लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळेच महायुतीला प्रचंड यश मिळालं का?

एकनाथ शिंदे, लाडकी बहीण योजना

फोटो स्रोत, ANI

    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठी

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. परंतु महाविकास आघाडीला या निवडणुकीत अपेक्षित यश संपादन करता आलं नाही.

महायुतीच्या या यशामागे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यशस्वी प्रचार आणि महिला मतदारांवर त्याचा दिसून आलेला सकारात्मक प्रभाव असल्याचं जाणकार सांगतात.

महिला मतदारांना लक्ष्य करण्यात महायुती कशा प्रकारे यशस्वी झाली हे या लेखातून आपण जाणून घेणार आहेत.

मध्य प्रदेशातल्या 'लाडली बहना'चा महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग

लाडकी बहीण योजना लाभार्थी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लाडकी बहीण योजना लाभार्थी

जेव्हापासून अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' महायुती सरकारकडून जाहीर केली गेली, तेव्हापासून विधानसभा निवडणुकीत ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचं महायुती सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. खरंतर 'लाडली बहना' ही योजना मध्य प्रदेशमध्ये तेथील निवडणुकीच्या वेळी भाजपकडून राबवण्यात आली होती.

मध्यप्रदेशमध्ये या योजनेचा भाजपला फायदा झाल्यानंतर तसाच प्रयोग महाराष्ट्रात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' निमित्ताने केला गेला, जो यशस्वी देखील ठरला.

ज्याप्रमाणं मध्य प्रदेशात महिला मतदारांना आकर्षित करून भाजप पुन्हा सत्तेत येणं सोपं गेलं अगदी त्याप्रमाणं महाराष्ट्रातही महायुतीला आणि खास करून भाजपला पुन्हा सत्तेत घेऊन येण्यात ही रणनीती फायद्याची ठरली, असं जाणकार सांगतात.

राज्यात प्रथमच महिला मतदारांच्या संख्येत वाढ

राजकीय विश्लेषकांच्या मते, आतापर्यंत कधीच झालं नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रथमच महिला मतदार मतदानासाठी बाहेर पडल्या. महायुती पुन्हा सत्तेत आली तर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ केला जाईल असं प्रचारादरम्यान महायुती सरकारकडून वारंवार सांगण्यात येत होतं.

ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रम

तसंच सध्या देत असलेल्या 1500 या रकमेत वाढ देखील करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. यामुळेच महायुती एवढा मोठा विजय खेचून आणण्यात यशस्वी ठरली. भाजपसहीत अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांनी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार केला.

राज्यातील अनेक महिलांच्या खात्यावर या योजनेमुळं पहिल्यांदा पैसे आले, तर अनेक महिलांची पहिल्यांदाच बँकेत खाती उघण्यात आली.

विशेषतः ग्रामीण भागीतील महिलांमध्ये स्वतःच्या हातात पैसे आल्याने सक्षमीकरण आल्याची भावना निर्माण झाली, याचाच परिणाम म्हणून यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांच्या टक्केवारीत पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची दिसून आली आहे.

अशातच ऐन दिवाळीच्या तोंडावर महिल्यांच्या खात्यावर पैसे आल्याने योजनेची महिला मतदारांमध्ये चर्चा झाली, असं जाणकार सांगतात.

लाल रेष
लाल रेष
एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Facebook/MiEknathShinde

फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"लोकसभेच्या निवडणुकीनंतर सरकारविरोधात शेतकऱ्यांमध्ये तसेच महागाईमुळे सामान्य जनतेमध्ये जो राग होता तो लाडकी बहीण योजनेमुळं कमी झाला असं मला वाटतं. कारण जेव्हा घरातील आई, बहीण यांच्या बँक खात्यावर पैसे येतात तेव्हा आपोआपच तो रोष कमी होतो."

असं मत ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. शिवाय विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांनी देखील "लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली" असं मत व्यक्त केलं आहे.

या योजनेचा परिणाम काय झाला याबाबत बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी म्हणाल्या की या योजनेचा मतदारांवर निश्चितपणे प्रभाव असू शकतो.

"या निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढेलेली दिसून आल्यामुळं यामागे लाडकी बहीण योजनेचा पडलेला प्रभाव हे कारण असू शकतं असं आपण निश्चितच म्हणू शकतो. कारण या योजनेचा फक्त एखादाच हप्ता जर मिळाला असता तर हे घडलं असतं की नाही हे सांगता येणार नाही. परंतु महायुतीनं महिलांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या तोंडावर तीन हप्ते जमा केले शिवाय त्यातला शेवटचा हप्ता अॅडव्हान्समध्ये दिला. त्यामुळं अशाप्रकारे एकदम साडेसात हजार रूपये मिळाल्यानं मतदानात महिलांचा सहभाग वाढलेला दिसून आला."

"ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागातील महिला या योजनेमुळं प्रभावित झाल्याचं दिसतंय. शहरातील मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गातील महिलांना सुद्धा पैसे मिळाले आहेत. कारण या योजनेसाठी महायुतीनं आत्तापर्यंत तरी फार काही निकष लावले नाहीत, सरसकट महिलांना पैसे वाटले. त्यामुळं ग्रामीण भागातील लाडकी बहीण तर आपल्या सोयाबीनला भाव मिळाला नाही हे सुद्धा त्या दिवसांमध्ये विसरून गेली, इतकं सहज या योजनेचं मतांमध्ये रूपांतर झालं," असंही त्या पुढे म्हणाल्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)