सोबतचा राष्ट्रवादीतल्या दोन्ही गटातील लोकांना वाटतं की, दोन्ही पवार एकत्र यावेत. राजकारणात काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडून गेल्या आहेत. आम्ही चूक केली असं म्हणा किंवा बरोबर केलं असं म्हणा. पण आम्हाला विश्वास होता की, आम्ही शरद पवारांना सोडून गेलं, तर ते आम्हाला वेगळं समजणार नाहीत. म्हणून आम्ही तो निर्णय घेतला."
"दोन्ही पवार एकत्र आले पाहिजे ही पांडुरंगाला विनंती करतो. मी पांडुरंगाच्या शेजारी शरद पवारांना मानतो. मी शरद पवारांना प्रभू श्रीरामांच्या जवळचं स्थान देतो. आता मी पवारांकडे जाऊन लोटांगण घालून पाया पडणार आहे. आमच्यासारख्या अनेकांची अडचण झाली आहे. त्यामुळं काहीही करा, पण एकत्र या असं म्हणणार आहे," असं झिरवाळ यांनी नमूद केलं.
राष्ट्रवादीतली फूट आणि आरोप प्रत्यारोप
पवार कुटुंबातली दरी मिटावी अशा आशयाची वक्तव्य आता येत असली, तरी फूटीनंतर मात्र बरंच काही घडलं आहे.
जुलै 2023 मध्ये अजित पवार आणि त्याच्यासोबत इतर नेते महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूका त्यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत महायुती म्हणून लढल्या. लोकसभेला फटका बसला असला, तरी विधानसभेत मात्र त्यांच्या पक्षाची कामगिरी सुधारली. या दरम्यान लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, कौटुंबिक पातळीवर आरोप प्रत्यारोप होत राहिले.
लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली. नणंद भावजयीच्या या लढतीत कुटुंबातल्या सदस्यांमध्ये कोण कोणासोबत हे सिद्ध करण्यासाठी चढाओढ झाली.
याच निवडणूकीत सुप्रिया सुळे यांनी नेमका काय विकास केला असा प्रश्न अजित पवारांनीच विचारला होता.
याशिवाय राबवल्या गेलेल्या प्रकल्प आणि विकास कामांचं श्रेय घेण्यासाठीही चढाओढ सुरू होती. लोकसभेनंतर मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना कुटुंबातली लढत ही आपली चूक असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं.

फोटो स्रोत, Facebook
मात्र त्या निवडणुकीत पुन्हा कुटुंबातले सदस्य एकमेकांसमोर आले. युगेंद्र पवारांच्या उमेदवारीनं काका पुतण्यातली लढाई होत असताना शरद पवारांनी आपलं घर फोडलं, असा आरोप अजित पवारांनी जाहीर सभेत केला.
यावेळी अजित पवार भावनिक झालेले देखील दिसले. शरद पवारांनी मात्र त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांची नक्कल केली. यानंतर अगदी अजित पवारांची आई (युगेंद्र पवारांची आजी) आशाताई पवार नेमक्या कोणासोबत यावरूनही वक्तव्ये झाली.
अजित पवार त्यांना आपल्यासोबत सभेला घेऊन गेले, तर दुसरीकडे अजित पवारांचे भाऊ आणि युगेंद्र पवारांचे वडिल श्रीनिवास पवार यांनी आपल्या आईची तब्येत ठीक नसतानाही अजित पवारांनी त्यांना सभेला आणल्याचा आरोप केला. तसेच त्यांना येण्याची इच्छा नसल्याचंही म्हटलं.
कुुटुंबातील आरोप प्रत्यारोप या पातळीवर होत असताना दरवर्षी एकत्र होणाऱ्या दिवाळीलाही पवार कुटुंब एकत्र दिसलं नाही.
दोन घरांमध्ये दोन पाडवे आणि भाऊबीज साजरी झाल्याचे फोटो समोर आले. मात्र, निवडणुकीपुर्वी बीबीसी मराठीशी बोलताना युगेंद्र पवारांनी पवार कुटुंबाची पुढची दिवाळी एकत्र होणार असल्याचं म्हटलं.
नेमकं काय घडलं?
अर्थात फक्त आशाताई पवारांचं वक्तव्य हे एकच कारण या चर्चांमागे नाही. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आणि केली जाणारी वक्तव्ये ही देखील या दृष्टीनं महत्वाची ठरत आहेत.
लोकसभा निवडणूक झाल्यानंतरच सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीला गेल्याच्या चर्चा सुरू होत्या. विधानसभा निवडणूकीनंतर सत्तास्थापनेला विलंब होत असताना स्वतः अजित पवारच शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीसाठी सहकुटुंब पोहोचले.
यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेतेही उपस्थित होते. ही भेट शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचं अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान अजित पवार यांच्या विजयाला आव्हान देणारा ईव्हीएम तपासणीचा अर्ज युगेंद्र पवारांनी मागे घेतला.
दुसरीकडे मविआकडून ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जात असताना सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमबद्दल काही वक्तव्य करणं टाळलं.
हे सुरू असतानाच अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुनंदा पवार यांनीही दोन्ही पवार एकत्र यावेत असं वक्तव्य केलं.
दोन्ही पवार एकत्र येतील का?
याविषयी बोलताना सकाळचे संपादक सम्राट फडणीस म्हणाले, " राजकीय नेत्याच्या कुटुंबातली राजकारणाबाहेरची व्यक्ती राजकारणासंदर्भात एखादं वक्तव्य करते, तेव्हा त्याचे काही विशिष्ट अर्थ असतात. या व्यक्तीला संबंधित नेत्याची मानसिक जडणघडण पुरेशी माहिती असते. सार्वजनिक जीवनातल्या घडामोडींचा त्या व्यक्तीवर होणारा परिणाम माहित असतो. कुटुंबात होणाऱ्या चर्चा माहित असतात."
"या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या मातोश्रींच्या विधानाकडे पाहिले, तर दोन्ही पक्षांनी एकत्र यावे याबद्दल कुठे ना कुठे चर्चा झाली असणार याबद्दल शंका वाटत नाही. राजकीय दृष्टीकोनातून पाहिल्यास यामध्ये काही गैर आहे असंही नाही. काँग्रेस विचारांचे अनेक पक्ष निर्माण झाले. अनेकदा ते एकत्रही आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या विचारांचा पक्ष आहे."
"एकाचे आता दोन पक्ष आहेत. त्यामुळे पुढे मागे हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तीन पक्ष आता महाराष्ट्रात आहेत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. विधानसभा निवडणूकीनंतर अजित पवार यांचा पक्ष अधिक बलवान आहे."
"अशावेळी शरद पवार यांच्या सोबतच्या काही आमदारांना अजित पवार यांच्या पक्षासोबत जुळवून घ्यावेसे वाटले तर ते चुकीचे नाही. गेल्या 10 वर्षात विरोधी विचार म्हणजे मुळापासून उखडून टाका असा एक विचित्र समज प्रस्थापित होत गेला आहे."
"या समजापायी विषारी आणि विखारी भाषेमध्ये परस्परांवर टीका टिप्पणी होते. स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी काही एक दोन नेतेच शक्य तेवढी खालची पातळी गाठतात. परिणामी एक दोन नेत्यांमुळे वेगवेगळ्या पक्षांचे परस्परांमधले संबंध बिघडतात. दोन्ही राष्ट्रवादींच्या संभाव्य एकत्रीकरणाचा विचार केला तर असे उपद्रवी नेते अडथळा ठरतील हे निश्चित आहे."

ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांच्या मते, "अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजपसोबत जाणं. त्यामुळे आत्ता पवार काही निर्णय घेतील, असं वाटत नाही. ते राज्यसभेवरुन निवृत्ती घेतील त्यानंतरचा हा प्रश्न आहे. पण ते स्वतः निर्णय घेण्याऐवजी नेत्यांवर हा निर्णय सोपवतील. अर्थात त्यांनी संवादाची दारं मात्र उघडी ठेवली आहेत. सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमबद्दल न बोलणं, युगेंद्र पवारांनी निवडणूक निकालाला आव्हान करण्याचा निर्णय बदलणं किंवा अजित पवारांनी रोहित पवारांविरोधात सभा न घेणं यातून हे दिसतंय."
एकत्रीकरण की आणखी फूट?
ही चर्चा होत असताना त्याला आणखी एक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात असलेल्या काही नेत्यांनी त्यांची साथ सोडण्याच्या चर्चांची.
यात अनेक वरिष्ठ नेत्यांची नावं चर्चेत आहेत. काहींना मंत्रीपदं देखील दिली जाणार असल्याचं बोललं जातंय. पण या चर्चा सुरू असताना ही वक्तव्यं मात्र बहुतांश अजित पवारांसोबत असलेले नेतेच करत आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याकडून मात्र असे कोणतेही संकेत मिळताना दिसत नाहीत.
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपण अधिक जोमाने कामाला लागुया, अशी पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली.
त्या पाठोपाठ आता 8 आणि 9 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर त्यांनी मुंबईत राज्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही आयोजित केल्या आहेत.
आशाताई पवारांच्या वक्तव्याच्या निमित्ताने पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या नुसत्या चर्चा ठरणार की त्यापेक्षा काही वेगळं घडणार हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईलच.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











