लोकसभेनंतर 5 महिन्यात असं काय झालं, ज्यामुळे मविआ कोलमडली? - प्रा. सुहास पळशीकरांचं विश्लेषण

फोटो स्रोत, ANI
- Author, अभिजीत कांबळे
- Role, संपादक, बीबीसी मराठी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीनं स्पष्ट बहुमत मिळवलं, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना एकत्रितरित्या 50 जागांचा टप्पाही ओलांडता आला नाहीय. महाराष्ट्रातला गेल्या काही निवडणुकांमधील हा अभूतपूर्व निकाल मानला जातोय.
लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयातील एक महत्त्वाचं कारण असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र, या विजयाला आणखीही घटक कारणीभूत आहेत, हे निश्चित. हे घटक कोणते आणि महायुतीच्या विजयाचे नेमके राजकीय अर्थ काय, हे आपण या विश्लेषणातून समजून घेणार आहोत.
बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. सुहास पळशीकर यांच्याशी संवाद साधून, महाविकास आघाडीच्या पराभवाचे आणि महायुतीच्या विजयाचे राजकीय अर्थ जाणून घेतले.
प्रा.डॉ. सुहास पळशीकरांची सविस्तर मुलाखत जशीच्या तशी बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी आम्ही इथे देत आहोत.
प्रश्न - निकालाबाबत जेव्हा काही अंदाज व्यक्त केले जात होते किंवा जे एक्झिट पोल आले होते, त्यामध्ये 'महायुती जिंकू शकते' असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, सातत्यानं असंही म्हटलं जात होतं की, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात 'काँटे की टक्कर' होईल. खूपच अटीतटीचा सामना असेल, असं वाटत होतं. मात्र, निकालातून दिसतंय की, महायुतीच्याच बाजूनं एक लाट तयार झाली होती. महायुतीच्या या विजयामागची काय कारणं असावीत?
डॉ. सुहास पळशीकर - जेव्हा अशा प्रकारची लाट असल्यासारखी परिस्थिती असते, ज्याला आपण म्हणू की, एका पक्षाचा किंवा आघाडीचा स्विप असतो, तेव्हा आपण सामान्यपणे जी विश्लेषणं करतो की, कोणत्या समाज घटकानं कोणाला मतं दिली.
कोणत्या विभागामध्ये कोणत्या प्रकारे अपक्ष पुढे आला. तेव्हा ही सर्व विश्लेषणं एका अर्थानं अप्रस्तुत ठरतात. त्याचं कारण सगळीकडे म्हणजे, आता जेव्हा पक्की टक्केवारी येईल तेव्हा आपल्याला याबाबत कळेल.
मात्र, 48 ते 50 एवढी एकूण मतं महायुतीतील तीन मुख्य पक्षांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली आहेत असं दिसतं आहे.


जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर मतं मिळतात, त्यावेळेस आपल्याला हे मान्य करावं लागतं की, कोणताही एक समाज घटक महायुतीच्या मागे आहे असं नाही. तर विविध समाज घटक आणि समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांमधील लोक, हे सगळे मतदार महायुतीच्या बाजूनं वळल्यामुळे आणि विशेषत: या निवडणुकीत महायुतीनं जे प्रयत्नं केलेत, त्या प्रयत्नांमुळे त्यांच्यामागे याप्रकारचा पाठिंबा तयार झाला.
यामध्ये वेगवेगळ्या योजना येतात, यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या जाहिराती येतात, यामध्ये मोदींच्या सभा येतात, हे सगळे घटक त्यामध्ये येतात. अर्थात ज्याप्रकारचं वातावरण या महायुतीच्या बाजूनं निर्माण करण्याचा प्रयत्न, खासकरून भाजपानं केला, त्याचा वाटा या विजयामध्ये सर्वात मोठा आहे, असं मला वाटतं. तो म्हणजे 'एक है तो सेफ है' ही घोषणा. पण हे त्या घोषणेमुळे झालं असं मात्र मी म्हणणार नाही.

फोटो स्रोत, ANI
प्रश्न - लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की, महाराष्ट्रामध्ये महायुतीची मोठी पीछेहाट झाली होती, त्यांना एकप्रकारे पराभवाचा सामनाच करावा लागला होता. महाविकास आघाडीनं मात्र त्यावेळेस चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. मग असं काय घडलं की, ज्यामुळे गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये हे पूर्ण चित्र पालटलं?
डॉ. सुहास पळशीकर - कसं आहे की, निवडणुकीची विश्लेषणं करताना आपण गणितं बरीच करत असतो. मात्र जर लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहिलं तर असं दिसेल की महायुती जागांच्या बाबतीत हारली होती, पण मतांच्या बाबतीत ती हारली होती असं काही छातीठोकपणे म्हणता येणार नाही.
दोन्ही आघाड्यांची मतं ही इतकी जवळची होती की, त्यामुळे कोणतीही एक आघाडी महाराष्ट्रावर आपला वरचष्मा आहे असं खरंतर त्यावेळेला म्हणू शकली नसती. पण त्यांचं जागांमध्ये रुपांतर होताना महाविकास आघाडीला कुठे यश मिळालं, याचं त्यावेळेस बहुतेकांना वाटलेलं कारण असं होतं की महायुतीमधील जे तीन घटक पक्ष आहेत, त्यांची मतं एकमेकांकडे गेली नाहीत.
म्हणजे ज्याला आपण मतांचं हस्तांतर म्हणतो किंवा ट्रान्सफर म्हणतो ते पुरेसं झालं नाही. खासकरून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे, त्याचा त्यावेळचा परफॉर्मन्स हा फार कच्चा दुवा ठरला. ही त्यावेळची दोन कारणं होती.
आताचे निकाल जर पाहिले, तर या दोन्हींवर त्यांनी मात केलेली दिसते. म्हणजे गेल्या चार महिन्यांत किंवा सहा महिन्यांत काय बदललं हे बघत असताना, हे गणित आपण लक्षात ठेवलं पाहिजे की हे मतांचं ट्रान्सफर होईल, जास्त करून भाजपाची जी मतं आहेत, ती या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना जातील, याची काळजी घेतली गेली. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फरक झाला आहे.
दुसरा जो या चार महिन्यांमधील फरक आहे तो अर्थातच ज्याची सगळेजण आता पुढच्या काळात चर्चा करतील. जणूकाही ती जादूची कांडी असल्यासारखं सगळ्यांना वाटेल ती म्हणजे लाडकी बहीण योजना. त्याच्यामुळे किती यश मिळालं हे आपल्याला कळायला वेळ लागेल.
सकृतदर्शनी हे खरं आहे की वेगवेगळ्या योजना ज्या असतात, विशेषत: ज्या कॅश ट्रान्सफरच्या योजना असतात, त्यांचा फायदा झाला. कारण झारखंडमध्ये आपल्याला दिसतं की कॅश ट्रान्सफरच्या योजनांचा तिथल्या सरकारला फायदा मिळाला. महाराष्ट्रामध्ये ते झालेलं असणं हे सहज शक्य आहे, असं दिसतं.
मग तिसरा मुद्दा म्हणजे ज्याला मायक्रो मॅनेजमेंट म्हणतात तो. ठिकठिकाणी जाऊन भाजपानं ही जी घोषणा दिली की जातीच्या तिढ्यांमध्ये अडकून नको आणि जातीच्या पलीकडे जाऊन आपण हिंदू म्हणून एक आहोत याचा विचार करा.
त्याचा परिणाम हा या सर्वांच्यावर मात करून एक मोठ्या प्रमाणावर यश भाजपाला आणि त्याच्या मित्र पक्षांना मिळवून देण्यात त्याचा फार मोठा हातभार असणार असं मला वाटतं.

प्रश्न - हा जो तिसरा मुद्दा आहे आणि तुम्ही मघाशी 'एक है तो सेफ है' याचाही उल्लेख केला. मग त्यानंतर 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा देखील या निवडणुकीत चर्चेत आली होती. पण हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे, तो महायुतीसाठी कितपत प्रभावी ठरला आणि महाराष्ट्रामध्ये त्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला समर्थन मिळतं का?
डॉ. सुहास पळशीकर - कसं आहे, आतापर्यंत सगळेजण असं मानत होते की या मुद्द्याला महाराष्ट्रामध्ये फार समर्थन मिळणार नाही. अगदी खुद्द अजितदादांनी त्यापासून अंतर राखायचा प्रयत्न केला होता आणि पंकजा मुंडे यांनीदेखील त्याबद्दल असं म्हटलं होतं की याची काही गरज नाही.
पण मला असं वाटतं की, भाजपाच्या ज्या लोकांकडे प्रचाराची सूत्रं होती, त्यांना याचा अंदाज आला होता की असा काहीतरी प्रकार केला पाहिजे किंवा प्रयोग केला पाहिजे की जेणेकरून जातीच्या आधारावर होणारं मतदान ओलांडून जाऊन आपल्याला मतं मिळवता येतील. त्याच्यात ते यशस्वी झाले आहेत.
आपण ते पूर्वापार महाराष्ट्रामध्ये होतं का, याचा विचार करण्यापेक्षा हा प्रश्न विचारला पाहिजे की, हे जर यश मिळालं असेल तर इथून पुढच्या काळात महाराष्ट्राची एक नवीन सामाजिक, राजकीय पुनर्रचना होण्याचा रस्ता, भाजपाच्या आताच्या विजयानं खुला झाला आहे.
मला असं वाटतं की, निश्चितपणे या वेगवेगळ्या योजना आणि सरकारच्या जाहिराती असतील या सगळ्याच्या पलीकडे आणि त्याच्यावर मात करून जातीच्या प्रश्नावर उपाय शोधून हिंदू ऐक्य साधण्याचा जो प्रयत्न भाजपानं केला, भाषणांच्या पातळीवर केला, पण त्याहीपेक्षा समाजमाध्यमं आणि ज्याला आपण व्यक्तीगत प्रचाराचं म्हणतो.
त्या प्रकारच्या प्रचारामध्ये केला, त्याला मिळालेलं हे यश आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. ते जर केलं नाही, तर या निवडणुकीमध्ये भाजपाला आणि त्याच्या मित्र पक्षांनीही महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं यश जे मिळालं, त्याचं स्पष्टीकरण मला वाटतं अपुरं राहिल.

प्रश्न - मागे एकदा तुम्ही याच मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्राच्या राजकारणावर एकतर दक्षिणेचा प्रभाव पडू शकतो किंवा उत्तरेच्या राजकारणाचा पडू शकतो. पण महाराष्ट्रावर उत्तरेच्या राजकारणाचा प्रभाव पडतो आहे असं तुम्ही म्हटलं होतं तो या निवडणुकीच्या निकालानंतर अधिक गडद झाला आहे असं दिसतं आहे का?
डॉ. सुहास पळशीकर - मला असं वाटतं की हो! ते प्रयत्न त्यांचे चालले आहेत. ते महाराष्ट्रात 2014 साली काही प्रमाणात यशस्वी झाले. त्याच्यानंतर झाले नाहीत. हा जो चढउतार चाललेला होता, तो चढउतार बाजूला पडून आता आपल्याला दिसतंय, की मोठ्या प्रमाणावर हा प्रचार भाजपाला उपयोगी पडला आहे.
तो भाजपाला उपयोगी पडलेला असल्यामुळे इथून पुढच्या काळात कदाचित तशाच प्रकारचे प्रयत्न वारंवार होत राहतील. म्हणून मी त्याला पुनर्घटना असं म्हणतोय.

फोटो स्रोत, ANI
प्रश्न - आपण महायुतीला हे यश का मिळालं याविषयी तर बोललोच. पण महाविकास आघाडीकडून या लोकसभेच्या यशानंतर कुठल्या अशा गोष्टी राहून गेल्या, कुठल्या त्रुटी तुम्हाला जाणवतात, ज्या त्यांनी केलं असतं तर कदाचित निकाल या पद्धतीनं येऊ शकला नसता?
डॉ. सुहास पळशीकर - जर हिंदुत्वाचा प्रचार यशस्वी झाला हे आपण मान्य केलं तर मग महाविकास आघाडीला त्यांच्या पराभवाबद्दल किती दोष द्यायचा, याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे थोडक्यात या निवडणुकीचं विश्लेषण करताना मध्यवर्ती मुद्दा कोणता आहे, हे आपण शोधून काढलं पाहिजे.
मला असं वाटतं की मध्यवर्ती मुद्दा हा हिंदुत्वाच्या प्रचाराचा होता. त्याच्यावर उत्तर देणं हे महाविकास आघाडीला शक्य नव्हतं. याचं कारण ज्या पद्धतीनं हिंदू ऐक्याचा प्रचार झाला, त्याला त्यांनी उत्तर दिलं असतं, तर ते हिंदूच्या विरोधी आहेत, असा शिक्का त्यांच्यावर बसला असता.
याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायला लागलो, तर आपल्याला माहित आहे की आज दिवसभरात सगळ्यांनी आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा सगळेजण तज्ज्ञ बनतात आणि तुमचं काय चुकलं ते सांगतात, तसं महाविकास आघाडीची प्रत्येक गोष्ट गेल्या चार-सहा महिन्यातील चुकली, असं सांगितलं जातं आहे.
मला जर विचाराल तर मी असं म्हणेन की दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे या निवडणुकीमध्ये आपला विजय झाला असं त्यांनी जे मानलं, ते चुकीचं होतं. त्यांनी असं मानायला पाहिजे होतं की फक्त भाजपाला पायबंद घातला गेला आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत त्यांनी या पायबंद घातलेल्या भाजपाला अडकवून ठेवण्याचे प्रयत्न केले नाहीत.
दुसरं, त्यांच्यामध्ये पुरेसा समन्वय नव्हता. आपापसात नियोजन नव्हतं, संवाद नव्हता. ही दुसरी चूक कदाचित असेल. पण निवडणुकीचे निकाल मी सुरूवातीला म्हटलो तसं जेव्हा इतके एका बाजूला झुकलेले लागतात, तेव्हा या छोट्या गोष्टींपेक्षा मोठी गोष्ट उतरते ती म्हणजे, कोणाचं नरेटिव्ह म्हणजे कोणी सांगितलेली मध्यवर्ती गोष्ट ही लोकांच्या पचनी पडली आणि कोणाकडे ते सांगण्यासारखं काही नव्हतं.
महाविकास आघाडीची पंचाईत जी झाली ती ही की तुम्ही विरोधी पक्षात असतात त्यावेळेला आम्ही भविष्यात काय देऊ हे तुम्ही सांगता किंवा सरकारनं काय चुका केल्या, ते तुम्ही सांगता. एका अर्थानं त्यामुळे आपण नेहमी इन्कबन्सीची चर्चा करतो. मात्र विरोधी पक्षाला असणारी मर्यादा देखील लक्षात ठेवली पाहिजे.
त्या मर्यादेला ओलांडून जाणं म्हणजेच ज्याला आपण म्हणूया राजकीय कल्पनाशक्ती असणं, त्याचा महाविकास आघाडीकडे अभाव राहिला, असं कदाचित आपल्याला मागे वळून म्हणता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
प्रश्न - आपण पाहिलं की या निवडणुकीमध्ये म्हणजे अगदी एखाद्या त्सुनामी लाटेसारखंच आपल्याला सगळं दिसलं. ज्या पद्धतीनं काँग्रेसचे मोठे-मोठे नेते असतील त्यांनाही नाकारलं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर हे सगळेच. या सगळ्या लाटेमध्ये तुम्हाला हेच दिसतं की साधारणत: हिंदुत्व हाच मुख्य मुद्दा राहिला असेल आणि त्या सोबतीनं मग लाडकी बहीण योजना असेल आणि इतर गोष्टी, जे मायक्रो मॅनेजमेंट केलं, त्या असतील असं वाटतं?
डॉ. सुहास पळशीकर - अर्थातच! जेव्हा तुम्ही या मोठ्या नेत्यांची उदाहरणं देत आहात ती जर पाहिली, तर आपल्याला असं दिसतं की तिथे मग स्थानिक पातळीवर त्या प्रस्थापित किंवा प्रतिष्ठित नेत्याच्या विरोधात एकप्रकारचं ध्रुवीकरण तयार होतं आणि ते नेहमीच होतं.
प्रस्थापित नेत्यांना नेहमीच जसा अॅडव्हान्टेज असतो तसा त्यांना एक धोका असतो की त्यांच्या विरोधात वातावरण तयार होत असतं. जेव्हा इतर घटक त्यांच्या बाजूनं असतात तेव्हा जे वातावरण असतं त्याचा ते सामना करू शकतात.
यावेळेला जे झालं आहे ते असं की मोठे नेते, विशेषत: महाविकास आघाडीचे मोठे नेते जे आहेत त्यांना हा स्थानिक असंतोष आणि आता जे वातावरण बदललं होतं ते बदललेलं वातावरण या दोन्हीचा फटका बसला.

या बातम्याही वाचा -
- 'महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल, विश्वास बसत नाही', निकालानंतर उद्धव ठाकरे भावनिक प्रतिक्रिया
- शरद पवारांचा 'करिष्मा' संपलाय का? पवार आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य आता काय असेल?
- महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? महायुतीत कोण प्रमुख दावेदार आणि शर्यतीत कोण?
- उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं भवितव्य आता काय असेल?

पुन्हा एकदा मी माझ्या आधीच्या मुद्द्याकडे जाईन. जेव्हा असा पुनर्घटन व्हायचा टप्पा येतो ना, त्यावेळेला मोठे पक्ष, मोठे उमेदवार, प्रतिष्ठित उमेदवार असं काही न बघता धडाधडा अनेक उमेदवार पडतात किंवा अनेक उमेदवार त्याच्यातून टिकूनही राहतात अशी आपल्याला उदाहरणं दिसतात.
त्यातून एक आश्चर्यकारक निकाल तयार होतात आणि मग निकालांचं विश्लेषण करणं हे जोखमीचं होऊन बसतं. कारण आपण जर सगळ्या महाराष्ट्राचं चित्र म्हणून काही सांगू लागलो तर त्याचे अपवाद देखील सापडू शकतात किंवा जे नेते पडायचं अन्यथा काही कारण नव्हतं असं आपल्याला वाटतं, ते नेतेसुद्धा पराभूत झालेले असतात.
तिथे मग आपण अनेकवेळेला या निवडणुकांबद्दल बोलताना जो मुद्दा सांगतो तोच स्थानिक घटक अचानकपणे पुढे येतो, की जो इतर ठिकाणी लागू झालेला नसतो. ते एक विचित्र रसायन तयार होतं. म्हणून तुम्ही जो सुरूवातीला शब्द वापरला की एक सुप्त लाट जी या निवडणुकीमध्ये कोणाला फारशी दिसली नाही, सर्वेक्षणांमध्ये ती फारशी दिसून आली नाही, दिसलीच तर एखाद्या एक्झिट पोलमध्ये दिसली.
अशी लाट जेव्हा येते त्यावेळेला लोक अबोल असतात. आधीपासून कोणाच्या विरोधातील राग किंवा कोणाबद्दलचं प्रेम सांगत नाहीत. पण कुठली तरी एक गोष्ट त्यांच्या मनाला पटलेली असते. ती या निवडणुकीमध्ये घडली असं मला वाटतं. महाराष्ट्रात विशेषत: हे फारसं कधी घडलेलं नाही. त्यामुळे आपल्याला याचा थेट अनुभव आतापर्यंत नव्हता.

प्रश्न - आपण जर आता बघितलं की आज महाराष्ट्राचा निकाल लागला, सोबत झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा देखील निकाल लागला आहे. इथे जो हिंदुत्वाचा प्रचार आहे तोच मुद्दा झारखंडमध्ये सुद्धा भाजपाकडून करण्यात आला होता. तिथे त्यांना या मुद्द्यावर यश मिळालं नाही. याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता?
डॉ. सुहास पळशीकर - मला असं वाटतं त्यांना त्याच्यात यश मिळालं की मिळालं नाही याची मोजपट्टी काय ते आधी ठरवावी लागेल? कारण झारखंडमध्ये ते निवडून आले नाहीत किंवा बहुमतानं निवडून आले नाहीत. पण त्यांना त्यांची मतं राखता आली आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.
दुसरा मुद्दा म्हणजे आदिवासी आणि बिगर आदिवासी हे जे दोन पट्टे आहेत किंवा मतदारांचे जे गट आहेत. त्याच्यामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे तरी निदान आदिवासींमध्ये त्यांना अशा प्रकारचा प्रचार यशस्वीपणे करता आलेला नाही, ही त्यांची मर्यादा आहे.
मला असं वाटतं की भाजपाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील यश जितकं त्यांना जितकं महत्त्वाचं वाटेल तितकंच झारखंडमधील अपयश महत्त्वाचं वाटेल. कारण तिथे त्यांनी अगदी सुरूवातीपासून आसामच्या मुख्यमंत्र्यापासून अनेक प्रचारकांना आणून, हेमंत बिस्वा सर्मा यांना आणून असा प्रयत्न केला होता की ज्याला आपण धार्मिक ध्रुवीकरण म्हणतो ते व्हावं.
मात्र, झारखंडमध्ये ते होऊ शकलं नाही याचं कारण तिथल्या आदिवासींमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि त्याचे नेते यांच्याबद्दल असणारी जी काही आपुलकी किंवा आस्था आहे, त्याला तडा देऊन त्याच्या पलीकडे जाऊन हिंदुत्वाचा आकर्षण निर्माण करणं भाजपाला तिथे जमलेलं नाही.
ते कदाचित भविष्यकाळात जमेल आणि त्यामुळे महाराष्ट्रात जे झालं त्यावरून धडा हा आहे की ते होऊ शकतं. कारण तुम्ही म्हणालात तसं हे काही पूर्वापार हिंदुत्ववादी राज्य असं नाहीए. इथला समाज तसा हिंदुत्ववादी नव्हता. पण त्याला हिंदुत्ववादी बनवण्यात आता त्यांना यश आलेलं आहे.
त्यामुळे त्या दृष्टीनं त्यांच्या झारखंडच्या अपयशाकडे पाहावं लागेल. तो त्यांच्या हिंदुत्वाच्या प्रवासातील एक टप्पा आहे.

प्रश्न - महाराष्ट्राला हिंदुत्ववादी बनवण्यामध्ये त्यांना आता यश आलेलं आहे, असं तुम्ही म्हणता आहात, तर महाराष्ट्राची भविष्यातील राजकारणाची वाटचाल कशी असू शकेल? तुम्हाला काय चित्र दिसतं आहे?
डॉ. सुहास पळशीकर - म्हणजे पक्षांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भाजपाला मिळालेलं जे भव्य यश आहे, त्यामुळे बाकीचे सर्व पक्ष झाकोळून जाणार, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मध्यवर्ती सूत्र आहे.
म्हणजे खरंतर, जे कोणी भाजपाचे विरोधक असतील, महाविकास आघाडीसारखे, त्यांनी शिंद्यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांचे आभार मानायला पाहिजेत.
कारण जर एकट्या भाजपानं जागा लढवल्या असत्या आणि असंच समाजात वातावरण राहिलं असतं तर एकटा भाजपा दीडशे जागा पार करून दोनशेच्या जवळ गेलेला असता.
कारण भाजपाच्या यशाचं प्रमाण जर तुम्ही पाहिलंत त्यांनी लढवलेल्या जागांपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त त्यांनी जिंकल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर यश मिळणं याचा अर्थ महाराष्ट्रात 2014 साली ज्या प्रक्रियेची सुरूवात झाली होती, काँग्रेसच्या जागी एक वर्चस्वशाली पक्ष निर्माण होण्याची ती प्रक्रिया मला वाटतं या निवडणुकीनं जास्त गतिमान आणि जास्त पक्की झाली आहे.
म्हणजे इथून पुढच्या काळात भाजपाला महाराष्ट्रात एकट्याच्या जीवावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा रस्ता या निवडणुकीनं खुला झाला आहे. त्यामुळे बाकीचे पक्ष किती टिकतील, किती नाही, किती त्यांच्याबरोबर राहतील, कोण नाही याच्यापेक्षा भाजपाचं महाराष्ट्रातील स्थान हे जास्त पक्कं झालं आहे.
त्यांची स्वत:ची मतं 25 - 26 टक्क्यांच्या आसपास आहेत हे खरं आहे. पण त्याचं कारण त्यांनी जागाच कमी लढवल्या होत्या हे आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारतात जी सेकंड नॉमिनी पार्टी सिस्टम म्हणजे दुसरी प्रबळ पक्ष पद्धती 2014 साली आली ती महाराष्ट्रामध्ये आता या निमित्तानं रुजायला सुरूवात झालेली आहे.

प्रश्न - या सगळ्या मुद्द्यांमध्ये तुम्ही जो आता मुद्दा मांडला त्यालाच धरून प्रश्न आहे की शत प्रतिशत भाजप असं त्यांचं धोरण राहिलेलं आहे. ते इतर पक्षांसाठी आहेच, पण हे आव्हान एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी देखील असेल?
डॉ. सुहास पळशीकर - हो, ते राहणाचं आहे. म्हणजे आता या दोन्ही पक्षांना भाजपाच्या बरोबर राहिल्यामुळे खूप मोठं यश मिळालं आहे.
त्यांची मतं ही त्यामानानं जास्त चांगली आहेत, लोकसभेच्या तुलनेत सुधारलेली आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काळात जी स्पर्धा असणार आहे, ती खरंतर भाजपा आणि त्यांचे मित्र पक्ष यांच्यातच असणार आहे. एका अर्थानं भाजपानं विरोधी पक्ष जवळपास संपवले आहेत. त्यामध्ये ऐक्य निर्माण झालं, ते एकत्र राहिले तर काय होईल हा पुढचा मुद्दा आहे.
पण या दोघांचं बळ मात्र त्या प्रक्रियेत वाढलेलं आहे आणि शत प्रतिशत भाजपा असं ज्यांना वाटतं, त्यांच्या दृष्टीनं आजच्या निकालातील खरी विरोधाभासाची गोष्ट ही असणार आहे की शत प्रतिशत भाजपाचा रस्ता मोकळा झाला.
पण त्या रस्त्यामधील आता नवे मुख्य अडथळे हे आता भाजपाचे मित्र पक्षच असणार आहेत. त्याच्यातही अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा मुख्य पक्ष असणार आहे. कारण त्यांनी वारंवार ही भूमिका घेतली आहे की विकासाच्या पलीकडे हिंदुत्वाचा राजकारण आम्हाला मान्य नाही.
आता त्यांना भूमिका बदलावी लागेल नाहीतर भाजपाला त्यांच्याशी असलेले संबंध हे काही प्रमाणात सावधगिरीचे ठेवावे लागतील. त्यामुळे इथून पुढचं येत्या काही काळातील महाराष्ट्रातील राजकारण हे या कारणासाठी रंजक होईल की भाजपाला आपल्या ज्या महत्त्वाकांक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी हे दोन पक्ष किती मदत करतात किंवा करत नाहीत.

प्रश्न - आपण पाहिलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार कायम रेलेवंट किंवा प्रस्तुत राहिलेले आहेत. मग अगदी 2014 चा निकाल असो की पक्ष फुटल्यानंतरसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी चांगलं यश मिळवून दाखवलं होतं. साधारणत: कायम त्यांच्याकडे या अपेक्षेनं पाहिलं जातं की ते राजकारणामध्ये नवीन चमत्कार घडवतील आणि पुन्हा एकदा आपल्या पक्षाला बळकटी देऊ शकतील. पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता ते आणू शकतील, असं साधारणत: वाटत होतं. पण या विधानसभा निवडणुकीत तसं काही घडलं नाही. शरद पवारांविषयी तुम्ही वेळोवेळी विश्लेषण केलेलं आहे. 'पवार नावाचं प्रकरण' हा तुमचा लेखही चर्चेत राहिलेला आहे. शरद पवारांच्या आताच्या या परिस्थितीकडे आणि आता त्यांच्या पक्षाची जी स्थिती आहे याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता?
डॉ. सुहास पळशीकर - मला वाटतं 2014 सालापासून गेली दहा वर्षे हा प्रश्न सतत राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल विचारला जातो आहे की यांचं पुढचं भविष्य काय आहे. त्याचं कारण असं की त्यांना वारंवार भाजपाबरोबर जाण्याचा मोह पडतो आहे आणि या ना त्या कारणानं पवारांनी त्यांना दर वेळेला भाजपाकडे जाण्याच्या ऐवजी काँग्रेसबरोबर जाण्याची गळ घातलेली आपल्याला दिसते किंवा त्यांच्या राजकारणाची ती दिशा राहिलेली दिसते.
या सगळ्या काळात मला असं वाटतं की दोन वर्षापूर्वी पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर आज आलेलं अपयश हे पवारांच्या सगळ्या राजकारणातील अत्यंत कठीण प्रसंग आहेत की त्यावर मात कशी करायची. त्यांनी दरवेळेला मात केली हे तुम्ही म्हणता आहात ते खरं आहे. पण ती मात करायला एक अवसर लागतो आणि तो अवसर आताच्या या नव्या वर्चस्वशाली पक्ष पद्धतीमध्ये त्यांना किती मिळेल हा त्यांच्यापुढचा खरा आव्हानाचा प्रश्न असणार आहे.
कारण तुम्ही ज्याला मात करणं म्हणता ती त्यांनी पहिल्यांदा केली ती 1985 च्या संकटावर मात केली. त्यावेळेला पोकळी होती. जनता पक्ष, जनता दल यांच्या पडत्या काळामध्ये शरद पवारांना एक भूमिका घेता आली आणि स्वत:चं स्थान पुन्हा प्रस्थापित करता आलं. 1980 साली त्यांचा पराभव झाल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरा टप्पा त्यांनी 1999 मध्ये काँग्रेसशी संघर्ष केला तेव्हा आला.
पण तेव्हासुद्धा त्यांनी पटकन काँग्रेसशी जुळवून घेतलं आणि स्वत:चं मध्यवर्ती स्थान कायम ठेवलं. आताच्या टप्प्यावर त्यांची मतं ही परत एकदा आक्रसली आहेत. 10-11 टक्क्यांच्या आसपास मतं आहेत आणि जागा तर अगदी कमी.
अशा परिस्थितीमध्ये नव्यानं पक्ष पुन्हा कसा उभारायचा हे जर आव्हान असेल तर एकट्या शरद पवारांपेक्षा त्यांच्या पक्षातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या चिकाटी वर अवलंबून आहे. ही जी चमत्काराची भाषा आहे ती मला वाटतं आपल्याला बाजूला ठेवावी लागेल, की एकट्या शरद पवारांनी चमत्कार केले की का त्यांनी त्यावेळेला त्यांच्या बाकीचे लोक गोळा करून त्यांच्या मदतीनं चमत्कार केले.

फोटो स्रोत, Facebook
प्रश्न - असाच प्रश्न उद्धव ठाकरेविषयी आहे. त्यांची पुढची राजकीय वाटचाल कशी अशू शकेल आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य तुम्हाला काय दिसतं आहे?
डॉ. सुहास पळशीकर - दोघांचीही, शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, व्यक्तिश: आणि पक्ष म्हणून या निवडणुकीच्या निकालांनी कोंडी केलेली आहे यात काही शंका नाही. कारण आता त्यांनी इतकं सगळं झाल्यानंतर परत भाजपाकडे जाणं याचे रस्ते बंद झाले आहेत. त्यातच भाजपाच्या विजयामुळे हा प्रश्न खरंतर शिल्लकही राहिलेला नाही. स्वत: भाजपाचाच एवढा मोठा विजय झाला आहे की त्यामुळे त्यांना आता हा पर्याय उरलेला नाही.
उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जर म्हणाल तर मला असं वाटतं की त्यांच्यापुढचं आव्हान हे आहे की ते सतत असं म्हणत आले आहेत की, आम्ही हिंदुत्ववादीच आहोत. त्यामुळे त्यांना जोपर्यंत ते त्यांचं स्वत:चं हिंदुत्व हे भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा कसं वेगळं आहे हे सांगत नाहीत तोपर्यंत त्यांना स्वत:ला उभं राहता येणं अवघड आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस काही म्हटलं तरी एक वेगळ्या प्रकारचा पक्ष आहे की ज्याचं लागेबांध्यांचं किंवा नेटवर्कचं राजकारण करून टिकून राहण्यावरती नेहमी भर राहिलेला आहे. शिवसेनेचे राजकारण हे नेहमीच भावनिक राहिलेलं आहे.
उद्धव ठाकरेंचं त्यांच्या शिवसेनेच्या स्थापनेशी आणि त्यांच्या वडिलांशी असलेलं नातं याच्यातून त्यांचं एक स्थान निर्माण झालेलं आहे. आता ते ओलांडून त्यांना स्वत:ची एक प्रतिमा तयार करावी लागेल की माझं हिंदुत्व हे हिंदू धर्मासाठी असलं तरी भाजपापेक्षा कसं वेगळं आहे, हे त्यांना सांगावं लागेल. अन्यथा त्यांना दुसरा रस्ता आहे तो म्हणजे मराठी भूमिकेकडे परत जावं लागेल.
की जी मराठी भूमिका या निवडणुकीत चालली नाही. पण तिला जागा आहे. जोपर्यंत भाजपाचं सरकार आहे आणि विशेषत: गुजरातचा वरचष्मा असल्याची टीका आहे तोपर्यंत त्यांना तो दुसरा एक रस्ता उपलब्ध आहे. ते काय करतील आपल्याला माहित नाही.
पण मला असं वाटतं की या दोन्ही पक्षांपुढे आणि तुम्ही मघाशी म्हणालात तसं खरंतर हे दोन काय महाराष्ट्रातील सगळ्याच राजकीय पक्षांपुढे अत्यंत कठीण प्रसंग आताच्या निवडणुकीच्या निकालांमधून आलेला आहे. याचं कारण ही निवडणूक महाराष्ट्रातील नव्या पुनर्घटनाला वाट करून देणारी निवडणूक आहे.

फोटो स्रोत, ANI
प्रश्न - शेवटचा प्रश्न असा की या निवडणुकीच्या निमित्तानं महिला मतदारांची खूप चर्चा होते आहे. महिला मतदार या खूप महत्त्वाच्या ठरतील. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की या योजनांचा देखील प्रभाव पडतो. ठिकठिकाणी इतर राज्यांमध्ये देखील लाडकी बहीण सारख्या या योजना आहेत. तर महिला मतदारांचा प्रभाव निर्माण होणं असा काही वेगळा पॅटर्न तुम्हाला दिसतो आहे का?
डॉ. सुहास पळशीकर - पहिली गोष्ट एक लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की महिला मतदार पुरुष मतदारांपेक्षा वेगळं मतदान किती करतात हा विचार भारताच्या संदर्भात एकूण थोडासा गुंतागुतींचा आहे. त्याच्यासाठीचे जे पुरावे आहेत ते अपुरे आहेत.
दुसरा मुद्दा असा आहे की, या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदारांची टक्केवारी ही जशी वाढली तशी महिला मतदारांची टक्केवारी वाढली हे खरं आहे. त्याचा फायदा भाजपाला आणि लाडकी बहीण योजना आणणाऱ्या महायुतीला मिळाला असणार.
पण हा जो एवढा प्रचंड फरक पडलेला आहे, तो काही फक्त महिला मतदारांमुळे पडला आहे असं मला वाटत नाही. त्याचं योगदान निश्चित असणार.
पण जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं जेव्हा मतांमध्ये 10 टक्के फरक पडतो. दोन आघाड्यांमधील फरक दहा टक्क्यांहून जास्त होतो आणि चार महिन्यात प्रचंड प्रमाणात लोकांची मतं फिरतात, त्यावेळेला ते काही केवळ महिला मतदानामुळे होऊ शकत नाही.
पुरुष आणि महिला या दोघांच्याही भिन्न जातींच्या आणि भिन्न आर्थिक स्तरांमधील मतदारांच्या एकूण वेगळ्या निर्णयामुळे हा निकाल लागला, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











